संपीचे आई-बाबा.. (भाग २३)
दुसर्या दिवशी सकाळी संपी उठली ती आईच्या फोननेच. झोपेतल्याच
विश्वातून आईशी एक-दोन वाक्य बोलल्यावर आईच्या चढलेल्या सुराने ती खाड्कन जागी
झाली आणि आज आई-बाबा भेटायला पुण्यात येणार होते हे तिला आठवलं. रात्री श्वेता आणि
गौरीच्या नादात ती हे साफ विसरून गेली होती.
‘आम्ही सकाळी आत्याकडे पोचलो. तासाभरात तुझ्याकडे येतोय’ असं म्हणून आईने फोन ठेवला.
डोकं खाजवत संपी उठली आणि पटापट अवरायला लागली. दात घासत घासत बेड
स्वच्छ केला. कुठेही कसेही पडलेले कपडे उचलून सरसकट laundry bag मध्ये कोंबले आणि त्यात न बसू शकलेले शेवटी कपाटात. बेसिन मधला भांड्यांचा
पसारा पाहून मात्र तिचं अवसान गळालं. ते घासण्याची तिची टर्न होती आणि रात्री तिने
आळस केला होता. आता झाली की पंचाईत. तिने केविलवाण्या नजरेने मीनलकडे पाहिलं. मीनलने
रागात तिच्याकडे पाहिलं आणि ‘जा तय्यार हो ले..’ म्हणत तिने भांडी साफ करायला घेतली. संपीने खुश होत मग हळूच मागून तिला मिठी
मारत तिच्या गालांचा मुका घेतला. ‘आपण दात घासत होतो’ हे तोवर ती विसरून गेली होती. मग तसच हातात झाडू घेऊन तिने कधी नव्हे इतक्या
sincerely रूम झाडून काढली. आणि बाथरूममध्ये अंघोळीसाठी पळाली.
ती बाहेर येईतो मीनलने रूम लख्ख केली होती.
आई-बाबा येणार म्हणून संपी आता फार excite झाली होती. बाबांनी
पाहिलेलं असलं तरी तिच्या आईने अजून तिचं हॉस्टेल आणि कॉलेज पाहिलेलं नव्हतं. संपीची
लगबग पाहून एव्हाना आजूबाजूच्या रूम्समध्येही तिचे आई-बाबा येणार असल्याची वार्ता पोचली
होती. यथावकाश तेही पोचले. खाऊने भरलेल्या दोन जड बॅगा घेऊन संपीसोबत ते गेट मधून आत
आले. गर्ल्स हॉस्टेल असल्याने तिच्या बाबांना ऑफिस मध्येच बसावं लागलं. आईला मात्र
सगळा परिसर दाखवत संपी तिच्या रूममध्ये घेऊन आली. वाटेत कामवाल्या बाईपासून सीनियर
दीदी लोकांपर्यंत सगळे थांबून संपीच्या आईची चौकशी करत होते. ‘आपकी संपदा बहोतही cute है हां आँटी’ असंही आवर्जून सगळे सांगत होते.
लख्ख आवरलेली रूम पाहून संपीच्या आईने क्षणाचाही विलंब न करता,
‘मीनल, छान ठेवलीयेस रूम. खूप ऐकलंय मी संपीकडून तुझ्याविषयी’ म्हटलं.
यावर नीटनेटकी खोली पाहून आई आपलं कौतुक करेल अशी अपेक्षा ठेऊन असलेल्या
संपीचा चेहराच पडला. पण आपली आई आपल्याला ‘नीट’ ओळखते हेही तिला कळून चुकलं. मग आईशी बर्याच गप्पा, आणलेले पदार्थ चाखून पाहणं इ.इ. तिचं बराच वेळ सुरू होतं. त्यात सतत सगळ्या
मुली आवर्जून येऊन भेटून जात होत्या. ‘संपीच्या आईला’ पाहण्याची सगळ्यांनाच भलती उत्सुकता होती. त्यात हॉस्टलवर असं कोणाच्या घरून
कोणी आलं की उगाच आपलं प्रत्येकाला आपल्याही घरच्यांची आठवण वगैरे यायला लागते तसंही
काहीसं होतं. संपीची आई संपीहून अगदीच निराळी असल्याचं सगळ्यांना जाणवलं. संपी वेंधळी
तर तर तिची आई अगदी नीटनेटकी आणि हुशार. कुठे, कधी, काय बोलायचं कसं वागायचं याचं पुरतं भान असलेली. बोलण्यातूनही त्यांची बुद्धिमत्ता
दिसायची. त्यांच्या वागण्यावरून त्यांनी संपीचा वेडगळपणा आपलासा केलेला जाणवत होताच
पण तिच्यातला innocence ही जपल्याचं दिसत होतं. उगाच ‘हे असं करू नको’, ‘ते तसं करू नको’, किंवा ‘हे काय जीन्स घालायला लागलीस?’ वगैरे टिपिकल तिची आई नव्हती. आईशिवाय संपीचं
पानही हलायचं नाही. आज तर तिला आईला काय दाखवू आणि काय नको असं झालेलं.
