सावली - भाग १





भाग - १

   

    अंगणात पहाटेची नीरव शांतता होती. पक्षांची कुजबूज सुरू झाली होती. रोजच्या सारखी मुक्ता लवकरच उठली आणि आवरून, दार उघडून अंगणात आली. समोरच्या पडवी कम सोप्याच्या समोर डाव्या कोपर्‍यातला पारिजात फुलांनी डवरला होता. खालच्या लालसर मातीत त्याची शुभ्र-केशरी फुलं आश्वस्तपणे पहुडली होती. हे मोहक दृश्य पाहिल्या शिवाय तिची सकाळ व्हायचीच नाही. त्या फुलांमधून नाजुक पावलांनी वाट काढत ती झाडाच्या बुंध्याशी येऊन पोचली. रात्री पावसाची हलकी सर येऊन गेल्याची साक्ष त्याची पानं-फुलं देतच होती. तिने मान वर करून एकवार झाडाकडे पाहिलं आणि दोन्ही हातांनी बुंधयाला धरून झाडाला गदागदा हलवलं.. तोच ती लाघव शुभ्र फुलं त्यांच्यावरच्या पावसाच्या थेंबांसकट तिच्यावरून ओघळायला लागली. आणि पाहता पाहता अंगण प्राजक्त फुलांनी भरून गेलं. हे ती रोज करायची आणि रोज तितकीच आंनंदुन जायची. त्याचं आनंदात वर झाडाकडे पाहत असता, फाटक उघडल्याचा किलकिल आवाज तिच्या कानांवर आला. इतक्या पहाटे कोण आलं असावं म्हणून ती फाटकाकडे पाहू लागली..

जड sack आणि हातातला टॉर्च सांभाळत मल्हार आत आला. आणि समोर पारिजातकाच्या सड्या मध्ये उभ्या मुक्ताला पाहून जरासा गोंधळला. टॉर्च सरळ तिच्यावर धरून त्याने तिच्याकडे पाहिलं.. पारिजातकी शुभ्र रंग, तसाच नाजुकपणा.. पण टॉर्च चा लाईट चेहर्‍यावर पडल्याने, मुक्ताने दोन्ही हातांनी चेहरा झाकून घेतला आणि मल्हार ला तो काही दिसला नाही..

“कोण आहे तिकडे? आधी तो टॉर्च खाली घ्या!” मुक्ता जराशी ओरडलीच॰

मल्हारने टॉर्च खाली घेतला आणि तो पुढे आला. त्याने आधी त्याचं जड sack सोप्यावर टेकवलं आणि पायर्‍यांवर बसला.

“ओह गॉड.. काही बदललेलं नाहीये इथे अजून. स्लीपरी घाट आणि कच्चे रस्ते.. आधीचा जेट लॅग आणि आता हा घाट लॅग.. वाट लागलीये माझी..”

बोलता बोलता त्याची नजर पुन्हा मुक्तावर गेली.

ती आता चांगलीच चिडली होती. हा कोण मुलगा, सरळ घरात काय शिरतोय आणि वर आपल्या बोलण्याकडे पूर्ण दुर्लक्ष करतोय.. त्या पारिजातकाच्या सड्यातून हळूच वाट काढत ती त्याच्यासमोर येऊन उभी राहिली.

मल्हार ने मान वर करून तिच्याकडे पाहिलं.. पहाटच्या सावळ्या प्रकाशात केतकी सारखी शुभ्र मुक्ता, तिच्या त्या नीटस नाजुक नाकावर चढलेला राग, काळेभोर बोलके डोळे, नाजुक जिवणी, त्या अंधारातही उठून दिसणारे तिचे लांबसडक केस.. तो पहातच राहिला. मुक्ता अजून चिडली.

“तुमचं निरखून झालं असेल, तर बोलाल का आता?

“ओह सॉरी.. हाय, मी मल्हार! आणि त्याने हात पुढे केला.

त्याच्याकडे दुर्लक्ष करत ती पुढे म्हणाली,

“कोण मल्हार? आणि काय काम आहे?”

“ते.. मी.. मनस्विनी वर्तक..”

मल्हारचं बोलणं मधेच तोडत मुक्ता पुन्हा म्हणाली,

“त्या झोपल्या आहेत. मी काही त्यांना इतक्या अवेळी उठवणार नाही. तुमचं काय काम आहे ते सांगा मला.”

“हो.. हो.. माझ्या इतक्या चौकशा करताय.. तुम्ही नक्की कोण तेही सांगा की एकदा!” मल्हार म्हणाला.

