डायरीतली संपी! (भाग २१)
बापरे! शेवटचं कधी लिहलंय मी यात.. किती दिवस झाले डायरी उघडून! पूर्वी
नेहमी काहीतरी करायचे हिच्यासोबत. आता कमी आय मीन बंदच झालंय. अरे हां.. तेव्हा मोबाइल
नव्हता नाही का माझ्याकडे. आता आहे. आणि अर्धा निम्मा वेळ त्यातच तर जातो. श्रीनिवास
भलतीच मज्जा करत असतो. परवा तर चालू लेक्चर मध्ये त्याचा मेसेज वाचून मोठयाने हसले
मी. सगळे आधीच वेडी समजतात त्यादिवशीपासून ठार वेडी समजतायत. वेडी वरुन आठवलं, मंदार पण वेडी म्हणाला काल मला. आणि
म्हणे, ही इज एन्वी ऑफ
माय madनेस! हाहा.. काहीतरीच बोलतो. भलताच हुशार
आहे बाबा तो. म्हणजे दडपण यावं इतका. मी म्हणते कशाला असावं इतकंही हुशार वगैरे. साधं-सोपं
असावं मस्त. तरी आता कै मी घाबरत नाही त्याच्या त्या औराला. पूर्वी यायचं दडपण. आता
मज्जा येते. जमेची बाजू म्हणजे माझं इंग्लिश फारच सुधारायला लागलंय बाबा त्याच्याशी
बोलून बोलून.. हाहा.
पण ना एक प्रॉब्लेम होतो, त्याच्यापुढे जरा जास्तच गोंधळते मी. आणि त्याला माझा वेडेपणा जरा इतरांपेक्षा
जास्त आणि लवकर कळतो. हसतो नुसता. आजकाल तर चिडवायला पण लागलाय. सारखं काय लग्न अन
प्रेम! प्रेमावरून आठवलं, ती मैत्रेयी
खरंच त्याच्या प्रेमात आहेसं वाटतं. कळतं ते बोलण्या-वागण्या वरुण लगेच. माझ्या वरून
पण कळत असेल का? छे, मी कुठेय त्याच्या प्रेमात. असं काही
नाहीच. आणि मुळात मी लग्नच करणार नाहीये. ठरलंय माझं. बाय द वे, कालचं ते गाणं भारी होतं..
मेधाने काल एक नवीन पुस्तक दिलंय वाचायला. गौरी देशपांडेचं. म्हणजे ऐकलंय
मी त्यांच्याविषयी. पण पुस्तकाला
हात लावावासा वाटत नाहीये अजून. Dan ने जादुच तशी केलीये ना. दुसरं काही वाचावसंच वाटत नाहीये. वाचण्यावरून आठवलं, अरे मी अभ्यास पण करत नाहीये किती दिवस झाले. केला पाहिजे बाबा आता. आत्ता
येईल परीक्षा. Submissions पण. बापरे, बर्याच
files incomplete आहेत यावेळेस. दांडया
पण भलत्याच मारल्यात या सेम मध्ये. लूज पडले काय मी. आणि आळशी पण झालेय जरा. शी बाबा
कपडे धुवायचेत. खूपच साचलेत. कपड्यांवरून आठवलं, काल गम्मतच झाली.
तो मंदार म्हणे, मी जिनी असतो तर माझ्याकडे काय मागितलं असतंस
तू? हाहा.. मी म्हटलं, येऊन माझे कपडे धुवून
दे. बास. बाकी कसलीच इच्छा नाही माझी. देवा, काय हसला तो. वर
मला अशक्य आहेस म्हणाला. त्याच्याशी बोलायला लागलं की वेळ कसा जातो कळत नाही. मला म्हणे, शास्त्रीय संगीत ऐकतेस की नाही? यावर मी काय सांगू त्याला, मला टन टना टन टन टन टारा टाइप्स गाणी आवडतात. अजून हसला असता. ‘हो हो’ म्हटलं मग मी फक्त. शास्त्रीय मधल्या श शीही माझा
दूर दूर तक संबंध नाहीये. झेपतचं नाही राव. बाबा ऐकतात माझे कधी कधी. बाबांवरून आठवलं, आई-बाबा येणारेत पुढच्या आठवड्यात. रूम आवरली पाहिजे बुवा. कपाट तर काय झालंय.
