बकुलावली
फाटक उघडून शिरीन आत आली तो संध्याकाळ होत आली होती. वाड्याच्या मागच्या बाजूचं आकाश धुरकट केशरी झालं होतं.अंगणातलं बकुळीचं झाड मात्र अंधाराची चाहूल लागल्यागत कातर भासु लागलं होतं. पायाखालचा पाचोळा जड पावलांनी तुडवत ती पुढे आली आणि वाड्याचं दार उघडलं. आई- दादा आठ वर्षांपूर्वी गेले तेंव्हाच तिने ठरवलं होतं, महिन्यातून एकदा तरी इथे येऊन वाड्यावरून हात फिरवून जायचं, मनाच्या कुपीत खोल खोल दडवलेलं बालपणीचं अत्तर श्वासात साठवून घ्यायचं. त्यानंतर अगदी दर महिन्यात जरी जमलं नाही तरी एक-दोन महिन्यातून का होईना पण ती नक्की येऊन जायची. इतरवेळी भागामावशी आणि विठू आठवड्यातून एकदा वाड्याला ऊन-हवा दाखवायचे पण तेवढ्याने शिरीनचं समाधान व्हायचं नाही, आपल्या इथे येण्याने वाड्याला जिवंतपणा येतोअसं वाटायचं तिला. आणि तो जिवंतपणा स्वत:मध्ये साठवत पुन्हा ती तिच्या सरधोपट जगण्याला सामोरी जायची. पण यावेळच्या येण्याला एका गाढ उदासीची किनार होती. तिला हवंहवंसं हे घर मुठीतून वाळू निसटावी तसं तिच्या हातातून निसटू पहात होतं आणि ती जितकी मूठ घट्ट करण्याचा प्रयत्न करत होती तितकी अधिक हतबल होत होती.
विदेशात स्थायिक शिरीनचे दोन मोठे भाऊ आणि तिचा नवरा सलील या तिघांनी मिळून मोडकळीस आलेल्या वाड्याकडे आता लक्ष देणं होत नव्हतं म्हणून तो पाडून तिथे एखादा नवीन व्यावसायीक प्रकल्प उभारण्याचा विचार चालवला होता. अतिशय निसर्गरम्य अशा त्या गावातला, माडीवरुन समुद्र दिसणारा, असा सुंदर पूर्वाभिमूख वाडा आणि ती जागा कोणालाही मोहात पाडणारी होती. सलील तर पेशाने आर्किटेक्ट आणि एक नावाजलेला बिल्डर! त्यात दोन्ही मेहुण्यांकडून समोरुन असा प्रस्ताव येतोय म्हटल्यावर त्यानेही ते मनावर घेतलं होतं. त्यांच्या या विचारात अडचण होती ती एकचं.. शिरीन!
मागच्या पाच-सहा वर्षांपासून त्यांचं हे टुमणं शिरीन उडवून लावत होती. निकराने त्याचा विरोध करत होती. आई-दादांचं वास्तव्य असलेली, दादांच्या रंग-साधनेचा साक्षीदार असलेली, पणजोबांनी बांधलेली ती वास्तू डोळ्यांदेखत जमीनदोस्त होताना पाहणं तिच्यासाठी केवळ अशक्य होतं.
पण, या वर्षीच्या पावसाळ्यात परसातलं आंब्याचं जीर्ण झाड मागच्या पडवीवर पडून पडवीसह जमीनदोस्त झालं आणि तसं विठूने कळवल्यावर शिरीनची चिंता वाढली. काहीतरी निर्णय घेणं आता भाग आहे हे तिलाही कळून चुकलं होतं.
