दिगंत : भाग १०
दुपारी अनुराग
ने सांगितलेल्या ठिकाणी दोघी येऊन पोचल्या. पण, तिथे गेल्यावर आपण पत्ता चुकलो तर नाही ना असा संशय
त्यांना येऊ लागला. कारणही तसंच होतं. त्या दोघी साहजिकच एखाद्या रेस्टोरंटची कल्पना
मनात ठेऊन आलेल्या. पण समोर त्यांना दिसत होतं एक साधं झोपडी वजा घर, गेरुने रंगवलेलं. दारापाशी त्या जराशा घुटमळल्या.
पण मग गाडीतून उतरून येत असलेला अनुराग दिसल्यावर त्यांचा जीव भांड्यात पडला.
“हे काय, अशा बाहेर
का उभ्या आहात? चला की
आत.” तो शूज काढत म्हणाला.
इतक्यात घरातून एक सत्तरीच्या आसपासच्या आजीबाई बाहेर आल्या. त्या दिसताच
अनुराग “अम्मा..” म्हणत लगबगीने त्यांच्यापाशी गेला आणि त्याने त्यांना मिठी मारली.
पुढचे संवाद कन्नड मध्ये झाले. ते या दोघींना ओ की ठो समजले नाहीत. चालू प्रकार त्या
निव्वळ पाहत उभ्या होत्या. अनुराग मध्येच रियाकडे बोट दाखवत त्यांना काहीतरी म्हणत
होता. त्या आजी त्यावर गोड हसत
होत्या. आता मात्र त्या सडपातळ, काटक बांध्याच्या, सावळ्या, बुटक्या
पण अतिशय लाघवी आणि गोड आजीबाई कोण असा प्रश्न त्या दोघींना पडायला लागला.
त्यांचं बोलणं झाल्यावर रिया आणि संहिताकडे पाहून त्या आजीबाई
“आओ, आओ..” असं मोडक्या हिंदीत म्हणाल्या.
त्या, त्यांच्या पाठोपाठ अनुराग आणि या दोघी मग आत गेल्या.
साधीशी बैठक होती. तिथेच बाजूला पाट, चौरंग, त्यावर
केळीची पानं अशी जेवायला वाढायची व्यवस्था केलेलीही दिसत होती.
दोघी बैठकीवर बसल्या. आजींनी पाणी वगैरे दिलं आणि अनुराग शी काहीतरी
बोलून त्या आत गेल्या.
दोघींच्या नजरा आता प्रश्नांनी भरल्या होत्या. त्यांची उत्सुकता आणखी
न ताणता पाण्याचा पेला बाजूला ठेवत अनुराग म्हणाला,
“ही कुमूद आजी.. मी तिला अम्मा म्हणतो. ही यांची घरगुती खानावळ आहे.
या आणि यांचा नातू मिळून चालवतात. माझ्या सारख्या येण्या-जाण्या मुळे आता आमची चांगली
ओळख झालीये. हम्पी मध्ये आलो की मी इथेच जेवतो. अतिशय रुचकर आणि authentic स्वयंपाक करते अम्मा.
तुम्ही बोटं चाखत राहाल..”
शक्यतो पहिल्या भेटीत ऐश्वर्याचा, रुबाबाचा भडिमार करणारे तरुण ठावूक होते. पण अनुरागचं वागणं त्यांना वेगळं वाटलं. पाहूया काय प्रकार आहे म्हणत दोघींनी मग माना डोलावल्या.
एकेक करून मग अम्मा आणि त्यांच्या नातवाने अतिशय सुंदर रित्या पानं
वाढली. बसायला पाट ठेवलेले होते. त्यासमोर चौरंगावर केळीच्या पानामध्ये जेवण वाढलं
होतं. तिघेही त्यांच्या त्यांच्या पानांवर बसले. चित्रान्न, गाजराची हिंग-कढीपत्त्याची फोडणी देऊन केलेली कोशिंबीर, पातळ-पातळ पोळ्या, सांबार, कैरीचा
कायरस, कर्नाटकी पद्धतीने केलेली दुधीची भाजी आणि हातांवर केलेल्या
शेवयांची स्वादिष्ट खीर असा तसा पहायला अतिशय साधा मेनू होता. पण, एकेक पदार्थाची चव घेतल्यावर त्यांना कळलं अनुराग अम्माचं इतकं कौतुक का करत
होता ते.. रसना तृप्त करणार्या चवींनी त्यांचं पान भरलं होतं. गाजराची साधी किसून
केलेली कोशिंबीरही इतकी चविष्ट लागू शकते? दोघी बोटं चाटत राहिल्या.
पानात वाढलेला कायरस पाहून संहिता तर आधीच excite झाली होती.
