संपी, मंदार आणि नमि.. (भाग ३०)



नमे, चल मस्त पाणीपुरी खाऊन येऊ..

सगळ्या मैत्रिणींशी यथेच्छ भेटून झालेली संपी आता घरी बसून बोअर व्हायला लागली होती. गेट-टुगेदर होऊनही पाच-सहा दिवस होत आलेले होते. त्यादिवशी खूप धमाल जरी केलेली असली तरी काही गोष्टी मात्र unsolved puzzle सारख्या तिच्या मनात घर करुन होत्या. मंदारचं आजूबाजूला असणं, पाहणं, बोलणं तिला सुखावह वाटत होतं. पण, त्याचवेळी श्री सोबत केलेली बेफिकीर मस्तीही हवीहवीशी वाटत होती. आणि यासगळ्या पलिकडे मयूरविषयी तशा काही फीलिंग्स नसतानाही त्याचं पाहणं’, शांतपणे मनातली गोष्ट बोलून टाकणं, तेही समोरच्याकडून नकरार्थी उत्तर येऊ शकतं हे माहित असताना, हे सगळं तिच्या मनात खोल घर करून गेलं होतं. एखाद्या कडून मनाजोगत्या प्रतिसादाची अपेक्षा नसताना, आपल्या नाजुक भावना त्याच्यासमोर शांतपणे कुठलीही अपेक्षा न ठेवता व्यक्त करता येण्यासाठी एक वेगळ्या लेवलची clarity आपल्या भावनांविषयी, हेतुंविषयी असावी लागते. ती बहुधा मयूरकडे होती. आणि हीच गोष्ट संपीला आकर्षित करत होती. पण, मन पुढे जात नव्हतं. ते कुठेतरी मंदारसाठी तिच्या मनात दाटून येणार्‍या खोल, गहिर्‍या, उत्कट भावनांमध्ये अडकलं होतं. क्षणभर तिच्या मनात प्रश्न येऊन गेला, का आपण इतकी घाई करतोय निष्कर्षापर्यन्त येण्याची? चांगले मित्र आहोत तर तसेच नाही का राहू शकत.. का दरवेळी ‘relationship’ नावाच्या कोंदणात स्वत:ला, इतरांना, फीलिंग्सना घट्ट बसवण्याची धडपड करायची.. why not let our heart wander a little more?’ या विचारासरशी शी फारच विचार करतोय बाबा आपण.. पुरे आता.. म्हणत तिने मनातल्या विचारांसोबत त्या विषयालाही बाजूला झटकल आणि पालथी पडून सिरियल्स पाहणार्‍या नमिला तिने मस्का मारायला घेतला.

आत्ता? अंधार पडलाय बघ बाहेर.. नुसती पोरं असतात तिथे. मी नाई येणार बाबा. हे कै तुझं पुणे नाहीये..

संपीचा प्लान क्षणात धुडकावत ती पुन्हा सिरियल मध्ये घुसली.

सात तर वाजलेयत.. काही कोणी खात नाही आपल्याला.. चल ना..

नमिने टीव्हीकडे पाहत नकरार्थी मान हलवली फक्त. संपी चिडलीच.

नमे.. ह्या असल्या सिरियल्स आणि कधीपासून पहायला लागलीस तू?’

ए गप गं.. ती निशा बघ किती दुष्टय. आज तिचं भांडं फुटणार ए..

संपीने डोक्यालाच हात लावला.

आणि मग सरळ जाऊन टीव्ही बंद करत म्हणाली, खोटं असतं ते! उठ चल.

जाऊदे म्हणत चार दिवसांसाठी आलेल्या आपल्या बहिणीला कशाला दुखवायचं असा विचार करत नमि नाईलाजाने उठली.

