आरसा : भाग ३

 




स्कूटीवर बसून हॉल कडे जाताना पूर्णवेळ तिच्या मनात जुन्या गोष्टी तरळत राहिल्या. तेव्हा, शहाणपणाचा मोठा आव आणत तिने त्याला जाऊ दिलं खरं पण, नंतर मात्र तो निर्णय निभावता निभावता तिचं मन मेटाकुटीला येत होतं. तो सोबत असताना तिला येणारं विशेष फीलिंग, एकटं नसण्याची जाणीव, केव्हाही काहीही बोलण्याची मुभा, ऐकलं जाण्याची खात्री हे सारं ती मिस करत होती. आपण केलं ते योग्य की अयोग्य हा प्रश्न तर तिला बराच काळ सतावत राहिला. त्या रात्रीनंतर तो अबोल होत गेला आणि नंतर तर निघूनच गेला. नंतर ना काही निरोप ना कधी फोन! मी मारे म्हणेन, नको करूया एकमेकांचा विचार. पण त्याने तरी ते असं इतकं ऐकयलाच हवं होतं का?’ मनातल्या मनात ती लटकी खंत व्यक्त करायची पण, मग आपण तेव्हा जे केलं ते खरं आणि योग्य होतं म्हणत स्वत:च्या वेड्या मनाला समज द्यायची

लग्न गोरज मुहूर्तावर होतं. ठरलेल्या वेळेच्या काही मिनिटं आधी ती पोचली आणि स्कूटी पार्किंग मध्ये लाऊन आत जायला वळली. क्षणभर थांबून तिने पुन्हा एकदा आरशात पाहिलं. साडी एकसारखी केली. तिची धडधड आता वाढली होती. तो समोर आल्यावर आपण काय बोलायचं, कसं वागायचं याचे उगाच वेडे आडाखे तिचं मन बांधत होतं. पण पुन्हा भानावर येत तिने तिच्या मनाला साफ बजावलं. तो आता पूर्वीचा तो नाहीये. बदललेला असू शकतो. कदाचित त्याच्या आयुष्यात आता दुसरं कोणीतरी आलेलंही असेल. आपला वेडेपणा आपल्यापाशी ठेवायचा. शक्य तितकं फॉर्मली वागायचं. मनातली धडधड चेहर्‍यावर दिसू द्यायची नाही.. आणि मग चेहरा नेहमीसारखा कोरा करून ती आत आली.

गर्दीच्या ठिकाणी तिला जरासं अवघडल्या सारखंच व्हायचं. अशा ठिकाणी ती एकतर जायचीच नाही. आणि गेली तरी पटकन कुठलातरी एक कोपरा गाठून कोणाच्या नजरेत न येता बाकीच्यांची गडबड, धावपळ बघत शांतपणे बसून राहायची. आजही तिने तेच केलं. हॉलच्या मध्यावर भिंतीच्या जवळची कोपर्‍यातली एक रिकामी खुर्ची पाहून तिथे जाऊन बसली. पूर्ण हॉल वरुन तिने एक नजर फिरवली. समोरच्या रांगेत तिला कॉलेज मधले एक-दोन ओळखीचे चेहरे दिसले. ती तिकडे पाहत असतानाच नेहा त्या दोघांना येऊन मिळाली. किती सुंदर आणि छान दिसतेय ही तिने दुरून पाहत मनातल्या मनात नोंद केली. बघता बघता तिथे कॉलेजमधला घोळका तयार झाला. थट्टा-मस्करी, खूप दिवसांनी भेटल्याचा आनंद वगैरे सारं त्यांच्या देहबोलीतून जाणवत होतं. क्षणभर तिला वाटलं जावं आपणही. पण ती तिथेच बसून राहिली. 

