पायरव..




    नागमोडी पायवाटेने पुढे पुढे जात मिनू तिच्या आवडत्या झर्‍यापाशी येऊन थांबली. आणि मग धावत जाऊन तिथल्या ठरलेल्या दगडावर सराईतासारखी चढून पाय खाली पाण्यात सोडून मस्त बसून राहिली. वाहणार्‍या झर्‍याचं झुळझुळ पाणी तिला जामच आवडायचं. आणि दोन-तीन मिनिटं पाय पाण्यात सोडून बसलं की ती तिची आवडीची जादू घडायची. त्या झुळझुळ पाण्यातले छोटे छोटे मासे येऊन तळपायाला गुदगुल्या करायला लागायचे आणि मग ती खुदुखुदु हसत बसायची. आजपण तिचं तेच चालू होतं. तेवढ्यात पलिकडच्या मोठ्या आंब्याच्या झाडाच्या मागून कोकिळेने कुहू कुहू अशी जोरात आरोळी ठोकली. तशी मिनू उठली आणि त्या कोकिळेचा माग काढत आंब्याच्या झाडाच्या दिशेने धावली. आणि मग तिचा आणि कोकिळेचा कुहूकुहू च्या भाषेतला संवाद सुरू झाला. त्या आवाजाच्या दिशेने मान वर करून पाहत कोकिळेला शोधण्याचा तिने खूप प्रयत्न केला. पण रोजच्यासारखी ती कोकिळा काही तिला दाद देईना. मग जा बाई! म्हणत थोडसं फुरंगटूनच मिनूने हाताला येणारी एक कैरी तोडली आणि खाऊ लागली. त्या आंबट गोड कैरीने तिला एकदम गार गार वाटलं. आणि मग इतका वेळ हुलकावणी देणारी ती कोकिळा अगदी तिच्यासमोरच्या फांदीवर येऊन बसली, तिच्याकडे पाहिल्यावर मिनूला अगदी जग जिंकल्याचा आनंद झाला. मग त्या कोकिळेशी तिने भरपूर गप्पा मारल्या. अगदी आईने आज कुठली भाजी केली होती इथपासून गणूची परत फुटलेली पाटी पाहून बाबांनी त्याला कसा चोप दिला तिथपर्यंत तिने तिला सगळं सांगितलं.

थोड्या वेळाने वार्‍याच्या हलक्या झुळुकी बरोबर एक सुरेख आंबट गोड सुवास तिच्या नाकावरून गेला. आणि मग एका हातात धरलेलं फ्रॉकचं टोक सोडून त्या कोकिळेला टाटा करून तिने परत धूम ठोकली. आणि येऊन पोचली त्या टच्च बहरलेल्या करवंदीच्या बनापाशी. जवळ आल्यावर तर अजूनच घमघमाट आला तिला त्या करवंदांचा. हलक्या हातांनी काटयांना चूकऊन तिने पोटात आणि तिच्या त्या फ्रॉक मध्ये जितकी शक्य होतील तितकी करवंद भरली. आणि मग फ्रॉक सावरत पुन्हा त्याचं नागमोडी पायवाटेने परत फिरली.. वाटेत तिला नलू आजी तिच्या अंगणात बसून फणसाच्या आठळ्या भाजताना दिसली. मिनू हळूच कुंपणावरून उडी मारून नलू आजीच्या अंगणात आली, आणि फ्रॉक मधली थोडी करवंद तिने आजीला दिली. आजीने मग त्या बदल्यात थोड्या आठळ्या तिच्या फ्रॉक मध्ये टाकल्या...

 

खिडकी जवळच्या बिछान्यावर बराच वेळ पडून राहिलेल्या मिनूला जाग आली.. तिने इकडे तिकडे पाहिलं आणि शेवटी तिची नजर शेजारच्या व्हीलचेयर वर येऊन स्थिरावली.. आणि मग पुन्हा खिडकीच्या बाहेर पाहत शून्यात हरऊन गेली..



- संजीवनी


टिप्पण्या

लोकप्रिय पोस्ट