कॅन्व्हास
कोरा कॅन्व्हास.. आयुष्याचा..
त्यावर हळूहळू चढत गेलेले रंग
काही आवडीने भरलेले
काही निसटून गेलेले
काही वेगळेच उमटलेले स्ट्रोक्स
काही चपखल बसलेल्या रेखा
आणि या सगळ्यातून तयार होत जाणारं चित्र, ॲबस्ट्रॅक्ट..
स्वत:चंच.
जे मला एक दिसतंय
आणि इतरांना वेगळंच
ज्याचा-त्याचा अर्थ लावून मोकळा होतो प्रत्येकजण..
‘हे इथे थोडंसं विस्कटलंय’ किंवा
‘हा रंग नकोच होता इथे’ नाहीतर मग
‘वाह! छान जमलंय’, ‘छे! बिघडलंय अगदीच’
‘काऽही म्हणून अर्थ लागत नाही’..
ज्याचे-त्याचे शेरे वेगळे
ज्याचे-त्याचे आकलन निराळे
पण सरतेशेवटी,
माझे मला माहित माझ्या रंगांचे फटकारे.
इतरांना काय ठावूक,
कोणत्या स्ट्रोकमागे काय होता विचार
आणि कुठलं अमीट स्वप्न शोधत होते मी चित्रात..
रंग..
या रंगांमागचे संदर्भही असू शकतात की चाकोरी बाहेरचे
का लाल नेहमीच धोक्याचा
अन् हिरवा रंग तो बहराचा?
काळ्या-कुट्ट अबीरालाही असतोच की स्पर्श श्रद्धेचा..
कोरा कॅन्व्हास.. आयुष्याचा..
संजीवनी
टिप्पण्या