सावली - भाग ३
दुसर्या दिवशी सकाळच्या पहिल्या फ्लाइटने चैतन्य निघून गेला. अरुंधती तिच्या त्या आलिशान घरातून
बाहेरची झगमग पाहत एकटीच बसून होती. इतकी वर्षं कधी काही न बोलणार्या चैतन्यचे कालचे शब्द तिला जाळत होते. ‘जा.. तू पण निघून जा..’ ती आतल्या आत किंचाळत होती. पण वरुन मात्र शांत.. निर्विकार.. मग हळूहळू
तिच्या त्या कोर्या डोळ्यांमध्ये तीस-पस्तीस वर्षांपूर्वीचे संदर्भ उमटू लागले.
पद्मिनीताईंकडे कथ्थक शिकणारी कोवळी अरुंधती तिला आठवली.. आई-बाबांची सततची भांडणं
आणि नंतर झालेला घटस्फोट याने होरपळून गेलेली.. चिडचिडी, हट्टी झालेली.. आणि त्या सार्यापासुन पळून जाता यावं म्हणून सतत नृत्याचा
ध्यास घेतलेली. याच दरम्यान मनस्विनी तिच्या आयुष्यात आली.. आणि ती तिची
जीवश्च-कंठश्च मैत्रीण झाली. सदैव हसरी, लाघवी, हुशार मनस्विनी! दोघींचही एकमेकिंशिवाय पानही हलायचं नाही. सोबत रियाज..
सोबत अभ्यास.. नंतर कॉलेज मध्ये घेतलेलं अॅडमिशनही सोबतच! अरुंधतीचं नृत्य हे कायम
महत्वाकांक्षेने पछाडलेलं असायचं. सतत तिची ती प्रथम येण्याची धडपड. आणि मनस्विनी
थिरकायची ती स्वत:च्या आनंदासाठी, उत्फुल्लपणे! दोघी उत्तम
नृत्य करायच्या. पण दरवेळी मनस्विनी थोड्या फरकाने उजवी ठरायची. अशावेळी अरुंधतीला
तिचा हेवा वाटायचा.
कॉलेज मध्ये या दोघींना येऊन सामील झाला, चैतन्य! तो हुशार होता, कलासक्त होता, मनस्वीही होता. तिघांचं प्रचंड
जमायचं. ते दिवस तिघांसाठीही खूपच सुंदर आणि स्वप्नांनी भरलेले होते. हळूहळू
अरुंधती तिच्याही नकळत चैतन्यच्या प्रेमात पडत गेली. पण चैतन्य मात्र मनस्विनीच्या
प्रेमात होता आणि मंनस्विनीही त्याच्या. कोणीच कोणाला मनातलं सांगितलेलं मात्र
नव्हतं. दिवस भराभर जात राहिले. शेवटच्या वर्षी ग्रँड सेंड-ऑफ डेला सर्वांच्या
नकळत चैतन्य मनस्विनीला घेऊन कॉलेज च्या ऑडिटोरियम मध्ये आला. त्या रिकाम्या
ऑडिटोरियम मध्ये स्टेज वर मधोमध मनस्विनीला थांबवून,
गुडघ्यावर बसत तिला त्याने लग्नाची मागणी घातली. क्षणभर तिला काही सुचलच नाही.
आनंदाची एक सुरेख लहर तिला स्पर्शून गेली. पण दुसर्याच क्षणी तिचा चेहरा जरासा
उतरला. तोवर अरुंधतीच्या भावना काही कोणापासून लपून राहिल्या नव्हत्या. तिला काय
वाटेल? हा प्रश्न मनस्विनीच्या मनाला छ्ळत होता. दोघांनी मग
मिळून तिला समजावण्याचा निर्णय घेतला आणि तिथून जायला निघाले. पण नियतीच्या मनात
काहीतरी वेगळच होतं..
बराच वेळ दारावरची बेल वाजत होती. मनस्विनी तिच्या खोलीत कसलंतरी
पुस्तक वाचत बसली होती. जवळपास पाच-दहा मिनिटं बेल वाजतेय पाहून नाईलाजाने ती उठली
आणि दार उघडायला बाहेर आली. मुक्ता-मल्हार सकाळीच बाहेर गेलेले होते. आणि कांताबाईंचा डोळा लागला होतं. बाहेर
मुसळधार पाऊस सुरू होता. थोडंस वैतागूनच तिने दार उघडलं.. तर दारात चैतन्य उभा
होता.. मनस्विनी क्षणभर स्तब्ध झाली. तिला काही सुचलंच नाही. काळ थांबल्या सारखा
वाटला. चार-दोन मिनिटांनी तोच म्हणाला,
“आत घेणारेस मला की असच इथेच थांबायचय आपण?”
भानावर येत मनस्विनी बाजूला होत म्हणाली,
“सॉरी.. ये आत ये.”
तो तिच्यामागून आत आला. मनस्विनीचं ते कोकणी ढंगाचं तरीही आधुनिक
भासणारं सुंदर घर पाहू लागला. त्याच्याकडे पाहून मनस्विनी म्हणाली,
“भिजलायस तू किती! जा.. फ्रेश होऊन घे. जिन्यातून वर गेलास की
डाव्या बाजूची खोली, सध्या माझा भाचा वापरतोय.. ईफ यू डोन्ट माइंड!”
