एकादशी मागचं विज्ञान!
आषाढस्य प्रथम दिवसे.. म्हणत आषाढ महिना उगवतो आणि साऱ्या महाराष्ट्राला वेध लागतात ते आषाढी एकादशीचे! पावसाची चाहूल तशी ज्येष्ठातच लागलेली असते पण तो मनापासून बरसायला लागतो तो आषाढात! अशा या पावसाला बरोबर घेऊन राज्यभरातून हजारो वारकरी अनावर ओढीने हाती पताका आणि डोईवर तुळस घेऊन निघतात पंढरीला, आपल्या लाडक्या विठूरायाला उरा-उरी भेटण्यासाठी! ते वेड, तो उत्साह, ती भक्ती अलौकिक असते. शतकांपासून अव्याहत चालू असलेली ही वारीची परंपरा म्हणजे महाराष्ट्राने मानाने मिरवावा असा दागिना आहे. पण यावर्षी मात्र चित्र वेगळं असणार आहे. कोव्हिड-१९ मुळे सारं जग ठप्प झालेलं असताना वारीवरही त्याचा परिणाम होणं साहजिक आहे.
यावर्षीची म्हणजे 2020 ची आषाढी एकादशी आहे 1 जुलैला. उरा-उरी जरी नसलं तरी व्हर्च्युअल दर्शन आपल्या सर्वांना घडेल अशी अपेक्षा करुन आपण आजच्या विषयाकडे वळुया. या आषाढीच्या निमित्ताने आज मी एकादशीच्या मागचं माझ्या वाचनात आणि अनुभवात आलेलं विज्ञान इथे शेअर करणार आहे. एकादशी का करावी? याचं उत्तर मी अगदी आत्ता आत्ता पर्यंत, भरपूर छानछान उपासाचे पदार्थ खायला मिळतात म्हणून असंच देत आलेय. पण आता माझ्याकडे एक अर्थपूर्ण आणि थक्क करुन सोडणारं उत्तर आहे, ज्याने माझा तरी या साऱ्या परंपरांकडे पाहण्याचा दृष्टिकोन पुरता बदलून गेलाय. तर तो कसा हे आता आपण पाहू!
भारतीय पद्धतीमध्ये लूनर कॅलेंडरचा वापर होतो. म्हणजे चंद्राच्या बदलणाऱ्या कलांवर आधारित कालगणना! या पद्धतीमध्ये एका महिन्यामध्ये एका पौर्णिमेपासून दुसऱ्या पौर्णिमेपर्यंत चा कालावधी गणला जातो. म्हणजेचं चंद्राला पृथ्वीभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करण्यासाठी लागणारा कालावधी! या एका महिन्याचे पुन्हा दोन भाग होतात. पौर्णिमेपासून अमावस्ये पर्यंतचा कालावधी म्हणजे शुक्ल पक्ष आणि अमावस्ये पासून पुढच्या पौर्णिमेपर्यंतचा कालावधी म्हणजे कृष्ण पक्ष! आता या दोन्ही पंधरवड्यामध्ये एक-एक अशा एका महिन्यात दोन एकादशा येतात. तर आता आपण या व्रतामागचं विज्ञान जाणून घेऊ.
- चंद्राच्या गुरुत्वाकर्षणाचा समुद्राच्या पाण्यावर होणारा परिणाम तर आपल्या सर्वांना माहितच असतो. एकादशी ते पौर्णिमा/अमावस्या या दरम्यान हे गुरुत्वीय बल सर्वाधिक असतं. या दरम्यान कुठलंही वारं किंवा त्यासदृश परिस्थिती नसताना समुद्रात आक्राळ-विक्राळ लाटा तयार होत असतात. कारण चंद्र तुलनेने पृथ्वीच्या जवळ आलेला असतो. केवळ समुद्रच नाही तर पृथ्वीवरच्या समस्त वाॅटर बाॅडीज वर याचा परिणाम होतो. तो आपल्याला जाणवत नाही इतकंच. मानवी शरीरात ७०% पाणी असतं. आपण काहीही समजत असलो तरी मनुष्य हा शेवटी पृथ्वीवरचा एक बायोलाॅजीकल घटक आहे. आणि आपल्याला न दिसणारे असे अनेक परिणाम आपल्या शरीर आणि मनावर होत असतात. चंद्राचा असे बदल घडवण्यात खूप मोठा वाटा आहे. या विषयावर बऱ्याचं ठिकाणी संशोधनंही चालू आहेत. ही यासंदर्भातली एक लिंक - https://pubmed.ncbi.nlm.nih.gov/16407788/
- एकादशीच्या दिवशी पूर्ण उपवास यासाठीचं करायचा असतो.हा एक दिवसाचा उपास आपल्या शरीराला येणाऱ्या ३ दिवसांमध्ये होणाऱ्या बदलांचा सामना करायला मदत करतो.
