द सोशल डिलेमा!!


 

दोन दिवसांपूर्वी सहज नेटफ्लिक्स वर सर्फिंग करताना मला पहिल्या क्रमांकावर ट्रेंड करणारी एक डॉक्युमेंट्री दिसली. नाव होतं, द सोशल डिलेमा’!! उत्सुकतेपोटी मी ती पाहून काढली. आणि अक्षरशः थक्क झाले! आपण कल्पनाही करू शकत नाही अशा गोष्टी त्यातून आपल्या समोर येतात. आणि तंत्रज्ञान कुठल्या पातळीला पोचलय ते पाहून धक्केही बसतात. जेफ ओर्लोव्हस्की या अमेरिकन फिल्म-मेकरने ही डॉक्युमेंट्री लिहून दिग्दर्शित केली आहे. आणि ती नेटफ्लिक्स वर 9 सेप्टेंबर पासून उपलब्ध आहे. यावर्षीची ती सगळ्यात महत्वाची, सगळ्यांनी पहायलाच हवी अशी आणि डोळे उघडणारी डॉक्युमेंट्री आहे असं समीक्षकांचं म्हणणं आहे. असं काय आहे त्यात? तर, त्यात या सगळ्या सोशल मीडियाच्या आकर्षक packaging मागचं काळं सत्य सांगितलंय. कोणी? तर तिथेच मोठ्या मोठ्या पदांवर काम केलेल्या माजी अधिकार्‍यांनी! यात गूगलचे माजी डिजाइन एथीसिस्ट त्रिस्तान हॅरिस आहेत, पिंटरेस्टचे माजी प्रेसिडेंट टिम केंडल आहेत जे आधी फेसबूकचे monetisation हेड होते, फेसबूकच्या लाइक बटनचे को-क्रिएटर जस्टिन Rosenstein आहेत.. आणि असे बरेच एक्स्पर्ट्स.

आपल्याला सगळ्यांना असं वाटत असतं की आपण सोशल मीडिया वापरतो. पण मुळात असं नाहीचे. आजकाल आपण सोशल मीडिया वापरत नाही तर सोशल मीडिया आपल्याला वापरतं! मागच्या दहा वर्षात इतके अचाट बदल या क्षेत्रात घडलेयत की सामान्यांनी केवळ आ वासून त्यांच्याकडे पाहत राहावं! 12-15 वर्षांपूर्वी जेव्हा सोशल मीडिया बाळसं धरू पाहत होतं, तेव्हा जगाला ते एक अभूतपूर्व इनोवेशन वाटलं होतं.. सगळं जग अगदी एका क्लिकच्या अंतरावर येऊन ठेपलं होतं. पण तेव्हा कोणी कल्पनाही केली नव्हती, अगदी त्यांना जन्म देणार्यानीही की पुढच्या दहा वर्षात ते एक अक्राळ-विक्राळ रूप धारण करून जगातलं नंबर एकचं बिजनेस मॉडेल बनेल वगैरे! पण तसं झालंय. सगळ्या इंटरनेट कंपन्या आज मार्केटमध्ये टॉप वर आहेत. खोर्‍याने डॉलर ओढतायत. यात मग फेसबूक, Instagram, गूगल, ट्वीटर, whtasapp, पिंटरेस्ट पासून सगळे आले. हे कसं काय शक्य झालं असेल? बरं हे सगळे सोशल प्लॅटफॉर्म यूजर साठी विनामूल्य आहेत. म्हणजे फेसबूक वर जर कोणाला नवीन अकाऊंट काढायचं असेल तर कुठलीही सब्स्क्रिप्शन फी भरावी लागत नाही. असं असेल तर मग यांचं उत्पन्नाचं साधन काय? ज्याच्या सहाय्याने ते trillions मध्ये पैसे कमावतायत. उत्तर आहे advertising! Advertisers या सोशल नेटवर्किंग साइट्सना पे करतात. आणि त्यावर या साइट्स चालतात. कशासाठी पे करतात advertisers? तर या सगळ्या सोशल साइट्स वर जे जवळपास 2-3 billion यूजर आहेत (म्हणजे आपण) त्यांच्यापर्यंत आपापले प्रोडक्टस आणि त्यासंबंधी जाहिराती पोचवण्यासाठी हे advertisers या साइट्सना पैसे देतात. इथपर्यंत सारं काही ठीक आहे. पण खरा प्रॉब्लेम सुरू होतो तो यापुढे..

