दिगंत २.४ : Going with the flow
घरात अनुरागला पाहून आई-बाबा पुरते चकित झाले. पूर्वी त्याचं स्थळ आलं होतं
तेव्हा अर्थात दोघांनी त्याचे फोटोज पाहिलेले होते. एक-दोन मिनिटं विचार केल्यावर
त्यांना, निदान
आईला तरी लख्ख आठवलं, हा राव काकांचा अनुरागच आहे. पण त्याला
आत्ता असं इथे मोमोज खाताना पाहून दोघेही बुचकळ्यात पडले हे मात्र नक्की. त्यांचे
प्रश्नार्थक चेहरे टाळण्याचा मी आटोकाट प्रयत्न केला. पण किती वेळ टाळणार? त्या तिघांना बाहेर सोडून मी चहा करायला म्हणून आत आल्यावर आईने येऊन
गाठलच मला. त्यावेळी मी तिला उडवून लावलं. पण चहा घ्यायला चौघे बाहेर बसल्यावर
बोलणं भाग होतं. अनुराग आणि मी एकमेकांकडे पाहत होतो. काय आणि कसं सांगायचं
दोघांना समजत नव्हतं. शेवटी मग बाबाच म्हणाले,
‘तुमची आधीपासून ओळख आहे का?’
मी न राहवून म्हटलं,
‘नाही.. ते तुम्ही हे स्थळ सुचवलं होतं त्यानंतरच झाली..’
‘म्हणजे तेव्हा तुम्ही भेटला होतात एकमेकांना?’
आईचा प्रश्न.
‘नाही.. म्हणजे हो.. म्हणजे त्याचं असं झालं..’ मी
शब्दांची जुळवाजुळव करत होते पण नेमक्या वेळी ते सुचत मात्र नव्हते.
‘कसं?’ बाबांचा प्रश्न.
मी गप्प.
शेवटी मग अनुरागच बोलायला लागला. त्याने हम्पीमध्ये झालेली भेट, नंतरची ओळख, माझी परीक्षा होईपर्यंत घरी न सांगण्याचा आम्ही घेतलेला निर्णय हे सगळं
सांगून टाकलं.
‘…
आता एक्झॅम झालीये. सो, आम्ही जवळपास तीन
महिन्यांनी आज भेटतोय!’
त्यांच्या मनात भलती शंका येऊ नये म्हणून की काय त्याने हे शेवटचं
वाक्य देखील जोडलं.
आता आई-बाबा प्रचंड गंभीर. आमच्या माना खाली. मला वाटलं होतं आता
भूकंप होणार. आधीच का नाही सांगितलं, लपवून का ठेवलं वगैरे वगैरे..
थोड्यावेळाने बाबा आईला म्हणाले,
‘ते बरोबर आणलेले गुलाबजाम काढ बाहेर. तोंड गोड करा आधी. बर्याच दिवसांनी
काहीतरी आनंदाची गोष्ट घडलीये..’
आणि मग दोघांनी आमच्याकडे पाहिलं. त्यांच्या चेहर्यावरून आनंद
ओसंडून वाहत होता. गंगेत घोडं न्हालं टाइप्स. इतकं खुश त्यांना मी माझं इंजीनीरिंग
झाल्यावरच पाहिलं होतं. त्यानंतर सिविल सर्विसेसची तयारी करायला लागल्यापासूनची
मधली २-३ वर्षं नुसती सतत टेंस्ट गेली होती.
त्यांच्या आनंदात आता अनुराग पण सामील झाला होता. आईने गुलाबजामचा
डबा उघडला. बाबांनी अनुरागला गुलाबजाम दिले. आई मला खाऊ घालायला आली.
‘अगं चहा घेतलाय आत्ताच.. गुलाबजाम काय लगेच. खाईन नंतर’ म्हणत मी डबा घेऊन आत पळाले.