“तुम्ही आमच्याकडे आला आहात, तेही अशा अवेळी! काही न कळवता. मी नाही आलेय तुम्हाला भेटायला. त्यामुळे मी कोण हे तुम्हाला सांगायची मला काहीही आवश्यकता वाटत नाही!” मुक्ता अजूनच ताठर आवाजात म्हणाली.

ठीक आहे नका सांगू..” असं म्हणत तो सरळ आत जायला निघाला.

तशी लगबगीने पुढे होत तिने त्याला अडवलं,

“थांबा, मी अशी तुम्हाला घरात घुसू देणार नाही! ताई उठल्या की मी निरोप देईन त्यांना. तोवर तुम्ही इथेच बसा.” असं म्हणून तिने सरळ दार आतून लावून घेतलं.

मल्हार चांगलाच गोंधळला. त्याने फोन चेक केला पण बॅटरी डेड होती. सो आता काही पर्याय नाही म्हणत तो तिथेच झोपाळ्यावर आडवा झाला.

मनस्विनी वर्तकांचं घर म्हणजे, सह्याद्रीच्या कुशीत पहुडलेलं एक अतिशय सुंदर आणि कलात्मक दालनच होतं. वीस वर्षांपूर्वी तिने हे स्वप्न पाहिलं आणि आज ते ती जगत होती. एका अतिशय कुशल आणि यशस्वी शास्त्रीय नर्तिकेने तिच्या बहराच्या काळात कलाविश्वापासून स्वत:ला तोडून घेत इथे असं दूर कोकणात येऊन राहणं, तेंव्हा सगळ्यांसाठीच आश्चर्याचा विषय ठरलं होतं. अतिशय मोजक्या, तिच्या कठोर चाचणीत उत्तीर्ण झालेल्या काही खूप थोड्या dedicated विद्यार्थ्यांना ती इथे कथ्थकच प्रशिक्षण द्यायची, गुरुकुल पद्धतीने! इथून शिकून बाहेर पडलेल्या कलाकारांना मात्र कलाविश्वात प्रचंड मानाचं स्थान मिळायचं. पण मुळात तिचं शिष्य होणं आणि इथे राहून नृत्य-साधना करणं या दोन्ही गोष्टी खूप कठीण होत्या.

सूर्याची कोवळी किरणं खिडकीतून आत आली आणि मनस्विनीला हलकेच जाग आली. थोड्यावेळाने  ती आवरून बाहेर आली. बाहेर टेबलवर रोजच्या सारखा फुलांचा गुच्छ आज तिला दिसला नाही. तिची चाहूल लागून मुक्ताने दोघींसाठी मस्त कॉफी बनवून आणली. तिला कॉफी आणताना पाहून मनस्विनी म्हणाली,

“काय गं, तू का बनवलीस कॉफी? कांताबाई कुठेयत?”

“ताई अगं, काल रात्री फोन नव्हता का केला त्यांनी, त्यांच्या वाडीत पाणी शिरलय म्हणे पावसाचं. थोड्या उशीराच येणारेत आज.” मुक्ता कॉफी चा मग तिच्या हातात देत म्हणाली.

“अरे हो की, विसरलेच बघ मी. आणि काय मॅडम, परीक्षा झाली म्हणून आता पहाट्चा रियाज बंद केला की काय? फुलं आणलेली दिसत नाहीयेत आज..” तिच्याकडे एक हलका कटाक्ष टाकत मनस्विनीने कॉफीची चव घेतली.

“ताई अगं असं करेन का मी? आणि या अलंकार परीक्षेपेक्षा यावर्षीची नॅशनल कॉम्पटिशन माझ्यासाठी जास्त महत्वाची आहे. रियाज केला मी पहाटे!” मुक्ता उत्तरली.

“अहाहा! सुंदर.. कांताबाई राहुदे, मुक्ते उद्यापासून तूच कर कॉफी.. मस्त झालीये!.. अगं, फुलांचा गुच्छ दिसला नाही आज म्हणून म्हटलं मी..” मनस्विनी म्हणाली.

“अगं हो, तुला सांगायचच राहिलं, पहाटे कोणीतरी मुलगा आला होता.. कोण-कशासाठी काही सांगायला तयार नाही, उलट माझ्याशीच उद्धट पणे बोलला. मग मी त्याला सरळ बाहेरच बसवलं. ताई उठल्यावर या म्हटलं.” आपण काहीतरी खूप मोठी कामगिरी केल्यासारखी मुक्ता बोलत होती.

“अरे देवा..” तिचं बोलणं ऐकून काहीतरी महत्वाचं आठवल्या सारखं मनस्विनी हातातली कॉफी खाली ठेऊन बाहेर धावली.