“येस येस.. आय वोंट माइंड. येतो मी फ्रेश होऊन!”
आणि तो वर गेला.
त्याच्या पाठमोर्या आकृतीकडे पाहत मनस्विनी कोचावर टेकली. कधीतरी
ही भेट होणार हे माहीत असलं तरी ती ही अशी अनपेक्षितपणे होईल असं तिला वाटलं
नव्हतं. तशी तिच्या मनाची तयारीही नव्हती. कधीकाळचा आपला हा जीवलग.. मधला सगळा
चक्रावणारा घटनाक्रम.. लोटलेला काळ.. आणि आताची ही आकस्मिक भेट.. सार्याची मनात
ओळ लागायला तिला जरासा वेळ लागणार होता.
काहीवेळाने ती उठली आणि किचन मध्ये आली. गॅसवर चहाचं आधण ठेवलं.
इतक्या वर्षांनीही चैतन्यला जसा आवडायचा तसा, त्याचं प्रमाणातला, आल्याचा चहा तिने केला.. क्षणभर
तिचं तिलाही नवल वाटलं, एवढी वर्षं लोटली तरी तिच्या हातांनी
अजून त्या चहाचं तंत्र जपलं होतं.
हातात हात गुंफून मनस्विनी आणि चैतन्य ऑडिटोरियम मधून जिथे पार्टी
चालू होती तिथे आले. पण तिथे सगळं एकदम शांत झालेलं होतं. मधोमध सार्यांचा घोळका
जमला होता. काहीतरी नक्कीच घडलंय असं म्हणून दोघे गर्दीतून पुढे आले.. तर समोर
खुर्चीवर शून्यात पाहत अरुंधती बसली होती. एकदम गप्प. कोणीतरी त्या दोघांना
सांगितलं, कॉलेज च्या
लॅंडलाइन वर तिच्या कुठल्याशा नातेवाईकाचा फोन आला होता दहा तेव्हापासून ही अशी बसून आहे, काहीच बोलायला तयार नाहीये. मनस्विनी
तिच्याजवळ गेली. पण अरुंधतीने तिच्याकडे न पाहता चैतन्य दिसल्या दिसल्या त्याला
मिठी मारली आणि रडत रडत म्हणाली,
“आई-दादा गेले,
चैतन्य! मला सोडून कायमचे..”
“गेले म्हणजे?” काही
न कळून तिला खुर्चीवर बसवत त्याने विचारलं.
“अॅक्सिडेंट झालाय दोघांचा..” ती वेड्यासारखी रडत म्हणाली.
मनस्विनी आणि चैतन्यला क्षणभर सगळं सुन्न झाल्यासारखं वाटलं.
अरुंधतीचं चैतन्यला घट्ट धरून ठेवणं, एक आधार म्हणून त्याच्याकडे पाहणं मनस्विनीच्या नजरेतून सुटलं नव्हतं॰
तिला सारं उमजलं. तिने चैतन्य कडे पाहिलं. दोघांचे डोळे भरलेले होते, त्यात समजुतीचं दु:ख भरून आलं होतं.
त्यानंतर परीक्षा झाल्यावर कोणालाही काहीही न सांगता मनस्विनी
कोकणातल्या तिच्या गावी निघून गेली.. कायमचीच!
पुढे मग अरुंधती आणि चैतन्यचं लग्न झालं. मनस्विनी अशी एकाएकी का
निघून गेली हे चैतन्य जाणून होता. तिच्यामागे न जाऊन किंवा पुन्हा कधीही तिला न
भेटून त्यानेही तिच्या निर्णयाचा आणि इच्छेचा मान राखला. आयुष्यभर अरुंधतीची साथ
देत राहिला. अरुंधतीने एक-दोन वेळा मनस्विनीशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला खरा
पण मनस्विनीने तो होऊ दिला नाही. सारे संबंध तोडून टाकले. आणि त्यानंतर म्हणावे
तसे प्रयत्न अरुंधतीनेही केले नाहीत. खरंतर सेंड ऑफ च्या दिवशी तिच्या त्या
उध्वस्त अवस्थेतही चैतन्य-मनस्विनीचे एकात एक गुंफलेले हात तिच्या नजरेतून सुटले
नव्हते. आणि नंतरही मनस्विनीच्या जाण्याचं कारण उमगु नये इतकी ती अजाण नव्हती. तिला
जाणीव होती त्या दोघांच्या प्रेमाची, पण मैत्रीसाठी प्रेम त्यागण्याचं जे धाडस मनस्विनीने दाखवलं ते ती दाखवू
शकली नाही. चैतन्यचं आपल्यावर म्हणावं तितकं प्रेम नाही हे माहीत असूनही
त्याच्याशी लग्न करण्याचा मोह तिने टाळला नाही. तो सल पुढे तिला आयुष्यभर सलत
राहिला. आपलं चुकलंय हे माहीत असूनही वर-वर ते मान्य न करता माणूस जेव्हा जगत असतो
तेव्हा तो मुखवटे धारण करतो, स्वत:सकट इतरांनाही फसवत राहतो.
अरुंधतीचंही असच झालं होतं. ती मग अजून अजून कठोर बनत गेली. कथ्थकलाच विश्व समजून
जगू लागली.. यश मिळत गेलं, प्रसिद्धी मिळत गेली. आणि तिचा तो
मुखवटा तिची कातडी बनत गेला. पण आज घरात एकटीने बसून तिला स्वत:चा सामना करावा लागणार
होता.. मुखवटा काढून!
