संपीचं हॉस्टेल.. (११)






बहावा.. नीलमोहर.. बॉटलब्रश.. गुलमोहर तर जागोजागी उभा.. संपीच्या कॉलेज आणि हॉस्टेलचा परिसर हा असा रम्य होता. हॉस्टेलच्या बाहेर तर बाहेर येण्यासाठीच्या रस्त्यावर दुतर्फा झाडी होतीच. पण रस्त्याच्या दोन्ही बाजूला पूर्ण रस्ताभर कोणीतरी मोगर्‍याची झाडं लावलेली होती. उन्हाळ्यात ही फुलतील तेव्हा इथे रात्रीची शतपावली करायला काय मजा येईल, संपीच्या मनात विचार येऊन गेला. ही अशी इतकी हिरवळ, नवी-नवी झाडं, तर्‍हेतर्‍हेचे सुगंध आणि ओळखी-अनोळखी पक्षांचा सततचा किलबिलाट तिला त्या परिसराच्या आणि हॉस्टेलच्याही पुन्हा-पुन्हा प्रेमात पाडत होता. तिच्या आवडीचाच सगळा प्रकार होता. हॉस्टेलही मोठं. मराठी मुली तिथे नव्हत्या असं नाही पण जास्त करून सगळ्या परराज्यांमधल्या. त्यांचा पोशाख, राहणीमान, बोलणं-वागणं हे सारं संपी साठी इतकं नवीन होतं की सुरूवातीचे दिवस ती फक्त सारं न्याहाळत होती. बोलणं तसं फक्त मीनल आणि जिया सोबत.

तिथल्या सिनियर्स सोबत बोलताना तिला फार म्हणजे फारच अवघडल्या सारखं व्हायचं. एकतर त्यांचा तो बिनधास्तपणा, हिन्दी बोलणं संपीच्या अंगावर यायचं. मराठी त्यांना फारसं समजायच नाही. आणि मराठी सोडून हिन्दी-इंग्लिश दैनंदिन आयुष्यात बोलावं इतकं तिचं सफाईदार नव्हतं. तोंड उघडून हशा पिकवण्यापेक्षा गप्प राहिलेलं बरं असा साधारण तिचा विचार. त्यात सीनियर म्हटल्यावर त्यांना दीदी किंवा त्यातल्या त्यात मॉडर्न म्हणजे दी म्हणणं भाग होतं. नाहीतर नाराजी ओढवण ओघाने आलंच. संपीच्या घरी संपिच मोठी. ती कोणाला ताई-दीदी म्हणण्याचा प्रश्न नव्हताच पण तिची लहान बहीण देखील तिला सरळ नावाने बोलायची. त्यामुळे असं एकदम येऊन कोण-कुठल्या अनोळखी पोरींना दीदी वगैरे म्हणणं तिच्या जीवावर यायचं. सवयच नव्हती ना तशी. त्यामुळे बरेच दिवस तिचं अळि-मिळी-गुपचिळीच चालू होतं.

रूममध्ये मात्र धमाल चालायची. हे असं खरंतर आईविना राहणं, घरी कधीच कुठलंच काम न केलेल्या तिच्यासाठी एक दिव्यच होतं. त्यामुळे रोजची साधी-साधी कामं करतानासुद्धा तिची उडणारी धांदल पाहून मीनलची हसता-हसता पुरेवाट व्हायची. पण तिला खरी कमाल वाटली ते संपीचं कपडे धुण पाहून. कपडे धुवायचे म्हणजे काय करायचं हे अजिबातच माहित नसलेल्या संपीने जेव्हा तिच्या-तिच्या पद्धतीने आठवडाभर साचलेले कपडे धुवायला सुरुवात केली तेव्हा तो गजब सोहळा पाहता पाहता मीनलचं हसून पोट दुखायचंच बाकी होतं. कपडे भिजवायचे असतात ही गोष्ट कपड्यांचा गठ्ठा घेऊन बाथरूममध्ये ते धुवायला जाईपर्यन्त तिच्या गावीच नव्हतं. मग जाऊदे म्हणत तिने ते पाण्यात भिजवले. आणि मग एक कपडा घ्यायचा, त्याला साबण लावायचं, तो घासायचा, पिळायचा आणि बाहेर येऊन वाळत घालायचा. या सगळ्या क्रिया प्रत्येक कपड्यासाठी पुन्हा-पुन्हा तिला करताना आणि कपड्यांसोबत स्वत:ही धुवून निघत असताना पाहून मीनल हसून लोळत होती.. तिने मग संपीला कसंबसं समजावून सांगितलं की तू हे सगळे एकदा घासून मग नंतर ते पिळून मग सगळे एकदाच वाळत घालू शकतेस तेव्हा जगातल्या अंतिम सत्याचा साक्षात्कार झाल्यासारखी संपी अरे हे आपल्याला कसं नाही सुचलं म्हणत स्वत:वरचं हसत बसली.

