आरसा

 




तिने तिची ती आवडीची अंजिरी रंगाची साडी नेसली. कधी नव्हे ते काजळही रेखलं जरासं डोळ्यांखाली. आणि आरशात स्वत:कडे पाहू लागली.

ती साड्या तशा कमीच नेसायची. एखादा ढगळ सूती कुर्ता आणि त्याखाली तशीच ढगळ जीन्स हा तिचा स्थायी वेश होता. लहानपणापासून घरात झालेले चंगळवादाला शरण न जाण्याचे संस्कार आता तिच्या अंगवळणी पडले होते. पूर्वी, मनाला नवे पंख फुटण्याच्या वयात, वाटायचं तिलाही बरे कपडे घालावेसे, नाही असं नाही. त्यातच, त्या काळात तिच्यावर टिकायला लागलेली त्याची नजर तर तिला अजून अजून त्या मोहाकडे ढकलायची. पण मग आपल्या भोवतीचं समाजवादी वर्तुळ, तत्वनिष्ठ आई-वडील काय म्हणतील या विचाराने ती त्या मोहाला बळी मात्र पडायची नाही. पुढे चंगळवादाचं वावडं नसलेला तो, नवी क्षितिजं धुंडाळत पार साता-समुद्रापार निघून गेला. आणि त्यासोबत छान राहण्याचा हट्ट करणारा तिच्या मनाचा तो एक कोपराही मूक झाला. पुढे मग तिलाच त्या कशात रस उरला नाही. आपलं काम, अभ्यास, व्यासंग यावरुन आपली ओळख निर्माण व्हावी असं वाटण्याच्या मानसिक टप्प्यावर ती एव्हाना येऊन पोचली होती. उगाच खळखळ करणारं वयाचं ते नाजुक वळणही आता मागे पडलं होतं. मुक्त आणि सुधारणावादी घरात वाढल्यामुळे लग्नाचं वय वगैरे संकल्पनांना फारसं सामोरं न जाता ती तिच्या कामात व्यग्र होती. वाड्या-वस्त्या धुंडत जगण्याचा संघर्ष पाहत होती, तो कमी व्हावा यासाठी तिला शक्य तितके प्रयत्न करत होती. तिचे स्तंभ वर्तमानपत्रांतून झळकत होते. नावाजले जात होते. परखड, मनस्वी, संवेदनशील, आणि अभ्यासू लेखणी कोणाच्या मनाचा ठाव घेणार नाही?

 

कॉलेजच्या त्या दिवसातही ती अशीच लिहायची. बरंच काही. विचार करायला भाग पाडणारं. मनाचा ठाव घेणारं. एरवी अतिशय बुजरा स्वभाव असलेल्या तिच्याकडे कोणाचही लक्ष जायचं नाही. त्यात तिचा तो ढगळ अवतार. आपल्याच तंद्रीत असणं. कॉलेजमधले ते तिचे सुरूवातीचे दिवस लायब्ररीत आणि वर्गात अतिशय निमूटपणे जात होते. पण त्यावर्षीच्या इंटर-कॉलिजियेट लेखन स्पर्धेत, प्रथम परितोषिक मिळवलेल्या कथेपेक्षा द्वितीय पारितोषिक मिळवलेल्या तिच्या कथेनेच सार्‍यांचं लक्ष वेधून घेतलं. रुढ विचारांना धक्के देणारी ती कथा भुवया उंचवणारी होती. कथेसोबत मग आपसूक तिच्या लेखिकेकडेही सार्‍यांच्या नजरा वळायला लागल्या. आपल्याच कोशात जगण्याची सवय असणार्‍या तिला मात्र याने फार कानकोंडं व्हायला व्हायचं. कित्ती मस्त लिहतेस गं तू! पासून बापरे हे असं कसं लिहू शकते ही इथपर्यंत दोन टोकांच्या प्रतिक्रिया देणारे बरेच जण रोज तिला भेटू लागले. खूप बोलणं हा तिचा स्वभावच नसल्याने ती बरेचदा या सार्‍यांना टाळायची. लिहणं एकवेळ सोप्पं पण ते वाचणार्‍यांना भेटणं तिला अधिक कठीण वाटू लागलं. जुजबी हसून ती वेळ मारून न्यायची. तिला भेटायला येणार्‍यांची मात्र तिला भेटून जराशी निराशाच व्हायची. इतकं स्फोटक लिहणारी ही मुलगी नक्कीच  तितकीच बेधडक असणार असा वाचणार्‍याचा समज असायचा. पण प्रत्यक्षात ती मात्र अतिशय कमी बोलणारी, गर्दीत न मिसळणारी, पुस्तकात तोंड खुपसून बसणारी वगैरे आहेसं दिसल्यावर हे सगळं नक्की हिनेच लिहलंय का अशी शंका इतरांच्या मनात आल्याविणा राहायची नाही. तिला मात्र मग प्रश्न पडायचा मी जे लिहते त्याहून वेगळ्या स्वभावाची मी असू शकत नाही का?’