दार उघडून बाहेर पाहिलं तर मल्हार तिथेच झोपाळ्यावर झोपलेला होता. मनस्विनी हळूच त्याच्या जवळ गेली. आणि हा येणार ते आपण असं कसं विसरलो म्हणून स्वत:ला दोष देत हळूच त्याच्या डोक्यावरुन हात फिरवला. दहा-बारा वर्षांपूर्वी तिने त्याला पाहिलं होतं तेव्हा अगदी 15-16 वर्षांचा होता.. पण आता चांगला ऊंच-धिप्पाड आणि मोठा दिसत होता. त्याला झोप लागलेली पाहून ती परत फिरली तर मागून तिचा हात धरत तो म्हणाला,

“मावशे.... जागाय मी!!” आणि मग उठून त्याने मनस्विनीला कडकडून मिठी मारली.

वयाने मोठा झालेला असला तरी अजून पूर्वीसारखा लगेच येऊन बिलगतो ते पाहून तिलाही मनापासून आनंद झाला. मग त्याला खाली झोपाळ्यावर बसवत तिने प्रश्नांची सरबत्ती सुरू केली,

“मल्हार अरे काय हे.. असा अचानक! तेही लंडन वरुन? आणि गाढवा, काल रात्री कळवतोस येतोय म्हणून? तेही sms ने? मला तर वाटलं गम्मतच करतोयस माझी!”

“हाहा.. अगं हो हो.. किती प्रश्न विचारशील? फ्रेश तरी होऊदे मला.. आधीच पहाटे खूप मस्त पाहुणचार झालाय माझा.. ती मुलगी कोण होती आणि?

पहाटेच्या प्रसंगाची कल्पना येऊन मनस्विनी हसून म्हणाली.. “सांगते तुला.. आणि सॉरी त्या सार्‍या प्रकारासाठी. चल, तू फ्रेश होऊन घे. मी काहीतरी खायला बनवते मस्त!”

“हो.. प्लीज.. खूप भूक लागलीये.” मल्हार तिच्यामागून आत गेला.

आपण काहीतरी मेजर घोळ घातलेलाय हे लक्षात येऊन मुक्ता सरळ रियाजाच निमित्त करून वर पळाली. ती थेट तास-दोन तासांनीच खाली आली. तोवर या मावशी-भाच्याच्या भरपूर गप्पा आणि नाश्ता सुद्धा पार पडला होता. तिला पाहताच मनस्विनीने तिला हाक मारून बोलाऊन घेतलं.

आता ताई आपली चांगली शाळा घेणार असं मनातल्या मनात म्हणत ती डायनिंग टेबलापाशी गेली. तिची मल्हारशी ओळख करून देत मनस्विनी म्हणाली,

“हा मल्हार.. माझा भाचा! जयु ताई विषयी बोलते नं मी अधून-मधून.. तिचा मुलगा. लंडनला असतो. वाईल्डलाईफ बायोलोजिस्ट आहेत साहेब! त्याच्या कुठल्यातरी प्रोजेक्ट निमित्ताने आलाय इथे आपल्या सह्याद्रीचा अभ्यास करायला..”

“हाय..” मल्हारने तिच्यापुढे हात केला..

जराशी गोंधळून त्याच्या हाय ला नमस्ते ने उत्तर देऊन ती म्हणाली,

“ते.. पहाटेसाठी सॉरी..”

तिला मधेच तोडत मनस्विनी म्हणाली,

इट्स ओक मुक्ता, तुझी चूक नाहीये. रात्री उशिरा याचा एसएमएस आला येतोय म्हणून. तुला सांगायचं राहिलं माझं.” तिला जवळ बसवून घेत ती पुढे म्हणाली,

“आणि बरका मल्हार, ही मुक्ता! माझी शिष्या कम ऍडव्हायजर  कम केअरटेकर कम फ्रेंड..”

“ताई काय अगं तू.. मस्करी कर आता माझी!” मुक्ता आणि मनस्विनी दोघी ओळखीचं हसल्या.

बरं मुक्ता, जुवेकरांचा फोन आला होता मुंबईहून. कथ्थक एलिट नावाचा प्रोग्राम अरेंज केलाय नॅशनल कल्चरल डिपार्टमेंटने.. आपल्या क्षेत्रातले सगळे दिग्गज असणार आहेत तिथे. आणि त्यांनी मला परफॉर्मेंस साठी रिक्वेस्ट केलीये.”

“ओहह वॉव ताई.. ही तर आनंदाची बातमी आहे. कधी जातेयस मग?” मुक्ता आनंदाने म्हणाली.

