संपी 'क्लियर' झाली.. (भाग १८)
‘संपे उठ.. संपे.. संपदा.. अरे आज कॉलेज नई आना क्या तुझे?’
बेडवर पालथी झोपलेली संपी ढिम्म हलली नाही. तिच्या स्वप्नात ती
अजून विन्सी कोड मध्येच होती. Uniform घालून तयार असलेल्या मीनलने शेवटी तिच्या अंगावरचं पांघरूण खसकन ओढलं आणि
म्हणाली,
‘उठ जा यार चल.. आज शायद रिजल्ट आयेगा.’
रिझल्ट हा शब्द ऐकून मात्र संपी खाड्कन उठून बसली,
‘काय? रिजल्ट? कुठे? कधी?’
‘आज. अभी. उठ. चल. नाही तो फर्स्ट लेक्चर गया..’ मीनल
गडबडीने म्हणाली.
संपी डोळे चोळत उठली. आणि ब्रश कडे धावली. पण पाहते तर रोजच्या
जागी ब्रश काही दिसेना. पिंजरलेले केस खाजवत, अर्धवट झोपेत, मीनलची नजर टाळत ती ब्रश शोधायला
लागली.
‘अरेच्चा.. गेला कुठे हा.. इथेच तर होता. Dan ने गायब
केला वाटतं. हीही’
त्या अति घाईच्या वेळेत आणि अर्धवट झोपेतसुद्धा संपीला असले फालतू
जोक्स crack
करताना पाहून मीनलने डोक्यालाच हात लावला. एवढ्यात तिला संपीच्या बेडवर पडलेल्या
विन्सी कोड मधून टूथब्रशचं डोकं बाहेर डोकावताना दिसलं. संपीने ते काल रात्री चक्क
बूकमार्क म्हणून वापरलं होतं आणि आता साफ विसरून गेली होती.
‘हां.. उसिने गायब कीया है.. वो देख..’ मीनल रागातच
म्हणाली.
‘अरेच्चा! हो रात्री मीच घेतलं होतं..’ संपी हसत दात घासायला पळाली.
दोघी कॉलेज मध्ये पोचतायत तोवर पहिलं लेक्चर अर्थातच सुरू झालेलं
होतं. आणि आज ते चक्क mechanics चं होतं. Mechanics म्हणजे टेंशन हे आता संपीच्या
डोक्यात फिक्स झालेलं. शिकवणार्या प्राध्यापिका बाईही कमालीच्या खडूस होत्या.
मीनलच्या मागे लपून संपी वर्गात शिरली आणि ठरलेला मागचा बेंच पकडून बसली.
रिझल्टच्या बातमीमुळे आज वर्गात लक्ष तसं कोणाचंच नव्हतं. प्रत्येकीच्या मनात नाही
म्हटलं तरी धाकधूक होतीच. पहिलं लेक्चर झालं, दुसरं झालं, तिसरं झालं, recess ही उरकला.
पण रिझल्टचं नामोनिशाण काही कुठे दिसेना. आता आज काही तो लागत नाही म्हणत सगळे बर्यापैकी
निर्धास्त झाले होते. संपी तर शेवटचं लेक्चर बंक करून विन्सी चे राहिलेले शेवटचे
५० पेजेस वाचून काढावे या विचारात होती पण तितक्यात कोणीतरी धावत वर्गात बातमी
घेऊन आलं. ‘रिझल्ट लागलाय!’
झालं. सगळ्यांच्या पोटात नाही म्हटलं तरी गोळा आलाच. इंजीनीरिंगचा
हा पहिला निकाल. नंतर नंतर सेकंड, थर्ड इयर ला ‘अरे आज निकाल आहे. चल आधी एखादी मूवी
टाकून येऊ. कसा लागेल काय माहित.’ वगैरे गेंड्याची कातडी
टाइप्स अॅटीट्यूड बनत जातो. पण पहिल्या सेमिस्टरच्या निकालाची मात्र सगळ्यांनाच
धास्ती आणि उत्सुकताही असते. संपीच्या ग्रुपची अवस्थाही काही वेगळी नव्हती. ती, मीनल, मेघा, प्राजक्ता चौघी
एकमेकांचे हात घट्ट धरून गेल्या रिझल्ट पहायला. लिस्ट मध्ये नाव शोधताना मनाची जी
काही अवस्था होत असते ना तिची तुलना कशाशीच होऊ शकत नाही. प्राण डोळ्यांत आणून
संपीची नजर स्वत:चं नाव शोधत होती.. पण तिच्या आधी ते मीनलला दिसलं.
‘संपे, इधर इधर..’ तिने संपीला
जवळ-जवळ ओढलंच.
संपीने ते पाहिलं. ‘संपदा मिलिंद जोशी..’ आणि पुढे विषयवार पास.. पास..