या प्रश्नाचं उत्तर तिला त्याने दिलं.

सगळीकडे चर्चा होत असलेली तिची ती कथा त्यानेही वाचली होती. आणि अर्थातच प्रभावित झाला होता. पण इतरांसारखा तो लगेच तिला येऊन भेटला नव्हता. कधीतरी लायब्ररीत टाइमपास करत असताना कोपर्‍यात एकटीच काहीतरी वाचत बसलेल्या तिच्याकडे बोट दाखवून त्याला कोणीतरी म्हणालं होतं, अरे ते बघ ती त्या कथेची रायटर.. तेव्हा, मागून तिचा केसांचा बॉबकट आणि तिकडे त्या कोपर्‍यात एकटं बसणं एवढच त्याच्या डोळ्यात भरलं होतं. तो खूप बडबडा नसला तरी जे काही बोलायचा ते प्रभावी असायचं. जात्याच हुशार. डोळ्यात भरेल असं व्यक्तिमत्व. त्यात distinction मिळूनही जाणीवपूर्वक आर्ट्स निवडलेल्यांपैकी तोही एक होता. कॉलेज मधल्या इतरांना होती तशीच तिलाही त्याची तोंडओळख होती. पण केवळ तोंडओळखच. स्वत:हून कोणाशी जाऊन बोलण्याचा तिचा स्वभाव नव्हता. तो प्रांत काही आपला नाही म्हणत निमूटपणे ती पुस्तकात स्वत:ला मिटून घ्यायची.

एका दिवशी कुठलंस लेक्चर चांगलच रंगलेलं होतं. प्राध्यापक अतिशय रस घेऊन शिकवत होते. त्यांनी वर्गाला उद्देशून प्रश्न विचारला,

मानवी इतिहासातली सर्वात आदिम आणि नैसर्गिक गोष्ट कुठली?’

सारे विचारात पडले. बरीच उत्तरं पुढे आली. पण प्रश्नकर्त्याचं समाधान काही होईना. सर्वात शेवटी तिने हात वर केला. सरांनी इशारा केल्यावर ती उठली आणि अतिशय निर्विकारपणे तिने उत्तर दिलं,

स्त्री-पुरुष संबंध!’

क्षणात सार्‍यांच्या माना वळल्या. त्याचीही वळली. त्यादिवशी त्याने तिला नीट पाहिलं. ती सुंदर होती की नाही हा प्रश्न नव्हता. पण, तिच्याकडे पाहिल्यावर सौंदर्याची एक नवीन व्याख्या त्याच्या मनात मूळ धरू लागली हे मात्र नक्की! इतर मुलींसारखे नटणे-लाजणे-मुरडणे वगैरे प्रकार ती करायची नाही. आणि अगदी बिनधास्त पोशाख किंवा बोलणं-चालणं ठेऊन तथाकथित पुढारलेपणाही दाखवायची नाही. तिचं वेगळेपण तिच्या बुद्धीत आणि विचारांमध्ये होतं. पण तिला स्वत:लाच अजून त्याची जाण नव्हती. ती का कोणास ठावूक स्वत:ला कमी समजायची. आदर्शवादी, बुद्धिवादी घरात वाढली असल्याने इतर मुलींसारखी स्वत:च्या दिसण्या-असण्याचे चोचले पुरवत ती मोठी झाली नव्हती. त्याबद्दल एक छुपं आकर्षण तिच्या मनात होतं. आणि मग त्या कळत्याही म्हणता येऊ नये आणि न कळत्याही म्हणू नये अशा वयाच्या अल्लड टप्प्यावर आकर्षक न राहणं, पार्लर, ट्रेण्ड्स वगैरेची जाण नसणं या सगळ्यापाई तिला स्वत:मध्ये काहीतरी न्यून आहे असं वाटत राहायचं.

