संपी रिटर्न्स.. (संपी आणि तिचं धामाल जग : भाग १५)

 





संपी घरी येणार म्हणून घरात सगळ्यांचा उत्साह ओसंडून वाहत होता. तिन्हिसांजेला ती पोचली तेव्हा नमीने चक्क नाक न मुरडता तिचं स्वागत केलं आणि पुणे रिटर्न वगैरे असल्यामुळे बराचवेळ तिच्याभोवती पिंगाही घातला. संपीचं तर म्हणजे किती बोलू, किती सांगू आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे किती खाऊ असं झालेलं होतं. हॉस्टेलवर राहिल्याशिवाय घरच्या जेवणाची किम्मत कळत नाही हा शाश्वत नियम ती जगून आली होती. त्यामुळे आल्या-आल्या आईच्या हातचं पाणीही तिला अमृतासारखं वगैरे वाटलं. एरवी दिसेल त्या पदार्थाला नाकं मुरडणारी ती समोर येईल ते आनंदाने खाऊ लागली. अगदी आईच्या पोळ्याही तिला गोड वगैरे वाटायला लागल्या होत्या. मोठ्या शहराचा आवाका मनात नोंदला गेल्यावर आपलं गाव छोटं वाटायला लागतं तसं संपीचंही झालं. हॉस्टेलच्या गमती, कॉलेज मधला अभ्यास, मेस चं जेवण इ. इ. ची वर्णनं तर जाता-येता सतत सगळ्यांसमोर करणं चालूच होतं. नुकतंच कमावलेलं मॅगीचं पाक कौशल्य घरच्यांना दाखवण्याची संधीही तिने सोडली नाही. पण त्यावर यापेक्षा शेवयांची खिचडी जास्त छान लागते ही आईची प्रतिक्रिया ऐकून तुला पामराला या दैवी पदार्थाचं माहात्म्य काय कळणार अशा अर्थाचा तुच्छ लुक संपीने आईला दिला. नमिला मात्र संपीची मॅगी प्रचंड आवडली.

संपीचं मंदार आख्यान सुट्टीत पुन्हा सुरू झालं. पेपर कसे गेले वगैरे तुच्छ गप्पा आता ते मारायचे नाहीत. शाळेतले जुने किस्से revise करणं, त्यांच्यावर हसणं, किंवा या वयात आयुष्य’, स्वप्नं सॉरी ड्रीम्स वगैरेंविषयी बोलण्याची भारी हौस वाटायला लागते, त्याविषयी बोलणं वगैरे चालू असायचं. सोबत तोंडी लावायला संपीचे भन्नाट किस्से आणि वेंधळेपणा असायचाच. यावेळपर्यंत संपीच्या मेसेज बॉक्स मध्ये आणखीही पाच-सहा नावं परमनंट झालेली होती. श्वेता, जाधव, श्रीनिवास, मयूर, निखिल इ.इ. श्रीनिवास born flirting master होता. तो संपीसोबत बोलताना क्लास मधल्या इतर दहा मुलींविषयीचे किस्से आणि कोणाशी कसं फ्लर्ट करायचं याविषयी मजेशीर गप्पा मारायचा. त्याच्या हेतुंबद्दल कधी शंका न वाटल्याने संपीपण मस्त बोलायची. श्वेताला मयूर आवडायचा त्यामुळे ती सतत त्याच्याचविषयी बोलायची. पण, मयूर मात्र सिरियस हंक असल्यामुळे हाय आणि मग ‘wassup’ च्या पलिकडे इछा असूनही फार काही बोलू शकायचाच नाही. हो पण त्याला श्वेता आवडायची नाही हे मात्र त्याच्या बोलण्यावरून संपीला आता समजलेलं होतं. आपण फारच कूल आणि स्मार्ट आहोत असा समज असणारी काही पब्लिक असतेच जिथे तिथे. निखिल त्यापैकि होता. संपी त्याच्याशी बोलणं सहसा टाळायचीच. नाहीतर मग त्याच्या त्या स्मार्टनेस ला काडीचाही भाव न देता वाद घालायची. मग तोच निघून जायचा. संपीचं टेक्स्ट मेसेज टायपिंग स्किलही आता प्रचंड सुधारलं होतं. एकावेळी चार-पाच चट्स चालू ठेवणं म्हणजे बाएं हात का खेल झालेला होता. कधी कधी तर तिच्यासमोर कीपॅडच थकून जायचं पण ती नाही!