पास.. दिसत गेल्यावर तिचा जीव भांड्यात पडायला लागला. आणि सगळ्यात शेवटी एकूण ‘पास’ दिसल्यावर तर ती ‘हुश्श..’ असं मनातल्या मनात म्हणालीही.
यथावकाश मीनल आणि प्राजक्ताही संपीप्रमाणेच ‘क्लियर’ होत्या.
मेघाचा मात्र एक backlog आला. तिच्या सांत्वनाखातर चौघी मग बर्याचं
फिरल्या आणि तिला फ्रेश करण्याच्या नादात रग्गड पोटपुजा करत स्वत:च ‘फ्रेश’ झाल्या.
पहिलं सेमिस्टर तरी संपीने सही-सलामत पार केलं होतं. आता तिला थोडाफार कॉन्फिडंस आलेला
होता. मुलांची वाटणारी भीतीही आता कमी झाली होती. समोर मुलं दिसली तर ती मान खाली घालून
किंवा वाट बदलून वगैरे आता जायची नाही.
या काळात तिला अजून एका गोष्टीची प्रथमच जाणीव झाली, ती म्हणजे ‘आपण ‘छान’ वगैरे दिसतो!’. मंदार अधून-मधून हे तिला म्हणायचाच. पण, श्री-मयूर
देखील बर्याचवेळा या गोष्टीचा उल्लेख करायचे. ‘दिसणं’ या गोष्टीविषयी इतके दिवस पुर्णपणे अनभिज्ञ असलेली ती, किंवा आतून कुठेतरी स्वत:लाच अन्डररेट करणारी ती आता ‘आरशात’ पहायला लागली होती. मीनलमुळे नुकतीच तिची ‘पार्लर’ या गोष्टीशी ओळखही झाली होती. त्यामुळे, एकूण राहण्या-वागण्यातला गबाळेपणा काही अंशी कमी झालेला होता. गळयातली ओढणी
जाऊन आता tshirts आले होते. केसांची लांबी कमी झाली होती. कोरलेल्या
भुवयांमुळे टपोरे डोळे आता आणखीच खुलून दिसायला लागले होते.
हे सगळे दृश्य, बाह्य बदल सोडले तर आतूनही ती आता बदलायला लागली होती. विचार करण्याची पद्धत
बदलत होती. चूक-बरोबरच्या संकल्पना बदलत होत्या. आयुष्य नावाची गोष्ट दोन्ही हात पसरून
तिला खुणावत होती. अगणित स्वप्नं, धुंदावणारे दिवस, मैत्रिणींसोबतचा कल्ला, जुन्या मित्र-मैत्रिणीसोबत गप्पा, नवीन विषयांशी होत असलेली ओळख, ऋतू-निसर्ग-भोवताल-माणसं-देश-राजकारण-जग
या सगळ्यांचं नव्याने येऊ लागलेलं भान, ते व्यक्त करण्याची अपार
ओढ, मंदारसोबत होत असलेल्या अभ्यासा बरोबरच अवांतर चर्चा, त्यातून त्याचं वचन आणि आवाका किती मोठाय याची तिला होणारी जाण, आणि परिणामी तिचाही वाढत जाणारा अभ्यास या सार्यात संपी कमालीची बदलत चालली
होती. एक गोष्ट मात्र कायम होती ती म्हणजे तिच्यातला निरागसपणा.. चार-चौघात उठून दिसेल
असा तिचा तो दुर्मिळ दागिना होता आणि तोच सगळ्यांना तिच्याकडे आकर्षितही करायचा.
दिवस भराभर जात होते. अशातच एक दिवस संपी आणि मंदारची अजून एकदा अगदी
न ठरवता भेट झाली. निमित्त होतं रोबोटिक्स workshop चं.. बदललेल्या संपीला प्रथम त्याने ओळखलंच नाही. आणि जेव्हा ओळखलं तेव्हा
तिच्याकडे पाहतच राहिला.. तो दिसताक्षणी संपी उत्फुल्ल हसत त्याला सामोरी गेली तेव्हा
क्षणभर काय बोलायचं ते त्याला सुचलंच नाही..
क्रमश:
@संजीवनी देशपांडे
(कथा आणि कथेतील सर्व पात्रे काल्पनिक असून त्यांचा वास्तवाशी संबंध नाही. पात्रांची नावं आणि ठिकाणं कोणाशी मिळती-जुळती असतील तर तो निव्वळ योगायोग समजावा.)
*ही कथा आणि 'चाफा' वरील सर्व लिखाणाच्या copyrights चे पूर्ण अधिकार लेखिकेकडे आहेत. परवानगी शिवाय केलेलं कॉपी-पेस्ट किंवा माध्यमांतर किंवा कसल्याही प्रकारचं साहित्य चौर्य आढळून आल्यास संबंधितावर कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल.
टिप्पण्या