चैतन्य आवरून खाली आला. बैठकीत सोफ्यावर बसला. मनस्विनीने त्याला चहा
दिला. दोघांनीही इतकी
वर्षं एकमेकांशी न बोलता काढली होती. त्यामुळे आता असं एकदम एकमेकांच्या समोर
आल्यावरही त्यांना फारसं काही बोलायची आवश्यकता वाटत नव्हती. थोड्यावेळाने
मनस्विनी म्हणाली,
“मला माहीत नव्हतं तू येतोयस ते.. मुक्ता काही म्हणाली नाही.”
चहाची तीच पूर्वीची चव पाहून आतल्या आत सुखावून तो म्हणाला,
“कळवलं नव्हतं मी तिलाही. अचानक आलो. मुंबईत झालेला प्रकार समजला.
मुक्ताची काळजी वाटत होती. आणि सांगून सवरून आलो असतो तर हा असा अचानकातला लाभ
मिळाला नसता ना!”
“म्हणजे?” न समजून तिने विचारलं.
“म्हणजे, मी येणार हे माहीत असतं तर आधीच मनाची तशी तयारी करून, काय बोलायचं-काय नाही बोलायचं याचा दहा वेळा स्वत:शीच विचार करून, चेहरा कोरा करून बसली असतीस तू.. हा तुझा आत्ताचा शांत-खोल आनंदाने भरलेला, विस्मयित चेहरा पहायला मिळाला नसता मला. तू न सांगता मला सोडून आलीस, मी न सांगता तुला भेटायला आलो.. फिट्टंफाट!!”
सोफ्यावर मागे टेकून, हातात चहाचा कप धरून, तिच्या डोळ्यात पाहत तो
शांतपणे बोलत होता. त्याचं ते उत्तर ऐकून मनस्विनीला भरुन आलं. पण ती काहीच बोलली
नाही.
इतक्यात दारावरची बेल पुन्हा वाजली.
“मल्हार-मुक्ता असतील” म्हणत मनस्विनी दार उघडायला गेली.
मल्हार आणि मुक्ता आत आले. बाहेरचा पाऊस आता थांबला होता. मुक्ता
नेहमीपेक्षा खुश दिसत होती. तिला मनस्विनीला काय सांगू अन काय नको झालं होतं. ती
बोलायला तोंड उघडणार इतक्यात तिला सोफ्यावर बसलेला चैतन्य दिसला. आणि ती आनंदाने
जवळ-जवळ किंचाळलीच..
“बाबा तू?? कधी आलास? आणि असा अचानक?
व्हॉट ए प्लेजंट सर्प्राइज इट इज!” तिने जाऊन त्याला एक घट्ट मिठी मारली.
“भेटावसं वाटलं तुला म्हणून आलो.. कशी आहेस तू? आणि रियाज कसा चालूये?”
त्यावर मल्हारकडे पाहत मुक्ता म्हणाली,
“हम्म.. मी मस्त!! रियाज.. आतापर्यंत ठीक-ठाक चालू होता पण आता
मस्त चालणारे!”
“म्हणजे?” चैतन्यने विचारलं.
थोडसं सावरत ती उत्तरली, “अरे म्हणजे, तू आलायस नं आता म्हणून..”
मनस्विनी आणि मल्हार, बाप-लेकीचं बोलणं ऐकत होते. त्या दोघांकडे पाहत मुक्ता म्हणाली,
“बाबा ही माझी मनस्विनी ताई.. तुमची ओळख झालीच असेल आता. आणि हा
मल्हार, तिचा भाचा
आणि आता माझा खूप चांगला मित्र!”
चैतन्यने त्याच्याकडे पाहत हसून म्हटलं, “हाय..
आपण रूम-मेट्स आहोत आता थोडे दिवस..” यावर मग मनस्विनी आणि चैतन्य हसले. मल्हारने
गोंधळून नुसतच “हाय” म्हटलं.
चैतन्यने विचार केला होता की मुक्ता खूप नाराज असेल, उमेद हरवून बसली असेल. पण इथे
येऊन त्याला आश्चर्याचा सुखद धक्काच बसला होता. तिला पूर्वीसारखं खळाळताना पाहून
त्याला मनापासून आनंद झाला. तिच्या डोळ्यात यावेळी त्याला एक वेगळीच चमक दिसली.
त्या दिवशी रात्री त्याने मनस्विनीचे आभारही मानले..
“थॅंक यू मनस्विनी.. मुक्ताची खरंतर खूप काळजी वाटत होती मला. पण
ती इथे मजेत आहे हे पाहून खरंच बरं वाटतय.”
“वेल, यावेळी थॅंक्स मला नको म्हणूस. मी काही नाही केलं.”
“मग?” त्याने कुतुहलाने विचारलं.
त्यावर थोडासा pause घेत ती म्हणाली,
“मल्हार.. त्याची जादू आहे सगळी. मुंबईहून आल्यापासून ती बसलीच
होती सगळं काही सोडून देऊन. शून्यात पाहत. माझेही सगळे प्रयत्न थकले होते. पण
मल्हारने तिला काय समजावलं काय माहीत, ती हळूहळू पूर्वीसारखी होत गेली. आणि तू आलास त्यादिवशी दोघे कुठेतरी
गेले होते, तिथून आल्यापासुन तर ती एकदमच बदलूनच गेलीये.”