 

गावातल्या त्यांच्या ठरलेल्या पाणीपुरीवाल्याकडे दोघी आल्या. गर्दी होती बर्‍यापैकी. पण नमि म्हणाली तसं मुलंच होती सगळी. नमि उगाच अवघडून जात होती आणि बोलतही हळू-हळू होती. संपीने चटकदार पहिली पुरी तोंडात टाकली आणि डोळे मिटून जोरात आहाहा..!!’ म्हणाली. तिच्या त्या बोलण्याने नमि उगाच ओशाळली. आणि हळू आवाजात संपीला म्हणाली,

अगं, हळू ना.. मुलींनी असं मोठयाने बोलायचं नसतं..

तिच्या या वाक्याने पुरी संपीच्या गळ्यातच अडकली आणि तिला ठसकाच लागला.

काय??? मुलींनी काय करायचं नसतं?’

हेच असं नको इतकया मोठयाने हसणं, बोलणं.. वगैरे..

ओये आजीबाई!! कोणी भरलंय हे तुझ्या डोक्यात? काहीही काय बडबडतेयस... मागच्या वेळेस आले होते तेव्हा तर बरी होतीस.

कोणी काही भरवल नाहीये. मलाच असं वाटतं! नमि ठामपणे म्हणाली.

संपी तिच्याकडे पाहतच राहिली. जेमतेम आठवीतली ही आपली बहीण.. आणि हा असा विचार करायला लागलीये?

नमे असं काही नसतं बरं.. काढून टाक असले विचार डोक्यातून

नमि यावर शांतच राहिली.

 

तेवढ्यात संपीच्या फोनने टुन्न केलं.

काय करतेयस?’ मंदारचा मेसेज.

संपी किंचित हसली आणि रीप्लाय केला,

पाणीपुरी खातेय..

अरे वा.. अकेले अकेले का?’

नाही.. नमि आहे ना सोबत..

अच्छा..

ये खायला तू पण..

मी?’

हो..

बघ हां खरंच येईन.

संपीने नमिकडे पाहिलं. आणि तो खरंच आला तर काय गम्मत होईल म्हणत

हो.. येच.. म्हणाली.

त्याचा स्वभाव पाहता या अशा ठिकाणी गावात, त्याचं घर तिथून जवळ असलं तरी तो येईलच याची संपीला खात्री नव्हती. सो फोन पर्स मध्ये ठेवत तिने पुन्हा तिचं लक्ष पाणीपुरीवर केन्द्रित केलं.

दोन-तीन प्लेट पोटात गेल्यावरच तिने मान वर केली.

आणि पाहते तर खरंच समोरून मंदार येताना तिला दिसला. ती गप्पच झाली क्षणभरासाठी.

तो जवळ आला आणि एकदम अचानक एकमेकांसमोर आल्यासारखं भासवत,

अरे संपदा, तू?’ म्हणाला.

नमिच्या भुवया उंचावल्या. तोंडातली पुरी गिळत संपी म्हणाली,

अरे हो.. पाणीपुरी खायला आलेले. तू इकडे?’

मी पण!! तो हसत म्हणाला.

नमिच्या चेहर्‍यावरची प्रश्नचिन्हं वाढायला लागली.

अच्छा..

संपीचं लक्ष नमिकडे गेलं. मग ती तिला उद्देशून म्हणाली,

नमे, अगं हा मंदार.. माझा जुना क्लासमेट.

नमिने मग जिवावर येऊन हसत असल्यासारखं एक जुजबी स्माइल केलं फक्त त्याच्याकडे पाहून..

 

तू मागव ना पाणीपुरी.. संपी मंदारला म्हणाली.

हो..

 

मग त्याची प्लेट येईपर्यंत त्या दोघांच्या वरवरच्या गप्पा नमि खाली मान घालून ऐकत होती. एकतर अंधार पडलेला, आजूबाजूला मुलं-माणसं आणि त्यात आपली बहीण एका मुलाशी गप्पा मारत थंबलीये हे सगळं नमिला पचवायला जरा वेळच लागत होता. घरी गेल्या-गेल्या आईला हे सगळं सांगायचं असं मनातच ठरवत ती गपचूप पाणीपुरी खाऊ लागली.