तिचं उत्तर ऐकून प्राध्यापक खुश झाले. ते त्यांना अपेक्षित असंच उत्तर होतं.

त्या दिवशीपासून त्याचं लक्ष तिच्याकडे थोडं जास्तच जायला लागलं. तिचं एकटं-एकटं राहणं, ठरलेल्या एक-दोन मित्र मैत्रिणींव्यतिरिक्त इतर कोणाशीही पाच मिनिटांच्या वर फारसं न बोलणं, अतिशय साधं राहणीमान, आपण कसे दिसतोय याची अजिबातचं फिकीर नसणं, हे सगळं त्याच्या मनात नोंदवलं जात होतं. आणि या सार्‍यामुळे तो अधिकाधिक तिच्याकडे ओढला जात होता. आपल्याकडे कोणाची तरी नजर सारखी वळतेय हे मुलींना लगेच उमजतं. तसं ते तिलाही समजायला लागलं. पण छे, हे सारे आपल्या मनाचे खेळ आहेत. कितीजणींचा घोळका असतो त्याच्यामागे सतत. तो कशाला आपल्याकडे पाहील. असं काहीतरी म्हणत ती तो विषय पार डोक्यातून काढून टाकायची. तिचं अलिप्त आणि त्याचं लोकप्रिय वलय त्या दोघांना एकमेकांपासुन दूर ठेवत होतं.

 

कधी नव्हे ते तीन-तीन वेळा तिने आरशात पाहिलं. ऋतूचं म्हणजे कॉलेज मधल्या एका जुन्या मैत्रिणीचं लग्न. आणि त्यासाठी आपण आज चक्क तयार वगैरे झालोय या गोष्टीचं तिलाच थोडसं नवल वाटत होतं. निमंत्रण द्यायला आल्यावर ऋतूने तीन-तीन वेळा, आपला पूर्ण ग्रुप येणार आहे. तूही नक्की ये. कितीही व्यस्त असलीस तरी नक्की ये असं तिला बजावलं होतं. पूर्ण ग्रुप वर तिने मुद्दाम दिलेला जोरही तिला जाणवला. तो परत आलाय हेही तिला तिच्याच कडून समजलं. त्यादिवशी पासून तिचं मन थार्‍यावर नव्हतच तसं. आज इतक्या वर्षांनी तो तिच्या समोर येणार होता. तिला खूप आतून मोहरल्या सारखं वाटत होतं. पूर्वी वाटायचं तसच. अजून काही बदललं नाहीये तर! तिचं मन स्वत:लाच कबुली देऊ लागलं. थोडसं लिपस्टिक लावावं का? क्षणभर तिला मोह झाला. पण दुसर्‍याच क्षणी तिने तो विचार झटकून टाकला. आणि मग एव्हाना रक्तात भिनलेली समज तिच्या मनात आणि चेहर्‍यावर उमटली. स्वत:च्या पोरकटपणावर हसून तिने पर्स उचलली आणि जायला निघाली.

 

एका दिवशी ती जराशी लवकरच कॉलेज मध्ये आली. तिला लायब्ररी मधलं एक पुस्तक अतिशय तातडीने हवं होतं. आल्या आल्या तिने लायब्ररी गाठली. पण लायब्रेरीयन कडून समजलं ते पुस्तक दोन महिन्यांपासून कोणीतरी घेऊन गेलय. हिचा जीव खालीवर होऊ लागला. तिला हवे ते संदर्भ त्याच पुस्तकात होते. आणि असा एखादा किडा डोक्यात शिरला की मग तिला त्या विषयाचा फडशा पाडल्याशिवाय चैनच पडायचं नाही. बरीच विनंती केल्यावर तिला त्या लायब्ररियन कडून कळलं, पुस्तक त्याच्याकडे आहे. आता झाली की पंचाईत! पुस्तक हवं असेल तर त्याच्याशी जाऊन बोलावं लागणार. त्यात काय होतय, एवढा कोण लागून गेला तो, जा जाऊन बोल एक मन म्हणू लागलं. नाही. नको! दुसरं मन. याच विचारांमध्ये ती क्लास पाशी येऊन पोचली. तिच्या ठरलेल्या बेंच वर जाऊन बसली. लेक्चर ला अजून वेळ असल्याने गर्दी नव्हती. तिने इकडे तिकडे पाहिलं. आणि एकदम चकित झाली. दाराच्या अलीकडे तो त्याच्या चार-दोन मित्रांसोबत गप्पा मारताना तिला दिसला. जाऊन बोलावं की नको या विचारात ती त्याच्याकडे पाहत होती. तेवढ्यात त्याचीही नजर तिच्याकडे गेली. लगेच आपली नजर इकडे-तिकडे वळवत तिने तिचं लक्षच नसल्या सारखं दाखवण्याचा प्रयत्न केला. पण तो सपशेल फसला. तिच्या चेहर्‍यावरचा गोंधळ त्याने ओळखला. आणि किंचित गालात हसून पुन्हा गप्पांमध्ये गुंगला. हिची इकडे चिडचिड व्हायला लागली. जाऊन पुस्तक मागायचं ही इतकी साधी सोपी गोष्ट. पण त्यासाठीही आपली इतकी तारांबळ उडावी. त्यात तिला त्याच्याकडे पाहताना त्याने पकडलं होतं याने तर तिचा अजूनच तिळपापड होऊ लागला. शेवटी आता काही होऊदे, जाऊन विचारायचच असं ठरवून ती आता उठणार इतक्यात तिने त्यालाच तिच्याकडे येताना पाहिलं आणि पुरती गार पडली. पुन्हा गोंधळून उगाच पुस्तकं खाली-वर करण्याचा आव आणत बसून राहिली.