- आपली त्वचा ही एक सेमी परमिएबल मेम्ब्रेन असते. विद्युत चुंबकीय तरंग यात दोन्ही बाजूंनी प्रवाहित होत असतात. तसंच डाॅ. अर्नाॅल्ड लिबर, मियामी-फ्लोरिडा युनिव्हर्सिटी, यांच्यामते, प्रत्येक नर्व्ह इंपल्स मधुन वाहणाऱ्या ऊर्जेतून आपल्या प्रत्येक पेशीच्या भोवती तेजवलय (Aura) तयार होत असतो. आणि ही छोटी-छोटी विद्यूत चुंबकीय क्षेत्रं (EM fields) बाहेरुन येणाऱ्या तरंगांना न्युट्रल करत असतात. पण पौर्णिमा आणि अमावस्येच्या दरम्यान चंद्राचं आकर्षण आणि चंद्र-सूर्य-पृथ्वी यांच्या मार्गांच्या एकत्रित परिणामामुळे हे इक्विलिब्रियम नाहीसं होतं. आणि त्यामुळे cell membranes weak होण्याची भिती असते. दर महिन्यात याचं ड्युरेशन मध्ये अॅसिल्युम्स मध्ये किंवा इतरत्र मानसिक रुग्णांच्या बिहेवियरमध्ये लाक्षणिक बदल दिसून आल्याच्या नोंदीही त्यांनी केलेल्या आहेत.
- आपल्याकडे जुनी माणसं, अमावस्या-पोर्णिमेला बाहेर पडू नये, प्रवास करु नये असं म्हणतात त्यामागे खरं हे कारण आहे. वातावरणात होणारे हे बदल आपल्या शरीर आणि मनावर आपल्याला न दिसणारा असा परिणाम करत असतात. आणि दीर्घकाळ आपल्या ग्रंथी आणि हार्मोन्सवर असा परिणाम होऊन त्याचं मग आजारांमध्ये रुपांतर होऊ लागतं!
- एकादशीचं व्रत हे भारतीय संस्कृतीमध्ये सर्वात श्रेष्ठ व्रत मानलं गेलंय ते यासाठीचं. हे व्रत तीन दिवसांचं असतं. दशमीला दुपारी एकवेळ च जेवण, एकादशी शक्यतो निर्जळी किंवा मग पाणी-ज्यूस इ. (सर्व प्रकारची धान्य वर्ज्य, साबुदाण्यासहित), आणि मग द्वादशी दिवशी सकाळी लवकर उठून जेवण असा त्याचा क्रम आहे! एकादशी दिवशी पचायला जड कुठलाही पदार्थ पोटात गेला तर त्याचे पुढचे ३-४ दिवस आपल्या मन आणि शरीरावर वर पाहिलेल्या बाह्य घटकांमुळे विपरित परिणाम होतात. एकादशी ते पंचमी आपली पचनसंस्थाही खूपचं स्लो काम करत असते.
- त्यामुळे अल्प किंवा अज्जिबात आहार न घेता चित्तवृत्तीनिरोध करुन आपलं मानसिक आणि शारिरीक स्वास्थ्य जपण्याचा एकादशी हा एक सनातन मार्ग आहे. साऱ्या जगालाही आता आपल्या या एकादशीचं महत्व पटू लागलंय!
मला आठवतंय आई जेव्हा हे करायचं नसतं, ते करायचं नसतं असं मला सांगायची तेंव्हा मी तिला का? असं विचारून परेशान करुर सोडायचे. ती म्हणायची, हे असं चालत आलंय पूर्वीपासून म्हणून! आणि हे उत्तर मला समाधानकारक वाटायचं नाही! मग त्या सगळ्या गोष्टीही निरर्थक वाटायला लागायच्या. पण आता जेव्हा मला एक मुलगी आहे आणि उद्या तिने हे असे प्रश्न मला विचारले तर त्यांचं समाधानकारक उत्तर मला देता यायला हवं आणि आपली संस्कृती योग्य तऱ्हेने पुढे नेता यावी म्हणून हा सारा अभ्यास खटाटोप! जो मला खूप समृद्द करत जातोय.. तुम्हाला सगळ्यांनाही आवडेल अशी अपेक्षा आहे! 😊🙏🏻
ashadhi ekadashi, ashadhi ekadashi 2021, ashadhi ekadashi information in marathi, ashadhi ekadashi essay in marathi
टिप्पण्या