संपीची डायरी.. (८)





 

ऐ आई, मला पावसात जाऊदे..

एकदाच गं भिजूनी मला,

चिंब चिंब होऊदे..

ऐ आई..

 

.....

 

ढग पावसाने भिजले

मन निथळत हलके झाले..

 

......

 

आईने माझ्यासाठी ड्रेस आणले आज. मला एकही आवडला नाही. शी तसे कोण घालतं का आता? मी म्हटलं तर, गप्प बस टिकाऊ आहेत आणि अंगभरुन आहेत, तुला काही कळत नाही असंही म्हणाली. मला कधी कळायला लागणारे काय माहित. आईचं बरोबर असतं का? मागच्या उन्हाळ्यात तिने घेतलेले कपडे अजून छान आहेत. मधुला तर किती आवडले. मला का नाही आवडत? मी यातलं काही न बोलता गप्प बसते मात्र.

 

......

 

अबोलीला खूप फुलं लागलीयेत. आई त्यांचा गजरा बनवते. आज मी पण बसले बनवायला. एकात एक गाठी नुसत्या. काहीच जमलं नाही. फुलं खराब केली म्हणून आई ओरडली ते वेगळंच. शेजारच्या काकू फिदीफिदी हसू लागल्या. त्यांच्या त्या पूजाला येतं. मला नाही येत.

 

......

 

निकाल लागला आज. मला चक्क 89.09%?? वाटलं नव्हतं. वर्गातल्या हुशार मुळा-मुलींकडे पाहून वाटायचं आपल्याला कधी जमणार इतकं? अभ्यास करत गेले पण. मागच्या वर्षीपेक्षा थोडा जास्त केला. निबंधा सकट सगळं पाठ केलं होतं. हुशार असणं म्हणजे हेच का? पण आतून असं वाटत नाही. ते काहीतरी वेगळं असलं पाहिजे. मला सगळे वेंधळी म्हणतात. पण आज खूप कौतुक झालं. सगळ्यांनी केलं. शाळेत अवचट पहिला आलाय. तो पण पाठ करत असेल का सगळं? वाटत नाही त्याच्याकडे बघून. पण तो हुशार वाटतो का कोणास ठावूक. नेहा म्हणे, राणे आणि शिल्पाचं सुरूये’. एका दिवशी शिल्पाने मला शाळेत उशिरा थांबवून घेतलं होतं खरं, भूमिती समजावून सांग म्हणून. त्यादिवशी राणे पण थांबला होता. मी तिला वर्तुळ कसं काढायचं शिकवत होते आणि ती त्याच्याशी बोलत होती खुणेने. आत्ता कळतंय मला. मला काहीच कसं कळत नाही लवकर? जाऊदे. आता मला इंजीनियर व्हायचय. आणि मग पैसे कामवायचेत. मग मी मला हवे तसे ड्रेस घेईन.

 

.......

 

कॉलेज सुरू झालं. आता डायरी वगैरे सगळं बंद. फक्त अभ्यास.

 

.......

 

डिक्शनरी घेतली आज सायन्स ची. किती ते इंग्लिश. अकरावी अवघडच जाते म्हणे सगळ्यांना. फिज़िक्स उघडलं की वाटतं केमिस्ट्रि सोपं आहे, केमिस्ट्रि उघडलं की मॅथ्स बरं वाटायला लागतं. हळू हळू सवय होईल म्हणाली मधु. पाहू. खूप नवीन मुली पण आहेत वर्गात. आता जमायला लागलंय सगळ्यांशी थोडं-थोडं. काही इंग्लिश मिडियमच्या पण आहेत. त्या फार पुढे-पुढे करतात. सगळे एकमेकांना म्हणत होते म्हणून मीही काल हॅप्पी ख्रिसमस म्हटलं तर ती मेघा काल लाइकवाइज म्हणाली. मला समजलंचं नाही. दुसरंचं काहीतरी म्हंतेय असं समजून मी वेड्यासारखं म्हणजे?’ म्हणाले. तर, हिला एवढंही माहित नाही! असा लुक दिला तिने मला. आणि मग त्यांच्या त्या इंग्लिश मिडियम ग्रुपमध्ये जाऊन हसत बसली. म्हणजे हे मला तेव्हा काही कळलंच नाही. नंतर मधुने सांगितलं. खरंच मधु नसती तर काय झालं असतं माझं. ती नवीन आलेली दिशा मात्र छान बोलते. हो पण ती मुलांशी बोलते बाबा सरळ जाऊन.

