दुष्काळ
डोई तळपतं ऊन,
पाठी वैशाख वणवा
आस मृगाची घेऊन
गडी ऊन्हात राबला
झाली मशागत पुरी,
रानं पेरणीला ऊभी
पावसाच्या ओढीने
डोळे लागले नभी
उजाडला जून..
नाही पावसाची खूण
मृग सरला कोरडा,
मनात चिंतेने काहूर
कुठे पूराला ऊधाण,
कुठे पडतो मूसळधार
माझा मराठवाडा मात्र
एका सरीसाठी झुरणार
घाम गाळल्या मातीत
नाही इंचाचीही ओल
आषाढ-श्रावणातल्या पेराने
कशी मिळावी भाकर
'ये रे ये रे पावसा' म्हणत
बाळ जाई निजून
त्याच्या 'उद्याच्या' काळजीने
बाप पुरता व्याकूळ
दरसालाचं हे दुखणं,
दरसालाची ही कथा
दुष्काळाचे घास गिळत
होतो जगण्याचा चोथा
~ संजीवनी
टिप्पण्या