Result..!! (संपी आणि तिचं धमाल जग : भाग ३२)
शनिवारची दुपार. आदल्या
दिवशी पावसात भिजल्यामुळे आजारी पडलेली संपी सकाळपासून झोपूनच होती. कॉलेजला पण
दांडीच मारली होती तिने. पण बाहेर अचानक वाढलेल्या आवाजाने आणि अॅम्ब्युलेन्स च्या
सायरनने ती जराशी दचकूनच जागी झाली. मीनल कॉलेजला गेलेली होती. डोळे चोळत संपी
रूममधून बाहेर आली. पाहते तर वरांड्यात मुलींची नि हॉस्टेल स्टाफची ही गर्दी जमलेली..
तिला क्षणभर समजलंच नाही काय झालंय. सगळे श्रुतीच्या रूमच्या दिशेने पाहत होते.
भयग्रस्त वातावरण. दोन-तीन मिंटांतच तिच्या कानावर कोणाचं तरी वाक्य आलं,
‘अरे अभ्भि एक घंटा पेहले देखा था मैने उसे कॉलेजसे आते हुए..’
‘हां क्या?’
‘हम्म.. गुमसुम थी.. बिना कुछ बोले ही रूममे चली गयी.. और आधे घंटे बाद तो
उसके रूममेट की चींख सुनाई दी..’
‘असं कसं केलं यार तिने.. किती हसरी होती..’
‘रूम मे कोई नही था क्या?’
‘नही शायद, वो पलक है ऊसकी रूममेट.. कॉलेज से आके
उसने रूम खोला तो सामने श्रुती सीलिंग फॅन से लटकी हुई दिखी.. तबसे सदमे में है..
देख कैसे कोनेमे बैठी है..’
‘क्युं किया लेकीन उसने सूइसाइड?’
‘अरे फर्स्ट येयर इंजीनीरिंग का रिजल्ट आया है आज सुबह.. श्रुती का येयर
डाउन है शायद..’
हे सगळं ऐकून संपी सुन्न झाली. श्रुती तिच्याच वर्गात होती. फार
मैत्री नसली तरी ओळख होतीच. रोज दिसणारा एक चेहरा! तिने सूइसाइड करावं?? का???
संपी प्रचंड अस्वस्थ झाली.. आलेले पोलिस, अॅम्ब्युलेन्स..
त्यांनी नेलेलं तिचं पार्थिव.. संपी दुरून पाहत होती. मृत्यू नावाच्या गोष्टीशी ही
तशी तिची पहिलीच गाठ. आज सकाळीच नाश्ता करताना तिला दिसलेली श्रुती.. आता अशी
निपचित पडली होती. प्रश्नांचं काहूर उठलं संपीच्या मनात..
काही वेळाने मीनल कॉलेजमधून परतली. ही गोष्ट आता सगळीकडे पसरली
होती. तिलाही अर्थात समजलं होतंच. संपीच्या शेजारी जाऊन ती बसली. ती दिसताच संपीने
तिचा हात घट्ट पकडला. दोघींनी एकमेकींकडे पाहिलं पण बोलल्या काहीच नाहीत.
वायडी झालं म्हणून आत्महत्या?? घडला प्रकार संपूर्णपणे कठीण होता पचवायला.
बर्याचवेळाने हळू-हळू संपीला realise झालं की ‘रिजल्ट’ लागलाय.. आपलाही! आज नेमकं कॉलेजला न गेल्याने तिला याचा काही पत्ताच
नव्हता. तिने मीनलकडे पाहिलं आणि म्हणाली,
‘रिजल्ट?’
‘हो..’
‘काय लागला?’ संपी घाबरून विचारत होती.
मीनल क्षणभर काहीच म्हणाली नाही. संपीचं टेंशन वाढायला लागलं.
‘सांग नं..’
‘एक-एक backlog आहे आपल्या
दोघींचाही..’
संपीचा चेहरा पडला. पहिल्या सेम मध्ये ऑल क्लियर झाल्यामुळे ती
दुसर्या सेम मध्ये बरीचशी लूज पडली होती. इतकी वर्षं कधी कुठल्या विषयात फेल होणं
माहितच नसल्याने एक backlog असणंही तिला फार अपमानास्पद वाटलं.