“मी नाही, आपण जातोय!”

“म्हणजे?”

“म्हणजे, माझ्यासोबत तूही तिथे परफॉर्म करणार आहेस! बाकीच्या जणी सुट्टीवर घरी गेल्यायत सो यावेळी ते एक्सक्यूज पण नाहीये तुझ्याकडे. तू येतेयस आणि मी तसं कळवून पण टाकलय.”

“ताई अगं पण..” मुक्ता नाराजीने म्हणाली.

“पण काय?”

“तिथे आई पण असेल!”

“हो.. असेल. त्याने काय फरक पडतो?”

“तुला माहितीये ताई सगळं.. तरी असं विचारतेयस?

“हो माहितीये पण म्हणून तू कधी परफॉर्मच करणार नाहीस का? किती दिवस घाबरणार आहेस?”

यावर मनस्विनी आणि मल्हार दोघांकडे एकदा पाहून काही न सुचून ती तिथून निघून गेली.

मल्हार मात्र पुरता गोंधळून गेला. मुक्ताच्या पाठमोर्‍या आकृती कडे पाहत तो मनस्विनीला म्हणाला,

“काही प्रॉब्लेम आहे का मावशी?”

त्यावर एक उसासा सोडून मनस्विनी म्हणाली,

“हम्म.. आहेही आणि नाहीही!”

“म्हणजे?”

“म्हणजे.. तू अरुंधती अय्यरचं नाव ऐकलंयस?”

“पद्मश्री अरुंधती अय्यर? हो ऑब्वियसली.. त्यांना कोण नाही ओळखत? International Kaththak icon.. पण त्यांचा आणि या सिचुएशनचा काय संबंध?”

“मुक्ता त्यांची मुलगी आहे, मल्हार!”

“काय?? Are you serious?”

“हो!”

“ती इथे काय करतेय मग? आय मीन, त्या अरुंधती अय्यर सगळ्या जगाला कथ्थक शिकवतात.. तिकडे लंडन मध्ये मोठी अकॅडेमी आहे त्यांची! मी गेलेलो एका प्रोग्रामला. स्वत:च्या मुलीला त्या शिकवू शकत नाहीत??”

“शकतात नं! पण मुक्ताला शिकायचं नाहीये तिथे!”

“का?”

“कारण थोडं जगावेगळं आहे.. सांगेन पुन्हा कधीतरी!” मनस्विनीचा चेहरा थोडा चिंताग्रस्त वाटत होता. वातावरण निवळावं म्हणून मल्हार म्हणाला,

“पण मावशे.. हे काय पाहतोय मी? अॅज फार अॅज आय नो, तू एक अतिशय खडूस आणि कडक शिस्तीची गुरु आहेस.. आणि ही मुक्ता चक्क तुझी फ्रेंड वगैरे?”

“हाहा गप्प बस.. तू स्टीरियोटाइप करतोयस मला..  बीइंग स्ट्रिक्ट इज ए प्रीरेक्विसाईट इन अवर फील्ड! आणि मुक्ता विषयी म्हणशील तर, ती आहेच रे तशी. ती माझी आजवरची सगळ्यात प्रिय आणि हुशार शिष्या आहे. लाघवी आहे खूप.”

“हम्म.. पाहिलंय मी पहाटे किती लाघवी आहे ते..”

“हाहा.. कळेल तुला हळूहळू..”

 

मनस्विनीने मेकॅनिक बोलावून, खंडू मामांना मल्हारची घाटात बंद पडलेली गाडी घेऊन यायला पाठवलं. आणि मग मनस्विनी आणि मुक्ता त्यांच्या रियाजाला लागल्या.

अभोगी कन्नडा मधल्या एका सुंदर बंदिशीतली नजाकत मनस्विनी मुक्ताला तिच्या नृत्यभिनयातून उलगडून दाखवत होती.. मुक्ता एकाग्रतेने ते समजाऊन घेत होती. त्या सुंदर नृत्याविष्कारा नंतर अतिशय कुशलतेने समेवर येत मनस्विनी थांबली आणि आता तू.. असं नजरेनेच मुक्ताला खुणावत खाली बसली.

मुक्ता उठली.. त्यांची रियाजाची जागा, घराच्या मागच्या बाजूला अतिशय कल्पकतेने मनस्विनीने तयार करवून घेतली होती. दगडी चबुतरा, त्यावर लाकडी खांब आणि वर कौलांचं छत असा तो ओपन एअर वर्तुळाकार मंडप होता.. चहुबाजूंना गर्द हिरवळ.. नारळी-पोफळीच्या बागा.. पलीकडे टेकडी.. पक्ष्यांची सततची किलबिल.. आणि तिथे घुमणारा मुक्ताच्या पैंजणांचा नाद.. अतिशय मनोहारी असं ते दृश्य असायचं!