यावर चैतन्य जरासा शांत झाला. मनस्विनीच्या मनात डोकावली होती
तशीच शंका त्याच्याही मनात डोकावली. तो म्हणाला,
“म्हणजे.. ती प्रेमात वगैरे पडलिये का?”
अपेक्षित प्रश्न ऐकून मनस्विनी म्हणाली,
“हो.. ऑल्मोस्ट! पण तिचं तिला ते अजून उमगलं नाहीये असं वाटतं.”
“आणि मल्हार?”
“तो तर आहेच तिच्या प्रेमात, पहिल्यांदा तिला पाहिलं तेव्हापासून!”
“ओहह... दॅट्स ए गुड न्यूज देन.. माझी मुलगी फायनली कोणाच्या तरी
प्रेमात पडलिये! तिचा एकलकोंडा स्वभाव पाहता मला तिची काळजीच लागून राहिली होती.
मल्हार सीम्स ए नाइस गाय! मी बोललो ना त्याच्याशी.. त्याचं काम आणि त्याविषयीच
त्याचं passion
दोन्ही इंट्रेस्टिंग आहे.”
त्यावर थोड्याशा शांत स्वरात मनस्विनी म्हणाली,
“येस, ही इज! पण, ते दोघही एकदम विरुद्ध आहेत रे
एकमेकांच्या. नॉर्थ अँड साऊथ पोल! मला थोडी काळजी वाटते त्यामुळे. आणि अरुंधती? मला नाही वाटत तिला हे पटेल!”
थोडासा सिरियस होत चैतन्य म्हणाला,
“अरुंधतीचं सोड.. आय वोंट लेट हर रुईन माय डॉटर’स लाइफ एनीमोर! अँड डोन्ट वरी
अबाऊट देम ऑल्सो.. opposites attract,
यू नो धिस वेरी वेल! आणि त्यांच्यात जे काही आहे ते खरं-खुरं असेल नं तर गोष्टी
त्यांचं ते फिगर आऊट करतील कसही करून! सो चिल..”
मनस्विनीला त्याचं म्हणणं पटलं, म्हणजे तसं तिने दाखवलं तरी.
इतक्या रात्री अंगणातले दिवे चालू बघून मुक्ता बाहेर आली तर समोर
मनस्विनी आणि चैतन्य पायरीवर बसलेले तिने पाहिले. तिला क्षणभर काही कळलच नाही. ते
काय बोलत होते हे जरी तिला कळलेलं नसलं तरी कुठलातरी गंभीर विषय आहे इतकं तिला
समजलं. पण तिला आश्चर्य याचं वाटत होतं की हे दोघे इतक्या उशिरा गप्पा मारत
बसलेयत.. इतपत ओळख यांची कधी झाली एकमेकांशी? चैतन्य तर कालच आलेला होता. तिची चाहूल लागून दोघांनी वळून पाहिलं तेव्हा
तिच्या डोळ्यातले प्रश्न त्या दोघांनाही समजले. तिचे अजून गैरसमज होऊ नयेत आणि
बहुधा सगळं खरं सांगायची वेळ आता आलीये असं म्हणून चैतन्यने त्या रात्री तिला त्या
तिघांच्या जगावेगळ्या नात्याविषयी सगळं सांगितलं. मुक्ताला आश्चर्याचा मोठा धक्काच
बसला. आपल्या आयुष्यातल्या तीन खूप महत्वाच्या व्यक्ति एकमेकांशी या अशा विचित्र
बंधाने बांधल्या गेल्या आहेत आणि हे आपल्याला आत्ता कळतय या सार्याचाच तिला प्रथम
खूप राग आला. पण नंतर शांत डोक्याने विचार केल्यावर, तिला
त्यातली गुंतागुंत, त्याग, प्रेम आणि
त्यासोबतच या सार्याच्या पायात तिघांनी जगलेलं अत्यंत यातनामय आयुष्य या सार्याची
कल्पना आली. आणि त्यात सर्वात जास्त होरपळून निघाली होती मुक्ता स्वत:!! आता
परिस्थिति वेगळ्या दृष्टीकोणातून तिला उमजायला लागली. मनस्विनी-चैतन्यने दाखवलेला
मनाचा मोठेपणा तिला जाणवलाच पण आपली आई अशी का घडत गेली असावी याचा अंदाजही आता ती
बांधू शकत होती.
चैतन्य मग दोन-तीन दिवस तिथे राहून नंतर स्पर्धेच्या वेळी परत येण्याचं
मुक्ताला प्रॉमिस करून निघून गेला. तो खरंतर आला होता मुक्ताला भेटायला पण मुक्ता
मात्र इतकी तिच्या रियाजत दंग झाली होती की ती hardly चैतन्यला वेळ देऊ शकली. स्पर्धेच्या तिन्ही
राऊंडसचा अभ्यास, त्यांची तयारी यात ती प्रचंड बिझी होती. पण
चैतन्यला या सार्याचा आनंदच झाला. तिला असं स्वत:ला झोकून देताना पाहून
त्याच्याही अपेक्षा वाढल्या होत्या. अरुंधतीला तिने खोटं ठरवावं असं त्यालाही आता
मनोमन वाटु लागलं होतं. मनस्विनी तिला मार्गदर्शन करतच होती. पण फायनल परफॉर्मेंस
मात्र मुक्ताने स्वत: कोरिओग्राफ करायचा असं ठरवलं होतं. तिची त्याविषयीची
कल्पनाही तयार होती. इतक्या मोठ्या स्पर्धेत असे प्रयोग करणं खरंतर रिस्की होतं.
