ऋणनिर्देश




कोरे कागद. नुसतेच कोरे कागद पसरले होते सगळीकडे. एखाद-दूसरा शब्द लिहून चुरगळून टाकलेले पण होते काही. अस्ताव्यस्त पसारा नुसता. मन ब्लॉक. डोकं बधिर. पेन थिजलेलं. एखादा शब्द अगदी तोंडावर
असूनही जेव्हा नेमका सुचत नाही, तोंडातून बाहेर पडत नाही तेव्हा कशी घुसमट होते, त्याहून कैक पटींनी जास्त घुसमटत होते. आत खूप काही साचलेलं. पण बाहेर पडायला वाट सापडू नये अशी अवस्था.

मग 2020 उजाडलं.

पूर्वी लिहलेली एक कथा लोकसत्ता मध्ये छापून आली. नावाजली गेली.

मग भीत भीत पुन्हा पेन उचललं. म्हटलं पहावं जमतय अजून की विसरलेय. एखादी खूप अवघड गाठ सायासावीण सुटत जावी तसे शब्द सापडत गेले. मी लिहत गेले. एका मागून एक कथा मग कविता मग अजून काय काय लेखणीतून बाहेर पडत गेलं. मनाचे कोपरे हलके होत गेले.

मग या माझ्या कितीतरी वर्षांपासून बंद असलेल्या ब्लॉगचं कुलूप काढलं. जुन्या खुणा जपत तो पुन्हा लिहता-वाचता केला. बरचसं लिखाण आता इथे पोस्ट केलय. बाकीचं जमेल तसं अजूनही करतेय. इतर ठिकाणी लिहण्याचे पर्यायही होते. वर्तमानपत्रं, सध्या बहरात असलेली निरनिराळी मराठी संकेतस्थळं.. पण मी माझा जुना ब्लॉग निवडला. जे वाटतय ते जसं च्या तसं उतरवायचं असेल तर हेच ठिकाण उत्तम. इथे येऊन कोणी वाचेल का? हा प्रश्न होता. पण, कोणीतरी वाचावं हा लेखनामागचा उद्देशच नसल्याने त्याने फरक फारसा पडला नाही. माझे गुण-अवगुण बरोबर घेत मी लिहत राहिले. आणि वाचकांनी खूप छान प्रतिसाद दिला. तीन-चार महिन्यात वाचकसंख्या वीस हजारांचा टप्पा ओलांडून पुढे गेली. प्रतिक्रियांचे भरपूर मेल्स आले. येताहेत. काही काही प्रतिक्रिया तर अतिशय हृदयस्पर्शी आहेत. निरनिराळ्या देशातील मराठी भाषिक आवर्जून त्यांच्या प्रतिक्रिया कळवतात. यामुळे उत्साह खरच द्विगुणित होतो. 

हे वर्ष खरंतर खूप उलथा-पालथीच होतं. बरे वाईट अनुभव सगळ्यांना आले. खूप काही शिकायलाही मिळालं. आपल्या मुळांची आठवण या वर्षाने आपल्याला करून दिली.

नवीन वर्षात पाऊल ठेवण्या आधी, हा माझ्या वतीने एक प्रकारचा ऋणनिर्देश आहे माझ्या लेखणीप्रती, सरलेल्या वर्षाप्रति, आणि अर्थात वाचकांप्रती!

सर्वांचे खूप आभार!

तुमच्या प्रतिक्रिया अशाच कळवत रहा. सध्या इंग्लिश-मराठी दोन्ही भाषांमध्ये थोडंफार काम चालू आहे. ते येणार्‍या वर्षात तुम्हा सगळ्यांसमोर येईलच.

नवीन वर्षाच्या सगळ्यांना खूप शुभेच्छा!

येणारं वर्ष सर्वांसाठी आरोग्यदायी आणि आशादायी ठरो!


 

संजीवनी 

 

 


टिप्पण्या

अनामित म्हणाले…
तुमचे लिखाण ईतके सुंदर असते की प्रतिसाद दिल्याशिवाय राहावत नाही.
पुढेही असेच सुंदर आणि आशयपुर्ण लिखाण वाचायला मिळेल ही अपेक्षा. :)
पुढील लेखनासाठी खूप सार्या शुभेच्छा!

लोकप्रिय पोस्ट