श्रावण आणि पुरण!

 



श्रावण मासी हर्ष मानसी.. वगैरे सगळं लिहण्या-वाचण्या पुरतं ठीक आहे. पण आता कोणी मान्य करो अथवा न करो, श्रावणाची एंट्री ही समस्त महिला वर्गाच्या मनात धडकी भरवणारीच असते. आणि अशा दहशतीमागचा कर्ता-सवरता असतो तो पुरणाचा स्वयंपाक’! श्रावण महिना म्हटलं की सणावारांची गडबड हे तर ठरलेलच असतं.. श्रावणातले शुक्रवार, नागपंचमी, श्रावणी सोमवार, राखी पौर्णिमा, गोकुळाष्टमी, पोळा.. इ.इ. आणि ही तर फक्त सुरुवात.. पुढचा भाद्रपद तर याहून अधिक डेंजर असतो. आणि यापैकी बहुतांश वेळेला करावा लागतो तो हा पुरणाचा स्वयंपाक! याला आपण स्वयंपाकातला गट म्हणू शकतो. बरं, पुरणाचा स्वयंपाक म्हणजे केवळ पुरणपोळी असं समजणार्‍यांना आत्ताच सांगते, तुम्ही घोर अज्ञानात जगत आहात. यूपीएससी चा सिलॅबस जसा व्हास्ट असतो नं तसाच या पुराणा-वरणाच्या स्वयंपाकाचा सिलॅबस पण भल्या-भल्यांना घाम फुटायला भाग पाडतो. एखाद-दुसरी चटणी, कालवलेलं मेतकूट, पंचामृत, कोशिंबीर, एक फोडभाजी, एक पालेभाजी, तळलेले पापड, भजी, कुरवड्या, कटाची आमटी, कढी, साधं वरण, सुधारस, लिंबाची फोड इ.इ. सुग्रास दागिन्यांनी वर्तुळाकार ताट सजलं की मधोमध येऊन विराजते ती लुसलुशीत पुरणपोळी! आणि याला म्हणतात पुरणाचा स्वयंपाक! आणि हा जिला जमतो ती असते खरी सुगरण!

असा हा पुरणाचा स्वयंपाक श्रावणात, चार शुक्रवार, नागपंचमी, पोळा इ धरून किमान 5-6 वेळा तरी होतोच होतो. म्हणजे किमान मराठवाड्यात तरी असं चित्र आहे. मोठ्या शहरांनी आता यातलं फारसं काही उरलेलं नाही.. बहुतांश ठिकाणी तो आऊट ऑफ सिलबस होण्याच्या मार्गावर आहे. पण मराठवाड्यात तरी अजून तसं नाही. आला सण की शिजवा पूरण ही पॉलिसी अजून तरी इथे अस्तित्वात आहे. मराठवड्यातल्या देवांना पुरणाशिवाय दूसरा नैवेद्य चालतच नाही यावर आता माझा ठाम विश्वास बसलेला आहे. पण त्यामुळे मला वाटतं सणांची authenticity अनुभवता येते. साध्या श्रीखंड, खीर वगैरे क्षुद्र पदार्थांवर इथे सणांची बोळवण अजिबात होत नाही. आणि असा चारी-ठाव स्वयंपाक करणार्‍या निष्णात बायका इथे घरोघरी सापडतात. म्हणजे अर्थातच मी आधीच्या पिढी विषयी बोलतेय. माझ्यासारखा तरुण वर्ग अजून तरी ट्रेनिंग फेज मध्येच आहे. एकवेळ नुसती पुरणपोळी वगैरे करणं जमू शकतं, पण समग्र पुरणाचा स्वयंपाक अतिशय कुशलतेने करून, म्हणजे एकीकडे तर्हे-तर्‍हेच्या फोडण्या देत दुसरीकडे योग्य consistency मध्ये पूरण वाटणं (हो, consistency फार महत्वाची असते.. पोळ्यांची कणीक आणि पूरण ह्यांची consistency सारखी असली तरच पुरण सगळीकडे सम-प्रमाणात पसरून सुंदर पोळी तयार होते) किंवा एकीकडे भजी तळत दुसरीकडे लुसलुशीत पोळ्या लाटणं आणि वर प्रसन्न मुद्रेने सगळ्यांना आग्रह करत जेवायला वाढण यासाठी नेक्स्ट लेव्हल ची स्किल्स असावी लागतात. हे साक्षात अन्नपूर्णेचच काम आहे॰

बरं या अशा सगळ्या प्रकारच्या चवी आणि रंगांनी संपन्न अशा आर्टिस्टिक स्वयंपाकाचा आवडीने आस्वाद घेणार्‍या मंडळींचीही इकडे वानवा नाही. बसल्या बैठकीला 3-4 मध्यम आकाराच्या, तुपात थबथबलेल्या पुरणपोळया, सोबतचे सगळे पदार्थ तोंडी लावत, घासागणिक अन्नपूर्णेच कौतुक करत खाणे आणि वर कटाची आमटी पैज लावून ओरपणे यालाही स्किल्सच असावी लागतात. माझ्या लहानपणी सणावारांना एकावेळी 15-20 माणसांची पंगत बसलेली आणि पैजा लागलेल्या मी पाहिल्या आहेत. एक-दोघी जणी वाढायला उभ्या आणि आई किंवा आजी सर-सर गोल गरगरीत पोळ्या लाटत बसलेल्या आणि आम्ही सगळे मस्त चेष्टा-मस्करीसह जेवतोय हे मनावर कायमचं कोरलं गेलेलं चित्र आहे. या बायका हे सगळं तेव्हा कसं पेलायच्या याचं आता नवल वाटतं.

महालक्ष्म्यांचा (म्हणजे गौरीचा, मराठवाड्यात महालक्ष्मी म्हणतात) स्वयंपाक तर अतिशय क्लिष्ट! वर उल्लेखलेले सगळे पदार्थ प्लस सोळा प्रकारच्या भाज्यांचा compulsory वापर, साखरभात, मसालेभात, साधा भात, सोवळयातल वळवट, त्याची खीर, उडीदाचे पापड इ.इ.इ. 

बहुतेक वेळा बायकांचा दिवस जातो यात.

सध्याच्या वेगवान जगात जिथे बायका-मुली बाहेर पडून इतरही कामं करतायत तिथे आता हे सगळं जमवण थोडसं कठीणच आहे. पण वर्षातून एकदातरी हा असा सुग्रास स्वयंपाकाचा घाट घालून तो चाखण्याचा आनंद सगळ्यांनी अनुभवायलाच हवा असं वाटतं. बाहेर तर्हे-तर्हेच्या थाळ्यांचा आस्वाद घेत असताना आपली ही परिपूर्ण, मराठमोळी, चविष्ट पुरणा-वरणाची थाळी आपण नक्कीच जपायला आणि पुढच्या पिढीपर्यंत पोचवायला हवी..:)

टिप्पण्या

लोकप्रिय पोस्ट