संचित..

 जड-जड शब्द

दाराशी आले

कधी कविता कधी गोष्टी

गुंफायला लागले

आडवी ओळ 

की उभी ओळ

मग वादच सारे मिटले

सुचणं-बिचणं सगळं झूठ

मनात साचलेली तळी

आणि झाकलेली ती मूठ

उघडत गेली नकळत

फासे पडले उलट-सुलट

कुणी म्हणे काहीही

कुणी म्हणे वा! सुरेख

अरे कविताच ती

तिला कसलं आलंय

लाॅजिक अन्

कसलं आलंय तिखट-मीठ

कधी साधी-सरळ

कधी वाकडी चालत

कधी वळणांनी

कधी घाटातून 

उतरते खाली आणि 

म्हणते हळूचं,

लिहती हो!

नाहीतर सुकशील आतून

तुझं-माझं संचित आता

वाहणार फक्त शब्दातून

भीड जगण्याला..

रड घाबरता..

हस खळखळून..

थोडं मायेचं मिरवण

थोडं दु:खाचं गोंदण

तू कर आपलंसं सारंच

दोन्ही हात पसरुन

मांडी घालून, हात जोडून 

मिळव जराशी शांतता

मनातले तरंग मग 

मांड शब्दातून

जाणीवेला टिपण्याचा 

खेळचं असा अफलातून

सारं बाजूला सारत 

गाभ्याला हात घालणं..

जगण्यासाठी शब्द

की शब्दांसाठी जगणं?


दोन्ही एक होईतो,

आता हे चालत राहणं..


~ संजीवनी

टिप्पण्या

लोकप्रिय पोस्ट