ती आणि तो!!
ती..
दिनेश पानावरून उठला आणि तरातरा बाहेर निघून गेला. कविताला काही
कळेना. ती नुसतीच बघत राहिली. आणि मग नक्की काय झालं असेल याचा विचार करू लागली. सकाळी? वेळेत तर उठली होती. दिनेशचं
रूटीन म्हणजे अगदी घड्याळाच्या काट्यावर तोललेलं असतं. सगळं अगदी वेळच्या वेळी.
लग्न झाल्या-झाल्या कविताला यासगळ्याशी जुळवून घेता-घेता नाकी नऊ यायचे. पण आता
चार वर्षात तिच्याही ते अंगवळणी पडलं होतं. आजपण झाड-लोट,
चहा-पाणी सारं वेळेवर झालं होतं. आंघोळ झाल्यावर तिने बनवलेले पोहेही आज दिनेशला
आवडले होते. मग एकाएकी माशी कुठे शिंकली? पोहे झाल्यावर
दुसर्या राऊंडचा मस्त आल्याचा चहा पिऊन ती नऊच्या ठोक्याला स्वयंपाकालाही लागली
होती. सगळं अगदी-अगदी वेळेत चालू होतं. कालच निवडून ठेवलेली छान लुसलुशीत मेथी
तिने दिनेशला आवडते तशी खरपूस परतली. कोबीची हलकासा कांदा पेरून कोशिंबीर केली
त्यावर खमंग हिंगाची फोडणी घातली. वरण दिनेशला शक्यतो साधंच आवडतं. हे सारं होईतो
कणीक मळून ठेवलेली होतीच. ती आता छान भिजली होती. तिला मग आणखी मऊ करून त्यावर
जरासं तेल लाऊन, तिने लुसलुशीत पोळ्या लाटायला घेतल्या
तेव्हा दहाला पाच मिनिटं कमी होती. तीन पोळ्या झाल्या की ती गॅस बंद करून दिनेशचा
डबा शोधू लागली. तिने तो व्यवस्थित भरला. सोबत एक लिंबाची फोड आणि चमचा ठेवायला ती
विसरली नाही. एवढ्यात तयार होऊन दिनेश आलाच. ठरलेल्या सवयीने प्लेट मध्ये वाढलेली
एक पोळी, भाजी आणि कोशिंबीर तो भराभर खायला लागला. दोनच घास
त्याने खाल्ले असतील की त्याची नजर प्लेट शेजारी ठेवलेल्या फोनवर गेली. आणि त्याचा
चेहरा एकदम उतरला. तोंडात घास तसाच ठेऊन त्याने एक विचित्र नजर कवितावर टाकली..
भाजी कशी झालीये विचारायला ती तोंड उघडणारच होती इतक्यात त्याची ती नजर पाहून तिने
उघडलेलं तोंड मिटून घेतलं. तिच्याकडे तसच पाहत बॅग, डबा आणि
फोन सावरत तो न जेवताच निघून गेला.
काय बरं झालं असावं? मी काही विसरलेय का? कसला निरोप वगैरे द्यायचा
राहिलाय का? एक मिनिट, त्याचा फोन
वाजला होता का तो आंघोळीला गेल्यावर? आणि आपल्या
स्वयंपाकाच्या घाईत आपल्याला ऐकायलाच आला नाही? इम्पॉर्टंट
असेल का काही? की दुसरंच काहीतरी असेल?
कविताच्या डोक्यात विचारांचे भुंगे घुं-घुं करत होते. मीनव्हाइल तिने भाजी आणि
कोशिंबीरीची चवही घेऊन पाहिली, ठीक होतं की सगळं. उलट छानच
झालं होतं. जेऊन घ्यावं का आपण? भूक लागल्यासारखी वाटतेय.
