गुरुपौर्णिमा


“विठु मामा, नीट बघा नं, इथं थोडं वापल्या सारख्या वाटतय..”          

अथर्व, नुकत्याच पेरलेल्या तुरीच्या पाळीत उकिडवं बसून मातीत तोंड खुपसून, त्याने पेरलेल्या ठिकाणी बी उगवलय का ते पाहत होता. मागच्या चार दिवसांपासून दिवसातून दहावेळा त्याचा हाच उद्योग चालू होता.

त्याच्या त्या कुतुहलाची विठू मामाना मजा वाटली. ते म्हणाले,

“आवो छोटे मालक, एवड्या जल्दि कस वापल ते.. परवा तर पेरणी झाली न्हवं? आन तुमाला शाळंला जायचं न्हाई व्हय.. सकाळधरनं हितच घुटमळताव ते!”

त्यावर जराशा नाराजीनेच अथर्व म्हणाला

जायचय हो विठू मामा! पण तुम्हाला सांगू का, काल माझ्या स्वप्नात हा होला आला होता. मला म्हणाला, तुझी तूर वापलीये चल बघायला आणि मग भुर्रकन उडून गेला.”

अथर्व चा अशा गोड टेपा लावण्याचा स्वभाव माहीत असल्यामुळे विठू मामा म्हणाले,

“अस्सं होय.. शिंगरु झालं, पाडस झालं आता होला बी याया लागला व्हय तुमच्या सोप्नात! तूर वापायला येळ लागत असतो मालक, लई दम्माचं पीक हाय ते.. तुमी कायबी काळजी करू नगसा, बी वापलं की पहिलं तुमाला सांगतो. जावा तुमी बिनघोर शाळंला.”

पाटलाचं घर शेतातच असल्यामुळे, शाळेतला तेवढा वेळ सोडला तर बाकी पूर्ण वेळ अथर्व शेतात विठू मामा सोबतच असायचा. विठू मामा पाटलांचे जुने आणि विश्वासातले गडी होते. त्यांची सारी हयात पाटलाच्या शेतात गेली होती. सुट्टीच्या दिवशी तर दिवसभर अथर्व त्यांच्या मागे मागेच असायचा. आपली कामं संपली की विठू मामा त्याला हरणं दाखवायला घेऊन जायचे.. कधी मोर दाखवायचे.. कधी मधाचं पोळं कसं काढायचं ते दाखवायचे. एकूण काय तर, सत्तरीतले विठू मामा आणि आठ वर्षांचा अथर्व यांची चांगली गट्टी जमलेली असायची.. तो त्यांना दिवसभर तर्‍हेतर्‍हेचे प्रश्न विचारत रहायचा आणि विठू मामा त्याला बी कसं रुजतं इथपासून पेरणी, कापणी, रानभाज्या, माळवं, घार, साप इ.इ. पर्यन्त सगळं न थकता सांगायचे.. बाकीचे म्हणायचे तसं, तू अजून लहान आहेस, तुला नाही कळणार त्यातलं वगैरे काही ते म्हणायचे नाहीत. आणि म्हणूनच विठू मामा अथर्वला फार फार आवडायचे.

रोजच्या सारखा अथर्व शाळेत आला खरा, पण नेहमीप्रमाणे त्याचं अर्धं लक्ष शेतातच होतं. पण त्यातल्या त्यात आज पहिला तास EVS चा असल्याने तो थोडा खुश होता. तो त्याचा सगळ्यात आवडीचा विषय होता आणि तो शिकवणारे राव सर पण त्याला खूप आवडायचे.

सर वर्गात आले. पण आज नेहमीसारखं त्यांनी मुलांना पुस्तक उघडायला सांगितलं नाही. ते म्हणाले,

“मुलांनो, आज काय आहे माहितीये का तुम्हाला?”

सगळी मुलं विचारात पडली. आज कुठलाच डे नव्हता.

राव सर पुढे म्हणाले, “आज गुरुपौर्णिमा आहे! आणि आपण आज याच विषयावर बोलणार आहोत.”

“हा कुठला डे आहे सर?”

अथर्वने विचारलं.

त्यावर त्याच्या बाजूच्या बेंच वरची नेहा म्हणाली,

“अरे वेड्या हा कुठला डे नाइये.. हा हिंदू फेस्टिव्हल आहे. आपल्या बूक मध्ये नव्हतं का?”

हिला जिथे तिथे मी किती हुशार दाखवायचं असतं अथर्व मनातल्या मनात म्हणाला.

सरांना नेहाच्या उत्तराची गम्मत वाटली.

“थांबा मी तुम्हाला सोप्या भाषेत सांगतो.. सरांनी बोलायला सुरुवात केली,

‘..मला सांगा आपण शाळेत टीचर्स डे साजरा करतो की नाही? तसाच हा पण एक दिवस असतो. आजच्या दिवशी आपल्या गुरूचे आभार व्यक्त करून त्यांची पूजा करतात लोक!”

“गुरु म्हणजे टीचर च ना मग सर?” कोणीतरी विचारलं.

