असंच काहीतरी..
संध्याकाळ झाली की मला काहीतरी होतं. कुठेही असले तरी अशा वेळी मनाने एखाद्या
निवांत समुद्रकिनारी जाऊन पोचते. बुडणारा सूर्य दिसू लागतो. पायाखालून सुप्त
आठवणींची वाळू सरकायला लागते. मनाच्या अवस्थेनुसार लाटा एकतर उधाणलेल्या असतात
किंवा मग संथ-शांत वगैरे.. आणि मी त्यावर तरंगत असते. मनातली एरवीची धांदल बाजूला
पडते. इतर गोष्टीतून अंग काढून घेत ते स्वत:पाशी परतून येतं. स्वत:मध्ये रमतं.
गेल्या काही दिवसांपासून ही वेळ खूप हवीहवीशी वाटायला लागलिये.
मागच्या महिन्याभरात मी काही म्हणजे काही लिहिलेलं नाहीये. सुरूवातीला
खूप व्यस्त असल्याने जमलं नाही. आणि नंतर काही गोष्टींमुळे मन कशातच लागत नव्हतं.
त्यात हे लिहिणं-बिहिणं म्हणजे मनाच्या तालावर नाचण्याचा प्रकार आहे निव्वळ. ते
प्रसन्न-उत्फुल्ल असलं की सगळं मस्त जमून येतं पण नसलं की मात्र साधी अ आ इ ई
लिहिणं पण अवघड होऊन बसतं. दिगंत लिहायला घेतली आणि हे सगळं असं घडत गेलं. तिचे
पुढचे भाग लिहायचेत. तुम्ही सगळे वाट पाहताय याची जाणीव आहेच. पण मनासारखं
झाल्याशिवाय पोस्ट करणं माझा पिंड नाही. शिवाय संपीच्या कथेचा शेवटचा टप्पाही
लिखाणाधीन आहे. संपीची ही गोष्ट मी आता पुस्तकरूपात प्रकाशित करावी अशी वाचकमतेही
माझ्यापर्यन्त पोचली. त्यावर विचार चालू आहे.
मनाविरुद्ध गोष्टी घडणं, आपल्या हेतुंचा चुकीचा अर्थ लावला जाणं, चूक नसताना
अपप्रसिद्धी आपल्याच माणसांकडून केली जाणं इ इ तशा दिसायला साध्या पण सामोर्या
जायला खूप कठीण असणार्या, त्यात काय दुर्लक्ष करायचं असा
सल्ला मिळणार्या गोष्टींचा आपण सारेच सामना करत असतो. पोएटिकली आदर्श पण व्यवहारी
मूल्य शून्य असणार्या ‘संवेदनशील’
कॅटेगरीमध्ये मोडत असल्याने थोडा अशा गोष्टींचा जास्तच त्रास होतो. अशावेळी मग काय
करायचं? यावर मनाला divert वगैरे
करण्याचे, दुर्लक्ष करण्याचे बरेच उपाय मीही गेल्या काही
दिवसात योजले. कंसात भन्नाट लिहायचं राहून गेलं. तर या दुर्लक्ष करण्याच्या
टास्कच्या नादात जे अॅक्चुअल्ली करायला हवं ते सोडून इतर सगळं मी केलं.
पहिली गोष्ट केली ती म्हणजे लिहिणं बंद केलं. छे मूड नाही, मी किती दू:खात वगैरे आहे
याची स्वत:लाच हजारवेळा वर्दी देत काहीच लिहिलं नाही. तास अन तास फोनची स्क्रीन
विनाकारण स्क्रोल करत राहिले. दिसत गेलेल्या सगळ्या जाहिराती इमाने इतबारे
पाहिल्या. काहींपासून प्रेरणा घेत खरेदी वगैरे करून पाहण्याच्या विचारही केला. Shopping
is healing सारखी ब्रंडेड पण तितकीच निरुपयोगी वाक्यंही अशावेळी धावून येतात. गावातली
माहितीची चार दुकानं हिंडावी तशा या ठरलेल्या sites पायांखालून
सॉरी बोटांखालून तुडवल्या. तसं सततचंच येणं-जाणं असल्याने कुठे काय कसं मिळतं हे
पाठच झालेलं असतं. पूर्वी कधीतरी भरून ठेवलेली बॅग/कार्ट किंवा
अजून काही पुन्हा एकदा पाहिली. शी हे घ्यायचं होतं मला? असं म्हणत
ती रिकामी केली. यावेळी काहीतरी नवंच/ वेगळंच असं घेऊ म्हणत पूर्वी हजारवेळा पाहिलेल्या गोष्टी पुन्हा न कंटाळत्या
पाहिल्या. एंड ऑफ सीझन किंवा तत्सम कुठलातरी सेल बारा महिने चालूच असतो अशा
ठिकाणी. तोही पुरता पालथा घातला. अरे वा मस्त, आहा काय भरिये म्हणत पुन्हा कार्ट भरून टाकली. पण
सरतेशेवटी याची साइज बरोबर नाही, याचा कलर ठीक नाही, याचे रिव्यूज वाईट आहेत म्हणत काहीच न घेता पुन्हा app क्लोज केलं. आणि शी आपल्याला काहीच म्हणावं तसं भेटत नाही म्हणत पुन्हा
गाडी आपण खरंच किती दु:खात आहोत या ध्रुपदावर येऊन टेकली.