पण, मनस्विनीने तिला तसं करू दिलं. उलट प्रोत्साहनही दिलं.
चैतन्य गेल्या दुसर्या दिवशी सकाळचा रियाज आटोपून हातात डायरी
घेऊन मुक्ता धावत मनस्विनीकडे आली. तिला तिने घरभर शोधलं. पण ती कुठे दिसली नाही.
तेव्हा तिची लगबग पाहून व्हरांड्यात लॅपटॉपवर काही तरी काम करत बसलेला मल्हार
म्हणाला,
“मावशी, कांताबाईंकडे गेलीये सकाळीच. कार्यक्रम आहे
म्हणे काहीतरी तिकडे.”
“अरे हो की.. मला सांगितलं होतं तिने. विसरलेच बघ मी.” स्वत:च्या
वेंधळेपणावर हसत झोपाळ्यावर बसत ती म्हणाली.
“खजिना सापडलाय की काय तुला कसला? इतकी का शोधतेयस तिला. घाम बघ किती आलाय.”
“अरे रियाज करत होते म्हणून आलाय. खजिनाच सापडलाय! माझी कविता
ऐकवायची होती तिला.. त्यावर पेरफोर्म करणारय मी अभिजात कथ्थकच्या स्टेजवर.”
“कवितेवर नृत्य?” मल्हारने गोंधळून विचारलं.
“अरे म्हणजे कविता नृत्याचा एक भाग असेल.. ताईच्या आवाजात रेकॉर्ड
केलेली. ती खूप सुंदर वाचते.”
मुक्ता उत्साहाने बोलत होती.
“हम्म.. साऊंडस इंट्रेस्टिंग!!”
तिने त्याच्याकडे हसून पाहिलं. आणि हातातल्या लॅपटॉपकडे पाहत
म्हणाली,
“तू काय करतोयस? काम कसं चालूये तुझं?”
त्यावर एक दीर्घ श्वास घेत मल्हार म्हणाला,
“काम उत्तम चालूये. उद्या निघतोय केरळला जायला. केरळ-कर्नाटकातले
काही स्पॉट्स अभ्यासले की माझं इथलं काम संपेल. बाकीचं मी लंडनला जाऊन पूर्ण करू
शकतो.”
“म्हणजे तू जातोयस?” मुक्ताचा उत्साह ओसरला होता.
“हम्म.. आत्ताच बोलणं झालं आमचं. तिकडे नवीन कामं आलीयेत. सो इथलं लवकर
आटोपून निघायचय. केरळवरूनच फ्लाइटच बूकिंग केलय.”
“आर यू सिरियस? तू स्पर्धेपर्यंत थांबणार नाहीस? उद्याच जातोयस?”
“हम्म.. जावं तर लागेल.”
यावर ती काहीच बोलली नाही. तो पुढे म्हणाला,
“पाय तर माझाही निघत नाहीये यावेळेस. पण काय करणार काम आहे.”
“का निघत नाहीये पाय?” मुक्ताने विचारलं.
त्यावर हातातला लॅपटॉप बाजूला ठेवत, तिच्यासमोर बसत तो तिला म्हणाला,
“त्या दिवशी पहाटे, पारिजातकाच्या सड्यामध्ये उभं राहून माझ्याकडे पाहणार्या त्या भिरभिर डोळ्यांमध्ये
जीव गुंतलाय माझा!”
“म्हणजे?” काही न कळल्याचा आव आणत मुक्ताने नजर खाली वळवत विचारलं.
“तुला कळलं नाही मी काय म्हणतोय ते?” मल्हारने प्रतिप्रश्न केला.
तिने नकरार्थी मान हलवली.
“ठीक आहे.. जेव्हा कळेल तेव्हा बोलू मग!” यावर दोघेही शांतचं
राहिले.
तो काय म्हणतोय ते मुक्ताला कळत नव्हतं असं नाही पण ते अॅक्सेप्ट
करायला तिचं मन अजून तयार होत नव्हतं. मुळात हा असा विचार तिने केलाच नव्हता.
त्यांच्यात जे काही आहे ती निव्वळ मैत्री आहे याचं समजात ती होती. आणि सध्यातरी
तिच्या डोक्यात स्पर्धेशिवाय दुसरे कुठलेही विचार नव्हते. मल्हारला याची जाणीव
होती आणि म्हणूनच त्याने लवकर परत जाण्याचा निर्णय घेतला.
दुसर्या दिवशी पहाटेच तो निघून गेला. मुक्ताला मग एकदम खूप
रिकामं रिकामं वाटू लागलं. का कोणास ठावूक, त्याचं असणं तिने गृहीत धरलं होतं. पण मग तिने पुन्हा तिला रियाजात
गुरफटून घेतलं. स्पर्धा आता अगदी आठवड्यावर आली होती. तिची सगळी तयारी ऑल्मोस्ट
पूर्णही झाली होती. पण मल्हारच्या जाण्याने तिला एक अनाम पोकळी जाणवू लागली होती.
