संपी आणि तिचं धमाल जग! - १
एक मोठी जांभई देऊन संपी पलंगावरुन उठली. आजूबाजूला पाहिल्यावर तिच्या लक्षात आलं की दुपार झालीये आणि रोजच्या प्रमाणे आजही आपण माती खाल्लीये. स्वयंपाकघराच्या दारातून हळूच डोकावून तिने पाहिलं. आई ओटा पुसत होती. आता तो पुसून झाल्यावर ती आपल्याकडे वळणार हे संपीच्या चाणाक्ष मनाने लगेच ओळखलं. आणि मग वायू वेगाने हालचाली करत तिने शून्य मिनिटांत एकदा डावीकडे आणि एकदा उजवीकडे ब्रश फिरवून दात घासले. जवळपास वादळ वेगाने बादलीभर पाणी अंगावर ओतून आंघोळ उरकली. आणि मग हाताला लागतील ते कपडे अंगावर चढवून ती हॉल मध्ये दिसेल तो पेपर उघडून वाचत असल्याचा आव आणत येऊन बसली.
संपीची आई हात पुसत बाहेर आली. समोर पेपर उघडून बसलेली संपी. आईने
काही न म्हणता पंखा चालू केला. आणि मग खुर्चीवर टेकत म्हणाली,
“तो कालचा आहे. झोप झाली असेल तर आजचा टीव्हीच्या बाजूला ठेवलाय.”
संपीने लगेच पेपर वरची तारीख पहिली. खरच कालची होती. पेपरच्या
आडूनच जोरात डोळे मिटून घेत ती स्वत:च्या मूर्खपणावर चरफडली. आणि मग मुकाट्याने
त्या पेपरची घडी घालून तो जागच्या जागी ठेऊन आजचा उघडून येऊन बसली.
पुन्हा आईचं मिश्किल वाक्य कानांवर पडलं,
“आज भल्या पहाटे उठलेली दिसतेयस. अंधारात कपडे सुलटे की उलटे
दिसलं नाही बहुतेक.”
पुन्हा पेपरच्या आडून संपीने कपड्यांकडे पाहिलं, चक्क उलटे होते. हौसेने शिऊन
घेतलेल्या त्या फ्रिलच्या ड्रेसची आतली सगळी अस्ताव्यस्त शिवण छानपैकी सगळीकडून
प्रदर्शित होत होती. तिने पुन्हा जोरात डोळे मिटले. यावेळी जराशी जीभ पण बाहेर
आली. वरच्या आणि खालच्या दातात घट्ट दाबलेली. मग आईची नजर टाळून पेपर बाजूला ठेऊन
ती तशीच आतल्या खोलीत पळाली. आत जाऊन स्वत:च्या (नेहमीच्या)
वेंधळेपणावर स्वत:शीच हसली.
आणि अशा प्रकारे आजचा गाढ झोपेतून पृथ्वीवर अवतीर्ण झाल्यानंतरचा
युद्धप्रसंग हसतमुखाने पार पडल्याने संपीने सुस्कारा सोडला.
थोड्या वेळाने संपीचे बाबा घरी आल्यावर, जेवताना, आजचा दिवस आईच्या ठेवणीतल्या शिव्या न खाता इतका छान कसा उगवला ते संपीच्या
लक्षात आलं. ताटात आज वरण-भात-भाजी-पोळी नामक जेवण नव्हतं तर आईच्या दाव्या नुसार ‘दाळ-बाटी’ होती. काल टीव्ही वर
पाहिलेली रेसिपी आज ताटात अवतरली होती. संपी तशी साधारण मध्यमवर्गीय असल्यामुळे
तिच्या घरचे एकत्रच जेवायला बसत. तेही
खाली जमिनीवर. मध्यमवर्गीय म्हणजे जुने मध्यमवर्गीय बरंका. ईएमआय भरणारे आणि डायनिंग
टेबलावर जेवणारे नवे मध्यमवर्गीय नाही. मधोमध सगळे पदार्थ ठेवलेले आणि त्याभोवती
सगळ्यांची पानं वाढलेली. सगळ्यांची म्हणजे, संपीचे बाबा, संपीचे आजोबा, संपीची धाकटी बहीण, संपीची आई आणि स्वत: संपी यांची. तर, ताटातला तो
पदार्थ टकामका पाहत सर्वांनी येणार्या प्रसंगासाठी मनाची तयारी सुरू केली. संपीची
आई सगळ्यांच्या चेहर्यांकडे चातका सारखी पाहत होती. कोण पहिला घास घेतोय, आणि ‘दाळ-बाटी’ कशी झालीये ते
सांगतोय याकडे तिचं लक्ष लागलेलं.