पॅंट सापडली तर टॉप सापडत नाही आणि टॉप सापडला तर ओढणी नाई. परवा
गम्मतचं झाली. आधीच उशीर झालेला. मग हाताला येईल ते जरा कलर्स मॅच करून घातलं. टॉप
एक, ओढणी वेगळीच आणि पॅंट तिसरीच. कहर म्हणजे, कोणालाच कळलं नाही ते वेगवेगळंय. हाहा. आता मी असंच मिसमॅच करायला मोकळी.
मीनलला कळलं होतं. डोक्याला हात लावला तिने. ती भारी नीटनेटकी राहते बाबा. आणि तिला
सगळं येतं सुद्धा. मागे एकदा न पाहवून तीनेच माझं कपाट आवरून दिलं होतं. जरा गिल्टच
येतं अशावेळी. पण मी काही सुधरत नाही.
मॅथ्सची असाइनमेंट पूर्ण करायचिये. पण कंटाळाच आलाय जरासा. मॅथ्स 2
थोडं अवघडच आहे. आणि mechanics पण. पहिलं सेम सोपं होतं तसं. यावेळी फिज़िक्स पण थोडं
जडच वाटतंय. तो प्रोफेसर घाईच करतो फार. सगळ्या पोरी काय मरतात त्याच्यावर! पर्सनॅलिटी
भारीचे तशी.
शी! मी काहीही लिहतेय.. पण डायरी त्यासाठीच असते ना. ‘काहीही’ लिहण्यासाठी.
मग कशाला विचार करायचा. जसा मनात येईल तसं कागदावर! इतरवेळी लावावेच लागतात ना filters, मनाला, बुद्धीला, जिभेला.. कोणाला
काय वाटेल, याने माझी इमेज काशी दिसेल इ. इ.
मेसेजिंग मध्ये पण विचार करावाच लागतो. मला तर फारच. त्या मंदारशी
बोलताना तर जास्तच. मी बोलते आणि मग माझाच पोपट होतो. डायरी बेस्ट ए. पण खरंच, नाती पण अशीच हवीत ना, फिल्टर्सची गरज नसणारी. एकदम निखळ. तशा नात्यांमध्ये मजाय. आईसोबत असतं तसं
नातं. इथेही आहेच की मीनल, मेधा सोबत. कधी कधी करावा लागतो विचार
पण फार नाही. मंदारसोबतचं नातं काही कळत नाही बुवा. कधी खूप जवळचा वाटतो तर कधी कधी
खूप अनोळखी. आवडतं मला बोलायला पण फिल्टर्स असतातच. हम्म पूर्वीइतके नाही. पूर्वी खूप
असायचे. आता तसं खूप मोकळं वाटतं. पण अर्थात डायरी इतकं नाही. त्या लेवलचा फ्रँकनेस
यायला हवा. येईल का? काय माहित! कदाचित हो, कदाचित नाही.
जाऊदे बाबा, फारच विचार झाला. फार प्रश्न पडायला लागले की नको वाटतं विचार करायला. पुस्तक
वाचावं का? पाहुच काय म्हणणं आहे गौरी बाईंचं! ‘थांग’ म्हणे. वेगळंच नाव ए नाई पुस्तकाचं.
अरेच्चा आधी ते चहाचं भांडं धूतलं पाहिजे. ती मीनल आत्ता येईल. आणि
अजून तसंच पाहून जीव घेईल माझा. पण ठिकाय. ती रोज सकाळी जो फक्कड चहा पाजते ना त्यापुढे
सात खून माफ!
क्रमश:
संजीवनी देशपांडे
टिप्पण्या
माझेच होस्टेल चे दिवस आठवले....
फार छोट्या छोट्या गोष्टी फुलवत नेण्याचं तुमचं कौशल्य आहे. नाहीतर या घटना आपण विसरूनही जातो.....
:-)
पुढचा भाग आज रात्री पोस्ट करतेय.. :)