आपण करमणूक म्हणून किंवा connectivity साठी वगैरे या साइट्स वापरतो. तीन-चार वर्षांपूर्वी फक्त तरुणांचा यावर वावर असायचा. आता तसं राहिलेलं नाही. जवळपास सगळे याचा वापर करतात. आणि आपण जे-जे काही इथे करतो सर्चिंग असेल, चॅटिंग असेल, स्क्रोलिंग असेल, शेरिंग असेल या सगळ्यावर या साइट्सचं अगदी बारीक लक्ष असतं. किती बारिक? तर आपण काय पाहतो, आपल्या क्लोज कोण आहे, कोणाची प्रोफाइल आपण वारंवार पाहतो, कुठला फोटो कितीवेळ पाहतो इथपर्यंत इत्थंभूत गोष्टी त्यांना माहीत असतात. इन फॅक्ट ते माहीत करून घेतात. आणि या माहितीला म्हणतात डेटा’! याच डेटाच्या जिवावर हे लोक अरबो कमावतात! कसं? हा डेटा ते विकतात का? तर नाही. आपला हा डेटा ते advertisersना डायरेक्ट्लि विकत नाहीत. ते illegal पण आहे. ते काय करतात तर हा जो गोळा केलेला डेटा असतो तो analyse करतात. त्यासाठी engineers च्या टीम च्या टीम काम करत असतात. आणि मग त्यावरून आपल्या आवडी-निवडी, आपलं व्यक्तिमत्व या सार्‍याचा ते अंदाज बांधतात. आपलं एक मॉडेल तयार केलं जातं जे आपल्या actions predict करत जातं. हो! प्रत्येक अकाऊंटचं एक वेगळं मॉडेल असतं! आणि मग त्यावरून या साइट्स आपल्याला गोष्टी recommend करतात. त्यात मग फ्रेंडस, पेजेस, प्रोडक्टस, softwares, पोस्ट्स हे सगळं आलं! थोडक्यात, या साईट ओपन केल्यावर आपल्याला काय दिसणार, आपण काय पहायचं, काय दिसणार नाही हे सगळं ते ठरवतात. म्हणजे बघा आपण जर विकिपीडिया उघडलं तर जगातल्या सगळ्या व्यक्तींना त्यावर ठराविक सर्च साठी ठराविक माहिती दिसते. व्यक्तीगणिक ती माहिती बदलत नाही किंवा कंटेंट बदलत नाही. पण सोशल मीडियाच्या बाबतीत मात्र असं नाही. इथे यूजर प्रमाणे कंटेंट बदलत जातो. मला फेसबूक वर जे दिसतय ते तुम्हाला दिसेलच असं नाही. आपल्या इंट्रेस्टनुसार किंवा त्यांना आपल्याला जे दाखवायचय जेणेकरून आपला स्क्रीनटाइम वाढत जाईल त्यानुसार पोस्ट्स आणि ads आपल्याला दिसतात. आपण किती जास्त वेळ त्या साईटवर ऑनलाइन आहोत त्यावर त्यांचं प्रॉफिट ठरत असतं. त्यामुळे, आपल्याला सतत स्क्रीनवर गुंतवून ठेवणं हे या साइट्सचं एकमेव टार्गेट असतं. आपल्या आवडी-निवडी तर त्यांना कळलेल्या असतातच. त्यावरून, advertisers ना त्यांच्या प्रॉडक्टमध्ये रस असू शकणारे users (म्हणजे आपण) या साइट्स विकतात! म्हणजे तुमच्या लक्षात येतय का, या सोशल नेटवर्किंग बिजनेस मध्ये आपण ना users आहोत ना customers!! आपण चक्क प्रॉडक्ट आहोत.. जे हे विकतात. आपल्या नकळत! तुम्ही जर गूगल वर एखादी वस्तु सर्च केली तर उद्या लगेच त्याची ad तुम्हाला तुमच्या फेसबूक अकाऊंट वर आपोआप दिसेल. किंवा एका ठराविक विषयाच्या पोस्ट्स ना तुम्ही लाइक करत गेलात तर, त्याच विषयाच्या भरमसाट पोस्ट्स तुम्हाला पुन्हा-पुन्हा दाखवल्या जातील. एकूण काय तर, आपल्या नकळत आपण वापरले जातोय. आपण सोशल मीडिया वर केलेली प्रत्येक गोष्ट ते त्यांच्या आर्थिक फायद्यासाठी वापरतात. गूगल मॅपचच उदाहरण घ्या, आपण सतत जे लोकेशन अॅड करत राहतो ना फेसबूक, Instagram इ. इ. साइट्स वर त्यातून गूगल त्यांचे मॅप modify करत असतं. त्यांना लोकेशन पुरवणारे आपण unpaid वर्कर्स आहोत. तसच autopark, लेन assist वगैरे आधुनिक फीचर्स असणार्‍या गाड्या खरेदी करून आणि मग वापरुन आपण त्यांना लोकेशन प्रोवाइड करत असतो, आपल्या नकळत!

