तुळस




पहाटे दबक्या पावलांनी उठून ती अंगण सारवायची. कौलांच्या फटीतून आत येणाऱ्या प्रकाशा सोबत पाठशिवणीचा खेळ खेळत घरभर फिरायची. कोण्या अमक्या-ढमक्याला यथेच्छ शिव्या भरत ‘आजपण चोरून नेली मेल्याने अंगणातली भाजी’ म्हणत ताजी भाजी तोडून त्याच सढळ हातांनी शेजारी-पाजारी ‘तुमच्या नलूला आवडते ना हो’ म्हणत कधी कोवळी लुसलुशीत मेथी, कधी वांगी, कधी अळू हसत हसत नेऊन द्यायची! चूलीचं पोतेरं झालं की मग नुकत्याचं सारवलेल्या ओलसर अंगणात रेखीव रांगोळी रेखायची. आणि ते करता करता अंगणात दाणे टिपणाऱ्या पाखरांशी, गोठ्यातल्या गाई-गुरांशी हवा-पाण्याच्या, सुख-दु:खाच्या गप्पाही मारायची. ‘विठे आज तरी देशील ना बयो भरपूर दूध? पुढल्या महिन्यात जायचंय लेकीकडे. पैसे साठले नाहीत अजून पुरेसे. तुझ्यावरच सगळी भिस्त आहे बरं माझी’ असं काहीसं म्हणत गाई-म्हशींना कुरवाळत पुढच्या कामाला लागायची. अंधोळ करून देवासमोर बसली की तीचं देवासारखी वाटायची. देवानंतर चूलीला नमस्कार करून लागायची रांधायला.. निगुतीनं, किती जाळावर काय शिजवायचं याची पक्की गणितं मनात ठेवून, एक-दोन लाकडांवर १०-१२ माणसांचा स्वयपाक चवीनं आणि मायेनं रांधायची. ‘ये रे सुदाम्या चार घास खाऊन जा’ म्हणत घरातल्यांसोबत गड्यांनाही अन्नपूर्णेच्या हातांनी पोटभर खाऊ घालायची. दुपारच्या टळटळीत ऊन्हात अंगणात नुसतीचं बसून रहायची. सांजेला तुळशीसमोर दिवा लावायची..
हे सगळं रोज, वर्षानुवर्षे करतंच रहायची. न थकता. न कंटाळता. आणि मग एक दिवस तिचं ते थकलेलं कलेवर घेऊन गेली दूर निघून. कायमची.
आता त्या अंगणात पाचोळा आहे. भाज्या कधीच्या सुकून गेल्यात. सूर्य सुद्धा त्या कौलांतून आत डोकावताना आताशा गहिवरतो. अंगणातली तुळस मात्र आहे अजून, तिचा अंश स्वत:त घेऊन सांडतेय अजून मंजिरी. त्या तुळशीला तिने भोळ्या भावाने घातलेलं पाणी नक्कीचं अमृताचं असणार..


~ संजीवनी

टिप्पण्या

Harshada म्हणाले…
hmmm...
अशा अनेक बायका नजरे समोर आल्या..

लोकप्रिय पोस्ट