एक दीर्घ श्वास घेऊन मुक्ताने ताल धरत तिचा पदरव सुरू केला.. आणि नेहमीसारखी त्या रागात हरवून जात नजाकतीने तिने सम गाठली.. आजूबाजूचे पक्षीही जणू स्तब्ध होऊन तिचं ते हरवून जाणं पाहत राहिले. खूप रेअर्ली कौतुक करणार्‍या मनस्विनीने वाह! म्हटलं.. पण मुक्ताच्या चेहर्‍यावर मात्र समाधान उतरलं नव्हतं.. आणि हे असं नेहमीच व्हायचं.. का कोणास ठाऊक तिला अपूर्णच वाटत रहायचं.. कुठलीतरी मेजर गोष्ट तिच्या नृत्यात कमी आहे असं तिला वाटायचं.. पण कुठली ते काही तिला उमगायचं नाही. Technically ती पर्फेक्ट होती. तिच्या त्या कल्पित पूर्णत्वाचा ध्यास घेत मग ती तास अन तास रियाज करत बसायची.

थोड्या वेळाने मल्हार झोपेतून उठून बाल्कनी मध्ये आला.. त्याची नजर रियाजात मग्न मुक्तावर गेली. ती थकली होती पण रियाज काही थांबवत नव्हती. ती त्याला एकाच वेळी खूप मोहकही वाटली आणि खूप अगतिकही.. कशाचा तरी पछाडल्या सारखा ध्यास घेऊन ती रियाज करत होती. आणि ती गोष्ट काही केल्या तिला गवसत नव्हती. तो विचारात दंग होता. तेवढ्यात मनस्विनी तिथे आली. तिला पाहून तो आधी थोडा दचकला पण नंतर सावरत म्हणाला,

“अगं मला हाक मारायची नं, मी आलो असतो खाली.”

“एकाही हाकेला उत्तर मिळालं नाही म्हणून आलेय वर, साहेब नक्की कशात बिझी आहेत ते पहायला!”

खाली मुक्ताच्या रियाजाकडे पाहून मनस्विनी म्हणाली.

“अगं काही नाही मगाच पासून हा आवाज झोपमोड करत होता माझी! म्हटलं काय चालुये पाहावं तरी म्हणून..”

“माझ्या घरी हा आवाज नवीन आहे तुला? मल्हार.. बेटा, मी मावशीये तुझी! जन्मलास तेव्हा तुझ्या आईच्या आधी मी तुला मांडीवर घेतलं होतं.

“हाहा.. हो माहितीये मावशीबाई.. वाकून नमस्कार!”

“यशस्वी भव! बट एनिवेज, बाकी काय म्हणतोयस? आई-बाबांना भेटून आलास की थेट इकडेचं?”

“हम्म.. विचार होता तसा. पण कशी कोणास ठावूक गाडी इकडेच वळली.”

“काय रे तू.. ताई रागावणार आता!”

तिचा राग कसा घालवायचा ते माहितीये मला. आणि जाणारे गं मी तिकडे पण. पण आधी काम महत्वाचं!”

“अरे हो, नक्की कसलं प्रोजेक्ट आहे?”

“अगं ते थोडसं कॉम्प्लिकेटेड आहे. थोडक्यात सांगतो, सध्या योगा सारखंचं भारतीय आयुर्वेदाविषयीही पाश्चिमात्य देशात आकर्षण वाढताना दिसतय. सो आमची इंस्टीट्यूट सध्या मेडिसीनल प्लांट्सचा अभ्यास करतेय. आणि मला प्रोजेक्ट हेड केलय. या व्हिझीट मध्ये स्पेसिफिकली कोकम निवडलाय. पुढच्या पन्नास वर्षात हवामान बदलाचे त्याच्या वाढीवर आणि पॉप्युलेशन वर काय परिणाम होऊ शकतात अशा संबंधीचा प्रोजेक्ट आहे. सो भटकावं लागणारे सह्याद्रीत 1-2 महिने. वीस स्पॉट्स फायनल केलेयत आम्ही महाराष्ट्र टू केरळ.. फील्ड स्टडी.. sampling.. observation.. etc etc..”

“हात्तिच्या!! आपल्या या कोकमाचा अभ्यास करायला तू लंडनहून इथे आलायस तर!” मनस्विनीला मज्जा वाटली. “बरं चल, जेवण तयार आहे. कांताबाईंनी छान बेत केलाय आज!”

