साडी आणि मिसळ.. (भाग - २६)

 





पीएल, viva, exams..  महिना-दीड महिना संपीने मान मोडेपर्यंत अभ्यास केला. एकदा पुस्तकात घुसली की घुसलीच असा सगळा विषय.

मेच्या किर्र उन्हात, गुलमोहराच्या सुखावह लाल सड्यावरुन हलकेच पाय टाकत शेवटचा पेपर सोडवून ती हॉस्टेलवर परतत होती. उन्हाळा, परीक्षेचा ताण सार्‍यामुळे चेहरा सुकलेला होता पण आता परीक्षा संपल्यामुळे थोडासा निवांतपणाही त्यावर उमटला होता. वाकून गुलमोहराची एक-दोन फुलं तिने उचलून हातात घेतली. तो लाल रंग डोळ्यांत साठवत समोर पाहते तर फूटपाथच्या बाजूला स्कूटी लावून मंदार उभा असलेला तिला दिसला. क्षणभर भास होतोय असंच तिला वाटलं. पण, मग जवळ जायला लागली तशी खात्री होत गेली की तो मंदारच होता, तिचीच वाट पाहत उभा असलेला. तिचा सुकलेला चेहरा क्षणात उजळला.

तू काय करतोयस इथे??’ उत्साहाच्या भरात तिने विचारलं.

शर्ट-टाय-ट्राऊजर मधल्या संपीला तो शांतपणे निरखत होता. तिच्याकडे पाहत गाडीवर बसत, गाडी स्टार्ट करत तो म्हणाला,

सांगतो. तू बस आधी. आपल्याला जायचंय एका ठिकाणी. थोडंस काम आहे.

संपीला काही कळेचना.

अरे पण, कुठे? कसलं काम?’

तू बस गं आधी..

फार विचार न करता मग संपी त्याच्या मागे बसली. मुख्य रस्त्याला लागल्यावर तिने पुन्हा त्याला विचारलं.

सांगशील का आता तरी..

अगं.. आमच्या कॉलेजच्या यावर्षीच्या टेकफेस्ट मध्ये तीन-चार प्रायजेस मिळालेयत मला...

हे ऐकताच त्याचं बोलणं अर्ध्यात तोडून संपी म्हणाली,

वॉव.. भारीच की. आणि काय रे हे आत्ता सांगतोयस तू? फेस्ट होऊन दोन-तीन महीने होत आले आता.

हो म्हणजे, तसा काही विषय नाही निघाला आपल्यात..

पुन्हा त्याचं बोलणं अर्ध्यात तोडत ती म्हणाली,

विषय नाही निघाला म्हणजे? अरे वेड्या मला मिळाले असते तर मी ओरडून सांगितलं असतं जगाला.. त्यासाठी विषय क्रिएट करायलाही कमी केलं नसतं.. हाहा.. काय तू..

यावर तो नेहमीसारखा किंचित हसला फक्त. एक-दोन मिनिटांनी संपीच पुढे म्हणाली,

अरे पण त्याचा आत्ता काय संबंध? कुठे जातोय आपण?’

काही नाही. एक्झॅम संपलीये. रात्री घरी जायला निघतोय. नेक्स्ट वीकमध्ये आईचा वाढदिवस पण आहे. तर विचार असा आहे, की मिळालेल्या प्राइज मनी मध्ये थोडा पॉकेट मनी मिसळून तिच्यासाठी एखादी साडी घ्यावी.. माझे असे हे पहिलेच पैसे आहेत ना.. सो..

ओहह.. भारीये की आयडिया.. मस्त! काकू खुश होतील संपीला त्याचा विचार आवडला,

मग आत्ता काय आपण साडी घ्यायला जातोय?’

हो.. मला त्यातलं काही कळत नाही. म्हणून तुला घेऊन जातोय. मंदार उत्तरला.

हाहा.. कोणाला निवडलयस तू!! मला साड्यांमधलं काहीही कळत नाही!’ संपी मोठयाने हसत म्हणाली.

त्याची कल्पना आहेच. तरी मला एकट्याला जमलं नसतं म्हणून आलो तुझ्याकडे..

ठिके रे.. पाहू आपण. काही काळजी करू नकोस.. संपी है तो सब पॉसिबल है.. संपीने उगाच कॉलर उडवली.

यावर जरासं हसत मंदारने नेहमीसारखी महितीय! अशा अर्थाने मान हलवली.  

 

एका भल्यामोठ्या साड्यांच्या दुकानात दोघेही येऊन पोचले.

कशा साड्या आवडतात काकूंना?’ संपीने मंदारला विचारलं.

यावर मंदारने जरासा विचार केला.

साध्याच आवडतात तिला.. म्हणजे तशाच नेसते तरी.

आणि रंग कुठला आवडतो?’ संपीने पुढे विचारलं.

रंग?..’ मंदारने पुन्हा क्षणभर विचार केला. आणि त्याच्या लक्षात आलं आपल्याला माहितीच नाही आईला कुठला रंग आवडतो ते.. त्याने तसं संपीला सांगून टाकलं.