वाड्यात पाऊल टाकताचं आठवणींचे पूर तिच्यावरुन वहायला लागले आणि श्वास कोंडतोय की काय असं वाटून ती तशीचं ओसरीवर टेकली. तिथली धूळही तिला पूसावीशी वाटली नाही. ती ओसरी, बैठक, छतावरचे लाकडी सर, मोठाल्या खिडक्या, मधोमध असलेला चौक, चोहीकडच्या खोल्या, सगळ्यांवरून एक करुण नजर फिरवून तिने डोळे मिटून घेतले. तिथल्या कणाकणाशी जोडलेल्या आठवणी तिच्या डोळ्यांसमोर तरळू लागल्या.
माडीवरच्या खोलीतून आत्ता दादांचा आवाज येईल,
‘अगं, एक फक्कड चहा होऊन जाऊ दे बरं!’
आणि त्यावर आईचं उत्तर, ‘अहो, हा सातवा आहे आता’
सगळा वाडा आत्ता जिवंत होऊन बोलू लागेल असं वाटलं तिला! सकाळी देवघरातून येणारे अण्णांचे मंत्रोच्चार, आई-आजी-काकूची स्वयंपाकघरातील लगबग, पहाटेची शिकवणी आटोपून दादांची माडीवर जायची गडबड.. हे सगळं आत्ता मागच्या क्षणी घडून गेल्यासारखं वाटायला लागलं तिला.
इतक्यात हातातला मोबाईल वाजला आणि ती भानावर आली. फोनकडे पाहिलं तर सलीलचा फोन. आणि तिच्या एकदम लक्षात आलं की कोणालाही काहीही न सांगता आपण गाडी घेऊन तडक गावी निघून आलोय. चिडून लालभडक झालेल्या सलील चा चेहरा आठवून तिने फोन उचलला,
‘शिरीन! आहेस कूठे तू?’
‘गावी आलेय.. साॅरी सांगायला विसरले!’
‘विसरले? आर यू सिरीअस??’
यावर ती गप्पच राहिली. आणि भांडून काही उपयोग नाही हे उमजून सलीलही गप्प झाला. ती शांतता भेदत सलील म्हणाला,
‘लवकर नीघ. आणि निघालीस की कळव’ आणि फोन ठेवून दिला.
ही अशी शांतता गेल्या काही वर्षांपासून त्या दोघांमध्ये मुक्कामालाच आल्यासारखी होती.
तिला काल रात्रीचं तिचं आणि सलीलचं बोलणं आठवलं,
दोन्ही मेहूण्यांशी फोनाफोनी झाल्यावर तो तिला म्हणत होता,
‘ शिरीन, मी तुझ्या भावना समजू शकतो पण बदल हा काळाचा नियम आहे. हा वाडा कधीतरी पडणारच आहे, त्याआधी आपण काहीतरी वेगळा विचार करायला हवा की नको? कीती काळ भूतकाळात जगणार आहेस तू?’
‘ मी भूतकाळात जगत नाहीये सलील, तो जपण्याचा प्रयत्न करतेय! मला समजतय वाडा आज ना उद्या पडणार आहे पण मग आपण तो रिनोव्हेट करु शकतो नं? तो पाडायची काय गरज आहे!’
‘ओह् कम आॅन शिरीन तो रिनोव्हेट करुन तू काय तिथे रहायला जाणार आहेस का? आणि तसं केलं तरी ते आजचं मरण उद्यावर ढकलण्यासारखं नाही का?’
‘ अरे पण..’
‘ ते काही नाही शिरीन, आम्ही निर्णय घेतलाय! तू त्यात सहकार्य करशील अशी अपेक्षा आहे!’
ती निर्बुद्धपणे त्याच्याकडे पहात राहिली आणि काही न सुचून दुसऱ्या दिवशी दुपारी गावाकडे निघून आली.