लग्न आता कुठल्याही क्षणी लागणार होतं. स्टेज वर धावपळ सुरू होती. तिने पुन्हा एकदा सगळीकडे पाहिलं. तो कुठेच दिसत नव्हता. तिच्या नकळत तिची नजर आल्या क्षणापासून त्यालाच शोधत होती. पण तो कुठेच दिसत नव्हता. जरासं खट्टू होत तिने तिची नजर आता स्टेज कडे वळवली. ऋतु आणि तिचा होणारा नवरा दोघेही तिथे आलेले होते. दोघांमध्ये आंतरपाट धरलेला होता. नऊवारी पायघोळ साडी, नाकात नथ, कपाळावर चंद्रकोर, ऋतु विलक्षण सुंदर दिसत होती. सनईचे सुर सभागृहात घुमतच होते. प्रसन्न, मंगल असं वातावरण होतं चोहीकडे. हा आज इथे होणारा संस्कार या दोघांना कायमचा एकमेकांशी बांधून ठेवणार. नवी स्वप्नं, नवं आयुष्य, सोबत, सारं काही. तिच्या मनात विचार येत होते. त्या दोघांच्या चेहर्‍यावरून आनंद, उत्साह ओसंडून वाहत होता. आणि तेवढ्यात वेधक, सुरेल आणि भारदस्त अशा पंडिती स्वरात मंगळाष्टकांचे सुर सभागृहात घुमू लागले.. गंगा सिंधु सरस्वतीच यमुना,गोदावरी नर्मदा ती आता एकाग्र होऊन त्या सोहळ्याकडे पाहत होती.. कावेरी शरयू महेंद्रतनया शर्मण्वति वेदीका ।.. वेगळाच माहोल तयार व्हायला लागला होता. तिला तिच्या आजूबाजूला थोडीशी हालचाल होत असलेली जाणवली. पण तिकडे दुर्लक्ष करून तिने पुन्हा तिचं लक्ष स्टेजवर केन्द्रित केलं.. शिप्रा वेञवती महासूर नदी,ख्याता गया गंडकी।.. ती कितीही विज्ञाननिष्ठ वगैरे असली तरी मंगळाष्टकांचे हे सुर ऐकून आज तिला खूप छान वाटत होतं.. इतक्यात तिला शेजारी बसलेलं कोणीतरी आपल्याकडे एकटक पाहतय असं जाणवलं. तिने मान वळवून शेजारी पाहिलं, आणि अवाक झाली. अनिमिष नजरेने तिच्याकडे पाहत तिथे 'तो' बसलेला होता! तिने पाहिल्यावर त्याने एक छान स्मित केलं.. मंगलाष्टकाचे सुर समेवर येत होते.. पुर्णा पुर्ण जलै, समुद्र सरीता। कुर्या सदा मंगलम, शुभ मंगल सावधान।।.. सगळीकडे अक्षतांचा पाऊस पडला. एकमेकांकडे सुखदाश्चर्याने पाहणार्‍या या दोघांवरही अक्षता पडल्या. 

भानावर येत ती त्याच्याशी बोलण्यासाठी शब्द शोधू लागली. पण, तिला ते सापडेचनात. आनंद तिच्या चेहर्‍यावरून ओसंडून वाहत होता..

अरे तू केव्हा येऊन बसलास इथे.. काय.. म्हणजे.. तू.. ती काहीतरी म्हणत होती.

आणि तिचा तो सारा गोंधळ पाहत तोही तिच्याकडे पाहून हसत म्हणाला,

तू मन लाऊन मंगलाष्टक ऐकत होतीस तेव्हा..”

यावर त्याच्याकडे पाहत ती नुसतीच हसली. मग पुढे केव्हातरी ते स्टेजवरच लग्न लागलं. पण, या दोघांना आता त्याचं गम्य उरलं नव्हतं. एकमेकांमधले वरकरणी दिसणारे बदल न्याहाळत दोघेही गप्पांमध्ये कधी गुंगून गेले त्यांचं त्यांना कळलं नाही. मनातले सारे प्रश्न, शंका, पण, परंतू क्षणभरासाठी गळून पडले होते. ती पूर्वीची ती झाली होती आणि तो पूर्वीचा तो’!

