संपी आणि तिची बहीण.. (७)

 






डोक्यावर वगैरे पडलीयेस का नमे? काय चाललंय हे सकाळपासून?’

बर्‍याच वेळापासून चित्र-विचित्र पद्धतीने शरीर वेडंवाकडं करत बसलेल्या लहान बहिणीकडे पाहून संपी म्हणाली.

ए संपे तू जा गं. अभ्यास कर जा. तुला नाही कळणार यातलं काही!

ए दीडशहाणे, ताई म्हण आधी तू. बारावीत आहे आता मी. कळलं का?’ संपी तोर्‍यात म्हणाली.

काय सांगतेस.. बारावीत? हाहा.. नमू.

हो! हे काय नवीन खूळ ते तरी सांग.’

खूळ नाही. मी दंड घालतेय. आमच्या पीटी च्या नवीन आलेल्या सरांनी शिकवलंय आम्हाला.. बघ मी किती भारी घालतेय.

समोरच्या दोन हातांवर वजन दिल्याचा आव आणत नमी नुसतेच पाय अन पाठ हलवत होती. अन आविर्भाव तर काय अगदी पट्टीच्या मल्लासारखा.

दंड? हाहा.. चालूदे चालूदे.. म्हणत संपी आत निघून गेली.

इकडे आपली कसरत क्षणासाठी थांबवून नमिने आईला हाक मारली,

आई, आजपासून मी पेल्यातून नाही मोठ्या ग्लासातून दूध पिणार!

आई हात पुसत बाहेर आली आणि लेकीच्या अवताराकडे पाहून काहीतरी बोलायला ती तोंड उघडणार इतक्यात, तिला आतून संपीची हाक कानांवर आली,

आई, बदाम...

आणि अरेच्चा! संपी उठली होय! म्हणत तिची आई तशीच मागे फिरून स्वयंपाकघरात गेली. रात्रीच भिजवून ठेवलेले बदाम पाणी काढून टाकून ती संपीला द्यायला गेली. संपीचं बारावीचं वर्ष नाही का?!

नमि भलतीच चिडली. आणि बैठकीत थांबून जोरात ओरडली,

या घरात मी पण राहते. माझ्याकडे कोणाचं लक्ष आहे का???’

पण सकाळच्या त्या अत्यंत गडबडीच्या वेळेत कोणीच तिच्याकडे लक्ष दिलं नाही. ती अजूनच फुगली. नमी पाचवीत होती. तिच्यात आणि संपीमध्ये तसं बरंच अंतर. इतके दिवस घरातलं शेंडेफळ म्हणून आणि एकूणच संपीपेक्षा जरा जास्त चपळ, हुशार आणि चतुर म्हणून तिचं कोड-कौतुक थोडं जास्तच झालेलं. पण, संपीची दहावी झाल्यापासून आणि तिला चांगले मार्क मिळाल्यापासून नमीकडचं सगळ्यांचं लक्ष संपीकडे वळलं होतं. त्यामुळे नमिला एकदम खूप एकटं-एकटं वाटायला लागलं.

जळली मेली बारावी! बारावीत असलं म्हणून काय झालं. मी पण आता पाचवीत आहे. माझं आहे का कोणाला कौतुक! ती एकटीच चरफडली.  

नसायला काय झालं? कोणी दुर्लक्ष केलं तुझ्याकडे?’ हातात भजीची पिशवी घेऊन चपला काढून आत येणारे आप्पा म्हणाले.

आणि मग बरोब्बर वेळेवर डोळ्यांतून पाणी काढण्याचं जे एक जगावेगळं कौशल्य जगातल्या सगळ्या शेंडेफळांच्या ठायी असतं, तेच नमिनेही वापरलं. कधी नव्हे इतक्या तीव्रतेने तिच्या गळ्यात आवंढा दाटला आणि डोळ्यात पाणी आलं. आणि मग आप्पांना जाऊन बिलगत ती म्हणाली,

या घरात माझी कोणाला किम्मतच नाही हो अप्पा. सगळं कौतुक त्या संपीचं!

बॅग सांभाळत दाराशी येऊन पायात चपला चढवणार्‍या संपीने मग कॉलेजला जाता जाता हळूच आगीत तेल ओतलं,

हो.. नमे तुला बोहारणीकडून घेतलंय अगं जुने कपडे देऊन.. म्हणून..!

यावर तिला जीभ दाखवत, पुन्हा आप्पांना बिलगत नमिने हंबरडा फोडला, अप्पा..