ती चव तिने पुन्हा पुन्हा जीभेवर घोळवली. आणि शेवयांची खीर? त्यात
या अम्मांनी काय घातलं होतं देव जाणे पण इतकी सुरेख मधुर खीर या आधी कधीच खाल्ली नसल्याची
कबुली दोघींनी दिली. अम्मा शेजारीच सारे पदार्थ घेऊन वाढायला बसल्या होत्या. त्यांनी
आग्रह करून करून तिघांना यथेच्छ जेऊ घातलं. भाषा कळत नसली तरी त्यांचं अगत्य आणि प्रेम
दोघींना जाणवत होतं.
जेवण झाल्यावर अम्मांशी थोड्या गप्पा मारून तिघे बाहेर पडले. पंचतारांकित गोष्टी हाताशी असताना अनुरागचे असे मातीत घट्ट रोवलेले पाय पाहून रिया दाखवत नसली तरी नक्कीच प्रभावित झाली होती. तो अम्मांशी ज्या विलक्षण सलगीने, आस्थेने वागत होता त्यावरून त्याच्यातले माणूस म्हणून असलेले गुण तिच्या नजरेतून सुटले नाहीत.
“जेवण खरंच अप्रतिम होतं. या चवी मी कधीच विसरणार नाही.” संहिता म्हणाली.
“..आणि तुम्हाला यायचं नव्हतं.” अनुराग रियाकडे पाहत म्हणाला.
“टोमणे पुरे.. जेवण खरंच छान होतं. थॅंक यू..” रिया शांतपणे म्हणाली.
“बाय द वे अनुराग, तू रियाकडे बोट दाखवत अम्माच्या कानात काय खुसुर-फुसुर करत होतास रे?”
संहिताने औत्सुक्याने विचारलं.
“हाहा.. ते आमचं सीक्रेट आहे.” तो मंद हसत म्हणाला.
हम्पी पाहत पाहत मग ते बराच वेळ फिरले. चर्चा-गप्पा-चेष्टा-मस्करी
आणि प्रेक्षणीय हम्पी.. त्यांचा वेळ कसा गेला त्यांचं त्यांना समजलं नाही.
सरतेशेवटी विरुपाक्ष मंदिरात दर्शन घेऊन रिया आणि अनुराग बाहेर चौथर्यावर
येऊन बसले. संहिता काहीतरी खरेदी करण्यासाठी म्हणून तिथले स्टॉल धुंडत होती.
मंदिराच्या कळसाकडे पाहणार्या रियाला अनुराग म्हणाला,
“मग.. आता पुन्हा अभ्यास का..”
नजर त्याच्याकडे वळवत रिया म्हणाली,
“हो..”
दोघांनी एकमेकांकडे पाहून हलकसं स्मित केलं. रिया बोलायला लागली.
“सिविल सर्विसेसची तयारी करायची म्हटल्यावर अपयशाची तयारी ठेवावीच
लागते. खचून चालत नाही.”
“हम्म.. हे आयुष्या बाबतीत पण खरं आहे.” अनुराग.
“म्हणजे?”
“म्हणजे, हेच बघ ना तू मला नाही म्हणालीस.. पण मी खचलो का? माझे
प्रयत्न चालूच आहेत..”
अनुराग हसत म्हणाला.
“हाहा. हो का.. अनुराग तो विषय नको. आपलं ठरलंय ना.”
हसणार्या गव्हाळ रंगाच्या रियाकडे तो क्षणभर पाहतच राहिला. वार्यावर
तिचे केस उडत होते. त्यांना सावरत सावरत बोलण्याचा तिचा यत्न त्याला अजूनच सुंदर वाटायला
लागला.
तसाच तिच्याकडे पाहत तो म्हणाला,
“तुला वाटतं, मी तुझ्या स्वप्नांच्या आड येईन?” त्याच्या डोळ्यात
चमक होती.
रिया काही न बोलता शांत राहिली.
“असे, चर्चा न करता, समोरच्याला संधी न देता एकतर्फी निर्णय
घेऊ नयेत रिया.. ते बहुतेक वेळा चुकीचे ठरतात.”
रियाने त्याच्याकडे पाहिलं पण काही न बोलता ती फक्त हसली.
संहिता तिची खरेदी आटपून तिथे आली. अनुरागचं शेवटचं वाक्य तिच्या कानांवर
पडलं. पुन्हा तिचं मन धावत मागे अनिकेत पाशी जाऊन पोचलं. त्याला तसंच ओढत आणून मग तिने
कॅमेरा बाहेर काढला. तिघांनी ढीगभर फोटोज क्लिक केले..
तिन्हिसांजा झाल्यावर हातात शहाळी आणि मनात कितीतरी नव्या गोष्टी घेऊन तिघेही मुक्कामी परतले..
.. उद्याचा नवा दिवस तिघांचीही वाट पाहत होता.
आता तो प्रवास त्या दोघींचा राहिलेला नव्हता, तिघांचा झाला होता!
टिप्पण्या