तिचं मन रियाजात म्हणावं तसं रमेना. पुन्हा काहीतरी सुटतय असं वाटू लागलं. या
शेवटच्या टप्प्यावर तिला असं आऊट ऑफ फोकस झालेलं पाहून मनस्विनी रात्री हळदीचं दूध
देता देता तिला म्हणाली,
“मुक्ता.. एक गोष्ट सांगु तुला?”
“सांग ना”
“प्रत्येक गोष्टीची एक वेळ असते बेटा. एकदा का ती वेळ टळली की ती
गोष्ट आपल्या हातातून निसटून जाते.. कायमची! आम्ही ज्या चुका केल्या त्या तुम्ही
करू नका. फॉलो यॉर हार्ट विदाउट एनी सेकंड थॉट! बोल मल्हारशी एकदा.”
तिचं हे अनपेक्षित बोलणं ऐकून मुक्ता आधी थोडी चकित झाली आणि मग
मानेनेचं होकार भरत झोपायला निघून गेली.
चैतन्य परत आल्यापासून त्याच्यात आणि अरुंधती मध्ये फारसं बोलणं
झालच नव्हतं. अरुंधती तिच्या रूटीन मध्ये बिझी होती. म्हणजे तसं दाखवत तरी होती.
आणि चैतन्यला त्यांच्यात बोलण्यासारखं काही उरलय असं वाटत नव्हतं. स्पर्धेच्या दोन
दिवस आधी तो दिल्लीला जायला निघाला. निघताना त्याने अरुंधतीला विचारलं,
“तू? येणार नाहीस?”
त्याच्याकडे शांतपणे पाहत, ती म्हणाली,
“तू हो पुढे.. येणार आहे मी. पण यावेळी माझा रोल जरासा वेगळा
आहे!”
तिच्या त्या कोड्यात टाकणार्या बोलण्याने तो जरासा साशंक झाला.
पण तिला काहीही न म्हणता तिथून निघून आला.
मुक्ताने रात्रभर मनस्विनीच्या बोलण्याचा विचार केला. आणि हो-नाही
करत शेवटी तिने फोन हातात घेतला. मल्हारचा नंबर सर्च केला. आणि दोघांचा त्यादिवशी
झर्याखाली बसल्यावर काढलेला सेल्फी तिने त्याला पाठवला. खाली caption होतं, ‘वाट पाहतेय, तुझी मुक्ता!’
दुसर्या दिवशी उठून तिने पुन्हा पुन्हा फोन चेक केला. मेसेज सेंट
होता आणि रीड केलेलाही होतं. पण त्यावर रीप्लाय मात्र आलेला नव्हता. ती थोडीशी
खट्टू झाली. पण विचार करत बसायला तिच्याकडे वेळ नव्हता. दुपारीच ती आणि मनस्विनी
दिल्लीला जायला निघणार होत्या. उद्यापासून स्पर्धा सुरू होणार होती. निघायच्या
अगदी काहीवेळ आधी मनस्विनीचा फोन वाजला. तो ठेवताना तिचा चेहरा गंभीर झाला होता.
मुक्ताने विचारलं,
“ताई, काय झालय?”
विचारातून बाहेर येत मनस्विनी म्हणाली,
“मुक्ता, अरुंधती यावर्षी स्पर्धेच्या जजींग पॅनल वर आहे!”
मुक्ताला क्षणभर काही सुचलं नाही. सगळी उमेद संपल्यासारखी वाटली.
पण मग सगळं बळ एकवटत ती मनस्विनीला म्हणाली,
“काळजी करू नकोस ताई, अरुंधती अय्यरच्या असण्या-नसण्याचा आता माझ्या नृत्यावर मी परिणाम होऊ
देणार नाही. आणि राहिली गोष्ट निकालाची, तर मला आधी माझ्या
नजरेत जिंकायचय. त्यानंतर मग निकाल काहीही लागो, मला फरक पडत
नाही.”
मनस्विनी मुक्ताकडे पाहतच राहिली. तीच्यातून एक वेगळीच ऊर्जा वाहत
असलेली तिला जाणवली. आणि मग दोघी दिल्लीसाठी रवाना झाल्या.