 

.......

 

माझी फीस वाढत चाललीये. आई थोडी जास्त काटकसर करायला लागलीये.

 

.......

 

आज गम्मतच झाली. परीक्षा होती. अकरावी तर आहे म्हणून सगळे तसे लूज. मी पण कै फार अभ्यास केला नव्हता. मधुशी गप्पा मारून मी माझ्या परीक्षा हॉल मध्ये गेले. पूर्ण वर्गभर चार फेर्‍या मारल्या तरी माझा नंबर सापडेना. सगळे पाहू लागले. शेवटी मग मागून दूसरा बेंच माझा वाटला. जाऊन बसले. सगळं सामान काढून ठेवलं. पेन, पेन्सिल, पाण्याची बाटली, घड्याळ, खोडरबर सगळं. आणि बसले पलिकडच्या मेघाला हाय करत. तर ती म्हणे मागे बघ’. बघितलं तर बेंच शेजारी अवचट उभा. गोंधळून. मलाही कळेना असा का थांबलाय. तो पुन्हा पुन्हा माझ्याकडे पाहू लागला. आता मला कसंतरीच वाटायला लागलं. पण मी गप्प. शेवटी तो म्हणाला,

हा माझा बेंच आहे. हे बघ माझा नंबर

मी पाहिला. त्याचाच होता. आता झाली का पंचाईत. सगळे आमच्याकडे पाहत होते. मी आणि माझा वेंधळेपणा. मग पसरलेलं सगळं साहित्य पुन्हा गोळा केलं. त्या गोंधळात ते नीट गोळाही होईना. पेन्सिल आणि रबर खाली पडलं. उचलायला वाकले. ते पुढच्या मुलाच्या पायांशी गेलेलं. आता काय करावं! पुन्हा माझा वेडपट वेंधळेपणा. अवचटनेच शेवटी ते मला दिलं. मग माझा तो सगळा पसारा घेऊन पुन्हा वर्गभर फिरून अगदी दाराशीच असलेल्या माझ्या बेंच वर जाऊन बसले. जाताना सगळे माझ्याकडे पाहत हसत होते. मी पण हसून घेतलं. आता काय करणार!

 

......

 

बारावी सुरू झालीये. खूप अभ्यास आहे. प्रॅक्टिकल, थ्यरी.. वेळ पुरत नाही. घरी आले की थकलेली असते. मग टीव्ही पाहावा वाटतो. अभ्यास होतचं नाही. अजून अख्खं वर्ष आहे तसं. एकजण म्हणाली असंही आत्तापसून केला तर परीक्षेच्या वेळपर्यंत विसरून जातं. दिवाळीनंतर खरा अभ्यास सुरू करायचा. पाहू.

सगळे फारच अभ्यास कर अभ्यास कर म्हणतायत बाबा आता. माझी चिडचिड होते जाम. म्हणजे मला कळतच नाही असं वाटतं का यांना.

आज आत्या आलीये. अरे काय फरक पडतो कुठे मीठ आणि कुठे भाजी याने. जाणार तर सगळं पोटातचं आहे ना. किती ते अवडंबर. बरं नीट समजावत पण नाहीत. उगाच उणी-दुणी काढायची. ह्या. मी नसते किम्मत देत. टॉम अँड जेरी खूप चांगलं तिच्यापेक्षा.

 

......

 

बापरे. आता सीरियस झालं पाहिजे. परीक्षा जवळ येऊ लागलीये. Cet चा स्कोर चांगला यायला हवा. नाहीतर नाही मिळणार इंजीनीरिंगला अॅडमिशन.

घरी होतचं नाही पण अभ्यास. ही नमि नुसती मध्ये-मध्ये करते. मधुकडेच जाते मी अभ्यासाला.

 

......

 

दिशविषयी किती गैरसमज करून घेतला मी. ती चांगलीये यार खूप. आणि बिचारा शिर्के. कसा अभ्यास करत असेल. मला काही कमी नाही तरी मी टंगळ-मंगळ करते. नाही. आता एकदम सीरियस. खूप म्हणजे खूपच अभ्यास. परीक्षा पंधरा दिवसांवर आलीये. डायरीला टाटा.

 

......

 

 

 

 

क्रमश:

 

@संजीवनी देशपांडे

 

 

 

 

 

टिप्पण्या

लोकप्रिय पोस्ट