आरसा.. भाग-२
तिने मला वेड लावलं वगैरे मी म्हणणार नाही. पण, ती भेटल्यापासून मी तिच्याकडे नकळत ओढला जाऊ
लागलो होतो. त्याआधी मी माझ्याच धुंदीत असायचो. माझी
बौद्धिक कुवत,
एकूण व्यक्तिमत्व, मेडिकल ला सहज अडमिशन मिळत असतांनाही कला
शाखा निवडली या गोष्टीचा नकळत चढलेला ‘माज’, सुरुवातीच्या काही दिवसातच कॉलेज मध्ये लोकप्रिय होणं, सतत मागे-पुढे घोळके, बहुतेक सर्व मुलींमध्ये
माझ्याविषयी निर्माण होणारं एक छुपं आकर्षण या सार्याच्या कैफात वावरायचो मी. पण
हा माझा सगळा माज तिच्या त्या एका कथेने उतरवला! कथा वाचून भारावून गेलो होतो मी.
माझ्याच वयाची ही मुलगी आणि इतकं अफाट लिहू शकते?
त्या दिवशी पासून मी पुन्हा जमिनीवर यायला लागलो. तिला दुरून
न्याहाळत राहिलो. त्या दिवशी वर्गात तिने दिलेलं उत्तर देण्याचा कोणी विचार देखील
केला नसता. पण तिने ते दिलं. कसलाही अभिनिवेश न आणता. केवळ शास्त्रीय
दृष्टीकोणातून त्या सार्याकडे पहात. हे खूप कमी जणांना जमतं. ती त्यापैकि एक
होती. कधी कुठे पुढे-पुढे नाही. ‘मला हे हे येतं’, ‘मी अशी अशी
आहे’ वगैरे काहीही ‘दाखवण्याचा’ तिने कधी प्रयत्न केला नाही. हे सगळं मला मनोमन आवडायला लागलं होतं.
तिच्या येण्याची मी वाट पाहू लागलो. कुठेही गेलो तरी नजर तिला शोधू लागली. मी
तिच्याकडे पाहतोय हे तिलाही कळायला लागलं होतं. पण वळत मात्र नव्हतं. तिच्या त्या
एक-दोन मित्र मैत्रिणीच्या चमूत तिसरा कोणी सहज जरी आला तरी ती लगेच तिथून पळ
काढायची. चित्रपट-नाटकाचे प्लान्स ठरायला लागले की ही ‘मला
नाही जमणार’ म्हणत लाईब्ररि मधल्या कुठल्या तरी कोपर्यात जाऊन
बसायची. ती स्वत:च स्वत:ला मागे ओढतेय असं वाटत राहायचं. राहणं तर इतकं साधं की ही
कधी आरशात पाहते तरी की नाही असा संशय यावा. पण जस-जशी ती मला कळत गेली तसं-तसं
तिचं ते साधेपणच तिचा खरा दागिना आहे हे समजायला लागलं. ती आतून-बाहेरून ‘खरी’ होती. इतर कुठेही मग माझं मन रमेनासं झालं.
त्यादिवशी पुस्तकाच्या निमित्ताने आमची औपचारिक भेट झाली. आणि मग
आम्ही ‘भेटतच’ राहिलो. सगळीकडे. सतत. तिच्याशी
दर्जेदार चर्चा करता
याव्यात म्हणून मी पूर्वीपेक्षा जास्त वाचायला लागलो. आमचा विषय तसा
मानववंशशास्त्र! उत्क्रांती, उत्खनन, इतिहास, भूगोल, समाजशास्त्र.. चर्चेसाठी विषयांच्या सीमा धुरकट होऊ लागल्या. माझा आवाका
वाढत गेला. तिच्या मुद्द्यांनी बहुतेक वेळा अवाक व्हायला व्हायचं. पण तसं मी तिला
भासवायचो नाही. स्तुती वगैरे गोष्टी तिला झेपायच्याच नाहीत. तसं काही केलं की ती
पळ काढते हे एव्हाना मला उमगलं होतं. ती इतर मुलींसारखी उठता-बसता ‘चहा पिलास का?, ‘जेवण केलंस का?’ वगैरे प्रश्न विचारणार्यांपैकी नव्हती. टायनबी,
इरावती कर्वे, सेपीएन्स, एप्स, आस्ट्रेलोपिथेकस, सामू, टागोर, दुर्गा भागवत असे सारे तिचे विषय असायचे. हो पण कधी माझ्या आवडीची भाजी
असली तर डब्यात आवर्जून ती थोडी जास्त आणायची. आग्रह वगैरे करायची नाही. पण मला
सोडून जेवायचीही नाही.