शिरीनला एकदम हतबल वाटू लागलं होतं. भागामावशींना हाताशी घेऊन तिने वाडा साफसुफ करुन घेतला. स्वयंपाकघरातलं आहे-नाही साहित्य पाहिलं. नसलेलं मागवून घेतलं. जुनी पितळेची भांडी, नाहणीघरातलं मोठं तांब्याचं घंगाळ चकचकीत करुन घेतलं. अंगण, परस स्वच्छ केलं. विठूकडून वाढलेलं गवत छाटून घेतलं. बकुळीचा पार पूर्वीसारखा बसता-उठता केला. वसंतात झाडाला बहर आला की पूर्ण वाडा बकुळफुलांच्या सुगंधाने भरुन जायचा.. शिरीनने तिच्या सगळ्या ऊन्हाळ्याच्या सुट्ट्या या पारावर बसून कविता म्हणत नाहीतर दादांपासून लपून चित्रं काढण्यात घालवल्या होत्या. एकदा दादांनी तिचं एक चित्र पाहून तिची चेष्टा केली होती. त्यांना ते बालीश वाटलं होतं. साहजिकच होतं ते.. एका ख्यातनाम अॅबस्ट्रॅक्ट आर्टिस्ट ला पाना-फुलांची, वस्तू-जागांची चित्रं पाहून असंच वाटलं असतं.. तेव्हापासून शिरीनने एकामोठ्या चित्रकाराची मुलगी असण्याचं दडपण घेतलं. तिची चित्रं दादांना आवडायची नाहीत आणि दादांचा अमूर्ततावाद तिला भावायचा नाही. या अशा जगावेगळ्या द्वंद्वामध्ये तिच्यातली चित्रकला मात्र कोमेजत गेली, ती इतकी की आपण शेवटचं चित्र किती वर्षांपूर्वी काढलं हेही आता तिला आठवत नव्हतं. अंगावरुन एक हलकी वाऱ्याची झुळुक गेली आणि त्या ओळखीच्या सुगंधाने खजील होऊन तिने वर बकुळीकडे पाहिलं तर एरवी वसंतात फुलणारी फुलं, यावर्षी शिशिरातचं एखाद-दुसऱ्या फांदीवर डोकावू लागली होती. आणि त्या सुगंधासोबत तिची ती ओळखीची आणि आवडीची मर्ढेकरांची कविता नकळत तिच्या मनात उमटू लागली. पूर्वी तिचा अर्थ तिला फारसा उमगायचा नाही पण आज मात्र तो सूर्यप्रकाशाइतका स्पष्ट तिला उमगला..
शिशिरर्तुच्या पुनरागमे,
एकेक पान गळावया
का लागता मज येतसे
नकळे उगाच रडावया
पानांत जी निजली इथे
इवली सुकोमल पाखरे
जातील सांग अता कुठे
निष्पर्ण झाडीत कापरे
फुलली असेल तुझ्या परी
बागेतली बकुलावली
वाळूत निर्झर बासरी
किती गोड ऊब महितली
येतील ही उडुनी तिथे
इवली सुकोमल पाखरे
पानांत जी निजली इथे
निष्पर्ण झाडीत कापरे
पुसतो सुहास, स्मरुनिया
तुज आसवे, जरी लागले
एकेक पान गळावया
शिशिरर्तुच्या पुनरागमे
आणि काहीतरी हरवलेलं सापडल्यासारखी ती तशीचं मागे फिरली. माडीवर दादांच्या खोलीकडे धावली. दार उघडून आत आली तो पूर्वीसारखे रंगांचे वास न येता नुसताच बंद खोलीतला कुबटपणा अंगावर आला. तिने मागच्या बाजूच्या सज्जाचा दरवाचा उघडला.. समुद्राची गाज कानांवर आली. खोलीभर ताजी हवा आणि प्रकाश पसरला. दादा गेल्यावरही त्यांच्या सगळ्या वस्तू, रंग, ब्रश, कॅन्व्हास, पेंटींग नाईफ्स सगळं ते ठेवायचे तसंच तिने जपून ठेवलं