संपी आणि तिचं धमाल जग..१४ (स्वल्पविराम)

 




 

मंदार आणि संपी पहिली ते बारावी एकाच वर्गात होते. त्यामुळे तोंड ओळख अर्थातच होती. पण बोलणं अजिबातच नव्हतं. फोन नंबर एक्सचेंच केल्या पासून आता त्यांचं दिवस-रात्र चॅटिंग सुरू झालं. मंदार हुशार होताच पण विचारी आणि शांतही होता. आणि टॉपर असल्यामुळे सगळ्यांचं अॅट्रॅक्शनही होता. संपीशी बोलणं त्याला आवडायला लागलं होतं. दोघांमध्ये एक बॉन्ड तयार व्हायला लागला होता. प्रेम वगैरे नाव त्याला आत्ताच नको द्यायला. जे होतं ते खूप निखळ होतं. आपली गाडी तिथपर्यन्त पोचणार की नाही याचा अजून त्या दोघांनी विचारही केला नव्हता. संपी आता मोकळेपणाने बोलायलाही लागली होती. तिचा cuteness, जिवंतपणा, खरेपणा त्याला हवाहवासा वाटायचा. आणि त्याचा intellect, विचारीपणा तिला. कॉलेजमधली इतरही सगळीजणं आता मोबाइलवरुन बोलायला लागली होती. मग गेट-टुगेदर वगैरे संकल्पनाही पुढे येऊ लागल्या. जे पुण्यात आहे त्यांनी तरी भेटूया वगैरे. पण, सेमिस्टर संपायला लागलं तसं-तसं सगळे पुन्हा सीरियस व्हायला लागले आणि गेट-टुगेदरचा विषय त्यावेळपुरता तरी बारगळला.

पहिलं सेमिस्टर सुरू झालं म्हणता म्हणताच संपायलाही आलं. Submissions ची घाई गडबड सुरू झाली. याच्या नोट्स ढाप, त्याची फाइल मिळव असे प्रकार सुरू झाले. टॉपर लोकांच्या सगळ्या फाइल्स अप टु डेट असायच्या त्यामुळे ते या काळात भाव खाऊन आणि मजेत आसायचे. तर कॉलेजमध्ये कधीच लक्ष न दिलेले, जेमतेम एटेंडेंस असलेले लोक्स सगळाच आनंद असल्याने निर्धास्त असायचे. पाहू, करू काहीतरी असा एकूण विचार. पण, संपी सारखे मधल्या patch मधले, ज्यांचं थोडंफार पूर्ण, थोडंफार अपूर्ण आहे असे सगळे प्रोफेसर्सच्या मागे-मागे करून हैराण व्हायचे. याची साइन मिळव, त्याचा टेबल पूर्ण कर, readings ढापणे वगैरे गोष्टींना ऊत येण्याचा हा काळ!

रात्र-रात्र जागून संपीने ग्राफिक्स च्या शीट्स पूर्ण केल्या. स्वप्नात पण फ्रंट व्यू, टॉप व्यू, साइड व्यू यायला लागले. घामे-घुम होऊन आणि अर्धा-एक किलो वजन घटवून तिची submissions कशीतरी पार पडली. आणि आता लागले लेखी परीक्षेचे वेध! परीक्षा पंधरा दिवसांवर असताना तिची पीएल सुरू झाली. पहिलीच वेळ असल्याने आणि पहिलीच पीएल असल्याने तिने ती खरंच preparation साठी वापरली. झोप आणि जेवण सोडून इतरवेळी पुर्णपणे अभ्यास. मंदारशी बोलणं सुद्धा बंद!

एव्हाना मॅगी बनवण्यात तिने बर्‍यापैकी प्रगति केली होती. रात्री-अपरात्रि ती बनवणं, रात्री जागणं हे तर नित्याचंच झालेलं. मॅथ्स-1 डोकं खायचा, तर इलेक्ट्रिकल-सिविल डोक्याला मुंग्या आणायचे. तिचं पाठ करोतंत्र ती याही वेळेस अवलंबत होती. पण, यावेळी ती घरी नसून हॉस्टेलवर आहे हे मात्र ती सारखी विसरायची. रात्री एक-दोन वाजता तिचं मोठयाने, स्तोत्र म्हणावी तसं पाठांतर चालू असायचं. आणि मग जिया किंवा मीनल झोपेतून दचकून उठून,

संपे, अगं हळू..म्हणेपर्यंत तिची चांगलीच तंद्री लागलेली असायची.

अशीच पीएल संपली आणि एकदाच्या परीक्षा सुरू झाल्या. शेवटच्या मिनिटापर्यन्त संपी पुस्तकात तोंड खुपसून बसलेली असायची. पेपर आले तसे गेले. ते चांगले गेले की वाईट याचा अंदाज मात्र कोणालाच येत नव्हता. विद्यापीठाची ही पहिलीच परीक्षा, मार्किंग पॅटर्न वगैरे अजून कशाचीच माहिती नसल्याने निकाल लागेपर्यंत आपण नक्की किती दिवे लावलेयत याबद्दल कोणीच ठामपणे काही सांगू शकत नव्हतं. आणि त्याबद्दल आता कोणाला काही पडलेलंही नव्हतं. घरापासून लांब येऊन 4-5 महीने झालेले. बाहेर राहण्याची ही पहिलीच वेळ. प्रत्येकाला आता घरी जाण्याचे वेध लागले होते. संपीपण मग निघाली घरी..

