प्रिय आजोबा,




पन्नासचं दशक. स्थळ हैदराबाद.
उस्मानिया विद्यापीठाचा वैद्यकीय विभाग.
द्वितीय वर्ष विद्यार्थ्यांची viva.
त्यातला एक विद्यार्थी. अतिशय कुशाग्र बुद्धिमत्तेचा पण तद्दन उनाड. ‘अवांतर’ विषयांची विशेष आवड असलेला. केटी लागण्याच्या मार्गावर असलेला. मार्गावर कसला वर्षही जाऊ शकतं अशी अवस्था. एकूण, या viva वर बरंच काही अवलंबून असलेला.
परीक्षा गृहात एक माननीय आणि शिस्तप्रिय महिला डॉक्टर viva घ्यायला बसलेल्या असतात.
हा विद्यार्थी आत जातो. आधीच्या मार्क-शीट आणि अहवाल पाहून त्या बाई त्याच्या वरुन एक नजर फिरवतात. त्यांच्या लेखी तो ऑलरेडी नापास असतो. तरी विचारायचे म्हणून त्या एक-दोन प्रश्न विचारतात. जुजबी उत्तरे मिळतात.
बाई पुन्हा एकवार त्याच्याकडे बघतात. आणि काय माहित त्यांना काय वाटतं, त्या म्हणतात,
“मी तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क दिले तरच तुमचं वर्ष वाचणार आहे, महितीय ना?”
विद्यार्थी काही न बोलता गप्प बसतो. त्या बाई पुढे म्हणतात,
“ठिके. मी तुम्हाला आता एकच प्रश्न विचारते. त्याचं जर तुम्ही बरोबर उत्तर देऊ शकलात तर मी देइन तुम्हाला पूर्ण मार्क. अगदी पैकीच्या पैकी!”
विद्यार्थ्याच्या डोळ्यांत चमक येते. तो प्रश्नाची वाट पाहू लागतो.
बाई प्रश्न विचारतात,
“delivery च्या वेळेस बाळाचा फक्त एक हात बाहेर आला, तर तो डावा आहे की उजवा हे तुम्ही कसं ओळखणार?”
बाईंना खात्री असते याला उत्तर जमणार नाही. त्या (चुकीच्या) उत्तराची वाट पाहत त्याच्याकडे रोखून बघू लागतात.
विद्यार्थी विचारात पडतो. मेंदूतले धागे त्वरित कामाला लागलेले असतात. एवढ्यात डोक्यात काहीतरी चमकतं. आणि घटकेचाही विलंब न लावता विद्यार्थी उत्तरतो,
“..by shaking hands!” (हातमिळवणी करुन)
बाई अवाक होतात.
विद्यार्थी ‘पास’ झालेला असतो!
हा विद्यार्थी मग पुढे जाऊन बनतो, डॉक्टर मनोहरराव पाटील उर्फ डॉक्टर साहेब!
मातीशी नाळ जुळलेला, गरिबांचा डॉक्टर.. पंचक्रोशीत विख्यात असा!
शहरात बस्तान बसवण्याची संधि असताना, चांगलं करियर डोळ्यांसमोर उभं असताना आजोबा, तुम्ही मूळ गावी, जिथे अजून ना वीज पोचली होती ना रस्ते, तिथे जाऊन प्रॅक्टिस करायचं ठरवलंत. आयुष्यभर ते व्रत पाळलंत. दोन पायांवर उभं मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल होतात तुम्ही. अगदी अल्प मोबदल्यात, प्रसंगी पदरमोड करुन सेवा पुरवणारे.
हा वरचा किस्सा सांगतानाची तुमच्या डोळ्यांत दिसलेली विलक्षण चमक मला अजूनही आठवतेय आजोबा. त्यादिवशी रंगात येऊन तुम्ही उस्मानिया मधले दिवस आठवत होतात. एकेक आठवण मला सांगत होतात. मी थक्क होऊन ऐकत होते. तुमचा बेधडक अंदाज, स्वत:च्या मतांशी प्रामाणिक राहण्याची वृत्ती.. सारं मनात भरत होतं. तसे तुमचे अतरंगी किस्से ऐकत पाहतच मी मोठी झाले.
दहा-बारा वर्षांपूर्वी एकदा मला बस मध्ये एक काका भेटले होते. मी तुमची नात आहे असं समजल्यावर त्यांनी त्यांच्या जन्माचा किस्सा सांगितला. पावसाळ्यात मध्यरात्री कुठल्याशा वाडीत त्यांच्या अडलेल्या आईची तुम्ही जाऊन सुटका केली होती आणि आशा सोडून बसलेल्या घरच्यांच्या हातात बाळ सोपवलं होतंत. तुम्ही त्यावेळी लाडाने त्या बाळाला ‘बंडू..’ म्हणालात म्हणे, तर घरच्यांनीही त्याचं म्हणजे त्या काकांचं नाव बंडूच ठेवलं.