संपीने पहिला घास घेतला. बाटी नामक दगडी वाटावी अशी वस्तु तिच्या
दातांना दाद देईना. मग तिने आईची नजर टाळून सरळ खाली मान घालून वाढलेलं पोटात
ढकलायला सुरुवात केली. संपीचे आजोबा काही न बोलता नुकत्याच बसवून घेतलेल्या
कवळीच्या जोरावर तो बाटीचा युद्धप्रसंग पचवू लागले. संपीची बहीण अजून तशी ‘बाल’
असल्याने तिने तिचा मोर्चा वरण-भाताकडे वळवला. आता उरले संपीचे बाबा. येणार्या
बाक्या प्रसंगाची कल्पना न येता पहिला घास खाल्ल्या-खाल्ल्या ते नकळत बोलून गेले
आणि पस्तावले,
“दाळ-बाटी आहे की दगड-बाटी?”
बास! संपीच्या आईचा चेहरा पडला. मग डोळ्यांत पाणी. मग ती उपसत
असलेल्या कष्टांची यादी. मग डोळ्याला पदर. मग कधी कसली हौस म्हणून नाही ते दिवसभर
राब-राब राबते पण माझ्या मेलीच कोणाला कौतुकचं नाही इथपर्यंत क्रॉसिंग वरुन जाणार्या
रेल्वेप्रमाणे धाड-धाड गाडी समोरुन सरकली. त्यापेक्षा डाळीमधले दगड परवडले अशी संपीच्या
बाबांची अवस्था झाली. मग संपीच्या आईच्या तारसप्तका
मधल्या पार्श्वसंगीतासह सार्यांची जेवणं कशी-बशी पार पडली.
संपीची दहावीची परीक्षा झालेली होती. सुट्ट्याही संपत आलेल्या.
कधीही निकाल लागतील असे दिवस. दहावीचं पूर्ण वर्ष मोल-मजुरी केल्यासारखी संपीने
पूर्ण सुट्टी लोळून काढली होती. सकाळ ही संकल्पना तिच्या लेखी अस्तित्वातच नव्हती.
तशा संपीच्या सगळ्याच संकल्पना जराशा वेगळ्याच होत्या. त्या कशा ते तुम्हाला
हळू-हळू कळेलच.
तिन्हिसांजेला संपी डायरीत तोंड खुपसून काहीतरी करत बसली होती.
काय ते तिचं तिलाच ठाऊक. एवढ्यात दोन घर सोडून पलिकडच्या सुमा काकू पदराखाली
काहीतरी झाकून घेऊन आल्या. समोर संपी बसलेली. दोन हाका मारल्यावर तिने वर पाहिलं.
“संपे, अगं तुला आवडतात म्हणून ताजे अप्पे घेऊन आलेय.”
त्यांचं हे वाक्य कानांवरुन उडवत ती सरळ आईला पाठवते म्हणत आत
पळाली.
“अगं, हे घेऊन तरी जा..”
आतून संपीची आई बाहेर आली.
“अहो सुमा ताई कशाला.. मी करणारच होते उद्या.”
हे ऐकून संपीने आत मान हलवली.
“राहुद्या हो, आवडतात संपीला म्हणून आणले.”