“हो चल..” असं म्हणून त्याची नजर पुन्हा खाली गेली. मुक्ताने रियाज थांबवला होता.

“येईल ती पण.. चल तू!” मनस्विनी हसून म्हणाली.

“हाहा अगं मी जस्ट पाहत होतो.. डोन्ट थिंक अदरवाईज!..

..ए पण मावशे, हिचा प्रॉब्लेम काये नक्की? सार्‍या जगाचं ओझं स्वत:वर असल्या सारखी का वागते ही?”

“ते तू तिलाच का नाही विचारत?”

“नको रे बाबा.. पुन्हा घराबाहेर काढायची मला.” आणि दोघेही मोठयाने हसले.

 

दुसर्‍या दिवशी मल्हार त्याच्या प्रोजेक्ट्साठी वरंधा घाटात गेला. आणि दोन-तीन दिवसांनीच उगवला. इकडे तोवर मुक्ताने मुंबईला जाण्याची मनाची तयारी केली होती. त्या दृष्टीने दोघींचा रियाज पण सुरू होता. पण नाही म्हटलं तरी तिच्या आत कुठेतरी थोडीशी भीती होतीच. पाच-सहा वर्षांपूर्वी मुक्ता घर सोडून इथे आली तेव्हा तिने मनाशी निग्रह केला होता, स्वत:वरची अरुंधती अय्यर नावाची सावली पुसून  टाकून आपली अशी नवीन ओळख निर्माण करायची आणि मगच आईसमोर पायात घुंगरू बांधायचे. तिचं असं मनस्विनीकडे निघून येणं अरुंधती साठी अर्थातच धक्कादायक होतं. पण नेहमीच बर्फासारख्या शांत असणार्‍या अरुंधतीने तिला निघताना केवळ एकच वाक्य म्हटलं होतं, जे काही करशील ते जीव ओतून कर! बास. दात-ओठ खाऊन भांडणं ना तिच्या स्वभावात होतं ना मुक्ताच्या. दोघींच नातं जगावेगळं होतं. आई-मुलीचं ते कधीचं नव्हतं.. अरुंधतीने कायम मुक्ताकडे तिची उत्तराधिकारी आणि शिष्या म्हणूनच पाहिलं आणि त्यामुळेच आईची माया ती मुक्ताला कधी देऊच शकली नाही, तिच्यातली गुरु कायम त्याच्या आड येत राहिली. आणि म्हणूनच मुक्ता तिच्या पासून दूर गेली. एक नृत्य सोडलं तर बाकी कुठल्याच बाजूने ती अरुंधतीची मुलगी वाटायची नाही. अरुंधती खरंतर दाक्षिणात्य, पण मुक्ता मात्र तिच्या बाबासारखी म्हणजेच चैतन्य सारखी पुरेपूर मराठी वळणाची झाली होती. तिला लळाही चैतन्यचाच जास्त होता. आताही दर दिवाळीला ती घरी जायची ती केवळ चैतन्य साठीच. मागच्या दिवाळीत मात्र कधी न भांडणार्‍या या माय-लेकींच चांगलच भांडण झालं. तेव्हापासून तर मुक्ताच मन आईच्या बाबतीत अजूनच कटू झालं होतं.

आणि आता हे असं अचानक तिला आईसमोर स्टेज वर उभं राहावं लागणार होतं. आपण इतरांच्या अपेक्षेस उतरलो नाही तर काय या भीतीने तिचं मन तिला खात होतं. आपल्याकडून थोडीजरी चूक झाली तरी आधी आपली आईच आपल्याला हसेल यावर तर तिचा गाढ विश्वास होता. या सार्‍याविषयी ती मोकळेपणाने कधी मनस्विनी समोर बोलायची नाही पण मनस्विनीला मुक्ताची ही घालमेल जाणवायची. आणि तिच्या मनातून ही भीती घालवण्यासाठीच ती तिला बरोबर घेऊन जात होती.

तिन्हीसांजेला मल्हार आला तेव्हा मुक्ता ओसरीवर कॉफी पित, कित्तीवेळ एकाच फांदीवर बसलेल्या खंड्याकडे पाहत बसली होती.

पायरीवर बसून शूज काढत तो तिला हाय! म्हणाला.

“हाय! झाली का कोकमाची फळं मोजून?”

“हाहा.. मॅडम, फॉर यॉर काइंड इन्फॉर्मेशन कोकमाला पावसाळ्यात नाही स्प्रिंग मध्ये फळं येतात!”

“एवढं माहितीये तर, पावसाळ्यात रस्ते कोरडे नसतात स्लीपरी होतात हेही माहीत असेलच की! आजकाल लोकांना चार दिवस बाहेर राहून आलं की आपला देश उगाच मागास वाटायला लागतो!”

