रुटीन
उकळला चहा, घेतला ओतून
तीचं चव तेचं प्रमाण
अगदी वेळ सुद्धा तीचं साधून
चार पक्षी बाहेर किलबीलले
चार सरी आल्या ओसरल्या
चहाची वाफ, कामाचा व्याप
डोळ्यांसमोर उभारला..
सारी कामं रोजचीच,
देव-धूळ-स्वयंपाक-चूल
प्रश्न रोजचा उभा, उत्तर मात्र फितूर
कुठली बरं करावी भाजी?
अन् कशाने बदलावी चव रोजची?
कशातुन प्राशावं प्रोटीन
आणि वगळावी जागा फॅटची?
मग काय.. इथेही रीघ रोजची..
विचारांनीच डोकं दुखतं,
आणि मग काहीतरी शिजतं
उदरभरण का काय ते, तेही पार पडतं!
कामं तीचं.. विचार तेचं..
आरामा सहित सारं तेचं सुरू राहतं..
खिडकीतून बाहेरची चित्रं बदलत जातात
आणि कॅलेंडर वरुन तारखा!
आपण मात्र राहतो होतो तिथेचं..
रुटीन नावाचं वस्त्र, मिरवत राहतो मजेत..
मग एक दिवस,
केस पिकतात.. सांधे झिजतात..
खिडकीबाहेर पाहणारे डोळेही थकतात..
त्यावेळी चघळण्यासाठी उरतं तेही रुटीनचं!
ती वेळ येण्याआधी,
खुण घ्यावी मनाशी बांधुन
आणि रुटीन शिवायचं प्रोटीन,
सर्वांनीच पहावं एकदातरी चाखुन..!!
~ संजीवनी
टिप्पण्या