स्पर्धेचे टेक्निकल आणि theoretical राऊंडस मुक्ताने सहज पार केले. त्यानंतरच्या क्वालिफाईंग राऊंड मध्येही
तिने परीक्षकांवर चांगली छाप पाडली. आता ती फायनल दहा मध्ये होती. सेमी-फायनल झाली
की टॉप फाइव मध्ये उद्या फायनल रंगणार होती. एकाहून एक सरस आणि दर्जेदार स्पर्धक
देशाच्या काना-कोपर्यातून आलेले होते. स्पर्धा चुरशीची होत होती. सेमी-फायनल साठी
मुक्ताने तुलसीदासांचा एक सुंदर अभंग निवडला होता. खरंतर अशावेळी कथ्थकच्या
टेक्निकल बाजू ठळकपणे दर्शवता येणारे परफॉर्मेंस स्पर्धक देणं पसंत करतात. कारण
त्याला लगोलग वाहवा मिळते. पण हे असं काव्य-प्रधान,
भावप्रधान नृत्य कितपत परीक्षकांच्या पसंतीस पडेल याबद्दल थोडी साशंकता होती. पण
मुक्ताने तिच्या अदाकारीने त्या अभंगामधला भक्तिरस असा काही साकार केला की
परीक्षकांना त्याकडे दुर्लक्ष करता येईना. दिवसाकाठी टॉप फाइव स्पर्धकांची नावं
जाहीर होणार होती. मुक्ता, मनस्विनी,
चैतन्य कानात प्राण आणून वाट पाहत होते. परीक्षक बाहेर आले. पहिलं नाव झालं, दुसरं झालं, तिसरं-चौथही झालं. मुक्ताने आता आशा
सोडली. पण शेवटी परीक्षकांपैकी एकाने मुक्ताचं नाव घेत म्हटलं,
“खरंतर असे पर्फोर्मंसेस खूप कमी होतात. त्यांना महत्वही कमी दिलं
जातं. पण मुक्ता चैतन्यचं प्रेक्षकांच्या मनाची पकड घेणारं नृत्य पाहिल्यावर
त्यांना अजून एक संधि देण्याचं आम्ही ठरवलं आहे.”
तिघांनीही रोखून धरलेला श्वास सोडला. मुक्ताची धड-धड शांत झाली.
परीक्षकांमध्ये बसलेल्या अरुंधतीवर तिने एक नजर टाकली. ती निर्विकारपणे बसून होती.
डोळ्यांची पापणीही न लवता!
मुक्ताला आता उद्याच्या फायनलची चिंता वाटू लागली होती. ती अगदी
थोड्या फरकाने आज निवडली गेली होती. उद्या तिला परीक्षकांची पकड घेणारा, त्यांना मंत्रमुग्ध करणारा
नृत्याविष्कार सादर करावा लागणार होता. तिच्या मनात खूप
धाकधुक चालू होती. झोपायच्या आधी तिने पुन्हा फोन चेक केला. अजूनही मल्हारचा काही
रीप्लाय आला नव्हता. तिला एकदम खूप निराश वाटू लागलं. त्याच्या अनुपस्थितीत त्याचं
तिच्या आयुष्यातलं महत्व तिला तीव्रतेने जाणवत होतं. इतके दिवस ती जे नाकारत होती
ते आता तिच्या मनाने पुर्णपणे मान्य केलं होतं. पण मल्हारचं हे असं काहीच न बोलणं
तिला छळत होतं. अकारण एकटेपणा देत होतं. मनाचा हिय्या करून हे सारे विचार बाजूला
सारत पूर्ण लक्ष उद्याच्या फायनल वर केन्द्रित करायचं असं ठरवून ती झोपी गेली.
फायनल सुरू झाली. मुक्ताचं नृत्य सगळ्यात शेवटी होतं. सुरूवातीचे
दोन नृत्याविष्कार पार पडले. तिसरा सुरू झाला होता. मुक्ता तयार होऊन बसली होती. वाइन कलरची पैठणीच्या
धाटाची घागरा-चोळी आणि त्यावर सुरेख पिवळ्या रंगाचा झिरमिरीत दुपट्टा तिने परिधान
केला होता. मुळचेच सुंदर लांब केस असल्यामुळे तिला कसलाही विग लावण्याची आवश्यकता
नव्हती. केसांपासून पायापर्यंत सुंदर मौक्तिकी आभूषणांनी ती मढली होती. पायघोळ
घुंगरू आणि रक्तवर्णी कुंकवाचे रेखीव लेपण तिच्या गोर्या पावलांवर शोभून दिसत
होते. काजळाची दाट रेखा आणि नाजुक लाल टिकली, डाळिंबी ओठ
तिचं सौंदर्य अजूनच खुलवत होते. ती श्वास रोखून तिच्या नावाची घोषणा होण्याची वाट
पाहत होती. मनातले सारे विचार हळू-हळू मागे पडू लागले होते. तिने डोळे उघडून शांत
चित्ताने एकवार स्वत:कडे आरशात पाहिलं आणि तेवढ्यात स्टेजवर तिचं नाव announce झालं, ‘मुक्ता चैतन्य’..
ती उठली. स्टेजवर आली. सार्यांना वाकून अभिवादन केलं. समोर बसलेले
परीक्षक, अरुंधती, दुसर्या रांगेत
बसलेला चैतन्य, त्याच्या बाजूला बसलेली मनस्विनी सार्यांवरून
एक नजर फिरवून आता ती मागे वळणार इतक्यात तिला काहीतरी जाणवलं, तिने पुन्हा एकवार समोर पाहिलं.. मनस्विनीच्या बाजूच्या खुर्चीवर चक्क
मल्हार बसलेला होता. ती आनंदाने भरून गेली. इतका आनंद तिला पूर्वी कधीही झाला
नव्हता. त्याने तिच्याकडे पाहून एक छान स्मित केलं. तिनेही गोड हसून ते स्वीकारलं.
आणि परिपूर्ण भावाने मागे वळली.
राग मल्हार सभागृहात घुमू लागला..
सा; म; प; - प; म; रे;
,नि१ सा रे प म रे ; म प म रे ; म प ; प म नि प म रे ; रे रे प
म रे ; रे सा ,नि१ सा ;
आणि मुक्ताची पाऊले त्यावर थिरकु लागली..
