भटकंती..





गळ्यात कॅमेरा अडकवून गाडीवर बसून निघावं दिशा नसलेल्या प्रवासाला, वेळ माहित नसलेल्या मार्गाने, खऱ्या माणसांच्या प्रदेशात. वेड्या गोष्टी पाहत, अनुभवत, ऐकत, टिपत. अनवाणी पायांनी मातीला भेटावं. तळपायांना वाटतच असेल की कधीतरी मुळांना भेटावसं. मध्यरात्री फुलांवरून वाहणाऱ्या सावळ्या वाऱ्याला वाहू द्यावं आपल्याही अंगावरुन. माणसांचा स्पर्श नसलेल्या माळरानावरुन रात्रीचा चंद्र पहावा. खरे सुगंध साठवावेत पर्फ्युम्सचं व्यसन लागलेल्या मनांमध्ये. आपल्या नसांना, पेशींना, रक्ताला अनुभवू द्यावं जरासं त्यांचं माहेरपण, चार भिंतींच्या बाहेर जाऊन मातीत, आभाळाखाली. जुनेर लुगडं ल्यालेल्या, डोईवर सरपण वाहणाऱ्या डोळ्यांतलं ते कष्टातून साकारलेलं खरेपण पहावं. नुसतंच पहावं कारण कुठलाच कॅमेरा ते टिपू शकत नाही. फाटका शर्ट सावरत उनाड रस्त्यावरुन काठीने टायर पळवत नेणाऱ्या पोराला कुठला आनंद  इतका पिसावतोय जाणून घ्यावं. वडाखाली तंबाखू चोळत दिवस काढणाऱ्या म्हाताऱ्यांना विचारावं, कडू तंबाखूवर आयुष्य आनंदाने उधळण्याइतका असा कुठला कडवटपणा गिळून गप्प बसून आहात तुम्ही. आनंदी झोपडपट्ट्यांमध्ये वाकून पहावं शहरातल्या प्रासांदांमध्येही सापडणाऱ्या सुखाचं कोणतं रूप यांना सुखी ठेवतंय. उच्चभ्रू काॅफी हाऊस मधल्यालातेला लाथ मारून गडाच्या पायथ्याशी भर ऊन्हात लिंबू-पाणी विकणाऱ्या आजीचं लिंबूपाणी प्यावं. अमृताची चव असते म्हणे त्याला. तासन् तास लाईट जाणाऱ्या गावात डेड झालेला फोन बाजूला ठेवून फोन व्यतिरिक्त आयुष्यात कोणत्या गोष्टी अजून तग धरून आहेत तपासावं एकदा. ग्यानबा तुकाराम च्या गजरातकाश ऐसा कोई मंजर होता, तेरे कांधे पे मेरा सर होता..’ चे सूर मिसळून पहावं कसली तंद्री लागतेय. स्टेटस, अपडेट्स, सेल्फीज, टार्गेट्स साऱ्याला फाटा देत रेंज नसलेल्या प्रदेशात भटकावं नुसतं. रणरणत्या ऊन्हात कडकडीत भूक लागलेली असताना दूर खोपट्यातल्या अन्नपूर्णेने दिलेली झुणका-भाकरी अधाशासारखी खावी. झाडाच्या झोळीत तान्हुल्याला निजवून शेतात राबणाऱ्या आईला पुसावं, बये जीव जाळणारी अशी कुठली ऊर्मी घेऊन घाम गाळतेस तू अहोरात्र! स्वार्थ, मीपणा, हेवेदावे काही काही माहित नसलेला एखादाखरामाणूस भेटला कुठे तर विचारून घ्यावं त्याला हे असं जगणं कसं जमवतोस तू? मलाही जमेल का ते

एखाद्या हिंस्र श्वापदाप्रमाणे केवळ वाईट वृत्तीचंही भेटावं कोणीतरी. ते तसं असणंही तो कसं जमवतो तेही हवंच की पहायला. उगाच केवळ मदत या उद्देशाने मदतही करुन पहावी कोणाला, कॅमेरा बाजूला ठेवून, उपकार केले तुझ्यावर सारखा आव आणता आणि त्या क्षणानंतर मी अमुक अमुक केलं ची टेपही वाजवता. मनाचा कोतेपणा बाजूला सारत चांगल्याला चांगलं म्हणायलाही शिकून घ्यावं जरासं. अवघड वाटलं तरी. गाव शहर राज्य देश साऱ्या सीमा नाकारत भटकत रहावं नुसतं. आपल्यापेक्षा खूप वेगळी, वेगळ्या विचारांची, आचारांची, संस्कृतीची, भूगोलाची माणसं देखील जगाच्या पाठीवर आहेत याची जाणीव करुन द्यावी मनाला. वेगळेपणा म्हणजे वाईटपणा नसतो हेही समजावून सांगावं जमल्यास.. 

गळ्यात कॅमेरा अडकवून गाडीवर बसून निघावं दिशा नसलेल्या प्रवासाला, वेळ माहित नसलेल्या मार्गाने, खऱ्या माणसांच्या प्रदेशात. वेड्या गोष्टी पाहत, अनुभवत, ऐकत, टिपत!


~ संजीवनी देशपांडे



टिप्पण्या

लोकप्रिय पोस्ट