आमचं एकत्र असणं एव्हाना कॉलेज मध्ये सगळ्यांच्या नजरेत यायला
लागलं होतं. आमच्या मागे आमची नावंही जोडली जात होती. खरं सांगायचं तर मला ते
आवडायचही. पण, तसं
काही नव्हतं हेही तितकच खरं. तिच्या मनात काय आहे हे ती कधीच कळू द्यायची नाही.
तिच्या नजरेतून कधी कधी व्हायची जाणीव. पण, त्याला शब्दांचा
दुजोरा कधीच मिळाला नाही. तिला समोर बसवून विचारण्याचं धाडस पहिली दोन वर्षं मीही
केलं नाही. तिचा स्वभाव पाहता तिला ते पटलं नसतं तर तिने पुन्हा स्वत:ला आपल्याच
कोशात मिटून घेतलं असतं. आणि मला ती रिस्क
नको होती.
शेवटच्या वर्षी एकदा तिच्या घरी जाण्याचा योग आला. कॉलेज संबंधी
काही काम होतं. तिने सरळ घरीच बोलावलं. मी गेलो. घर सुबक होतं पण अतिशय साधं! दिवाणखाण्यात
भारतीय बैठक होती. नजर जाईल तिथे पुस्तकंच पुस्तकं दिसली. ती ठेवलीही सुंदर
पद्धतीने होती. तिने तिच्या आई-बाबांशी ओळख करून दिली. तेही अतिशय साधे आणि मोकळे वाटले.
आमच्या बर्याच गप्पा झाल्या. ‘विद्वत्ता’ त्यांच्या प्रत्येक शब्दातून व्यतीत होत
होती. शहरात त्यांचं बरचसं नाव ही होतं. आधी मी थोडा दबूनच बोलत होतो पण नंतर
त्यांचा मोकळेपणा पाहून मीही खुलायला लागलो. ती मात्र पूर्णवेळ शांतच होती. नंतर
मग थोड्यावेळाने ती मला आत घेऊन गेली.. तिच्या आई-बाबांनी अजिबात आक्षेप दर्शवला
नाही. या सार्यात काहीच विशेष नसल्या सारखं तीही वागत होती. आमचं काम झालं.
तिच्या आईने बनवलेला कुठलासा लाडू खाऊन मग मीही तिथून निघालो.
माझ्या घरापेक्षा तिच्या घरातलं वातावरण खूपच वेगळं होतं. तिच्या
घरी तांब्याच्या फुलपात्रात रम पित असल्याचा फील यायचा आणि माझ्या घरी वाइनच्या
ग्लासात कोकम सरबत पिण्याचा! माझं घर चार-चौघांसारखं होतं. आमच्याकडे
पुस्तकांपेक्षा सिरियल-नाटकांवर जास्त चर्चा व्हायच्या. सणावाराला सोवळ्यात
स्वयंपाक व्हायचा तरी होटेलिंग, आउटिंग वगैरे कस्टम्सही रुळलेले होते. तिच्या घरी हे दोन्ही नव्हतं. ना
कर्मकांडांवर विश्वास ना बाहेरच्या चंगळवादावर!
माझ्या घरी माझ्या मित्र-मैत्रिणींच छान स्वागत व्हायचं पण
आलेल्या मैत्रिणीकडे हिचं ह्याच्यासोबत ‘तसं’ काही आहे का वगैरे शंका मनात ठेऊन पाहिलं
जायचं. हालचालीकडे, हावभावांकडे लक्ष वगैरे गोष्टी आल्याच. ‘तसं’ काही नाही याची खात्री झाली की मग उगाच
मनातल्या मनात मला तिच्यासोबत जोडून ‘जोडा’ कसा दिसेल याची चाचपणी पण केली जायची. माझ्या बहिणीच्या मात्र मैत्रिणीच
यायच्या फक्त. तिचे मित्र अगदी क्वचित. आले तरी त्यांना परत यायला नको वाटावं इतकं
त्यांच्यावर लक्ष ठेऊन आणि निरखून वगैरे पाहिलं जायचं. दिवाणखाण्याच्या पलिकडे
त्यांना प्रवेश तसा निषिद्धच असायचा. तिच्या घरी अगदी उलट. तिथे माझ्याकडे मित्र किंवा मैत्रीण म्हणून नाही तर ‘फ्रेंड’ म्हणून पाहिलं गेलं. तिच्या खोलीत सुद्धा
मला अगदी सहज प्रवेश होता. अतिशय मोकळं वातावरण. इतकं मोकळं की त्या मोकळेपणाचंच
नंतर दडपण यावं.
