सुगंधी चंद्र..




 

चंद्र पाझरतोय वेड्या सारखा. उगवलेली रात्र. आभाळाच्या निळाईत उठून दिसणारा तो पौर्णिम-चंद्र पाहून नजर खाली वळतेय न वळतेय तोवर अति मोहक दरवळ रंध्रांवर पसरला. वळलेली नजर मग आपसूक अंगणातल्या मोगर्‍यावर जाऊन स्थिरावली. ही टप्पोरी फुलं. मातीतून वर आलेला अस्सल खानदानी सुगंध! ताजी, टवटवीत, आत्ताच फुललेली ती फुलं हिर्‍याहूनही अधिक मौल्यवान वाटली. वाटायची कशाला आहेतच मौल्यवान. त्यांच्या ठायी जीवंत, दैवी सुगंध जो आहे!

वर निथळणारा लोभस चंद्रमा आणि पुढ्यात ताजा गंध शिंपणारा मोगरा.. आहा.. ह्या क्षणी माझ्याइतकी श्रीमंत मीच.. मनातला चकोर भरून पावला. कैवल्याचं चांदणं माहित नाही पण आजचं हे सुगंधी चंद्रांगण मात्र कायम मनाच्या कुपीत जपून ठेवावं असं आहे..

 

 

संजीवनी 

 

टिप्पण्या

लोकप्रिय पोस्ट