संपीची परीक्षा.. (९)





 

परीक्षा जवळ येऊ लागली तशी संपी कधी नव्हे इतकी सीरियस झाली. दिवसा तर करायचीच. पण रात्रीही एक.. दोन.. तीन.. वाजेपर्यंत ती पुस्तकात तोंड खुपसून बसायची. मध्येच पेंगायची पण कमी मार्क पडले’, ग्रुपिंग झालं नाही’, इंजीनीरिंग ला अॅडमिशन मिळेना असली भयानक स्वप्नं पडून पुन्हा खडबडून जागी होऊन अभ्यासाला लागायची. बोर्डाची परीक्षा, पाठ करण्यात तिचा हातखंडा असल्याने सुरळीत पार पडली. आणि सीईटी पर्यन्तचे पुढचे दोन महिने क्लास, क्रॅश कोर्स, कॉलेज मधले वेगळे वर्ग यामध्ये भुरर्कन उडून गेले. आता ती थोडीफार सुकलीही होती. मागची दोन वर्षं सतत कॉलेज, अभ्यास आणि टेंशन. आता तिच्या स्वप्नात सुद्धा चार गोल पर्याय असलेली सीईटी ची उत्तरपत्रिका यायला लागली. ती ते गोल काळ्या पेनाने भरतेय आणि मध्येच तिच्या पेनातली शाई संपते असंही भयानक स्वप्न तिला अधून-मधून पडायचं. त्यामुळे एकवेळ अभ्यास राहिला तर चालेल पण पेन तयार हवं म्हणून तिने चार-चार काळी पेनं पंधरा दिवस आधीपासूनच घेऊन ठेवली होती.

परीक्षा जवळ येऊ लागली तसं घरातलं वातावरण अधिकाधिक डेडली व्हायला लागलं. नमिला तिची परीक्षा झाल्या-झाल्याच मावशीकडे पाठवून दिलेलं होतं. आता घरात फक्त संपी आणि तिचा अभ्यास असं चित्र. बाकी आई-बाबा आणि आप्पा तिची बडदास्त ठेवण्यात गुंग.

आणि एकदाचा मागची दोन वर्षं ज्या दिवसाच्या तयारीत घालवली होती, तो दिवस उगवला. संपी आणि तिचे बाबा केंद्रावर जाण्याच्या तयारीत. संपीची आई, संपे, वेंधळेपणा करू नको. प्रश्न नीट वाचून मगच उत्तरापुढे गोल कर वगैरे सूचना देत होती. तिला हो, हो म्हणत ओढणी सांभाळत संपी एकदाची बाहेर पडली. परीक्षा केंद्रावर आली. कधी नव्हे ते अजिबात वेंधळेपणा न करता तिला तिचा बेंचही सापडला. आधी स्वप्नात कायम दिसलेली उत्तरपत्रिका एकदाची समोर आली. तिने अतिशय लक्ष देऊन वगैरे त्यावर डिटेल्स भरायला सुरुवात केली. तिचा नंबर तिने प्रत्येक लेटर दहावेळा क्रॉस चेक करून त्यावर टाकला. आणि प्रश्नपत्रिकेची वाट पाहत बसली.

प्रश्नपत्रिका हातात येऊन, एकामागून एक प्रश्न वाचणे, सोडवणे, उत्तर गोल करणे या सगळ्यात पुढचे दोन तास कधी संपले तिचं तिलाही समजलं नाही. वेळ संपल्यावर सर येऊन हातातून उत्तरपत्रिका हिसकावून घेईपर्यन्त तिचं उत्तरं गोल करणं चालूच होतं. सरांनी हातातून उत्तरपत्रिका घेतली तेव्हाही ती शेवटच्या प्रश्नाचं उत्तर गोल करत होती. पण, सरांच्या हातात गेल्यावरही तिने ते गोल केलंच. आणि मगच सुस्कारा सोडला.

परीक्षा संपली. संपीला एकदम फार भारी वाटायला लागलं. तिला सगळेच प्रश्न आपण बरोबर सोडवले असं वाटत होतं. पण नंतर घरी आल्यावर, मैत्रिणींशी बोलल्यावर बरोबर वाटणार्‍या प्रश्नांचा आकडा कमी-कमीच व्हायला लागला. नंतर मग तिने जाऊदे जे व्हायचं ते होईल म्हणत तो विषयच डोक्यातून काढून टाकला. आणि सरळ टीव्ही, आंबे आणि झोप या सुखत्रयीच्या स्वाधीन स्वत:ला करून टाकलं आणि थेट निकाल लागेपर्यंत त्यात अजिबात खंड पडू दिला नाही.