नाही नको. दिनेशला फोन करून विचारावं का काय झालय म्हणून. तिने फोन घेतलाही. पण
नको. गाडी चालवत असेल. पुन्हा विचारांचे भुंगे चालू झाले. जाऊदे जेवतेच. भाजी छानच
झालीये. नाही थांब. काही वेगळं तर नसेल ना. म्हणजे बाहेरचं
काही? नाही नाही. काहीतरी काय! तसं नसेल. आयडिया! संध्याकाळी
त्याच्या आवडीचा pineअॅपल केक बनवते. म्हणजे मूड ठीक होईल
त्याचा. हम्म झालं तर मग. चला जेवतेच आता. पोहे अगदी घासभरच होते. भूकच लागलीये.
मोजून दोन मुष्ट पोहे भिजवायचे म्हणे. तेही दोघांसाठी. Dietitian बदललीच पाहिजे!
तो..
रोजच्या प्रमाणे बरोबर सातच्या ठोक्याला दिनेश उठला. आज तो थोडासा खुशचं होता. त्याचं
प्रेझेंटेशन अगदी छान तयार झालं होतं. ते देऊन ऑफिस मध्ये सगळ्यांना इम्प्रेस
करण्याची त्याला प्रचंड घाई झाली होती. एडिटोरियल्स स्किप करून आज त्याने
पेपरमधल्या नुसत्या हेडलाइन्सच चाळल्या. पटापट आवरायला लागला. पोहेही थोडे
गडबडीतचं खाल्ले. छान झाले होते अगदी. कविताचंही सगळं अगदी वेळेत सुरू होतं. पण आज
ती फारशी काही बोलत नव्हती. का बरं? जाऊदे.. वेळ नाहीये विचार करायला. आवर दिनेश पटापट. त्याच्या वाटची कामं
करून तयार होऊन तो बरोबर दहाच्या ठोक्याला डायनिंग टेबलवर हजर होता. वा! मेथी!
मनातल्या मनात म्हणत त्याने पोळीचा घास घेतला. सवयीप्रमाणे त्याची नजर शेजारी
ठेवलेल्या फोनवर गेली. 10.05 होत आले होते. आवरलं पाहिजे पटकन. 10.15 ला गाडीत बसलो
तरचं अगदी वेळेत ऑफिसला पोचता येतं. एक मिनिट.. तारीख काये आज? 14 J.. इतकच त्याने पाहिलं. आणि मनातल्या मनात
म्हणाला. ओहह शिट्ट.. anniversary आहे का आज आपली?? ओह नो, आपण परत घोळ घातला का.. म्हणूनच बहुतेक ही
सकाळपासून गप्प आहे! बुलेट ट्रेनच्या वेगाने त्याच्या डोक्यात विचार येत राहिले.
घास तोंडातचं अडकला. आता काही खैर नाही! काय करावं बरं??
ऑफिसची घाई, पुढे सरकणारं घड्याळ,
विसरता विसरता राहिलेली anniversary या सार्याचा गोंधळ
त्याच्या चेहर्यावर तंतोतंत उतरला होता. त्याच तशाच विचित्र नजरेने त्याने एकवार
कविताकडे पाहिलं. ती काहीतरी बोलणार होती. तेच असणार.. परत विसरलास वगैरे. ओह नो.
हा विषय आत्ता नको! सटकलं पाहिजे. ती नजर तशीच ठेवत,
तोंडातला घास गळ्यात सरकवत त्याने पटकन डबा, बॅग आणि फोन
उचलला आणि तिथून चालता झाला.
कासातरी ऑफिसला पोचला. प्रेझेंटेशन छान झालं. पण डोळ्यांसमोर सतत
संध्याकाळचा युद्धप्रसंग उभा राहत होता. काय करावं? काय करावं? त्याने फोन
उघडून पाहिला.. कविताने काही स्टेटस पण ठेवलं नव्हतं anniversary स्पेशल. म्हणजे ती नक्कीच चिडलिये. साडी घेऊन जाऊ का? की ड्रेस? त्याच्या डोक्यातलं ट्रबलशूटिंग मेकॅनिजम
अॅक्टिवेट झालं होतं. नाही नको. ती आल्यापावली एक्सचेंच करायला घेऊन जाईल. इतका
चांगला चॉइस आहे आपला पण हिला काही आवडतच नाही कधी! आयडिया!! सर्प्राइज द्यायचं होतं असं प्रीटेंड
करतो. तिची ती ट्रायबल जुलरी का काय ते, ती घेऊन जाऊ आणि
तिचा ऑल टाइम फेवरेट पाइनअॅपल केक!! बास्स! वर थोडी अॅक्टिंग
चिटकावली की होईल ती सेट. येस्स. चला. कामाला लागलं पाहिजे.