आई आणि मीनलचं काहीतरी बोलणं सुरू असताना संपीच्या फोनने टुन्न केलं.
पाहिलं तर मंदारचा मेसेज. संपीच्या आईला संपीचे सगळे मित्रामैत्रिणी ठवूक होते. पूर्वी
झालेल्या गेट-टुगेदर विषयीही तिने आईला सगळं सांगितलं होतं. मंदारही अर्थात त्यांना
माहीत होता. पण आता त्यांची वाढत चाललेली मैत्री, वेगळ्या वळणावर उभं असलेलं नातं, तिच्या मनात नव्यानेच फुलू पाहणार्या भावना या सगळ्या विषयी मात्र काहीही
तिने आईला सांगितलं नव्हतं. सांगू शकतही नव्हती. कितीही मोकळं नातं असलं तरी आई-वडिलांचे
अशा बाबतीत विचार वेगळे असतात. आणि मुलं सगळंच त्यांच्याशी बोलू शकतात असं नाही.
संपीने हळूच मेसेज वाचून घेतला,
‘काय मॅडम, फार फेमस झाला
आहात तुम्ही सध्या!’
संपीला काहीच अर्थ लागेना. समोर आई बसलेली.
तिला नीट बोलताही येत नव्हतं. सो ‘आई आलीये रात्री बोलते’ असं त्याला सांगून
तिने फोन बाजूला ठेऊन दिला. पण डोक्यात विचारांचा किडा मात्र आता वळवळू लागला होता.
इकडे हाहा म्हणता श्वेता-मयूर-संपी प्रकरण
अख्ख्या ग्रुप मध्ये पसरल होतं. मयुरला संपी आवडते ही गोष्टही चांगलीच पसरली. मंदारच्याही
कानांवर हे अर्थात पडलं. आणि त्याला उगाच insecure वाटायला लागलं.
पण तसं दाखवताही येत नव्हतं. संपी मुळात कोणालाही आवडेल अशीच होती. त्यामुळे खरी गोष्ट
काय आहे किंवा संपीचं याबाबतीत म्हणणं काय हे जाणून घ्यावं म्हणून न राहवून त्याने
तिला मेसेज केला होता. पण अशा आलेल्या रीप्लायने तो अजून विचारात पडला.
संपीला मात्र या कशाचाही गंध नव्हता. ती आई-बाबांसोबत
मस्त कॅम्पसमध्ये भटकत होती. सगळं म्हणजे सगळं तिने त्यांना दाखवून घेतलं. तिघांनी
मस्त जेवण वगैरे केलं. दिवस मावळल्यावर आई-बाबांना आत्याकडे सोडून संपी हॉस्टेलवर परतली
तेव्हा प्रचंड थकली होती. बेडवर पडल्या-पडल्या तिचा डोळा लागला.
थोड्यावेळाने फोनच्या रिंगमुळे तिला जाग आली.
पाहते तर मयुरचा कॉल! ती विचारात पडली. तिला कालचं पूर्ण प्रकरण आठवलं. तिने कॉल रेसिव्ह
केला.
‘हॅलो, संपदा..’
‘हॅलो..’
‘हम्म.. झाल्या
प्रकाराबद्दल जो काही त्रास तुला झाला त्याबद्दल सॉरी! तुला त्रास वगैरे देण्याचा माझा
उद्देश नव्हता. मला तू आवडतेस हे खरंय. आणि तुला मी त्या अॅंगलने आवडत नाही हेही मला
माहितीय. सो, लेट्स जस्ट forget इट..’
त्याने अतिशय शांत आवाजात सगळं बोलून टाकलं.
संपीला काय बोलायचं, कसं रियक्ट व्हायचं काहीच कळलं नाही.
गोंधळून ती फक्त ‘ओके’ म्हणाली. आणि
मग ‘ओके देन’ म्हणून मयुरने फोन ठेऊनही दिला.
संपी फोनकडे पाहतचं राहिली. मयुरचं वागणं
तिला क्षणभरासाठी खूप mature वाटलं. आणि त्याच्या ‘फीलिंग्स’ विषयी वाईटही
वाटलं. पुन्हा प्रेम वगैरे गोष्टींविषयीचे विचार तिच्या मनात यायला लागले. त्याबरोबर
तिला दोन गोष्टी आठवल्या. एक म्हणजे काल अर्धवट राहिलेलं गौरीचं पुस्तक आणि दुपारी
मंदारसोबत झालेलं अर्धवट बोलणं. एका हाताने पुस्तक जवळ घेत तिने मंदारला मेसेज टाकला,
‘हाय, काय करतोयस?..’
आणि रीप्लाय ची वाट पाहत पुस्तकात तोंड खुपसलं.
क्रमश:
संजीवनी देशपांडे
टिप्पण्या
Thank you!
As usual ...
Remembering our engineering days...
Egarly waiting for next part...
Posting soon