निकालाच्या दिवशी संपी अस्वस्थ होती. पोटात घोळे वगैरे येत होते. बोर्डाचा निकाल एव्हाना येऊन गेलेला. त्यात तिने 80 चा टप्पा गाठला होता. पण सगळी मदार सीईटीच्या निकालावर होती आणि तो आज लागणार होता. दहावीच्या निकालाच्या वेळेस ती जशी निवांत होती तशी यावेळेस दिसली नाही. थोडीफार सीरियस वाटत होती. पुण्यात इंजीनीरिंग ला अॅडमिशन मिळवणे म्हणजे गाभार्‍यात जाऊन विठ्ठलाचं दर्शन मिळवण्याइतपत कमाल गोष्ट आहे असा तिचा आता पुरता समज झालेला होता. त्यामुळे ते हवं असेल तर तेवढे मार्कही हवेत हे आपसूक आलंच. आणि त्यातल्या त्यात चांगल्या आणि कमी फीस असलेल्या कॉलेजला मिळवायचं म्हणजे तर अजूनच जास्त हवेत. तिची धाकधूक शिगेला पोचली. पण तरी निकाल पहायला ती गेलीच नाही. तिचे बाबाच जाऊन तो पाहून आले.

ते घरी आले तेव्हा संपी, तिची आई, अप्पा सारेच बैठकीत बसलेले. संपीने चपला काढून आत येणार्‍या बाबांकडे पाहिलं. पण त्यांच्या चेहर्‍यावरून काही समजत नव्हतं. ते आत आले. बसले. संपीकडे पाहिलं. आणि जरासं शांतपणेच पण हसत तिला म्हणाले,

मग संपे, लागा आता तयारीला.. पुण्याला जाणार तू..

संपी जागची उडालीच. तिने लगेच ती मार्कशीट पाहिली. स्कोर होता 140. आणि मग आनंदाने एकदम फुललेला तिचा चेहरा क्षणभरासाठी पडला. 140 म्हणजे प्रायवेट कॉलेज मिळणार हे ती कळून चुकली. आणि एवढा खर्च आपल्याला झेपेल का या विचाराने गप्पच बसली. पण तिच्या पडलेल्या चेहर्‍याकडे पाहून तिचे बाबा म्हणाले,

संपे.. काही काळजी करू नकोस. कमी नाहीयेत मार्क. मिळेल अॅडमिशन. सकाळी आणून ठेवलेले पेढे घेऊन ये जा.. पळ..

आता संपीच्या डोळ्यांत पाणी तरळलं. तिने धावत जाऊन बाबांना एक घट्ट मिठी मारली..

यथावकाश, पहिला राऊंड, दूसरा राऊंड करत संपीचा नंबर पुण्यातल्या एका चांगल्या गर्ल्स इंजीनीरिंग कॉलेजला लागला.

त्यादिवशी रात्री आई-बाबांचं बोलणं तिच्या कानांवर पडलं. आई म्हणत होती,

काटकसर आता अजून वाढवावी लागेल. पुण्यात इंजीनीरिंग म्हणजे खायची गोष्ट नाही.

हम्म.. खरं आहे. होईल सगळं ठीक. तू काही काळजी करू नको.

नाही हो काळजी नाही.. संपीचं भलं होतंय. आनंदच आहे मला.

संपीला आपले खांदे आता अचानक जड वाटायला लागले. जबाबदारीची एक प्रचंड जाणीव झाली..

ती जाणीव सोबत घेऊनच ती आता पुण्याला जाण्याच्या तयारीला लागली.

मैत्रिणींना भेटणं, कोणाला किती पडले, कोणाचं अॅडमिशन कुठे झालं इ.इ. हेही सुरूच होतं. मधुला दुसर्‍याच एका शहरातलं कॉलेज मिळालं होतं. दिशा मुंबईला. जाता जाता अवचट ला COEP मिळालंय हेही वाक्य तिच्या कानांवर पडलं होतं. आणि तो सुद्धा पुण्यात असणार याचीही तिच्या मनाने नकळत नोंद केली..  


क्रमश: 


@संजीवनी देशपांडे 

 

टिप्पण्या

लोकप्रिय पोस्ट