आप्पांनी मग तिच्या दंडांची जराशी चौकशी करून तिची नाराजी थोडीफार घालवली॰

 

इकडे संपीची तयारी आता युद्धपातळीवर सुरू होती. आता फक्त अभ्यास एके अभ्यास, तिने ठरवलंच होतं. त्यादिवशी कॉलेजमधून घरी येताना वाटेत तिला दिशा आणि शिर्के बोलत थांबलेले दिसले. तिने जवळपास डोळे मिटूनच घेतले. ओळख न दाखवताच पुढे जायचं असं ठरवून इकडे तिकडे पाहत ती तिथून जाऊ लागली. पण तेवढ्यात दिशाचं लक्ष तिच्याकडे गेलं, आणि तिने संपदा.. अशी जोरात हाक मारली. नाईलाजाने संपीला थांबाव लागलं. दिशा तिच्यापाशी आली,

संपदा, अगं काय बोलतच नाहीस तू आजकाल..

असं काही नाही.. अगं परीक्षा जवळ आलीये ना आता म्हणून..

अच्छा.. काय म्हणतोय मग अभ्यास?’ दिशाने विचारलं.

काही नाही.. सुरू आहे. त्या शिर्के कडे न बघता ती जितक्यास तितकी उत्तरे देऊ लागली.

तुझं काय.. तू काय करतेयस इथे. आज वर्गात दिसली नाहीस. संपीने दिशाला विचारलं.

ती काही बोलणार इतक्यात समोरच्या दवाखान्यातून एक मध्यमवयीन बाई बाहेर आली आणि ती शिर्के आणि दिशा दोघांना पाहून म्हणाली,

आता बरी आहे शकू.. तुम्ही जा पोरांनो कॉलेजला जायचं असेल तर.. दिशा, बेटा थॅंक यू बरंका!

संपीला काही समजेना. दिशाशी बोलल्यावर तिला समजलं, शिर्केच्या आईला कॅन्सर झालाय. त्याला वडीलही नाहीत. त्यामुळे तो आणि आई दोघेच राहतात. तिचं हॉस्टेल त्याच्या घराशेजारीच असल्याने दिशाने त्याच्या आईकडे पूर्वी जेवणाचा डबा लावला होता. आणि त्यामुळे त्यांची जास्त ओळख झाली. पुढे आजारपण वाढत गेलं तसं त्यांना डबा बंद करावा लागला होता. पण दिशा त्यांच्याकडे येत-जात राहायची. आज सकाळी अशीच ती तिकडे गेली असता शिर्केची आई बेशुद्ध असलेली तिला दिसली मग तिने आजूबाजूच्या लोकांच्या मदतीने त्यांना दवाखान्यात आणलं वगैरे. शिर्के नंतर आला. मग त्याने त्याच्या मावशीला बोलावून घेतलं. ती आत्ता आतून बाहेर आलेली बाई म्हणजे त्याची मावशीच होती.

सगळा प्रकार ऐकून संपी चाटच पडली. मग क्षणभरासाठी आपल्या विचारांची तिला लाज वाटली. पण, ती दिशाला तसं काही बोलली नाही. घरी येताना पूर्णवेळ तिच्या डोक्यात तेच विचार घोळत राहिले. इतरांसारखा आपण पण किती वाईट विचार करत होतो दिशा बद्दल. तिला खूप वाईट वाटायला लागलं. तिने तिच्या मनाशी त्या दिवशी दोन खूणगाठी बांधल्या, एक म्हणजे इतरांच्या मतांवरून कोणाला जज करायचं नाही आणि दुसरं, मुलांशी बोलणार्‍या सगळ्याच मुली काही वाईट नसतात!

 

संपी घरी आली. पाहते तर दारात नमि हाताची घडी घालून तिच्याकडे ऐटीत उभी. संपीने विचारलं,

काय बरंय ना सगळं?’

नमिने मानेला एक झटका दिला. आणि ठसक्यात न्यूज लेटर वाचून दाखवावं तसं म्हणाली,

बोहारणी कडून नाही घेतलं मला. कळलं का? आईने मला माझे बाळ असतानाचे फोटो दाखवले. हम्म.. आणि मी तुझ्यापेक्षा जास्त छान दिसत होते लहानपणी बरंका. आणि आज आईने माझ्यासाठी खास बेसनाचे लाडूही बनवलेत. आणि बाबा मला नवीन स्कूलबॅग घेऊन देणारेत माझी पाचवी आहे म्हणून.. तुला ठेंगा!

यावर जिभेने तिला वेडावत हो का! म्हणत संपी घरात आली.

ती आल्या आल्या संपीची आई म्हणाली,

आलीस का.. ये. हात-पाय धुवून घे. छान लाडू आणि ताजा चिवडा देते तुला. अभ्यासाने वाळून गेलीये माझी पोर नुसती.

यावर नमिचा इतकावेळ दात काढणारा चेहरा पुन्हा पडला.

पण मग ते लाडू आणि तो चिवडा फस्त करत टॉम अँड जेरी पाहताना दोघी सारं विसरून गळ्यात गळे घालून केव्हा खिदळायला लागल्या त्यांचं त्यांनाही समजलं नाही!

 


क्रमश:


@संजीवनी देशपांडे 

टिप्पण्या

लोकप्रिय पोस्ट