रिलेशनशिप, फ्युचर वगैरे चा फार गंभीरपणे विचार करण्याचं ते वय नव्हतं. तेव्हा केवळ
एकमेकांसोबत असण्याचीच धुंदी वाटायची. मी तरी त्याच धुंदीत होतो. हळू-हळू मला
कळायला लागलं होतं की तिच्या प्रेमात पडलोय. पण, तिचं काहीच
कळायच नाही. बाकीचे म्हणायचे तीही आहे तुझ्या प्रेमात,
तुझ्यामुळे ती बादलायला लागलीये वगैरे. पण, मला का कोणास
ठावूक ते खरं वाटायचं नाही. मला हे सगळं तिच्याकडून ऐकायचं होतं. शेवटच्या वर्षी
तर मला खूप घाई व्हायला लागली ते ऐकण्याची. पदवी नंतर उच्च-शिक्षणासाठी परदेशी
जाण्याचं माझं चालू होतं. तिनेही माझ्या बरोबर यावं किंवा निदान मनातलं माझ्या
बरोबर शेअर तरी करावं असं मला खूप आतून वाटायला लागलं. मी वेगवेगळ्या पद्धतींनी
तिला अडून अडून पुढचे प्लान्स विचारत होतो. पण, देश
सोडण्याचा तिचा विचार अजिबातच नव्हता असं जाणवलं. ती मला एकदा घेऊन गेली होती त्या
आदिवासींसाठी काम करणार्या ngo मध्ये तिला उच्च शिक्षण घेत
घेत काम करायचं होतं. मी मात्र चांगल्या विद्यापीठात पुढचं शिक्षण घेऊन
मानववंशशास्त्रात पुढे संशोधन किंवा एखादी ‘चांगली’ नोकरी करुन ‘सेटल’ होण्याच्या
विचारात होतो. तिच्या आयुष्यात ‘सेटल’
होणे ही संकल्पनाच नव्हती. घर घेणे, गाडी घेणे, संसार थाटणे, आई होणे वगैरे तिची स्वप्नंच नव्हती
कधी. तिचं विश्वच माझ्यापेक्षा खूप निराळं होतं. मला ती हवी होती पण मला माझी
चौकटही सोडायची नव्हती. मी प्रचंड दुविधेमध्ये जगत होतो त्या काळात. माझी उगाच
चिडचिडही व्हायला लागली होती.
दरम्यान, माझ्या वाढदिवसा निमित्त माझ्या आईने एकदा सगळ्यांना घरी जेवायला
बोलावलं. तीही आली. पहिल्यांदा. माझा वाढदिवस होता म्हणून. त्यादिवशीही तिचा वेश
काडीमात्रही बदलला नाही. फक्त कुर्त्याचा रंग मात्र कधी नव्हे तो गुलाबी होता. पण
तेवढ्यानेही नुकत्याच उमललेल्या पांढरट गुलाबी गुलाबासारखी नाजुक आणि उत्फुल्ल
दिसत होती. इतर सारे छान गप्पा वगैरे मारत होते. घरच्यांशी बोलत होते. ती मोजकंच
बोलत होती. तेही माझ्याकडे पाहत पाहत. थोडी गडबडल्या सारखीही वाटत होती. माझ्या
घरातलं वातावरण तिच्यासाठी नवं होतं. ते विषयही तिच्यासाठी नवे होते.
का कोणास ठावूक पण, त्या दिवशी मी तिच्याशी बोलायचं ठरवलं. तिला घरी सोडायला म्हणून
तिच्यासोबत निघालो. रात्रीचे दहा वगैरे झाले होते. रस्त्यात सामसुम होती. मी बाईक
दूरच्या रस्त्याने नेली. वाटेत आमच्या ठरलेल्या टेकडीच्या पायथ्याशी गाडी थांबवली.
ती गोंधळली. मी बाईक वरुन उतरलो. तिने विचारलं,
“काय रे काय झालं? बंद पडलीये का?”
मी तिच्याकडे एकवार पाहिलं. चंद्राच्या प्रकाशात ती आणखीच सुंदर
वाटत होती. एक दीर्घ श्वास घेऊन मी तिला म्हटलं,
“बाईकला काही नाही झालं. जे काही झालय नं ते मला झालय!”
“म्हणजे? काय झालय?” तिच्या आवाजा वरुन तिला आता अंदाज येतोय
असं वाटलं. मी पुढे म्हणालो,
“तुला ते माहितीये.. आपण बोललो नाही कधी यावर. पण, तुला नक्कीच माहितीये मला तू
किती आवडतेस.”
तिची नजर खोल गेली. गाल थोडे अजूनच गुलाबी वाटायला लागले. मी तिचा
हात हातात घेत म्हटलं,
“या नात्याला नाव द्यायचय गं मला.. मला सांगायचय तुला, हे तुझे डोळे मला किती आवडतात, तू तुझ्याही नकळत माझ्या मनातली ‘सौंदर्याची’ व्याख्याच कशी बदलून टाकलीयेस, मला सांगायचय तुला, तू सोबत असताना मी कधी अनुभवलं नाही असं वेगळंच काहीतरी कसं अनुभवतो..
