संपी आणि मंदार.. (भाग १७)
मावळलेला दिवस,
लखलखणारे दिवे,
रस्त्यावरची वाहनांची वर्दळ, आणि
मंदारच्या स्कूटीवर डबलसीट
बसलेली संपी.. तिला आज जणू आपल्याला पंख फुटलेयत आणि आपण हवेत तरंगतोय असं वाटायला
लागलं होतं.
‘मग, कसं चालूये सेकंड सेमिस्टर?’ मंदारने विचारलं.
‘ते.. चालूये ठीक-ठाक’ संपी उत्तरली.
‘ठीक-ठाक? Why?’
‘अरे म्हणजे, चालूये. खरं सांगू
का मला सध्या dan brown सोडून दुसरं काही दिसतच नाहीये. कसलं भारी
लिहतो तो.. कमालच एकदम.’
‘हाहा.. प्रेमात
पडलीस की काय त्याच्या?’
‘हेहे.. वेरी फनी.
पण तो भारीये. आता त्याची सगळी पुस्तकं वाचून काढणार मी.’
यावर स्कूटी चालवत चालवत डोक्याला हात लाऊन
मंदार म्हणाला[PD1] ,
‘नाई वाच तू..
पण, अधून-मधून थोडं आमच्याशीही बोलत जा.. एकदा गायब झालीस की गायबच होतेस’
‘हो का.. तूच बिझी
असतोस तुझ्या ‘इंटेलेक्चुवल’ फ्रेंड्स मध्ये..’
‘इंटेलेक्चुवल?’
‘हो.. तू एक हुशार
आणि तुझे फ्रेंड्स पण तसेच हुशार वगैरे..’
‘हाहा.. काहीही.
आणि तू हुशार नाहीयेस असं कोणी सांगितलं तुला?’
‘हुशार म्हणजे..
ठीक-ठाक ए मी. तुझ्याइतकं पळत नाही बाबा माझं डोकं..’
इतक्यात मंदारने गाडी साइडला घेत बंद केलेली
पाहून संपी बोलायची थांबली. आणि मग आजूबाजूला पाहत, गाडीवरून उतरुन
स्वत:वरच हसत म्हणाली,
‘अरेच्चा! आलं होय हॉस्टेल
माझं. कळलंच नाही मला.’
मंदार तिच्या त्या धांदलीकडे आणि तिच्याकडे
शांतपणे पाहत होता. क्षणभराने थोडीशी चुळबुळत संपीच म्हणाली,
‘असा काय पाहतोयस
तू..’
‘पाहतोय.. शाळेतली
ती दुरून वेंधळी, गबाळी, अबोल आणि तरीपण खूप सुंदर वाटणारी संपी जवळून कशी दिसते ती..’
तो कमालीचा सिरियस. हे ऐकून संपीची चुळबुळ
आता शिगेलाच पोचली. तिला आतून ते जाम आवडलेलं होतं अर्थात.
‘तुला आठवते शाळेतली
मी?’
‘आठवते का म्हणजे? अगदी क्रिस्टल
क्लियर आठवतेस. कोपर्यात, घोळक्यात बसलेली, आपल्याच विश्वात
गुंग असणारी, पंजाबी ड्रेस मधली तू.. तुझा एक मोरपंखी रंगाचा ड्रेस होता..
खुपवेळा तोच घालायचिस. आवडता होता काय..’
हे ऐकून तर संपी आता चाटच पडली. ‘ह्याचं इतकं लक्ष
होतं आपल्याकडे?? कधी?’ खरंतर मंदार म्हणजे topper होता. सगळ्या
शिक्षकांचा, विद्यार्थ्यांचा फेव्हरेट!
‘हो अरे तो एकदम फेव्हरेट होता माझा. आईशी भांडून घेतला होता.
पण तो ड्रेस मी सोडून बाकी कोणालाच कधीच आवडला नाही.. सगळ्या मैत्रिणी हसायच्या मला.
पण मी कै तो घालायचा सोडला नाही.’ यावर हसत तिने त्याला टाळी द्यायला हात वर केला. तो मात्र
शांत नेहमीप्रमाणे.
वर गेलेला हात खाली घेत संपी म्हणाली,
‘तू हसत वगैरे
नाहीस का रे? सीरियस हंक!’
यावर पुन्हा एक लहानसं स्मित करून तो शांत
झाला. आणि मग तिला प्रतिप्रश्न करत म्हणाला,
‘आणि तू कायम हसतच
असतेस का?’
यावर जरासा विचार करून, आणि आठवून ती
म्हणाली,
‘हो म्हणजे ऑल्मोस्ट..
मी एकतर झोपते.. नाहीतर खाते.. नाहीतर मग हसत असते..’
‘हाहा.. ब्लेस्ड
यू आर..’ मनापासून हसत तो म्हणाला.
‘ब्लेस्ड? का..’
‘अगं म्हणजे..
यू आर सिम्पल.. लायव्ली. नॉट अॅट ऑल कॉम्प्लिकेटेड.. म्हणून म्हणालो.. मी नाहीये असा.