असे अनेक किस्से, अनेक रंगतदार गोष्टी तुम्ही जन्माला घातल्या आहेत. तुमच्या क्रिकेटच्या अचाट वेडा पासून, राजकारण-समाजकारणातील सक्रिय सहभागापर्यन्त अनेक गोष्टी अजूनही लोकांच्या चर्वित-चर्वणाचा विषय आहेत. तुमची वाचनाची आवड, सुसंस्कृत स्वभाव, प्रामाणिकपणा हा सारा आमच्यासाठी बहुमोल ठेवा आहे. तुमच्या व्यक्तिमत्वामुळे ‘माणूसपणाच्या’ संकल्पनेची मनात इतकी उच्च छवि निर्माण झालीये की त्याला आजपावेतो कोणी आव्हान देणारा भेटला नाही.
मला आठवतंय एका उन्हाळ्याच्या सुट्टीत, तुम्ही तुमच्याकडे बाळंतपणासाठी आलेल्या एका बोहारणीचं बाळंतपण केलं होतं. अर्थात फुकट. तिच्यासोबत तिची एक सात वर्षांची मुलगी होती फक्त. गरम पाण्यापासून पथ्य-पाण्या पर्यन्त सारं आपल्या घरातून पोचलं. पण जेव्हा ती सात वर्षांची चिमूरडी ते सारे कपडे धूत आणि इतर गोष्टी करत आपल्या आईचं बाळंतपण करतेय हे तुमच्या दृष्टीस पडलं तेव्हा तुम्ही त्या मुलीच्या हातात ‘चांगला फ्रॉक घे’ म्हणत पैसे टेकवले होते.
इतका निरलस डॉक्टर माझ्या पाहण्यात तरी दूसरा नाही. आणि माझं भाग्य किती मोठं, मी ‘तुमची’ नात आहे!
‘जाणं’ म्हणजे ‘नसणं’ का आजोबा? पण तुम्ही तर आहात. इथे. सतत. माझ्यापाशी. तुम्ही दिलेला विचार आहे. आठवणी आहेत. तुमचा हसरा चेहरा आहे. ‘सुंदराबाई..’ म्हणून हाक मारणारा तुमचा आवाज आहेच माझ्या कानात, आत्ताही. तुम्ही ओंजळीत टाकलेल्या चाफ्याच्या/रानफुलांच्या सुगंधाने अजूनही घमघमतो माझा तळहात. तुमच्यातलं लाघव, चातुर्य, धाडस, निरलस प्रांजळ मन, सारं सारं आहे माझ्या अवती-भवती. सतत. कठीण प्रसंगी येतं ते सगळं धावून. मला आठवण करून देतं की मी तुमची नात आहे. त्याला साजेसं मी वागलं पाहिजे याची जाणीव होत राहाते मग.

हे तुमचं ‘असणं’ असच राहणार आहे, मला माहितीये. ते माझ्यापासून कोणीही हिरावून घेऊ शकत नाही. गेल्या चार दिवसांपासून आपल्यावर अक्राळ-विक्राळ हसणारी ही जी मृत्यू नावाची गोष्ट आहे ना ती देखील नाही. तिने कितीही टेंभा मिरवू दे, तिलाही हे चांगलंच माहितीये, खरी पराभूत ती आहे! तिने नेलं ते पार्थिव. तुमचा गाभा, तुमचं चैतन्य, तुमचं ‘असणं’ हे सगळं तर माझ्यापाशी अजूनही आहे. आणि सदैव राहणार आहे!
खंत एकाच गोष्टीची आहे आजोबा, आयुष्यभर रुग्णांची आईप्रमाणे काळजी घेणारे तुम्ही, अफाट लोकसंग्रह असलेले तुम्ही, कोणाच्याही मदतीला रात्री-अपरात्री धावून जाणारे तुम्ही शेवटच्या क्षणी एकटे होतात. अगदी एकटे. किती विचार तुमच्या मनात आले असतील. असहाय्यता डोळ्यांत दाटून आली असेल. पण.. व्यक्त व्हायला जवळ कोणीही नाही. आम्ही कोणी इच्छा असूनही सोबत नव्हतो. असू शकलो नसतो. मन हळहळत होतं.. आक्रोश करत होतं.. चीड येत होती.. परिस्थितीची. तुमची तगमग जाणवत होती. कळत होती. असा मृत्यू नको होता तुम्हाला. आयुष्य जसं स्वच्छंदी, स्वावलंबी जगलात, मृत्यूही तसाच हवा होता. पण..
आयुष्यातले हे काही ‘पण’ फार जीवघेणे असतात.
तुम्ही एक समृद्ध, मनस्वी आयुष्य जगलात याचं समाधान आहेच. पण त्याचवेळी वेदनेची एक खोल लहर काळीज चिरत जात म्हणते, आपल्या गोष्टीचा हा असा शेवट व्हायला नको होता आजोबा.. नक्कीच नको होता..!



तुमची,
संजीवनी


भावपूर्ण श्रद्धांजली
🙏🏻

टिप्पण्या

Harshada म्हणाले…
Khup sundar... Tumachya aajobana namskar🙏🙏
Unknown म्हणाले…
खूप सुंदर आणि आतून आलेलं... डोळे चिंब झाले

लोकप्रिय पोस्ट