खरंतर connectivity या एकमेव उद्देशाने यातल्या बर्‍याचशा साइट्स जन्माला आल्या होत्या. पण नंतर पुढची दहा वर्ष ज्या वेगाने त्यात बदल होत गेले ते धक्कादायक आहेत. आणि हे असे बदल अॅक्सेप्ट करण्यासाठी आपण अजून तितके evolve झालेलो नाही. त्यांच्या आर्थिक फायद्यासाठी या साइट्स आपल्या सगळ्यांना आपल्या नकळत स्क्रीन अॅडिक्ट करत आहेत. विशी आणि अर्लि तिशी मधला जो तरुण वर्ग आहे तो या गोष्टींनी पटकन अॅडिक्ट होतोय. लाईक्स, कममेंट्स, शेरिंग, tagging इ ची प्रचंड क्रेझ त्यांच्यात आहे. अधिक लाईक्स ची रेस, पॉप्युलर प्रोफाइल ची रेस, वायरल होण्याची धडपड हे सगळं इतकं जीवघेण ठरतय की या जेनेरेशनला डिप्रेशन अगदी चुटकी सरशी येतं. लाईक्स कमेंट्सच्या वेडापायी सतत लोकांचं appreciation, approval यांना हवं असतं. सतत स्क्रीनला चिटकुन राहणारी एक अख्खी पिढी हा सोशल मीडिया घडवतोय. इतकच नाही तर त्यांना तसं अॅडिक्ट करून पैसेही कमावतोय. फिल्टरमध्ये दिसतो तसा खरा चेहरा दिसावा म्हणून टीनेज मुलं-मुली प्लॅस्टिक सर्जरि ची मागणी करतायत. हे भानक आहे. या टेक कंपन्यांमध्ये तीन गोल्स ठरवून दिलेली असतात. एंगेजमेंट गोल (अधिकाधिक, लोकांना सोशल मीडिया वर खेचून आणण), ग्रोथ गोल (नवीन अक्कौंट्स अॅड होत जातील हे पाहणं), advertising goal (अधिकाधिक advertisers शोधणं). आवडत्या लोकांचे updates notifications मार्फत सतत पाठवत राहणे, tagging, कमेंटिंग ला encourage करणे इ. इ. अनेकानेक उपाय हे लोक आपल्याला तिथे गुंतवून ठेवण्यासाठी करत असतात. तुम्हालाही आला असेलच याचा अनुभव. पिपल यू मे नो दाखवण्यामागेही हाच उद्देश असतो आणि नंतर त्यांना वेव करा म्हणण्यामागेही हाच उद्देश असतो. आणि ही सगळी कामं करत असतात त्यांनी बनवलेले अलगोरीथ्म्स आणि computers! यात कोणा एकाला दोषी धरताच येत नाही. पण humanity नावाची गोष्ट मात्र यातून नाहीशी होत चाललीये हे मात्र नक्की. अमानुष ट्रोल्लिंगला प्रोत्साहन देणे, समाजात दोन गट पाडून त्यामध्ये वाद घडू देणे हेही यातच आलं. याला conspiracy theories म्हणतात. इतकच नव्हे तर elections मध्येही या अवाढव्य डेटाचा अतिशय चलाखीने वापर केला जातो. पुन्हा आपल्या नकळत! इतकच नाही, पन्नास वर्षांनी तुम्ही कसे दिसाल? तुमचे नाव तुमच्या व्यक्तिमत्वाविषयी काय सांगते? तुमच्या राशिनुसार तुमचं भविष्य काय? किंवा चेहर्‍यांना वेगवेगळे शेप्स आणि filters लाऊन देऊ म्हणणार्‍या चिकार जाहिराती आपण रोज फेसबूक वर पाहतो. कुतूहलपोटी ती लिंक ओपेन करून सहभागी पण होतो. पण यात आपण त्यांना आपल्या पूर्ण प्रोफाइलला फ्री अॅक्सेस देतो. त्यांना आपला सगळं डेटा मग मिळत राहतो आणि ते त्याला monetise करतात. आपल्या नकळत! आपल्याला ती करमणूक वाटते पण नीट विचार केला तर हे सारं खूप भयानक आहे।