हा संपीचा पहिलाच एकटीने केलेला एसटी प्रवास. जपून राहायचं असतं, कोणाशी फार बोलायचं वगैरे नसतं हे सगळे सल्ले डोक्यात ठेऊन संपी शिवाजीनगर बसस्टँड वर पोचली. तिने आधीच येऊन सकाळी नऊच्या बसचं रिजर्वेशन केलं होतं बरंका! ती पोचली आठ वाजता. पण एकही बस लागलेली तिला दिसली नाही. मग काय ती आणि तिची आणखी एक मैत्रीण दोघी शेजारी असलेल्या कॅंटीन मध्ये जाऊन इडली-सांबार खत बसल्या. निवांत नाश्ता केल्यावर त्या 8.55 ला बसपाशी आल्या. त्यांच्या गावची बस पाहून आत जाऊन बसल्या. हळू-हळू प्रवासी चढले. सव्वा नऊच्या ठोक्याला कंडक्टर आला. आणि त्याने तिकिटं काढायला सुरुवात केली. संपी आणि तिची मैत्रीण आपलं तर रिजर्वेशन आहे म्हणून निवांत बसलेल्या. कंडक्टर जवळ आला आणि त्याने संपीला तिकीट मागितलं.

आमचं रिजर्वेशन आहे.संपी म्हणाली.

बर्‍या आहात ना, या गाडीला एकपण रिजर्वेशन नाही आज.कंडक्टर.

संपी आणि तिची मैत्रीन दोघी आता पडल्या की बुचकळ्यात. त्यांनी मग पावती काढून त्या कंडक्टरला दाखवली. ती पाहताच कंडक्टर मोठयाने हसायला लागला आणि म्हणाला,

अहो ही गाडी तर गेली की पुढे निघून.

हे ऐकून संपीच्या पायांखालची जमीनच सरकली.

अहोपण आम्ही बरोबर नऊ वाजता आलो. अशी कशी लवकर निघून गेली?’ संपी.

नऊ? पावणे-नऊ टाइमिंग आहे तिचं. यावर वाचलं नाही का तुम्ही?’ कंडक्टर.

अरे देवा! संपीने डोक्यालाच हात लावला. तिच्या डोळ्यांत पाणीच यायला लागलं. मग कंडक्टरने त्यांना डेपो ऑफिसरला भेटून पावतीवर सही घेऊन या, तरच प्रवास करता येईल असं सांगितलं.

मग काय संपी आणि तीच्या मैत्रिणीची सवारी निघाली त्या डेपो ऑफिसरला शोधयला. तो काही सापडेना. या पळतायत इकडून तिकडे. सामान एसटी मध्ये. ती कधीही निघण्याच्या तयारीत. आणि यांना पावतीवर सही काही मिळेना. शेवटी एका ठिकाणी दोघी रडवेल्या होऊन थांबल्या. त्यांची ती अवस्था पाहून उनिफोर्म मधल्या एका इसमाने त्यांना काय झालय असं विचारलं. संपीने जवळपास रडत सगळी हकीकत सांगितली. तो इसम मग त्या दोघींना घेऊन बसपाशी आला. कंडक्टरला खाली बोलावलं. आणि त्याच्या समोरच त्याने संपीच्या पावतीवर सही केली. संपीला तेव्हा कळलं की तोच डेपो ऑफिसर होता! दोघीं मग त्यांचे आभार मानून एकदाच्या पुहा बसमध्ये येऊन बसल्या. त्यांच्यासकट खोळंबलेल्या इतर प्रवाशांनीही मग सुटकेचा श्वास घेतला आणि एकदाची संपीची पहिली स्वतंत्र बस सफर सुरू झाली..



(स्वल्प विराम)


संजीवनी देशपांडे 


(संपीची यापुढची गोष्ट काही अवधी नंतर पोस्ट केली जाईल. इथे संपीच्या गोष्टीतला एक टप्पा पूर्ण होतो. यापुढची  तीची वाटचाल, तिच्यात होत जाणारे बदल आणि घडणार्‍या घटना पुढच्या टप्प्यामध्ये.. पुढचा टप्पा हा संपीच्या transformation चा असेल..  भेटूया लवकरच..:) )

टिप्पण्या

vishakhabothe म्हणाले…
खूप छान झाली आहे.पुढील भागांची आतुरतेने वाट पाहू
Sanjeevani म्हणाले…
धन्यवाद :)
अनामित म्हणाले…
कथा कधी सुरु होते क्या?
अनामित म्हणाले…
कथा कधी सुरू होतेय?
Sanjeevani म्हणाले…
दोन-तीन दिवसांनी सुरू करतेय पोस्ट करायला. लिखाण चालू आहे!
अनामित म्हणाले…
धन्यवाद!

लोकप्रिय पोस्ट