चाफा..

खिडकीतला चाफा..
मंद दरवळणारा
स्थिर.. शांत.. अबोल..
लोभस हसणारा..
कधी गंभीर तर क्वचित उदास भासणारा..
पिंपळाचं सळसळणं डोळ्यात झिरपल्यावर,
जसं त्याचं चैतन्यही मनात झिरपत जातं
तसचं फुलून, बहरून झाल्यावर
जेव्हा चाफ्याची पानं-फुलं,
समर्पित भावानं अलगद मातीत
मिसळु पाहतात
तेव्हा निसर्गानेच निसर्गाच्या केलेल्या त्या निर्मम पूजेचं
एक विलक्षण.. आदिम.. चि त्र
मनात रेखाटलं जातं..
त्याच चाफ्याच्या एका किंचित लवलेल्या फांदीतून,
फुलांच्या मागुन दिसणारा तो चंद्र..
कलेकलेने फुलत आणि कोमेजत जाणारा..
फुलणं असो वा कोमेजणं,
जसं त्याच्या प्रत्येक किरणातून
दरवळत असतं,
त्याचं प्रत्येक क्षण रसरसून जगणं..
आणि प्रत्येक क्षणी तितकचं सुंदर दिसणं..
अगदी तसचं, त्याच चंद्राच्या प्रकाशाने रात्रभर उजळून निघणारा
चाफा.. खिडकीतला..
त्याच्या षड्जा सारख्या गंधात,
चंद्राचा एक-एक किरण लपेटून
आपल्या डोळ्यातुन मनापर्यंत
पोचावताना
अधोरेखीत करत असतो,
त्याचं अंधारातलं चंद्रसुंदर मोहरणं
आणि ग्रीष्मातलं निष्पर्ण बहरणं...
खिडकीतला चाफा..
परसातला पिंपळ..
आणि या दोघांच्याही आडुन
डोकावणारा तो चंद्र..
म्हणजे
माझे खरे सखे.. सोबती.. सांगाती..
हक्काचे सवंगडी..
ज्यांचं असणं मी गृहीत धरु शकते
माझ्या बहरण्या-कोसळण्याला ज्यांच्यामुळे अर्थ येतो..
आणि ज्यांच्या समोर मी फक्त 'मी' असते..
आमच्यातलं नातं,
एकमेकांना संपूर्ण स्वीकारणारं..
आकाशाला गवसणी घालत ,
मातीशी नाळ जोडणारं..!!

टिप्पण्या

लोकप्रिय पोस्ट