ती आणि तो!!
कविताचा मस्त पाइनअॅपल केक फ्रीज मध्ये सेट होत होता. ती पण आवरून
एकदम तयार होती. बर्याच दिवसात डायट मुळे केक खल्लाच नव्हता दिनेशने. आज तो आपला केक
पाहून नक्की खुश होणार याची तिला खात्रीच होती. सगळं नीट आवरून तो यायच्या वेळेला निवडून
एक इंटेलेक्चुवल मॅगजीन वाचत ती सोफ्यावर बसली.
कविताच्या फेवरेट ब्रॅंडचा एक सुरेख ट्रायबल जुलरी सेट आणि मस्त पायनॅपल
केक घेऊन दिनेश दारात येऊन उभा राहिला. पुढे करायच्या अॅक्टिंगची मनात पूर्वतयारी करत
एक दीर्घ श्वास घेऊन त्याने बेल वाजवली.
बेल वाजल्या वाजल्या कविताने धावत जाऊन फ्रीजमधला केक आणून सोफ्यासमोर
टीपोय वर ठेवला आणि लागलेला श्वास नॉर्मल करत तिने दार उघडलं. आणि दोघेही एकदाच “सर्प्राइज!!”
असं ओरडले! समोरचा केक पाहून ‘चला, वातावरण नॉर्मल आहे. फार काही
चिडलेली दिसत नाहीये’ असं म्हणत दिनेशने एक सुटकेचा निश्वास सोडला.
आणि त्याच्या हातातला केक आणि गिफ्ट पॅक पाहून ‘वा! हा नॉर्मल
झालाय वाटतं’ असं म्हणत कवितानेही निश्वास सोडला. आत येत केक
कडे पाहत दिनेश उत्साहात म्हणाला,
“अरे वा! पायनॅपल केक!! मस्त.”
त्याच्याकडे हसून पाहत कविता म्हणाली,
“हो मग काय, सकाळी मूड गेलेला दिसला तुझा! काय झालय काही कळेना. म्हणून मग म्हटलं केक
करावा.”
तिच्या बोलण्याचा खरंतर त्याला काही अर्थ लागला नाही. जाऊदे म्हणत
हातातलं गिफ्ट तिला देत तो मोठयाने म्हणाला,
“हॅप्पी अॅनिवरसरी बायको!!”
कविताच्या हसर्या चेहर्यावर एकदम प्रश्नचिन्ह उभं राहिलं. ‘anniversary??’ ती मनातल्या मनात
म्हणाली. आणि मग कलेंडर कडे पाहिल्यावर सारा प्रकार तिच्या ध्यानात आला. आणि मग पोट
दुखेपर्यंत हसून ती दिनेशला म्हणाली,
“महिनाभर आधीच happy anniversary?? दिनेश अरे महिना तरी लक्षात ठेवायचा!
आज 14 जून आहे, 14 जुलै नाही!!”
तो जुलरी सेट वाखाणत लॉटरी लागल्याच्या आनंदात ‘ह्या उगाच काथ्याकूट केला आपण दिवसभर
अति विचार करून’ असं म्हणत परत मोठयाने हसायला लागली.
दिनेशच्या टम्म फुगलेल्या फुगयातली हवा सर्र्कन निघून गेली आणि ‘पुन्हा माती खाल्ली आपण’ असं म्हणत तो गिफ्टच्या बिलाकडे पाहत खाली बसला!
आणि मग हा गैरसमज-सोहळा celebrate करत दोघांनी ते दोन्ही पायनॅपल केक्स पुढचे चार दिवस चाखून चाखून खाल्ले!!
😂😂
@संजीवनी पाटील देशपांडे
टिप्पण्या