“हो तसं म्हणू शकतो आपण. पण गुरूचा अर्थ त्याहीपेक्षा अजून खूप मोठा आहे बरका! गुरु म्हणजे अशी प्रत्येक व्यक्ती जिच्याकडून आपल्याला काही ना काहीतरी शिकायला मिळतं. मग ती व्यक्ती फक्त टीचर च नाही तर अगदी कोणीही असू शकते. कारण आपली शिकण्याची प्रक्रिया ही शाळेबाहेरही सुरूच असते.

मुलांना हे नवीनच वाटत होतं. सर पुढे म्हणाले,

“कोणी आपल्याला हसायला शिकवतं, कोणी स्तोत्र म्हणायला शिकवत, कोणी सायकल चालवायला शिकवत, कोणी झाडं कशी लावायची ते शिकवत, तर कोणी चांगल्या-चांगल्या सवयी शिकवत.. हे सगळे आपले गुरुच असतात”

आता मुलांना ही छान सोपी गुरुची कन्सेप्ट आवडायला लागली. सतत शिस्त लाऊ पाहणार्‍या टीचर्स पेक्षा त्यांना ती जवळची वाटू लागली.

“म्हणजे जो कोणी आपल्याला छान-छान गोष्टी शिकवतो तो आपला गुरु असतो?” अथर्वने कुतुहलाने विचारलं.

सर म्हणाले, “हो!”

“सर पण आजच का असते गुरुपौर्णिमा? आज कोणाची बर्थ अंनिव्हर्सरी आहे?” नेहाने विचारलं.

“फार फार पूर्वी एक खूप महान ऋषि होऊन गेले.. महर्षी व्यास नावाचे! महाभारत माहितीये न तुम्हाला सगळ्यांना?”

सगळ्यांनी होकारार्थी माना हलवल्या.

“हम्म व्यास ऋषींनीच हे महाभारत लिहलय. अशा या महर्षी व्यासांचा आज जन्मदिवस आहे. म्हणून आजच्या दिवसाला व्यास पौर्णिमा पण म्हणतात.”

“पण अजून एक विशेष आहे बरं या दिवसाचा..” सर पुढे बोलू लागले,

“भगवान श्री शंकर माहिती आहेत न तुम्हाला? त्यांना योगशास्त्रात आदिगुरू समजलं जातं. म्हणजे आज आपण जो योगा शिकतो नं त्या योगाचे ते पहिले टीचर होते. जवळपास 15,000 वर्षांपूर्वी त्यांनी आजच्याच दिवशी त्यांच्या सात शिष्यांना म्हणजे स्टुडंट्स ना पहिल्यांदा योगा शिकवला. म्हणून सुद्धा आजच्या दिवशी गुरुपौर्णिमा साजरी केली जाते.”

योगाचा पहिला टीचर!! मुलांना गम्मत वाटली.

मग सगळ्यांनी राव सरांना नमस्कार केला आणि थॅंक यू म्हटलं.

तास संपला. सर निघून गेले. पण अथर्व च्या डोक्यात गुरुपौर्णिमा आणि गुरुची सरांनी संगीतलेली व्याख्या घोळत राहिली.

शाळा सुटली. तो घरी आला. पण रोजच्या सारखा त्याचा खाऊ न खाता हात-पाय धुवून सरळ शेतात गेला.

विठू मामा गोठ्यात गायीला पाणी पाजवत होते. अथर्व ने दुरूनच त्यांना पाहिलं. आणि मग एक मिनिट विचार करून तो बांधावर गेला. तिथली रानफुलं त्यानं टाचा वर करून करून तोडली. त्यांचा एक गुच्छ बनवला आणि तो घेऊन धावत विठू मामा जवळ आला.

त्याच्या पावलांचा आवाज ऐकून विठू मामांनी वळून पाहिलं. आणि ते काही म्हणणार इतक्यात अथर्व जवळ येऊन त्याना म्हणाला,

“विठू मामा इकडे या ना..”

“का वो मालक, काय झालं?” विठू मामांना काही कळेना.

“तुम्ही या तर, या इथे असे थांबा.” त्याने हाताने धरून आणून त्यांना समोर उभा केला. आणि हातातला फुलांचा गुच्छ त्यांना देत म्हणाला,

“थॅंक यू विठू मामा!” आणि अथर्वने विठू मामांना वाकून नमस्कार केला.

विठू मामा एकदम अवघडून गेले, त्यांना कळेचना तो काय करतोय ते.

“आवो आवो ह्ये काय करताय छोटे मालक तुमी?? कुणी बगितलं तर काय मनतील मला!”

“अहो विठू मामा आज की नाही गुरुपौर्णिमा आहे. आमचे सर म्हणाले, जो कोणी आपल्याला छान-छान गोष्टी करायला शिकवतो तो आपला गुरु असतो. तुम्ही माला रोज कित्ती काय काय शिकवता. चिंचा पाडायला, रोप लावायला, मध गोळा करायला, पक्षी ओळखायला.. मग तुम्ही माझे गुरुच झालात की नाही? म्हणून मी तुम्हाला थॅंक यू म्हणतोय!”

विठू मामा अथर्वकडे पहातच राहिले.. नकळत त्यांच्या डोळ्यात पाणी तरळलं..

कधीही शाळेत नं गेलेल्या वृद्ध विठू मामांना आपला जन्म सार्थकी लागल्या सारखं वाटलं..

 

 

-    संजीवनी 


टिप्पण्या

लोकप्रिय पोस्ट