सुट्टी सुरू झाली म्हणता म्हणता संपलीही. आणि मग संपीची स्वारी पुन्हा पुणे मुक्कामी येऊन पोचली. आता हॉस्टेल, कॉलेज इ.इ. चं नावीन्य बर्‍यापैकी कमी झालं होतं. जड-जड रेफ्रेन्स बूक्स पण बोरिंग वाटायला लागलेली होती. इंजीनीरिंग पल्याडचं विश्व खुणावू लागलं होतं. याच दरम्यान संपीच्या हातात Dan Brown ची जादुई दुनिया येऊन पडली. द दा विन्सी कोड! बास. इतके दिवस बोकया सातबंडे किंवा फारतर फास्टर फेणे ची मशागत झालेल्या तिच्या वाचिक मनाला एक नवंच विश्व दिसलं. अक्षरश: दिवस रात्र एक करून संपी विन्सी कोड वाचत होती. बेड वर कुठल्या तरी कोनात पालथी नाहीतर सुलथी पडलेली संपी, तिच्या डाव्या-उजव्या बाजूला एक डिक्शनरी, आणि असाच कुठेतरी पडलेला फोन असं चित्र रूममध्ये तिन्ही त्रिकाळ दिसत होतं. एखादा शब्द अडला की डिक्शनरी उघडून त्याचा अर्थ पाहत, विन्सीच्या चित्रांमधले बारकावे शोधत (जणू काही प्रोफेसर Langdon च्या आधी हीच होली ग्रेल शोधून काढणार अशा आविर्भावात) ती अक्षरश: पुस्तकात घुसून ते वाचत होती. कॉलेज करून उरलेला पूर्ण वेळ ती हेच करत होती. आता तिला मेसेजिंग मध्ये पण रस उरला नव्हता. आणि बोललीच तरी ती सगळ्यांशी फक्त विन्सी कोडविषयीच बोलत होती. त्यामुळे तमाम जगाला संपी विन्सी कोड वाचतेय हे ज्ञात झालेलं होतं. मंदारने ते आधीच वाचलेलं असल्यामुळे तो भारी आव आणत बोलायचा. आपल्याला आवडत असलेलं पुस्तक वाचलेल्या व्यक्तीशी बोलण्यात काय अद्वितीय आनंद असतो ते संपीला त्याच्याशी बोलताना जाणवत होतं. भारत-अमेरिका संबंध किंवा साऊथ चायना सी वगैरे गंभीर आणि हॉट विषयांवर चर्चा करत असल्याच्या आविर्भावात ते दोघे सोफी-langdon आणि होली ग्रेल विषयी बोलायचे.

दरम्यान त्यांच्या जुन्या ग्रुपमध्ये गेट-टुगेदरच्या विषयाने पुन्हा तोंड वर काढलं. आणि एकदाचं एका रविवारी दुपारी ते ठरलंही. संपी सध्या विन्सी फिवर मध्ये असल्याने रविवारी ठरलेल्या वेळेच्या तासभर आधी श्वेताचा फोन येईपर्यन्त गेट-टुगेदरला आपल्याला जायचंय हे संपीच्या गावीच नव्हतं. मग झटकन विन्सी विश्वातून बाहेर येत पटकन तयार होऊन संपी निघाली मॉडर्न कॅफे कडे..

तयार वगैरे होण्याच्या संपीच्या concepts अजून बर्‍यापैकी बेसिकच असल्याने कपाट उघडल्यावर अंगावर येणार्‍या पसार्‍यातून हातात आलेला त्यातल्या त्यात बरा असलेला एक ड्रेस अडकवून संपी निघालेली होती. बस मध्ये बसल्यावर तरी तिला एकदा वाटूनच गेलं, पुस्तक घ्यायला हवं होतं का सोबत? बसल्या-बसल्या थोडं वाचून तरी झालं असतं. इतक्यात मेसेज वाजला म्हणून तिने फोनकडे पाहिलं,

येतेयस ना.. मंदार.

आत्ता तिच्या डोक्यात प्रकाश पडला आणि तिला जाणवलं, आपण खरंच सगळ्यांना भेटायला जातोय. पहिल्यांदा. आणि तिथे मंदार पण असणार आहे! तिची धडधड आता उगाच वाढली. काही झालं तरी मेसेजेस मधून बोलणं वेगळं आणि समोरा-समोर भेटणं वेगळं. याच विचारात असताना तिची नजर तिच्या ड्रेस वर गेली. शी दुसरा घालायला हवा होता का! ती स्वत:शीच पुटपुटली.

एवढ्यात तिचा स्टॉप आला. संपी बस मधून उतरली. आणि तिथून पाच-दहा मिंनिटांवर असलेल्या मॉडर्न कॅफे कडे निघाली...



क्रमश: 


@संजीवनी देशपांडे 


(कथा आणि कथेतील सर्व पात्रे काल्पनिक असून त्यांचा वास्तवाशी संबंध नाही. पात्रांची नावं आणि ठिकाणं कोणाशी मिळती-जुळती असतील तर तो निव्वळ योगायोग समजावा.)

*ही कथा आणि 'चाफा' वरील सर्व लिखाणाच्या copyrights चे पूर्ण अधिकार लेखिकेकडे आहेत. परवानगी शिवाय केलेलं कॉपी-पेस्ट किंवा माध्यमांतर किंवा कसल्याही प्रकारचं साहित्य चौर्य आढळून आल्यास संबंधितावर कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल. 

टिप्पण्या

अनामित म्हणाले…
आता पटापट पुढचे भाग येऊद्या!
आवडतेय संपी
Sanjeevani म्हणाले…
dhanyvaad.. prayatn karen :)

लोकप्रिय पोस्ट