संपी निघाली पुण्याला.. (१०)





 

समोर टाकलेले चार ड्रेस.. आईची त्या दुकानदाराशी चालू असलेली हुज्जत.. संपीची वरच्या शेल्फमधल्या दुसर्‍याच कुठल्या तरी ड्रेस वर खिळलेली नजर.. या सगळ्यात काहीतरी फिस्कटलं आणि  राहुद्या, आम्ही दुसर्‍या दुकानात बघतो, चल गं संपे.. म्हणून आई जायला निघाली. आणि त्या ड्रेसवरची नजर वळवून संपीलाही तिथून निघावं लागलं. असं दोन-तीन दुकानात घडल्यावर चौथ्या दुकानात शरमून संपी दिसेल त्या ड्रेसला हो म्हणाली. आईचं असं हुज्जत घालणं तिला अजिबातच आवडत नव्हतं. सगळ्यात शेवटी, घे तो तुला आवडलाय ना.. असं म्हणून संपीची नजर ज्या ड्रेसवर खिळलेली होती त्याकडे बोट दाखवून संपीच्या आईने तिला यावेळी आश्चर्याचा धक्काच दिला. संपी खुश! अजून अशीच बरीचशी खरेदी करून संपी आणि तिची आई घरी परतल्या तेव्हा घड्याळात चार वाजले होते. रविवारची दुपार. संपीची पुण्याला जाण्याची तयारी जोरात सुरू होती. त्या दोघी आल्या तसा आज संपीच्या बाबांनी चहा बनवला. तो घेत घेत मग संपीच्या जाण्याविषयी, कॉलेजविषयी, हॉस्टलविषयी चर्चा सुरू झाल्या. हॉस्टेल मधल्या मुली कशा असू शकतात इथपासून तू जपून कसं रहायला हवंस इथपर्यंत बरेच सल्ले मग तिला दिले गेले. ती हो, हो म्हणून सगळ्यांचं ऐकून घेत असते. आप्पांनी त्यातच त्यांच्या तरुणपणी ते एकदा पुण्याला कसे गेले होते, तेव्हाचं पुणे कसं होतं, शनिवार वाडा किती मोठा आहे इ.इ. स्मरणरंजनही करून घेतलं.

संपीची उत्सुकता आता शिगेला पोचलेली होती. अॅडमिशनच्या वेळेस ती कॉलेज आणि हॉस्टेल तसं पाहून आली होती. ते सगळं तिच्या डोळ्यांना नवं असलेलं चकचकीत वातावरण पाहून दीपलीही होती. आता तिथे रहायलाच जायचं म्हणजे मधूनच तिला भितीही वाटत होती. कॉलेज कसं असेल, तिथल्या मैत्रिणी कशा असतील, आईला सोडून राहणं आपल्याला जमेल का एक ना अनेक प्रश्न पोटात गोळा आणायचे. 

पेस्ट, साबणा पासून चिवडा-लाडू पर्यन्त सगळ्या सामानाने संपीची बॅग भरगच्च भरली. ती जायच्या दिवशी नमिचेही डोळे नाही म्हणता ओले झाले. भरल्या डोळ्यांनी आणि जड मनाने संपीने सगळ्यांचा निरोप घेतला आणि बाबांसोबत जायला निघाली. स्वप्नांनी भरलेलं नवं जग आता तिची वाट पाहत होतं.

सकाळी-सकाळी ती आणि तिचे बाबा पुण्यात पोचले. ते मोठाले रस्ते, रिक्षावाल्यांची चढाओढ, अजून जांभई देत असलेली रहदारी, मोठ्या इमारती. सगळं पाहण्यात संपी दंग होती. त्यादिवशी मग कॉलेजमधल्या जुजबी गोष्टी निकाली लावून आणि संपीला हॉस्टेलवर सोडून तिचे बाबा संध्याकाळी जायला निघाले तेव्हा संपीची नजर कावरी-बावरी झाली होती. कधीच कोणाला सोडून न राहिलेली ती आता अंगावर आलेल्या त्या जाणीवेने काहीवेळ मलूल झाली. बाबांचा निरोप घेऊन तिच्या रूममध्ये ती परतली तेव्हा तिथे आणखी दोघीजणी तिला दिसल्या. ती आधीच दिवसभर तिथल्या मुली पाहून चाट पडली होती. आईगं! किती छोटे कपडे! म्हणून काहीवेळा स्वत:चीच नजर तिने दुसरीकडे वळवली. तिचा ओढणीसकट घातलेला पंजाबी ड्रेस तिला तिथल्या वातावरणात नऊवारी साडीसारखा वाटायला लागला.

ती रूम मध्ये आली. त्या दोघी हिच्याकडेच पाहत होत्या. त्यांच्याशी काही न बोलताच संपी तिच्या बॅग मधलं सामान काढून तिच्या रोब मध्ये लावायला लागली. एक काहीतरी काढायचं, चार गोष्टी खाली पाडायच्या असा सगळा संपीचा नेहमीचा वेंधळेपणा सुरू होता. शेवटी मग त्या दोघींमधली एकजण उठली आणि संपीला म्हणाली,

हाय, मी मीनल. फर्स्ट इयर. कम्प्युटर ब्रांच.

