दिगंत : भाग ७
काही प्रवास, काही
ठिकाणं आपल्या मनाला अगदी ताजं-तवानं
करतात. तसं काहीसं वाटतंय आज इथे येऊन. काहीतरी मिळवायचं म्हणून डोळ्याला झापडं
लाऊन पळत असतो आपण नुसते. एकेक गोष्ट मिळतही जाते. काही सुटतात देखील. आई गेली
तेव्हा वाटलं आता संपलं सगळं.. सगळं शून्य आहे तिच्याविना.. तिच्याविना मी? छे! कल्पनाही करवत नव्हती.
धावत येऊन बिलगायला, ए आई म्हणून हाक मारायला आता कोणीही नाही
या जाणिवेनेच अंगावर काटा आला होता. ती आहे किंवा होती ही कल्पनाच मनाला किती
आधारभूत वाटायची. कुट्ट काळ्या रात्री कुशीत शिरण्याचं हक्काचं ठिकाण! आणि ते आता
यापुढे कधीही नसणार होतं. कसली जीवघेणी पोकळी. तिचं नुसतं बिछान्यावर पडून असणंही
दिलासादायक होतं. बाहेरच्या जगात पेललेले सगळे घाव
तिच्यासमोर नकळत भरले जायचे. आता ते कसे भरायचे? दरवेळी ही
अशी पाठ फिरवून निघून तर येऊ शकत नाही मी. कुठून आणि कसं आणायचं बळ अशावेळी.
आई, तू काय करायचीस गं अशा अवघड वेळा आल्यावर.. तू तर किती कशातून गेलीस.
किती कष्ट. किती जखमा. कसं पेललंस सगळं? इतरांकडे न पाहता
अतिशय तुटपुंज्या मिळकतीत स्वाभिमानाने जगणं, ठरलेल्या
मोजक्या साड्यांवर स्वत:ची सगळी हौस भागवण, मुलांनी अमुक-अमुक
गोष्ट मागितली आणि आपण ती त्यांना देऊ शकत नाही ही वेदनामय जाणीव कडू औषधा प्रमाणे
गिळून टाकणं.. आपल्या नवर्याला कुणी टाकून बोललं तर काय वेदना होतात याची कल्पना
मी आता करू शकते. वसमतला आजीकडे गेल्यावर तुला ते दरवेळी ऐकावं लागायचं. खाली मान
घालून. आर्थिक परिस्थिति चांगली नसल्याने नातेवाईकांमध्ये मिळणारी दुय्यम वागणूक..
वर जिथे जाऊ तिथे अखंड कष्टांची अपेक्षा.. आणि ते तू करायचीस देखील. सगळं कसं गं
सोसलंस आई? कुठून आणायचीस बळ. विचारलं तर म्हणायचीस ‘तुझ्याकडे आणि चिंटूकडे पाहिलं की आपोआप शक्ति येते बघ सारं सोसण्याची.
आणि तुझे बाबा आहेतच की माझा भार हलका करायला. एकटी कुठेय मी!’
माझं आयुष्य तुझ्या मानाने बरंचसं सुकर आहे. तुझ्याच कष्टामुळे. तू मला ‘मी’ बनवलंस. पण येणार्या प्रत्येक अवघड परिस्थितीला सामोरं जाण्यासाठी जे बळ लागतं ना ते नाहीये गं माझ्यात अजून.. आई झाल्यावर येतं का ते? मी ‘आई’ होऊ शकत नाही म्हणाल्या डॉक्टर. तेव्हा आत जरासं काहीतरी हललं होतं, पण फार विशेष असं काही वाटलं नाही. आता उगाच हुरहूर वाटतेय. कठीण क्षण पेलायला, भार हलका करायला हवंच असतं का कोणीतरी.. एकटीने जमू नाही शकत सगळं? की सवयीने जमायला लागेल?
संहिता.
हम्पी.
.....
संहिता ने डायरी मिटली.
त्यादिवशी दुपारी हम्पी मधल्या ठरलेल्या हॉटेलमध्ये पोचल्यावर
दोघींनी आधी भरपेट जेवण केलं. जेवण झाल्यावर रिया आजूबाजूचा परिसर पहावा म्हणून बाहेर
पडली. संहिता मात्र थकल्याचं कारण सांगत रूम मध्येच थांबली. कालपासून सुरू असलेले
मनाचे सारे चढ-उतार.. थोडसं स्वत:पाशी बसून सार्याची मनात ओळ लावायची तिला कदाचित
निकड वाटत असावी. थोड्यावेळाने डायरी बाजूला ठेवत ती तशीच बेड वर आडवी झाली. नंतर
कधीतरी तिचा डोळा लागला.
हम्पी मधले छोटे छोटे रस्ते. साधं खेडंच ते. पर्यटकांमुळे
ठिकठिकाणी घरगुती हॉटेल्स, खानावळी दिसत होत्या. पाय फुटेल तिकडे रिया चालत जात होती. हातातल्या
मोबाइलवर हम्पीचा नकाशा होता. विरुपाक्ष मंदिर.. मातंग हिल.. हम्पी बाजार.. विठ्ठल
मंदिर.. सगळ्या खुणा आणि ठिकाणं त्यावर दिसत होती. ती तिच्यापासून हाकेच्या
अंतरावर होती. इतिहासाचा अभ्यास करताना तिने या सगळ्या विषयी वाचलं होतं. इतिहास
तिच्या आवडीचाच विषय. हम्पी विषयी वाचताना तिला कायम या ठिकाणाचं आकर्षण वाटत
आलेलं होतं. पण आज उगाच मनात एक व्यर्थ पोकळी दाटली होती. काल रिजल्ट पाहिल्यावर आधी
मन सुन्न झालं होतं. आणि नंतर शरीरासोबत मनालाही तिने वाहणार्या वार्यावर झोकून दिलं.