होतं. त्या सगळ्यावरची धूळ पुसून झाडून साफ केली. आणि बराच वेळ तिथे नुसती बसून राहिली. दादांची बहूतेक चित्रं ते हयात असताना विकली गेली होती. उरलेली दादा गेल्यावर शिरीनने पुण्याला नेली होती. आता या खोलीत उरल्या होत्या त्या केवळ आठवणी. पुण्यातली चांगली प्राध्यापकी सोडून ऐन तिशीत दादांनी या वाड्यात येऊन पूर्णवेळ चित्रकलेचा ध्यास घ्यायचं ठरवलं आणि ते शेवटच्या श्वासापर्यंत कृतीत आणलं. त्यांचा हा निर्णय अण्णांना आणि मोठ्या काकांना फारसा आवडलेला नव्हता पण त्यांनी जाहीर विरोध कधी केला नाही तो दादांच्या निर्मळ, शांत पण तितक्याच ठाम स्वभावामुळे. उदरनिर्वाहासाठी पूढे दादांनी घरीच शिकवण्या घ्यायला सुरुवात केली आणि ते उभ्या कावाचे दादा गुरूजी झाले. शिरीनचा जन्म वाड्यातलाच. दोन्ही भाऊ आई-दादा पुण्यात असताना जन्मलेले आणि नंतर शिक्षणाशाठी पुण्यातच मामाकडे वाढलेले. तिची नाळ वाड्याशी, दादांशी, बकुळीशी त्या दोघांपेक्षा अधिक जोडलेली होती ती यामुळेच.
एक दीर्घ श्वास घेऊन शिरीन उठली, तिने दादांचे ब्रश हातात घेतले आणि तिच्याही नकळत चित्रं काढायला लागली. खूप वर्षांपासून आत कोंडून ठेवलेली खदखद एकदम मोकळी करावी तशी! रंगांची ओढ तिला जन्मजातच होती. दादांना चित्रं काढताना पाहत ती मोठी झाली होती. तिची शैली जरी वेगळी असली तरी दादांच्या चित्रांतली उत्कटता, त्यांची नाईफ कौशल्यं तिनं अचूक टिपली होती. तिला नेहमी वाटायचं, काहीतरी गूढ शोधत राहण्यापेक्षा आपल्या आजूबाजूच्या छोट्या-छोट्या आनंदांना, भावनांना, सुगंधांना, आठवणींना, सृजनाच्या मूळ ऊर्जेला कॅन्व्हासवर चितारायला हवं आणि या साध्या साध्या गोष्टींमधून जगण्याचं सूत्र शोधायला हवं! आणि आज ती नेमकं हेच करु पहात होती. तिचे स्ट्रोक्स कॅन्व्हासचा प्रतल भेदत जात होते आणि त्यावर जे उतरत होतं ते विलक्षण होतं. वाडा, तिचं बालपण, झोपाळा, बकुळीचा पार सारं सारं आता जिवंत होणार होतं. तिची चित्रं अमूर्त नव्हती आणि ती नुसतीच वर्णनात्मकही नव्हती.. ती या दोन्हींचा एक मोहक मिलाफ होती.. ती दुर्बोध नव्हती तर रंगांमधून क्षण-सुगंध-भाव जिवंत करत एक गोष्ट सांगू पहात होती..
शिरीन आता फोनही घेईनाशी झाली म्हणून आठवड्याभराने न राहवून सलील वाड्यावर आला. तसा तो इथे फार कमी यायचा. दादा गेल्यापासून तर जवळपास नाहीच! ते असताना तो यायचा त्यांना भेटायला, त्यांची नवीन चित्रं पहायला. तो त्यांच्या चित्रांचा चाहता होता.. वीस वर्षांपूर्वी शिरीन सोबत त्याचं लग्न झालं तेव्हा तो चेष्टेत म्हणायचा देखील, शिरीन मी तुझ्याकडे नाही तर दादांच्या चित्रांकडे पाहून तुझ्याशी लग्न केलंय!