संपीला मात्र जाम धमाल येत होती.

तेवढ्यात मंदार नमिला म्हणाला,

मग नम्रता, कसा चालुये अभ्यास..

बरा नमि रुक्षपणे म्हणाली.

गणिताला कोणय तुम्हाला? पाटील सर का?’ त्याने पुढे विचारलं.

हो त्याच्याकडे पाहत नमि म्हणाली.

अरे देवा.. आवडीचा विषयपण नावडीचा होतो त्यांच्यामुळे मंदार हसत पुढे म्हणाला,

‘tuition वगैरे लावलीस की नाही मग गणितासाठी?’

आपलया आस्थेच्या विषयाला त्याने हात घातल्यामुळे आता नमि बोलायला लागली,

लावायचिये मला. पण आई म्हणते आठवीपासून काय ट्यूशन लावायची.. कर मुकाट्याने अभ्यास.

अरे काय संपदा, तू सांग ना मग आईला समजाऊन. ते पाटील सर किती 'भारी' शिकवतात माहितीये ना तुला.. मंदार.

हम्म.. सांगते पाणीपुरी खात खात संपी म्हणाली.

 

नमिसाठी आता मंदार अरे बापरे! कॅटेगरीमधून ओके कॅटेगरी मध्ये आलेला होता. त्यामुळे ती फार बोलत नसली तरी घरी गेल्याबरोबर आईला सगळं सांगण्याचा विचार मात्र तिने पुढे ढकलला.

 

थोड्यावेळाने मंदारला बाय करून दोघी घरी परतल्या.

वाटेत नमिच्या अनपेक्षित प्रश्नाने संपीला धक्काच बसला.

बॉयफ्रेंड ए का तो तुझा?’

संपीने आश्चर्याने तिच्याकडे पाहिलं. आणि काय उत्तर द्यायचं या विचारात पडली. आहे की नाही?’ तिने स्वत:लाच विचारलं. आणि मग झटकन तो प्रश्न बाजूला सारत नवाच आणि महत्वाचा प्रश्न तिच्या मनात उमटला आणि ती लगेच नमिला म्हणाली,

तुला काय माहित गं बोयफ्रेंड म्हणजे कोण ते..

माहितीये मला. जो आपल्याला प्रपोज करतो आणि आपण ज्याचं प्रोपोजल अप्रूव करतो तो आपला बॉयफ्रेंड!

नमिच्या अचाट ज्ञानाकडे पाहून संपी स्वत:च चाट पडली.

नमे तुझी शाळा घेतली पाहिजे असं वाटतंय मला आता. काहीतरी भलतंच साठलंय तुझ्या डोक्यात. आणि हो, तो मित्र आहे माझा. बॉयफ्रेंड वगैरे नाही..

 

दोघी मग काही विशेष न बोलता घरी परतल्या..

 

 

क्रमश:

 

संजीवनी देशपांडे 


#marathistory #marathikatha marathi story, marathi katha, sampi ani ticha dhamal jag

 

टिप्पण्या

अनामित म्हणाले…
Pudhil bhag??
Tanuja म्हणाले…
The story flow is going very well. Liked this part also.
अनामित म्हणाले…
पुढील भाग कधी येणार आहे?
Btw मंदार च्या आईला साडी आवडली का?
तनुजा, आभार!
करतेय पोस्ट लवकरच..
साडी आवडली की नाही कळेलच :)
अनामित म्हणाले…
पुढील भाग आलाच नाहीये की मला दिसत नाहीये?
अनामित म्हणाले…
Even I can't see..post kela asel tar ithe comments madhe sanga
संजीवनी देशपांडे म्हणाले…
Not posted yet.. पोस्ट केलेले भाग सगळ्यांना दिसतात.

लोकप्रिय पोस्ट