मी तुझे लेख वाचतो.. किंवा तुझ्या संशोधना विषयी मीही ऐकलंय वगैरे वगैरे अंगांनी संभाषण पुढे जात असतानाच डोळ्यातल्या डोळ्यात दोघांचं एक वेगळ संभाषणही चालू होतं. आणि वरवरच्या औपचारिक बोलण्यापेक्षाही ते अधिक खरं होतं. तिच्या डोळ्यातला आनंद पाहून त्याला कळलं, ही नक्कीच माझी वाट पाहत होती. आणि त्याचे ते पूर्वीसारखे शांत डोळे पाहून तिलाही तो पूर्वीचाच तो असल्याची जाणीव झाली. तिला साडीत पाहून तो खरतर क्लीन बोल्ड झाला होता. पण, त्याने वरवर तसं दाखवलं नाही. तिथल्या इतर झगमगाटात तिची ती साधी पण सुरेख साडी, साडीला शोभणारी मोजकी नाजुक accesary, पूर्वीसारखेच मानेवर रूळणारे केस, डोळ्यांचं सौंदर्य अधोरेखित करणारं काजळ, तिचा मूळचाच पण आता साडीमुळे उठून दिसणारा रेखीव बांधा, पूर्वीचा बुजरेपणा जाऊन देहबोलीत जाणवणारा नवा आत्मविश्वास.. हे सारं त्याच्या नजरेने टिपल होतं. आणि त्याने ते टिपलय हे तिलाही त्याच्या उत्सुकतेने तिच्यावरून फिरणार्‍या नजरेतून उमगलं होतं.

पुढे मग इतर भेटी, गप्पा, ऋतुला शुभेच्छा देणं वगैरेही पार पडलं. पण, हे सारं जोडीने. पूर्वीचा तो कडवट भाग सध्यापुरता तरी बाजूला टाकायचं असं मनातल्या मनात ठरवून दोघही एकमेकांशी खूप वर्षांनी होत असलेली भेट, सहवास अनुभवत होते. एकमेकांचं वागणं न्याहाळत होते. एकमेकांच्या आयुष्यात 'दुसरं' कोणी आहे का वगैरेचा 'मग, बाकी सारे मजेत?' किंवा 'काय म्हणतय आयुष्य?' सारखे प्रश्न पुन्हा पुन्हा विचारून धांडोळाही घेत होते. बाकीचा ग्रुप त्यांच्याकडे उत्सुकतेने पाहत होता. 

बर्‍याच वेळाने खूप सारा आनंद मनात घेऊन आणि उद्या भेटायचं ठरवून दोघही घरी परतले. तिने त्याला दुसर्‍या दिवशी तिच्या घरीच बोलावलं होतं.

परत येताना आणि घरी पोचल्यावर सुद्धा कितीतरी वेळ ती दिवसभरतले सगळे क्षण आठवत उगाच मनातल्या मनात मोहरत होती. आपण कसे गडबडलो इथपासून तो अजूनही पुरवीतकाच ग्रेसफुल कसा वागत होता इथपर्यंत सारं तिचं मन पुन्हा पुन्हा अधोरेखित करत होतं. आज तिला पुन्हा तिच्यातल्या सौंदर्याची जाणीव झाली. आरसा पुन्हा जवळचा वाटू लागला. कामात लक्ष लागेना. उद्याच्या भेटीची उत्सुकता वाटू लागली.

रात्री झोपण्या आधी मात्र दिवसभराचा आनंद उशाशी घेताना मनातल्या प्रश्नांनी पुन्हा डोकं वर काढायला सुरुवात केली. हे असं एखाद्या टीनेजर सारखं वागणं आपल्याला शोभत का असही क्षणभर वाटून गेलं. वास्तवाची जाणीव व्हायला लागली.

त्याची अवस्थाही काही वेगळी नव्हती. आज तिला पाहून तो पुन्हा नव्याने तिच्या प्रेमात पडला होता. आजची ही रात्र तरी का मध्ये आहे असं त्याला वाटायला लागलं. पुढे काय? हा दत्त प्रश्न समोर असला तरी तिच्यासोबत असणं त्याला हवंहवंसं वाटत होतं. बाकी कुठलेच विचार आत्ता नको असंही वाटत होतं. इतक्या वर्षांचं खूप काही बोलायचं राहून गेलेलं बोलायचं होतं, नवे अनुभव तिला सांगायचे होते.. मन पुन्हा पूर्वी सारखं झालं होतं.

मनात खूप सारी उत्सुकता, आनंद आणि त्याच्या पार्श्वभूमीला खूप सारे धूसर प्रश्न घेऊन दोघेही उद्याची वाट पाहू लागले होते..


क्रमश:

 

संजीवनी 


टिप्पण्या

लोकप्रिय पोस्ट