“मी पण आज दाल-बाटी केली होती. पण अहो बिघडलीच थोडी.”
दोघींच्या मग चांगल्याच गप्पा सुरू झाल्या.
संपीचा जीव आतमध्ये कासावीस होत होता. तिची डायरी बाहेरच राहिली
होती. आता ती जाऊन आणावी तर सुमा ककुशी बोलावं लागणार. मुळात कमी बोलणार्या
संपीला मोठी माणसं दिसली की तर अजूनच बावरल्या सारखं, गोंधळल्यासारखं व्हायचं. पण, कोणातरी सोम्या-गोम्याच्या लग्नावर त्यांचा विषय घसरल्यावर मात्र आता
यांच्या गप्पा काही लवकर आवरत नाहीत म्हणत संपी उठली आणि हळूच डायरी उचलून आणावी
म्हणून बाहेर आली. त्या दोघीना गप्पांमध्ये दंग पाहून तिने डायरी उचलली आणि ती आत
यायला वळणार इतक्यात सुमा काकुंचा आवाज तिच्या कानांवर पडला,
“काय गं संपे, हे काय घातलंयस तू?”
संपीने स्वत:च्या कपड्यांकडे एकदा वाकून पाहिलं. तिला वाटलं
पुन्हा उलटेच घातले की काय आपण! पण नाही सुलटे होते की.. तिला कळेना नक्की काय
बिघडलय.
“अगं.. दोन तू बसतील की यात. कुठून घेतलंस हे. आजकालच्या पोरी
ना.. काहीही घालतात अगदी. आणि जरा टिकली लावावी गं, बरं दिसतं ते..”
झालं आता यांचं पुन्हा सुरू म्हणत संपीने जराशा रागातच आईकडे
पाहिलं आणि मग सरळ आत निघून आली. शी किती बोरिंग असतात ही मोठी माणसं. ती स्वत:शीच
पुटपुटली. आणि पुन्हा डायरीत तोंड खुपसून बसली.
सध्या तिच्या घरात एकच चर्चा होती. संपीचा निकाल. आणि त्यानंतरचं
अडमिशन. पण तो खरंतर चर्चेचा विषय नव्हताच तसा. कारण दहावी झाल्यावर काय करायचं
असतं तर सायन्स घ्यायचं असतं. बास. हाच अल्टिमेट प्रोटोकॉल. तुमचे मार्क चांगले
असतील तर गुणवत्तेवर घ्या आणि नसतील तर पैसे मोजून घ्या. पण सायन्सच घ्या. तर
संपीसुद्धा सायन्सच घेणार होती. तिची तशी मनाची तयारी पण झालेली होती. आत्तापासूनच
तिला एंजिनियर झाल्याची स्वप्नंही पडू लागली होती. आजूबाजूला अमक्याची ही किंवा
तमक्याचा तो अशी एखादी सक्सेस स्टोरी असतेच सतत ऐकलेली किंवा ऐकवली गेलेली. तशी ती
संपीनेही ऐकली होती. आणि इंजिनियर होणे म्हणजे एकंदर आयुष्याचं सार्थक होणे असं
काहीसं चित्र तिच्या डोळ्यांसमोर तयार झालं होतं.
दुसर्या दिवशी सकाळी स्वप्नातच कोणीतरी जोरात ओरडतंय की काय असं
वाटून संपी दचकून जागी झाली. पाहते तर काय तिची लहान बहीण खरंच ओरडत होती.
‘संपे.. उठ निकाल लागलाय”
हो. संपीची तिच्यापेक्षा बरीच लहान बहीण तिला नावानेच हाक
मारायची.
संपी खडबडून जागी झाली.
“आज निकाल लागणार होता काय?”
डोळे चोळत झोपेतच ती बडबड्ली आणि आईचा कानोसा घेत हळूच बाथरूमकडे
पळाली.
क्रमश:
@संजीवनी देशपांडे
टिप्पण्या