दादा उत्तम चित्रकार होते पण ते कलेकडे व्यावसायिक दृष्टीने पहायचे नाहीत. ती बाजू सलील ने उत्तम पेलली. तो त्यांच्या चित्रांची प्रदर्शनं भरवायचा, वेगवेगळे परिसंवाद, कार्यशाळा आयोजित करायचा आणि दादांना वाड्याबाहेर पडायला भाग पाडायचा. त्यामुळे दादांचा फायदाच झाला. पण हे सर्व करुन सलीलने कधी कसलं श्रेय घेण्याचा प्रयत्न केला नाही, अशावेळी तो कमालीचा अलिप्त रहायचा.
शिरीन आवाज देऊनही कूठे दिसली नाही म्हणून तो माडीवर आला. आणि तिला चित्रं काढताना पाहून अवाक् झाला. तिने काढलेली चित्रं पाहून तर तो विस्मयाने भरून गेला.. शिरीन मध्ये ही अशी चित्रकला दडली असेल असा त्याने कधी विचारच केला नव्हता. शिरीनने मागे वळून पाहिलं आणि सलील ला पाहून ती आधी थोडीशी गडबडली. पण नंतर स्वत:ला जरासं सावरून तिने त्याला प्यायला पाणी दिलं. तिच्या हातातला ग्लास बाजूला ठेवत तिच्या चित्रांकडे पाहत सलील म्हणाला,
‘आय अॅम साॅरी शिरीन, दादांच्या चित्रांकडे पाहता पाहता माझ्या बायको मधल्या चित्रकाराकडे मी थोडंसं दुर्लक्षच केलं, आय अॅम रिअली साॅरी माय डिअर!’
‘अरे, तू काय मी तरी कुठे पाहिलं होतं स्वत:कडे! डोन्ट बी साॅरी माय डिअर!’
त्या दिवशी तिथे राहून त्याने वाडा, तो परिसर, बकुळीचा पार साऱ्यांची धावती भेट घेतली.
तिचा निरोप घेऊन दुसऱ्यादिवशी निघताना सलील तिला म्हणाला,
‘लवकर ये सगळी चित्रं घेऊन, तुझा हा मॅनेजर तिथे तुझी वाट पाहतोय!’
आणि एकमेकांशी नव्याने ओळख झाल्यासारखे दोघांचेही डोळे आर्त झाले.
जवळपास महिनाभर शिरीन भारावल्यासारखी रंगांमध्ये विहरत राहिली. हळुहळु तिचं मन निवळत गेलं. शांत झालं. आता तो वाडा, तिथल्या आठवणी आणि मुख्य म्हणजे तिला गवसलेली ती स्वत: तिच्यापासून कोणी हिराऊन घेऊ शकणार नव्हतं.
स्वच्छ मनाने ती पुण्याला परत आली तेंव्हा सलील तिच्यासाठी एक सरप्राईझ घेऊन समोर आला. तिच्या गैरहजेरीत त्यालाही कुठेतरी तिची होणारी घालमेल जाणवली होती.. एक भलीमोठी शीट उघडी करुन त्याने तिच्यासमोर टेबलवर ठेवली. त्यावर वरच्या बाजूला प्रोजेक्ट हेडींग होतं.. ‘बकुलावली.. The Spanish Cherry’!!
शिरीन सुखदाश्चर्याने त्याच्याकडे पाहत राहिली. वाड्याचा गाभा तसाच ठेवून त्यात योग्य ते बदल करून वाड्याला एका हेरिटेज व्हिला मध्ये रुपांतरित करण्याचा तो आराखडा होता. सलीलची ती कल्पना अगदी तिच्या चित्रशैली सारखीचं होती.. जुन्याचा नव्याशी सुरेख मेळ साधणारी!!
शिरीन आनंदाने भरुन गेली आणि सोबत आणलेली बकुळफुले ओंजळीत घेऊन तिने ती सलीलसमोर धरली..
@ संजीवनी देशपांडे
टिप्पण्या