नक्षत्रांचे देणे..
ऐ दिल ए नादान तुझे हुआ क्या है..
गालिब का आठवतो अशा वेळी. नाहीतर मग सरळ ग्रेस. ‘त्या व्याकूळ संध्यासमयी..’ पासून ‘ही चंद्रउदयिनी वेळा, घननीळ काठ मेघांचे..‘ इथपर्यंत काही-बाही उगाच मनात रेंगाळत राहतं. तसं पहायला गेलं तर ही खरी ‘चंद्र-माध्यान्ही’ वेळा. डोक्यावर चंद्र. खाली सारी समुद्राची उसळणारी निळाई. आणि या जलधीच्या मध्ये-मध्ये विखूरलेले तुरळक, पृथ्वीचे लाव्ह्यावर तरंगणारे तुकडे. त्यापैकी एका अतिप्राचीन तुकड्यावर कुठेतरी गल्ली-बोळ-रस्ता-गाव-शहर वगैरे ‘पत्त्यावर’ माझ्यासारखा एक क्षूद्र जीव झोपायच्या वेळेला जागा राहून मनातले तरंग शब्दांत प्रतिलिपीत करण्याचा प्रयत्न करतोय.
तरंग कसले तर गूढ.. गालीबची अचूक संवेदनशीलता, ग्रेसचं चीर दु:ख.. ‘.. तरी तुझ्या कुशीचा रंग, शरीरावर माझ्या उमटे.. की चिंब अभंगामधला, ‘भगवंत’ स्मृतीवर दाटे..’ ग्रेसच्या कवितेत ‘आई’ अशी सतत भेटत राहते. ती इथेही नेणीवेवर उमटते. आणि मग थेट समर्थांपाशी आणून सोडते.. ‘.. इतुकी माया कोठेची नाही, मातेवेगळी!!’ समर्थांमुळे चंद्राच्या शांत प्रकाशात अल्लद तरंगणारं मन उगाच सूर्याराधना करू लागतं.. ‘काकडआरती परमात्मजा रघुपती’ पासून सुरू होऊन ‘कोमल वाचा दे रे राम.. विमल करणी दे रे राम’ म्हणायला लागलेलं असताना ते आर्जवी होत जातं आणि मग ‘सुरेंद्रचंद्रशेखरा..’ च्या टीपेवरच्या सुरांना भिडल्यावरएक वेगळीचं ecstasy अनुभवतं.
थोड्या वेळाने पुन्हा चंद्र-माध्यान्ही वेळा प्रबळ होते. पुन्हा चंद्र. पुन्हा मी. पुन्हा कविता. असं काहीतरी करत पहाटेपर्यंत मन गर्भारपणे भरकटत राहत. आणि मग पहाटे त्याला शब्द फुटतात!
ब्रह्ममुहूर्तावर वसंत फुलतो..
चतुर्थ चंद्र विभ्रमे
मंद मुग्ध चांदणे
चांदण्याची माळ ही
हलकेच मी रे माळली
सांद्र दैवी सूर हे
अलभ्य आज लभ्य जे
काय जे की मी करु
उतराई होई वासरु
हेच सर्व चिंतले
तेच आज लाभले
चित्त शांत का असे
अवचित अन् रे जाहले
चतुर्थ चंद्र विभ्रमे
मंद मुग्ध चांदणे
चांदण्याची माळ ही
हलकेच मी रे माळली..!!
..या साऱ्या मुग्ध सफरी केल्यावर मग कुठे, ही ‘मन’ नावाची गोष्ट, दिवसभराच्या ‘जागृत निद्रेच्या’ कुशीत शिरण्यास तयार होते..
संजीवनी
टिप्पण्या