त्यांना वाटलं मी लाजले वगैरे. पण माझी गोची मलाच ठाऊक. खरंतर
मलाही ठाऊक नव्हतंच तसं. नक्की काय बिघडलय. पण काहीतरी मनात सलत मात्र होतं. ही
खरंतर किती आनंदाची गोष्ट होती. अनुरागला नावं ठेवायला जागाच नव्हती. आता तर
आई-बाबा पण खुश होते. मग मलाच का आनंद होत नाहीये मनापासून? पण मग शेवटी पीएमएस मुळे असं
होत असावं म्हणत मी मनाची समजूत घातली. आणि अनुराग मागे म्हणाला होतं तसं ‘प्रवाहासोबत स्वत:ला वाहू द्यायचं’ असं ठरवलं.
बाहेर आले तो बाबा अनुरागला म्हणत होते,
‘मग आता तुझ्या घरी तू सांगणार आहेस की आम्ही बोलणं अपेक्षित आहे?’
‘नाही. त्याची काही आवश्यकता नाही. मी सांगेन घरी. ते अर्थातच खूप खुश
होतील. मी फक्त रियाकडून ग्रीन सिग्नलची वाट पाहत होतो..’
‘आता अजून कसला ग्रीन सिग्नल?’
बाबांनी माझ्याकडे पाहत विचारलं. मी काहीच बोलले नाही. अनुरागच मग
म्हणाला,
‘हेच घरी कधी आणि कसं सांगायचं वगैरे वगैरे..’
हे बोलताना तो माझ्याकडे पाहत होता. ‘बरोबर बोलतोय ना?’ असा प्रश्न त्याच्या डोळ्यांत दिसला. मी किंचित हसून होकारार्थी मान
हलवली. मग मात्र तो मनापासून हसला. मगाचा आई-बाबांच्या चेहर्यावरचा आनंद आता
त्याच्याही चेहर्यावरून ओसंडून वाहू लागला. आणि त्या तिघांकडे पाहून मीही जराशी
आनंदले.
मग बर्याच गप्पा झाल्यावर अनुराग जायला निघाला. त्याला सोडायला
म्हणून मी खाली गेले.
त्याच्या चेहर्यावर किंचित शंका अजूनही दिसत होती. तो घुटमळत
होता. शेवटी मग न राहवून त्याने विचारलं,
‘तू नक्की
तयार आहेस ना?’
आता मी घुटमळले. एका क्षणी वाटलं सांगून
टाकावं जे वाटतंय ते. पण काय वाटतंय याचाच अजून गोंधळ असल्याने शेवटी ‘हो’ म्हणाले.
त्यानंतर तो गेला.
मी वर आले. आईने आधी जरासं रुसल्यासारखं
केलं. का सांगितलं नाहीस? आम्ही किती काळजी करत बसलो होतो वगैरे वगैरे.. आणि मग घरातला
पसारा पाहून वगैरे जरासं शॉर्ट लेक्चर. दुपारी बाहेर जेवायला गेल्यावर अपेक्षित
प्रश्न पडलाच कानांवर,
‘मग एंगेजमेंट
कधी ठरवायची?’
आता मी चिडलेच.
‘माझी आत्ताच
एक खूप महत्वाची परीक्षा झालीये. आल्यापासून एकदातरी त्याविषयी काही बोलावंसं
वाटलंय तुम्हाला? लग्न ही एकमेव अंतिम गोष्ट नाहीये जगातली. इतरही खूप
आहेत. तो अनुराग काय भेटला आज तुम्ही निघालात लगेच मुहूर्त काढायला..’
माझा एकंदरीत सुर पाहून दोघे गप्प बसले.
नंतर फार काही आम्ही बोललो नाही. ते घरी चल म्हणाले. मी नाही म्हणाले. मग दोघे
निघून गेले. आणि मी फ्लॅटवर परतले. आत्ता माझ्यासमोर जरी शांत राहिले असले तरी घरी
जाऊन हे आता अनुरागच्या घरच्यांशी बोलणार हे अध्याहृतच होतं.
माझी आता अकारण चिडचिड व्हायला लागली
होती. उगाच आवरल्या सारखं केलेलं घर मी पुन्हा अस्ताव्यस्त करून ठेवलं. मग भरून
कॉफी बनवली आणि कानांत हेडफोन्स घालून बसून राहिले खिडकीशी.. खूप वेळ..
क्रमश:
संजीवनी देशपांडे
टिप्पण्या