हॉस्टेल मध्ये मेस व्यतिरिक्त सगळ्यांसाठी म्हणून एक छोटंसं कॉमन किचन होतं. कोणाला चहा प्यायचा असेल तर किंवा, मॅगी किंवा खिचडी बनवण्याची तिथे सोय होती. रूममध्ये केटल किंवा गॅस वापरण्यास सक्त मनाई होती. मॅगी हा पदार्थ म्हणजे हॉस्टेल निवासींसाठीच म्हणून लागलेला एक अप्रतिम, अचाट शोध आहे हे ती पहिल्यांदा खाल्ल्यावर संपीच्या लगेच लक्षात आलं. तेव्हापासून दरदिवसा आड तो बनवणं हे नित्यकर्मच झालं जणू. पाणी कसं उकळायचं हेही माहित नसलेल्या संपीला मॅगी बनवणं सुद्धा पुरणपोळि बनवण्या सारखं अवघड वाटायचं. ते काम सहसा मीनलकडेच असायचं. ती एकदा काही कामानिमित्त बाहेर गेली असता संपीला मॅगी खाण्याची हुक्की आली. पण बनवणार कसं? एव्हाना थोडाफार आत्मविश्वास कमावलेल्या तिला त्यात काय इतकं करून तर पाहू असं वाटलं. आणि तिने कॉमन किचन मध्ये जाऊन पातेलंभर पाणी उकळायला ठेवलं. त्यात मसाला टाकून ती त्याला उकळी येण्याची वाट पाहू लागली. तेवढ्यात मॅगी बनवण्यासाठी म्हणून कोणी तरी हिंदीभाषिक सीनियरही तेथे आली. आणि संपीचं होण्याची वाट पाहत थांबली. ती थोडी सीरियस टाइप्स होती. संपीचं पातेलंभर पानी आणि मॅगीचं छोटंसं पॅकेट पाहून ती अतिशय गंभीरपणे म्हणाली,

आप शुअर हो, आपको इतना पानी लगेगा!’

संपी बुचकळ्यात पडली आणि मग उगाच आव आणत,

हां हां.. मुझे पता है मॅगी कैसे बनती है.. म्हणाली.

ती सीनियर संपीला एक विचित्र लुक देऊन मग मासिक चाळत बसली.

इकडे संपीच्या मॅगीचं जे होणार होतं तेच झालं. मॅगीची खीर बनली! संपीला कळेना कितीही गॅस वाढवला तरी भांड्यातल पानी का संपत नाहीये. आपण मेजर घोळ घातलाय हे ती आता कळून चुकली. शेवटी मग गॅस बंद करून तिची खीर घेऊन तिथून जायला निघाली तेव्हा त्या सीनियर ने त्या खीरीकडे आणि संपीकडे पाहिलं. संपीने मग तिच्याकडे न पाहताच तिथून धूम ठोकली. त्यादिवशी तिला स्वयंपाकात प्रमाण नावाची काहीतरी गोष्ट असते हे समजलं.

तिच्या या गमतीशीर वागण्यामुळे हळू-हळू मात्र ती सगळ्या हॉस्टेलमध्ये फेमस आणि वागण्या-बोलण्यातल्या एकूण निरागसतेमुळे सगळ्यांची लाडकीही व्हायला लागली. तिच्यात काहीतरी होतं जे सगळ्यांना आकर्षून घ्यायचं आणि ती त्यांना आपलीशीही वाटायची. संपी आता हळू-हळू तिथे रुळायलाही लागली होती.

हॉस्टेललाइफ जसं तिच्यासाठी नवं होतं तसंच इंजीनीरिंग ही नवीनच होतं. बारावी नंतर इंजीनियर होणं शास्त्रच असल्याने तिने त्याला अॅडमिशन घेतलेलं. आता ते कशाशी खातात हे मात्र जाणून घेणं बाकी होतं.. कॉलेज मध्ये या इंजीनीरिंगशी तिचा आता रोज सामना होत होता.. सामना कसला, कुस्तीच.. 

 

 

क्रमश:

 

संजीवनी देशपांडे

टिप्पण्या

लोकप्रिय पोस्ट