त्यामुळे जरासं हलकं वाटायला लागलं होतं. पण आता डोक्यावर चढलेल्या सूर्यापूढे स्वत:ची
विरलेली सावली तिला पुन्हा जमिनीवर घेऊन आली. आणि वर्तमानाची जड जाणीव पुन्हा जोर धरु
लागली. जो अभ्यास केलाय, जो मार्ग निवडलाय तो विफल तर ठरणार
नाही ना असं वाटणारी मन:स्थिती.. अस्थिर, अधांतरी भविष्य..
स्वप्न अगदी हातात येता येता हातातून निसटलं होतं. ज्या आयुष्याची कल्पना केलीये, स्वप्न पाहिलंय ते तसं नाही घडलं तर? तडजोडी
कराव्या लागल्या तर? पोटात गोळा आणनारी अनाम भीती मनात दाटत
होती. पण, ‘नाही. या स्वप्नाशी मी
तडजोड करू शकत नाही’, मनातल्या मनात तिने पुन्हा स्वत:लाच
ओरडून सांगितलं. रस्त्या शेजारच्या एका अजस्त्र पाषणाला टेकून ती उभी राहिली. तिला
पुढे जावसं वाटेना. मनाला आणि शरीरालाही मरगळ आल्यासारखी वाटली. बराचवेळ नुसतंच
फिरून ती हॉटेलवर परतली आणि संहिताच्या बाजूला तिनेही अंग टाकलं.
दोन एक तासांनी तिला जाग आली तेव्हा संहिता फोन वर काहीतरी करत बसली
होती. तोंडावर गार पाण्याचा भपकारा मारून रिया तिच्या शेजारी येऊन बसली.
“फीलिंग बेटर?” संहिताने विचारलं.
“हम्म.. थोडंफार..” रिया डोळ्यांभोवतीची काळी वर्तुळं आरशात पाहत म्हणाली.
“चल फिरून येऊ थोडसं. एखादं मंदिर वगैरे पाहू. बाकीचं उद्या. असंही
पाच वाजत आलेयत.” संहिता घड्याळाकडे पाहत म्हणाली.
“हो.. चल. कोणतं मंदिर बघायचं? विरुपाक्ष?” रिया.
“नाही.. ते दगडी रथ असलेलं मंदिर कोणतं? ते पाहू. मी पाहिलंय ते फोटोजमध्ये.”
“विठ्ठल मंदिर.” रिया जॅकेट अडकवत म्हणाली.
“हम्म.. तेच ते..” संहिताने शूज चढवले.
दोघी रस्ता विचारत विचारत विठ्ठल मंदिरात येऊन पोचल्या. डोळ्यांचं
पारणं फेडणारं ठिकाण. विकल उद्ध्वस्त पाषाण सौंदर्य! ठिकठिकाणी जुन्या ऐश्वर्याच्या
खूणा वाहणारा परिसर. मंदिराच्या अगदी मधोमध उभा पाषाण रथ. ज्याच्याकडे पाहून आपल्या
इतिहासा विषयी अभिमानाने उर भरून यावा. त्या सरून गेलेल्या काळाविषयी कुतूहल, उत्सुकता वाटत रहावी. दोघी काही
न बोलता ते भव्य मंदिर न्याहाळत राहिल्या किती तरी वेळ.. संध्याकाळची सोनेरी किरणं
पडू लागली तसं ते भग्न सौंदर्य आणखी खुलायला लागलं. सभामंडपात खांबाला टेकून दोघी ती
किरणं त्यांच्याही अंगावर घेत बसून राहिल्या. कॅमेरा बाजूला पडला होता. काही गोष्टी
टिपता येत नाहीत. तसं काहीसं.
काहीवेळाने ती शांत तंद्री भंगत रियाच्या फोनची रिंग वाजायला लागली.
तिने फोन घेतला.
“हॅलो, रिया?” थोडासा ओळखीचा वाटणारा शांत वजनदार आवाज.
“हो, बोलतेय..”
“हाय, मी अनुराग..”
रिया क्षणासाठी ब्लॅंक झाली. याने पुन्हा का फोन केला असं तिला वाटलं.
तो पुढे म्हणाला, “सो.. इट्स 6 पीएम शार्प! कुठे आहेस तू?”
रियाला काही कळेना.
“म्हणजे?”
“म्हणजे आपलं ठरलंय ना, 6 पीएम शार्प, अॅट हम्पी!”
“म्हणजे तू.. तू.. एक मिनिट कुठेयस तू?” रियाने गोंधळून विचारलं.
“हम्पी मध्ये.” तितकाच शांत आणि पुन्हा वजनदार आवाज.
“काय?” आता शॉक व्हायची वेळ रियाची होती.
अनुराग खरंच हम्पी मध्ये आला होता.
तिने मग कसं बसं ती विठ्ठल मंदिरात असल्याचं त्याला सांगितलं. फोन
कट झाला. रियाने संहिताकडे वळून बघितलं. फोन वरच्या संभाषणा वरुन तिला कल्पना आलीच
होती घडल्या प्रकाराची. दोघी मग गोंधळून एकमेकींकडे पाहत राहिल्या नुसत्या..
क्रमश:
@संजीवनी देशपांडे
टिप्पण्या
Thank you :)