मुक्ता दंग होऊन नाचू लागली. अचूक पदलालित्य.. अचूक भाव.. किंचित
जास्त नाही किंचित कमी नाही. ती तिचा जीव त्यात ओतत होती. मग हळूहळू ते सुर शांत
होत गेले आणि पावसाचा आवाज घुमायला लागला. मुसळधार पावसाचा आवाज.. मुक्ताचा नृत्याभिनय
त्याला जीवंत करत होता. आणि मग पावसाची लय आणि मुक्ताचे घुंगरू यांची अनिमिष
जुगलबंदी रंगली.. प्रेक्षक दंग होऊन पाहत राहिले. त्या पावसाच्या धुंद नादात मग
मिसळली मुक्ताची कविता..
घिरत घिरत कारे मेघ
विचल विचल विहग सचेत
कौन कहाॅंसे आयी अंगनीयां
लत उमडके, दंग संवरियां
थिरक थिरक मयूर नृत्य
कहत कहत खग समवेत,
सवर सवर आॅंचल ओ धरा..
गरजत आयो सजन तोहरा!
गरजत आयो सजन तोहरा!!
मुक्ता तिच्या विभ्रमांमधून त्या कवितेला जीवंत करू लागली. तिचे
डोळे जणू गात होते. आणि पाऊले नाचत होती. पाऊस तर बरसत होताच कवितेतून, संगीतातून.. परीक्षकांसह सारे
मंत्रमुग्ध होत होते. शहारत होते. कविता पुढे जात होती.
संगीत होय वृष्टी,
गाये जो मेघ!
तपित होय शीतल,
बहे जो मेह!
आंगन मे चितचोर,
बरस बरस बरसे घनघोर
‘कैसे कहुं री, कौन गीत गांऊ री..’
कहे धरा भाव-विभोर
व्याकुल वह जाय भीग
अंग अंग संग पुनीत
राग-रंग-सूर-ताल-लय
सबही मलहार सबही मलहार!!
मुक्ताला आता भान राहिलं नव्हतं. त्या धरेप्रमाणेच तीही तिच्या
मल्हाराच्या पावसात नखशिखांत भिजत होती. गात होती. नाचत होती. पाऊस जगत होती.
कविता संपली. पुन्हा राग मल्हार सुरू झाला. पुन्हा तेच सुर.. तीच
चीज..
अत घोर घोर गरजत आये..
द्रुत लय.. पुन्हा पावसाचा आवाज.. आणि त्यात मिसळलेल्या कवितेच्या
शेवटच्या ओळी..
लाये खुशीयां लाये बहार
राग-रंग-सूर-ताल-लय
सबही मलहार सबही मलहार!!
आणि मग त्या मुग्धभारल्या समेवर तिचा नृत्याविष्कार थांबला.
मिनिटभर सभागृह पूर्ण शांत. सारेचं मंत्रमुग्ध झालेले. दोन मिनिटांनी अरुंधती तिच्या
खुर्चीवरून उठली आणि भरल्या डोळ्यांनी तिने मनसोक्त टाळ्या वाजवल्या. आणि मग पूर्ण
सभागृह टाळ्यांच्या गजरात पुन्हा पुन्हा न्हाऊन निघालं. मुक्ताने गुडघ्यावर बसत
खाली डोकं टेकलं.. तिच्या डोळ्यात पाणी होतं. तिला जे हवं होतं आज ते तिला मिळालं
होतं. स्टेजवरची ती ecstatic अवस्था तिने अनुभवली होती. आता निकाल केवळ उपचारापुरता उरला होता. ती
केव्हाच जिंकली होती!
कार्यक्रम संपल्यावर हातात ट्रॉफी घेऊन मुक्ता बाहेर आली. तिने
मनस्विनीला कडकडून मिठी मारली. चैतन्यला मिठी मारली. हसत हसत ती रडतही होती.
मल्हार तिच्या समोर आला. तिच्या डोळ्यातल्या पाण्याचा एक थेंब बोटाच्या टिपेवर घेत
तो म्हणाला,
“हे जपलं पाहिजे.. फार मौल्यवान आहे हे!”
आणि मग हसत मुक्ता त्याला बिलगली.
थोड्यावेळाने अरुंधती तिथे आली. तिने मुक्ताचं अभिनंदन केलं.
मायेने तिच्या पाठीवरून हात फिरवला. तिचं हे रूप मुक्तासाठी नवीन होतं. मुक्ताने
तिला वाकून नमस्कार केला. ‘कायम आनंदात रहा’ अरुंधतीने तिला आशीर्वाद दिला.
आणि जाता जाता मनस्विनी आणि चैतन्य समोर थांबत, चैतन्य कडे पाहत ती म्हणाली,
“माझे लॉंयर तुला कॉनटॅक्ट करतील. त्यांना सहकार्य कर. मी.. divorce देतेय तुला चैतन्य!”
आणि मग मनस्विनीकडे पाहत म्हणाली,
“यू बोथ deserve ईच अदर!!”
एवढच बोलून ती तिथून गेली. स्वत:च्या सावलीतून सुटून एक मुक्त श्वास घेण्यासाठी..
मुक्तासह सारे तिच्या पाठमोर्या आकृतीकडे पाहत राहिले.
समाप्त!
@संजीवनी पाटील देशपांडे
टिप्पण्या