मला ‘तू’ किती आवडतेस.. हे सगळं मला
तुला रोज.. रोज सांगायचय!”
हातात घेतलेल्या तिच्या हाताकडे पाहत मी खूप मनापासून बोलत होतो.
त्या स्पर्शाची जादू असेल कदाचित.. पण मला खूप बोलावसं वाटत होतं. क्षणभर थांबून
मी तिच्याकडे पाहिलं. तिच्या डोळ्यात टचकन पाणी आलं होतं. मी थांबलो. तिच्या
बोलण्याची वाट पाहू लागलो. दोन-तीन मिनिटं तशीच शांततेत गेल्यावर ती म्हणाली,
“तुला काय वाटतं, मला हे सगळं ठाऊक नाही? मी कधी दाखवत नाही, मला ते जमतही नाही पण पहिल्यांदा भेटले ना तेव्हापासूनच प्रेमात आहे
तुझ्या..”
मला अपेक्षित तेच मी ऐकत होतो, आतून मोहरलो.. ती पुढे बोलू लागली,
“..पण कसंय नं, आपले मार्गच मुळात वेगळेयत रे.. तुला
दूर जायचय. स्थिर व्हायचय. माझं तसं नाही. तुला आयुष्यकडून वेगळ्या गोष्टी हव्या
आहेत आणि मला वेगळ्या.. आपलं करियर अजून व्हायचय. ओळख निर्माण व्हायचिये. इतक्यात
तू माझ्यासाठी तुझं स्वप्न सोडून इथे थांबण किंवा मी माझी ध्येयं सोडून तुझ्यासोबत
येणं दोन्हीही शक्य नाहीये. तसं केलं जरी नं आपण तरी तडजोडी करून सांधलेलं हे नातं
कधी ना कधी तडे गेल्यावाचून राहणार नाही! जे आत्ता आहे तेही हरवेल. म्हणून बोलायचं
टाळत होते.. माझ्यासाठी तू बदलावस असं मला वाटत नाही. तू जा.. तुझी स्वप्नं पूर्ण
कर.”
“पण मग आपल्या नात्याचं काय?” न राहवून मी विचारलं.
“ते जुळणार असेल तर जुळल्यावचून राहणार नाही. आत्ता नको घाई
करायला. आज मी तुझ्या घरच्यांना भेटले. सगळे खूप चांगले आहेत पण वेगळे आहेत आमच्यापेक्षा.
मला नाही वाटत मी दीर्घकाळ त्यांच्या अपेक्षांना खरी उतरू शकेन. तूच सांग उद्या
यावरून आपल्यात वाद होणार नाहीत?”
“काहीतरी मार्ग काढू ना आपण. उद्या लग्न नाही करायचय आपल्याला.”
मी.
“कधीतरी ते करण्याचा विचार करतोच आहेस ना तू. मी नाही करतय. आणि
हाच आपल्यातला फरक आहे. नको. सगळंच विस्कटेल. थांबू आपण आत्ता इथे. नको करूया
एकमेकांचा विचार.” ती॰
तिचा शब्द अन शब्द खरा होता पण तरी मला त्या सगळ्याचा खूप राग येत
होता. विचार नको
करूया म्हणजे? शक्य होतं ते? ही असं
कसं म्हणू शकते! मी चिडलो. ती हळवी झाली होती पण शांत होती. माझं चिडणही तिने
शांतपणे स्वीकारलं. मला तिच्या त्या शांतपणाचीही चीड यायला लागली. एक अक्षरही न
बोलता मी तिला घरी सोडलं आणि निघून आलो.
त्यानंतर मी निघून गेलो विदेशी. सुरूवातीला खूप धुसफूसलो. पण, हळू-हळू समजायला लागलं तिचं
बरोबर होतं. तेव्हा घाई केली असती तर सगळं विसकटण्याची भिती होती. तिने ते होऊ
दिलं नाही!
आज उगाच धडधडतय. जवळपास पाच-सहा वर्षांनी ती समोर येणार आहे. कशी
असेल. कशी दिसत असेल. मी परत येऊन आता महिना होत आला. खुपवेळा वाटलं करावा तिला
फोन पण नाहीच केला. करायला हवा होता का. तिने वाट पाहिली असेल का. की मुव ऑन झाली
असेल. कोणी दुसरं असेल तिच्या आयुष्यात?
असे सारे विचार डोक्यात चालू असताना कधीतरी तो गाडीत बसला आणि
लग्नाला जायला निघाला..
क्रमश:
संजीवनी
टिप्पण्या
पुढील भाग कधी?
लवकरच..