तो तिच्या जवळ आला आणि ग्रेसफुली म्हणाला,

“हाय!”

तिने मान वर करून त्याच्याकडे पाहिलं.

आणि किंचित हसून “हाय..” म्हणाली॰

“आज लवकर आलीस!”

“हो, ते लायब्ररी मध्ये काम होतं थोडसं.” ती जराशी गडबडलीच.

“अच्छा!” तो शांतपणे म्हणाला.

त्याने पुन्हा एकवार तिच्याकडे नीट पाहिलं. बोलके डोळे, ठसठशीत नाक, लक्ष वेधून घेणारी जिवणी, प्रसाधनं या गोष्टीशी दुरान्वयेही संबंध नसलेला नितळ रंग, आकाशी रंगाचा खादीचा कुर्ता, मानेपर्यन्त प्रयासानेच पोचणारे भुरभुर केस, डोळ्यांत विलक्षण चमक, पण देहबोलीत एक प्रकारचं प्रचंड अवघडलेपण, कपाळावर जमा झालेले बारीक घर्मबिन्दु.. तो अनिमिष डोळ्यांनी तिच्याकडे पाहत होता.

ती अजून अवघडली. जरासं हसून मग तो म्हणाला,

“आणखी नक्की किती मिनिटं विचार केल्यावर बोलणार आहेस जे बोलायचंय ते?

त्यावर अजून चकित होत ती म्हणाली,

“तुला कसं कळलं मला काहीतरी बोलायचय तुझ्याशी?”

“जादू..” पुन्हा तसंच हसून तो म्हणाला. असा हसला की त्याच्या डाव्या गालात खळी पडते हे तिला नव्यानेच समजलं.

त्याच्याकडे एक हलका कटाक्ष टाकून मग तीही हसली.

नंतर मग ती शोधत होती ते पुस्तक त्याने तिला आणून दिलंच. पण, पूर्ण दिवसभर दोघे सोबतच राहिले. लेक्चर, कॅंटीन, लाईब्ररी सगळीकडे. दिवस अखेरपर्यंत तिच्यातलं अवघडलेपण जाऊन ती छान खळखळून हसायला लागली होती. एरवी खूप कमी बोलणारी ती, त्याच्यासोबत बर्‍याच मुद्द्यांवर हिरीरीने तार्किक वादही घालू लागली होती.

त्यादिवशी रात्री तिने कधी नव्हे ते आरशात पाहिलं. आणि त्यात तिला तिच्या चेहर्‍या ऐवजी, तिच्यावरून प्रचंड कुतुहलाने फिरणारी त्याचीच नजर पुन्हा पुन्हा दिसायला लागली. मनाला दिलेली भूल जाऊन संवेदना जाग्या व्हाव्या तसं काहीसं तिला वाटायला लागलं होतं..


क्रमश:


@संजीवनी 


टिप्पण्या

अनामित म्हणाले…
पुढील भाग?
Sanjeevani म्हणाले…
पुढील भाग उद्या प्रकाशीत होईल.

लोकप्रिय पोस्ट