“ओहह.. हाहा.. मेमरी चांगलीये तुझी!”

यावर मुक्ताने त्याच्याकडे नुसताच एक कटाक्ष टाकला आणि पुन्हा कॉफी पिऊ लागली.

“कांताबाई, आल्याचा चहा करा मस्तपैकी!” तिथूनच त्याने कांताबाईंना आवाज दिला आणि मुक्ताकडे पाहून म्हणाला, “इतक्या सुंदर मुलीला इतका तुसडेपणा शोभत नाही!”

“हा टोमणा आहे की कॉम्प्लिमेंट!”

“बोथ!” त्याने हसत उत्तर दिलं.. मुक्ताने मग किंचित हसून त्याच्याकडे पाहिलं.

“मग, कधी आहे तुमचा मुंबईचा प्रोग्राम?” त्याने पुढे विचारलं.

“पुढच्या आठवड्यात!” मुक्ताचा चेहरा पुन्हा गंभीर झाला.

“सो, तू जातेयस!”

“हम्म.. मनस्विनी ताईला दुखवायचं नाहीये मला.”

यावर तो जरासा शांतचं राहिला. आणि अर्थातच मुक्ताही! ती शांतता भेदत मग एक दीर्घ श्वास घेऊन मल्हारच पुढे म्हणाला,

“नक्की कशाला घाबरतेयस तू?”

“म्हणजे?”

“म्हणजे, तू तुझ्या आईसमोर परफॉर्म करायला घाबरतेस की परफॉर्म करायलाच घाबरतेस?”

“एक मिनिट, मी यापैकी कशालाच घाबरत नाही. मला फक्त माझ्या आईला दाखऊन द्यायचय, तिच्याशिवाय पण मी शिकू शकते.. माझी ओळख फक्त अरुंधती अय्यर ची मुलगी एवढीच नाहीये. त्यापलिकडे पण मी कोणीतरी आहे.”

“मग हे तू त्यांच्याजवळ राहून पण करू शकतेस.. त्यासाठी असं दूर राहण्याची काय गरज?”

“गरज आहे! तिथे राहिले तर मी कायम तिची मुलगी म्हणूनच ओळखले जाईन. इथे येईपर्यंत मी फक्त माझं तिच्याशी होणारं comparision च अनुभवलंय. अरुंधती अय्यरची जेस्चर्स, हर स्टाइल.. याचं सततच दडपण! मला अरुंधती अय्यर नाही बनायचं.. मुक्ताच राहायचय. आणि इतकं सगळं करून शेवटी मला ऐकायला काय मिळतं तर, हिला काय सगळं आयतच मिळालय.. नो struggle अॅट ऑल! I don’t want to live in her shadow yar.. want to stand on my own! दॅट्स इट.

हम्म.. दॅट्स इंटेरेस्टिंग.. मग आता तू तुला हवं तसं जगतेयस राइट?”

“हो”

“मग आनंदी का नाहीयेस तू? कसलं तरी दडपण तू आत्ताही घेतलेलच आहेस.. म्हणजे तसं वाटतं तरी!”

यावर मुक्ता क्षणभर शांतच राहिली. कोणीतरी आपल्या मनातला गोंधळ शब्दात मांडतय असं तिला वाटलं पण तिने ते मान्य केलं नाही! ती म्हणाली,

“तुला कोणी सांगितलं मी आनंदात नाहीये! आहे मी. चार दिवसाच्या ओळखीत तू या निकषावर येऊ नकोस. Don’t be so judgemental!”

no no.. not at all.. मी फक्त मला जे जाणवलं ते सांगतोय! Just think over it!”

असं म्हणून मल्हार आत निघून गेला. पण मुक्ता मात्र विचारात पडली.

 

ठरल्याप्रमाणे कार्यक्रमाच्या एक दिवस आधी दोघी मुंबईत आल्या. सगळी तयारी झालेली होती. आता फक्त कार्यक्रमालाच उशीर होता. मनस्विनी नेहमीप्रमाणेच स्थितप्रज्ञ भासत होती पण मुक्ताच्या मनात मात्र प्रचंड गोंधळ सुरू होता. तिला तिचं आणि अरुंधतीचं शेवटचं भांडण आठवलं..