तशाच सुन्न अवस्थेत तिने कधीतरी अंघोळ केली. जात नव्हतं तरी पोटात
काहीतरी ढकललं. तशाच कोरड्या डोळ्यांनी गोळ्या घेतल्या. आणि छताकडे पाहत पडून राहिली.
एकीकडे डोळ्यांसमोर हसणारी श्रुती, दुसरीकडे तिचं पार्थिव.. आणि पुन्हा स्वत:चा रिजल्ट!! विचारांची आवर्तनं डोक्यात
अव्याहत सुरू होती. ती थिजत चाललेली. इतक्यात फोन वाजला. नावही न पाहता संपीने तो उचलला.
‘हॅलो.. काय लागला रिजल्ट? आणि उद्या कुठे भेटायचं?’
आवाजावरून तिच्या लक्षात आलं, मंदार आहे. ती क्षणभर काहीच बोलली नाही.
‘हॅलो.. संपदा..’
‘हॅलो..’
‘अगं बोल नं.. तब्येत ठीक नाही का?’
‘अम्म? हम्म.. एक backlog आहे.’
‘ओह.. कोणता..?'
दुपारपासूनच्या सार्या घटना, रिजल्ट यामुळे बधिर झालेलं मन आणि बुद्धी.. मंदारचा
आवाज आणि बोलणं ऐकून तिला एकदम भरूनच यायला लागलं.. खूप प्रयत्न करूनही तिला रडू थांबवता
आलं नाही.. आणि ती रडायला लागली..
'इट्स ओके.. होतं अगं.. इंजीनीरिंग आहे हे.. इतकं टेंशन नको घेऊस तू..
रडू नकोस संपदा.. इट्स ओके एकच विषय राहिलाय.. तू करशील manage या सेम मध्ये.. डोन्ट क्राय डियर..’ त्याला कळेना हिला कसं समजवायचं..
कसंबसं रडू आवरत मग संपी बोलू लागली,
‘आज सकाळी बोलले होते अरे मी तिच्याशी.. असं कसं म्हणजे? आत्ता आत्ता पर्यन्त होती इथे आणि आता चक्क कुठेच नाही??’ ती पुन्हा रडायला लागली.
या वाक्याचा मात्र मंदारला काही अर्थच लागेना.
‘संपदा, काय झालंय.. कोण नाहीये?’
‘श्रुती.. समोरच्या रूममधली. सूइसाइड केलं तिने दुपारी..’
‘काय???’
‘हो.. yd झालं होतं तिचं.. फॅनला लटकून..’ संपीला पुढचं काही बोलवेचना..
‘ओहह गॉड.. सो sad..’
मंदारही सुन्न झाला.
पण लगेच सावरत तो म्हणाला,
‘वाईट झालं.. पण संपदा तू सावर स्वत:ला.. नको इतका विचार करूस.’
संपदा शांत झाली होती. रडल्यामुळे तिला जरासं शांत वाटायला लागलं होतं.
पण अजून स्फुंदत होतीच.
‘ऐक नं, मी येऊ का भेटायला? थोडा फेरफटका मारला तर बरं वाटेल तुला..’
‘नाही अरे नको.. मला काहीच करावसं वाटत नाहीये..’
‘बरं ठिके.. मग झोपतेस का जराशी..’
‘हो झोपते जरावेळ.. तब्येत पण ठीक नाहीये थोडी..’
‘ओके झोप झोप.. विचार नको करू फार. मी करतो रात्री परत फोन.. आणि वाटल्यास उद्या येतो भेटायला..’
‘ओके.. चालेल.. बाय..’
‘बाय.. tc..’
मंदारशी बोलल्यावर संपीला जरासं हलकं वाटायला लागलं. गोळ्यांनीही सुस्ती
यायला लागली होतीच.. काही वेळातच ती झोपी गेली..
क्रमश:
(पुढचा भाग उद्या!)
संजीवनी देशपांडे
टिप्पण्या
Have to repeat the year during engineering course.
It is sad that students go to such extreme for failing in exam.