आय’म introvert टाइप्स. खूप विचार करणे, कमी बोलणे वगैरे
गुणधर्म.’
‘हम्म.. पण तेच
भारी वाटतं. कसला composed वाटतोस तू माहितीये.. विचार करून उत्तर देणं वगैरे.. मला
कधी जमेल की..’
‘कशाला जमायला
हवंय. जशी आहेस तशीच खूप भारी आहेस. डोन्ट चेंज!’
यावर संपी त्याच्याकडे पाहत जराशी हसली.
‘चल, उशीर झालाय..
ताई वाट पाहत असेल. निघतो मी. It was Nice to meet you 😊 ’
‘हो.. चालेल..
बाय.. आय मीन सेम हियर..’ संपी स्वत:च्या वेडेपणावर पुन्हा हसली.
तिच्याकडे पाहत हसत त्याने गाडी स्टार्ट केली.
संपी आज रोजच्या पेक्षा जराशी जास्तच हसत
होस्टेलवर आली. मीनल तिचं ते ध्यान पाहतच होती.
‘संपे, क्या हुआ? कुछ ज्यादाही
खुश लग रही है आज.. क्या बात है..’
संपी तिने विचारण्याचीच वाट पाहत होती. तिने
मीनलला लगेच तिच्या गेट-टुगेदरचा पूर्ण वृत्तान्त ऐकवला. श्रीनिवास कशी मजा करत होता, श्वेता कशी वेड्यासारखी
वागत होती, वगैरे वगैरे सगळं. हो पण, मंदारचा उल्लेख मात्र तिने क्वचितच केला.
याने समाधान न होऊन मीनल म्हणाली,
‘बस.. इतनाही? मुझे तो कुछ औरही
लग रहा है..’
‘कुछ और म्हणजे?’
‘तू ही बता.. क्या
हुआ है?’
इतकावेळ कसंतरी पोटात ठेवलेलं मंदार प्रकरण
मग संपीने शेवटी तिला सांगूनच टाकलं. त्याने कसं तिला इथवर सोडलं, काय काय म्हणाला..
सगळं!
‘मुझे पता था..
पहलेसेही.. जैसे तुम दोनो लगे रहते हो ना मोबाइल पे.. पता था मुझे..’ एखादा खजिना सापडावा
अशा आनंदात मीनल बोलत होती. पण, तिच्या बोलण्याचा काही अर्थ न लागून संपी म्हणाली,
‘काय? क्या पता था तुझे?’
‘यही.. की वो पसंद
करता है तुझे..’
‘चल काहीपण..’ संपी ती गोष्ट
नाकारत म्हणाली.
‘तू कुछ भी कह..
लेकीन है तो ऐसाही..’ मीनल मात्र ठामपणे म्हणाली.
संपीला तिचं म्हणणं आतून सुखावत तर होतं.
पण ते खरं मानायला ती अजून तयार नव्हती. याच विचारात मग तिला बेडवर पडलेलं विन्सी कोड
दिसलं. झालं. बाकी सारं विसरत तिने त्याच्यावर पुन्हा उडी मारली आणि त्या विश्वात कधी
हरवून गेली तिचं तिलाही समजलं नाही.
डिक्शनरीत एकेक शब्दाचा अर्थ पाहत पालथं पडून
पुस्तक वाचणार्या संपीकडे पाहून मीनल हसत म्हणाली,
‘क्या होगा इस
लडकी का क्या पता..’ आणि ती स्वत:च्या कामाला लागली.
थोड्यावेळाने संपीच्या फोनने टुन्न केलं.
पुस्तकातलं डोकं काढून तिने फोनकडे पाहिलं,
‘विन्सी वाचत असशील..
हाय सांग तुझ्या Dan ला..
बाय द वे, फेल्ट नाइस टूडे.
असे गेट-टुगेदर्स अरेंज केले पाहिजेत आपण वरचेवर..
यापुढे एक विंकिंग स्मायली..’
मंदारचा मेसेज. तो वाचून संपी हसली. तिला
मीनलचं बोलणं पुन्हा आठवलं. पण लगेच तो विचार
बाजूला सारत,
‘हो खरंच’ असा रीप्लाय टाइप करून ती पुन्हा तिच्या पुस्तकात शिरली. आणि ते हातात घेऊनच कधीतरी गाढ झोपीही गेली..
क्रमश:
संजीवनी देशपांडे
(कथा आणि कथेतील सर्व पात्रे काल्पनिक असून त्यांचा वास्तवाशी संबंध नाही. पात्रांची नावं आणि ठिकाणं कोणाशी मिळती-जुळती असतील तर तो निव्वळ योगायोग समजावा.)
*ही कथा आणि 'चाफा' वरील सर्व लिखाणाच्या copyrights चे पूर्ण अधिकार लेखिकेकडे आहेत. परवानगी शिवाय केलेलं कॉपी-पेस्ट किंवा माध्यमांतर किंवा कसल्याही प्रकारचं साहित्य चौर्य आढळून आल्यास संबंधितावर कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल.
टिप्पण्या