फेसबूकने तर नवीन अपडेट आणलाय. एक ऑक्टोबर पासून तो लागू होईल. तुम्हालाही येत असतील तसे notifications. आगामी लीगल धोके ओळखून त्यात त्यांनी हे सगळं स्पष्टपणे लिहलय आणि अॅक्सेप्ट किंवा न वाचता अग्री करून आपण त्यांना हे सगळं करायला परवानगीही देतोय. ही डॉक्युमेंट्री पाहिल्यावर मी ते अपडेट सविस्तर वाचलं. आपण एखादा फोटो शेअर केला तर तो स्टोर, कॉपी आणि शेअर करण्याचे पूर्ण अधिकार आपण फेसबूकला देतोय असं स्पष्टपणे त्यात लिहलय! आणि मला खात्री आहे नव्वद टक्के लोक न वाचता त्यावर अॅक्सेप्ट असं क्लिक करतील. अर्थात मीही केलं असतं. फेसबूकवर विकल्या जाणार्‍या कुठल्याही प्रॉडक्टची फेसबूक गॅरंटी देत नाही. त्यामुळे फसवा-फसवीचेही खूप प्रकार सध्या चालू आहेत.

हे सोशल प्लॅटफॉर्म तसे पूर्ण वाईटही नाहीत. चांगल्या गोष्टीही त्यात आहेतच की. ते बंद व्हावेत असं कोणाचच म्हणणं नाही. फक्त आपल्या डेटा वर आपला सर्वाधिकार असावा इतकीच मागणी आहे. तो कुठे कसा वापरायचा, मोबदल्यासकट की मोबदल्याविना तेही ठरवण्याचा पूर्ण अधिकार आपल्याकडे असावा इतकच म्हणणं या मूवमेंटच आहे. आणि मला वाटतं ते रास्तही आहे. पाश्चात्य देशात तसे प्रयत्नही होतायत. कॅलिफोर्निया मध्ये पुढच्या वर्षी तसा कायदाही येतोय. आपण मात्र या सगळ्यात खूप मागे आहोत. असं काही जगात घडतय हेच मुळी आपल्याला माहीत नाहीये. मग त्यावर उपाय वगैरे खूप दूरची गोष्ट आहे. आजकाल खेडोपाडीही तरुण मुलं-मुली या साइट्स वर पडून असतात. याने एक अनाकलणीय असा बदल आपल्या विचार करण्याच्या पद्धतीमध्ये होत जातोय. तो खूप gradual आहे. न जाणवणारा. पण त्याचे दूरगामी परिणाम खूप भयावह असतील. वाढता हिंसाचार, टुकाचा विचार करणे, आभासी जगामध्ये जगणे एक ना अनेक गोष्टी!

ही डॉक्युमेंट्री खरच सगळ्यांनी पहायला हवी अशीच आहे. मी आवर्जून सांगेन ती जाऊन तुम्ही पहा. आणि ही माहिती शक्य तितकी स्प्रेड करा. डोन्ट गेट यूज्ड! मी कालच माझ्या सगळ्या accounts च्या नोटिफिकेशन्स ऑफ केल्या आहेत. आणि recommended पोस्ट्स किंवा विडियो पहायचे नाहीत असहि ठरवलय. तुम्हीही करून पहा..:)


@संजीवनी पाटील देशपांडे 

 


टिप्पण्या

अनामित म्हणाले…
Thank you
देर आए दुरूस्त आए!!!

लोकप्रिय पोस्ट