दोघेही मग साड्या पहायला लागले. असे कॉलेज गोइंग मुलं-मुली सोबत दिसले की सगळे उगाच संशयाने पाहू लागतात. दुकानातल्या सेल्समनचंही तेच चालू होतं.

संपीने चार-दोन साड्या पाहिल्या. सगळ्या जुनाट वळणाच्या. तिने मग लेटेस्ट कलेक्शन त्यांना दाखवायला लावलं.

, अगं, आई नाही नेसत अशा साड्या.. मंदार गडबडीने म्हणाला.

तू गप्प बस.. तुला साधं त्यांना कुठला रंग आवडतो तेही माहित नाहीये..

संपीने मग मंदारच्या बजेटमध्ये बसेल अशी एक मस्त अबोली रंगाची सुपरनेटची साडी निवडली. त्यावर नाजुक embroidery वर्क केलेलं होतं..

हम्म.. ही घेऊन टाक. मस्त दिसेल तुझ्या आईवर.. संपी मंदारकडे पाहत म्हणाली.

संपदा, मला नाही वाटत आई अशी साडी नेसेल..

तू देऊन तरी बघ.. आधीच काय नाही म्हणतोयस! संपी ठामपणे म्हणाली.

तिच्या आग्रहस्तव मग मंदारने ती साडी विकत घेतली. आणि दोघे दुकानाबाहेर आले.

 

कॉफी?’ मंदारने तिला विचारलं.

फक्त कॉफी? मला जाम भूक लागलीये.. काय खाशील विचार. संपी लगोलग म्हणाली.

हाहा.. ओके.. काय खाशील तू संपदा.. तो हसत म्हणाला.

मिसळ.. मिसळेची भूक लागलीए मला.. डोळे मिचकावत ती म्हणाली.

 

मिसळ यायची वाट पाहत दोघे टेबलवर बसले होते. मंदारने Sack मधून एक पुस्तक काढलं आणि संपदा समोर ठेवलं. ते नवं-कोरं dan brown चं पुस्तक पाहून संपी जाम excite झाली. ती ते हातात घेऊन पाहतेय तोवर मंदार म्हणाला,

तुझ्यासाठी..

संपीला ते त्याचं वाटलं होतं. पण, तुझ्यासाठी असं ऐकल्यावर ती नाही म्हटलं तरी जराशी अवघडली. असं कोणाकडून काही गिफ्ट घ्यायची तिला एकतर सवय नव्हती. पण दुसर्‍या क्षणी तिला खूप छानही वाटलं.

तू हे माझ्यासाठी घेतलंयस?’ कुतुहलाने पुस्तक चाळत तिने विचारलं.

हो.. तो शांतपणे म्हणाला.

पुस्तकावरची नजर त्याच्यावर स्थिरावत ती त्याला,

थॅंक यू.. म्हणाली.

तिच्या चेहर्‍यावरचा आनंद पाहत तो, मोस्ट वेल्कम म्हणाला. आणि दोघेही क्षणभर एकमेकांकडे पाहत राहिले.

आणि तितक्यात टेबलवर मिसळ अवतरली.

गरमा-गरम मिसळ पाहून संपीने तिच्यावर ताव मारायला सुरुवात केली.

मग तू कधी जातेयस घरी?’ मंदारने खात-खात तिला विचारलं.

मी? उद्या जाईन रात्री.. मिसळवरची नजरही न हलवता संपी म्हणाली.

अच्छा.. भेटू मग.. घरी बोलावशील ना मला.. मंदार शांतपणे म्हणाला.

यावर धक्का लागल्यासारखी संपी त्याच्याकडे पहायला लागली..

घरी?? मी विचार नाही केला असा कधी.. आई काय विचार करेल!..

हाहा.. चिल गम्मत करतोय मी. आय नो, आपल्या गावात इतकं मोकळं वातावरण नाहीये..

यावर मग संपी काहीच म्हणाली नाही.

मेसेजिंग चालू राहीलच ना आपलं.. मिसळ संपवत संपी उत्तरली.

 

नंतर मग मस्त कॉफी पिऊन आणि बिलाचं संपीच्या आग्रहास्तव टीटीएमएम करून दोघेही आपआपल्या हॉस्टलवर परतले..


क्रमश: 


संजीवनी देशपांडे 


टिप्पण्या

अनामित म्हणाले…
गोष्ट वर्तमान काळात (संपीच्या) चालली तर जास्त मजा येईल वाचायला. ( हे मा वै म ) .
पुढील भाग लवकर येऊ देत. :)
कुसुमिता म्हणाले…
Mast.. As always.. Sampi wachayala khup maja yetey
अनामित म्हणाले…
Waiting for the next part...
Tanuja म्हणाले…
khup chhan chalu ahe Sampichi katha! It will be quite interesting to know how she becomes serious and professional after 4 years of Engineering....
अनामित म्हणाले…
छान चालली आहे कथा:)
पुढील भागाच्या प्रतिक्षेत...
Sanjeevani म्हणाले…
कथा रोचक करण्याचा प्रयत्न आहे.
प्रतिसादासाठी आभार :)
Sanjeevani म्हणाले…
Thank you.. let’s see how the story unfolds :)

लोकप्रिय पोस्ट