देवा, तु नक्की कसा दिसतोस?
देवा, तु नक्की कसा दिसतोस?
कुठे वसतोस?
कोणी तुला मुर्तीत शोधतं
कोणी पोथ्या-पुराणात
कुणाला वाटतं, तु आहेस चराचरात
तुझी रुपं वेगळी अवतार वेगळे
जगण्याच्या मितीत न मावणारे
सारे तुझे सोहळे
एखाद्या अभिषेकाने तु प्राप्त होशील?
नैवेद्याने सुखावशील?
नाही इतका सोपा तु खचितच नसशील!
तू चैतन्याचा अधिपती
असंख्य आकाशगंगा
असंख्य सूर्यमाला
साऱ्यांचा मूळ स्त्रोत.. बृहस्पती!
तू फुलांत सुगंध पेरतोस
फळांना गोडवा देतोस
तान्ह्या लेकराच्या गालात,
तू निरागस हसतोस
सुरकुतलेल्या हातांत
मायेने थरथरतोस
मला दिसतोस तू
बैलगाडीच्या किणकिण सूरांत,
वाऱ्यावर झुलणाऱ्या हिरव्या-सोनेरी तृणांत,
आईने भरवलेल्या मऊ-शुभ्र भातात
पहाटच्या शांत सुंदर प्रकाशात..
तुझं हे ‘असणं’ म्हणजेचं इश्
‘इशावास्यम इदम् सर्वम्’
तुझ्या अस्तित्वाचं बीज!
‘अल्टिमेट युनिफाईड फिल्ड’
तुझ्या असण्याची ही आधुनिक व्याख्या!
सारं काही सामावून घेणारं,
तरीही साऱ्यातून उरणारं
‘बीइंग’ ला तोलून धरणारं, तू ब्रह्मतत्व!
डोळे मिटून तुला साद घालणं,
पिंडी ते ब्रह्मांडी.. स्वत:मध्ये तुला शोधणं
तिथेच तू सापडशील हे उपनिषदांचं सांगणं..
तु सोप्पा आहेस, कठीणही तसा
तुझ्यापर्यंत पोचता पोचता
दर्शन घडतं माझंच मला..!!
~ संजीवनी
टिप्पण्या
आतून आलेलं काव्य आपलं...धन्यवाद