हातातल्या सामानानिशी संपीने तिच्याकडे पाहिलं आणि हसत तीही हाय म्हणाली,

मी संपी.. म्हणजे संपदा जोशी, इलेक्ट्रॉनिक्स अँड telecommunications, फर्स्ट इयर.

वॉव.. म्हणजे तू पण फर्स्ट इयर. भारी. मीनल आनंदाने म्हणाली.

त्या दोघींमध्ये तिसरीचा आवाज आला,

आणि मी जिया.. सेकंड इयर. E&tc. तुमची सीनियर!!

दोघींनी तिच्याकडे पाहिलं. आणि क्षणभर सीरियस झाल्या.

त्यांच्याकडे पाहत एमजी हसून जिया म्हणाली,

डोन्ट वरी.. मी रॅगिंग घेणार नाहीये तुमची

आणि मग तिघी एकमेकींकडे पाहून हसू लागल्या. त्यानंतर मग मेस मध्ये तिघींनी रात्री एकत्रच जेवण केलं. संपीला नाही म्हटलं तरी घरच्या जेवणाची आठवण आली पण तिथल्या त्या वातावरणात ती ते विसरून गेली. मीनल मुळची महाराष्ट्रियन असली तरी वाढली दुसर्‍या राज्यात होती आणि आता इंजीनीरिंग साठी पुण्यात आलेली होती. तिचं मराठी त्यामुळे बरंचस हिन्दी मिश्रित होतं. आणि वागायला-बोलायलाही ती एकदम बिनधास्त. अगदी संपीच्या उलट. जिया महाराष्ट्रियन असली तरी थोडी तिच्या-तिच्यात असायची. ती सीनियर असल्यामुळे असेल पण मीनल आणि संपीची थोडी जास्त गट्टी जमली. मीनल संपीच्या सगळ्या वेंधळेपणावर यथेच्छ हसून घेत होती. तिने हे असं संपी सारखं रत्न याआधी पाहिलेलंच नव्हतं. आता एकूण धमाल येणार हे मात्र ती ओळखून गेली.

दुसर्‍या दिवशी दोघी मिळूनच कॉलेजमध्ये आल्या. आज पहिला दिवस होता. योगायोगाने त्या दोघींची डिविजन एकच होती. पहिल्या वर्षी सगळ्या ब्रांचचे विद्यार्थी एकत्रच शिकतात आणि दुसर्‍या वर्षापासून आपापल्या ब्रांचमध्ये जातात हे संपीला त्यादिवशी नव्यानेच समजलं. भलमोठं कॉलेज, तिथला स्टाफ संपी आ वासून सारं पाहत होती. वर्ग गच्च भरलेला होता. खुपशा पुणेरी, काही इतर जिल्ह्यांमधल्या, काही थेट दुसर्‍या राज्यांमधल्या मुली दिसत होत्या. प्रोफेसर्स पण एकदम अस्खलित इंग्लिश बोलणारे. मुलींमध्ये मराठी पेक्षा जास्त हिन्दी आणि इंग्लिशच जास्त ऐकायला येत होतं. संपीला थोडं दडपण आलं. पण मीनल सोबत असल्याने ती थोडी relaxed होती. पूर्ण दिवस मग कॉलेजची, विषयांची, इंजीनीरिंगची ओळख करून घेण्यात गेला. मीनल आणि संपीने लायब्ररी लाही धावती भेट दिली. आणि सगळ्यात शेवटी मीनलने संपीला नेलं ते कॉलेजच्या नेटलॅब मध्ये. संपी घाबरत होती. पण मीनलने नेलंच तिला ओढत. तिने सराईतासारखे दोन पीसी ऑन केले आणि संपीची ऑर्कूट नावाच्या जादुई दुंनियेशी ओळख करून दिली. त्याबद्दल थोडंफार ऐकून असली तरी संपीने आजवर ते पाहिलं नव्हतं. तिला ते खूप भारी वाटलं. मीनलने संपीला तिचं अकाऊंट काढायला लावलं. संपीला त्यावर तिच्या आधीच्या वर्गातले, शाळेतले असे बरेचजण दिसायला लागले. तिने हळूच अवचटची प्रोफाइल काढून पाहिली. भारीच होती.

दुसराही दिवस कमी-अधिक फरकाने असाच गेला. अजून एक-दोघींशी त्यांची बरी ओळख झाली. कॉलेज संपल्यावर पुन्हा त्या कालच्या सारख्या नेटलॅब कडे धावल्या. ऑर्कूट उघडलं. संपीला बरेच नवीन scraps आलेले होते. त्यातला एक होता चक्क अवचटचा..!

तो पाहून संपीची धडधड उगाच वाढली. त्यातलं ‘hey, wassup..’ हे एवढंच संपीने दहावेळा तरी पुन्हा पुन्हा वाचलं. आणि बराच विचार करून मग I’m fine.. what about you?’ असा रीप्लाय केला.

प्रचंड एक्साइट होऊन त्यादिवशी ती हॉस्टेलवर परतली..

 

 

क्रमश:

 

@संजीवनी देशपांडे 

 

टिप्पण्या

लोकप्रिय पोस्ट