ती परत निघायच्या आदल्या दिवशी अरुंधती तिला म्हणाली,

“मुक्ता, इतकी वर्षं मी काही म्हणाले नाही, पण मला वाटतं आता तू परत यायला हवस. काही महिन्यात अलंकार पण होशील तू सो शिक्षण पूर्ण झालच आहे आता तुझं. तुला माझ्याकडे शिकायचं नव्हतं फाइन. मी समजून घेतलं. पण आता तुझं हे खूळ पुरे. कम बॅक! हा सगळा पसारा पुढे तुलाच सांभाळायचा आहे. I just need to train you a little for that.”

“खूळ? माझं इथून निघून जाणं हे खूळ नाहीये आई! It is a serious business for me. स्वत: सोडून इतरांच्या मतांनाही इम्पॉर्टेन्स देत जा तू कधी कधी!”

“इथला सगळा सेट अप सोडून तिथे दूर कोकणात जाऊन राहण्यात कसला आलाय सिरियस बिजनेस?? मुक्ता कळत का नाहीये तुला, हे सगळं दुसर्‍या कोणाला इतकं इजिली मिळत नाही. यू आर लकी टू हॅव ऑल धिस रेडीमेड! कम बॅक बेटा!”

“आई.. अगं तेच तर नकोय मला! तुला का कळत नाहीये? मी अरुंधती अय्यरचं साम्राज्य सांभाळण्यासाठी जन्माला नाही आलेय! I am Mukta Chaitanya! And I want to be Mukta Chaitanya only!! I’m not your puppet or pawn mumma.. I have my own dreams! तू आखून दिलेलं आयुष्य नाही जगायचं मला. तुला वाटतं, मी श्वास सुद्धा तुझ्या सारखाच घ्यावा.. पण ते शक्य नाहीये. मी नाही रमत तुझ्या क्लासिकल स्टाइल मध्ये.. गोष्टी इम्प्रोवाइज करायला आवडतात मला. And I know you won’t understand it ever!”

“oh is it? हे तू तुझ्या आईला सांगतेयस?”

“आई?? तू माझी आई कधीच नव्हतीस मम्मा! तू कायम अरुंधती अय्यर बनुनच वागत आणि बोलत आलीयेस माझ्याशी.”

“मुक्ता.. हे सगळं बोलणं खूप सोपं आहे. Try to be in my place for a while. I want you to be successful beta. तू अरुंधती अय्यर ची मुलगी आहेस! आणि तशी शोभायलाही हवीस.”

“तेच तर.. कधीतरी मुक्ता म्हणूनही बघ माझ्याकडे! सतत comparision! मी कंटाळलेय या सगळ्याला.”

“तुला गोष्टी इतक्या सोप्या वाटतात मुक्ता! ठिके मग.. जा!! बाहेरच्या जगाच्या झळा बसल्या की समजेल सगळं. Go and prove yourself! ‘मुक्ता चैतन्य म्हणून तुझी identity सिद्ध करून दाखव आणि मगच ये माझ्यासमोर!”

मुक्ताने तिच्याकडे रोखून पाहिलं आणि “sure!” इतकच म्हणून ती दुसर्‍या दिवशी मनस्विनीकडे परत आली.

 

त्या दिवसानंतर आजच तिचा अरुंधतीशी सामना होणार होता. मुक्ताने कितीही बळ एकवटलेलं असलं तरी आतून तिला काहीतरी कमतरता जाणवतच होतं. रियाज करताना जाणवायची तशी! सगळे मान्यवर सभागृहात जमा झाले होते. कार्यक्रमाची सुरुवातच मनस्विनी आणि मुक्ताच्या नृत्याने होणार होती. सगळ्या पूर्वसूचना झाल्या होत्या. मनस्विनी आणि मुक्ता स्टेजवर स्थिर मुद्रेत उभ्या होत्या. सभागृहातले lights ऑफ झाले. मुक्ताची धडधड अजूनच वाढली. समोरच्या बंद पडद्याच्या फटीतून तिला पाहिल्याच रांगेत बसलेली अरुंधती दिसली. तिच्या वयापेक्षा दहा वर्षानी लहान वाटणारी अरुंधती, नाकी-डोळी नीटस, रेखीव आणि तेजाने पुरेपूर दिसायची. मुक्ताला प्रश्न पडायचा, आपली आई नेहमीच इतकी आकर्षक कशी दिसु शकते! हळूहळू पडदा वर सरकू लागला.. आणि अभोगी कन्नडा मधली सुरावट सभागृहात घुमू लागली..

 

...क्रमश:

 

(ही एक दीर्घकथा असून दर आठवड्याला कथेचा एकेक भाग प्रकाशित होईल)

 

@ संजीवनी पाटील देशपांडे.

 

 

 


टिप्पण्या

Unknown म्हणाले…
छान ओघवती कथा आहे

लोकप्रिय पोस्ट