मग आता काय हा प्रश्न पुन्हा दत्त म्हणून उभा. मग धावून आले ऑनलाइन एंटरटेंमेंट प्लाट्फोर्म्स. पण सगळीकडे निराशा. वाचून, ऐकून, पाहून गुळगुळीत झालेले विषय चोहीकडे. शोधून एखादा नावाजण्यासारखा कार्यक्रम भेटणार. पण यावेळी तोही भेटला नाही. मग मोर्चा पुन्हा जुन्या आवडीच्या क्लासिक्स कडे. उदाहरणार्थ, फ्रेंडस वगैरे. चिक्कारवेळा पाहिलेले एपिसोडस पुन्हा पाहिले, पुन्हा पोट दुखेपर्यंत हसले. आणि कंटाळा येईपर्यंत पाहत राहिले. मग अर्थात आला तो कंटाळा. तिथून निघाले ती थेट मास्टरशेफ मध्ये जाऊन धडकले. लेटेस्ट सीझन पाहिलेला नव्हताच. पण त्याआधीचाही सीझन आपण पाहिलेला नाही याची अत्यंत निराशाजनक जाणीव झाली. चूक सुधारत मग लगेच सीझनचा शुभारंभ केला. यावेळी परीक्षक नवे दिसले. आणि स्पर्धक जुने. म्हणजे मागच्या सगळ्या सीझन्समध्ये चमकून गेलेले. त्यामुळे बरेचसे चेहरे ओळखीचे होती. मग त्यांचे ठरलेले मिस्टरी बोक्सेस, प्रेशर टेस्ट्स, सर्विस चल्लेंजेस वगैरे पाहतच गेले. काय एक-एक पदार्थ. त्यांचे ते ब्रोथ्स, stews, raviolis, पास्ता, panacotta, तर्हेतर्हेचे सौसेस पाहण्यात मन रमून गेलं. तशी मी पक्की शाकाहारी. पण तिथे शिजले जाणारे तर्हेतर्हेचे मीट्स पाहून कधी किळस आली नाही. ती आपल्याकडेच येते. कोंबड्या, बकर्या चिरून उलट्या टांगण्याचं घृणा आणणारं कसब केवळ आपल्याकडेच पहायला मिळेल. शिवाय टिवी किंवा फोनवर पाहताना त्यातल्या कशाचा वास येत नाही हाही मुद्दा आहेच. त्यामुळे माझी मास्टरशेफगिरी बरीच रंगली. त्यातल्या काही गोष्टी तशा फार रंजक आणि मजा आणणार्या पण असतात. पदार्थांचे रिव्यूज देताना, दॅट वॉज electrifying, टेर्रिफिक कूकिंग, oozing, melted इन माऊथ वगैरे म्हणणारे परीक्षक वात आणतात. पण भारीही वाटतात. त्यातली challenges पण भन्नाट असतात. एका चॅलेंज नुसार स्पर्धकांना ‘गूयी’ पदार्थ बनवायचे होते. गूयी म्हणजे चीझी, ओघळ येणारे वगैरे असे पदार्थ. आता गम्मत अशी की आपल्या अस्सल भाषेत या गूचा अर्थ भलताच निघतो. म्हणजे बघताना, ऐकताना काय धमाल येत असेल याचा विचार करा. उदाहरणार्थ ‘oh my god, it was so gooyie.. just melted in my mouth’, ‘I just hope, there is enough goo in my dish’ असे शेरे ऐकून एकदम हशा, टाळ्या, फालतू विनोद असा सगळा माहोल. एका एपिसोडमध्ये गेस्ट जज असलेली बाई भारतीय वंशाची होती. आणि तिने स्पर्धकांसाठी आणलेला पदार्थ होता ‘पास्ता नॉट पास्ता’. म्हणजे सोप्या भाषेत तिने चक्क खांडवी/सुरळीची वडी आणली होती. पण modified. ती पास्त्यासारखी सौस मध्ये सुरळी न करता सर्व केलेली होती. सौसे कशाचा तर ओल्या खोबर्याचा. तिथले ते सगळे फॅन्सि पदार्थ बनवणारे शेफ्स, आपली ही सुरळीची वडी बनवता बनवता त्यांच्या नाकी नऊ आले. अशावेळी छ्या! एवढंही येत नाही यांना टाइप्स शेरे मारून मीही आपला स्वत:चा पाक-कौशल्य-इगो शांतवून घेतला :D
या masterशेफ
प्रकरणामुळे दिवस जरासे बरे गेलेले असले तरी मूळ हेतु साध्य झालेलाच नव्हता. पाहणं
झालं की पुन्हा void. आता काय करायचं?. नशीब, दु:ख, अन्याय-बिन्याय
असले जड-जड प्रकार गुळगुळीत करून बरीच आसवं ढाळली पण मन:शांति काही
मिळेना. मग शेवटी लॅपटॉप हातात घेतला आणि खर-खर-खरडलं. वाट्टेल ते. बर्याच
दिवसांनी. आणि काय सांगू प्रचंड हलकं वाटलं. एकदम ताजं-तवानं. आणि मग अर्थात पुन्हा
जाणीव झाली, आपला आनंद, शांतता, zen moment सारं काही इथेच आहे. उगाच भरकटण्यात अर्थ
नाही.
तर आता माझ्या अशा या आडव्या-उभ्या-तिरक्या
मनोभ्रमंती नंतर मी पुन्हा लिहायला सुरुवात केलेली आहे. तेव्हा लवकरच पुढचं सगळं पोस्ट
करत जाईन.. खूप वाट पहायला लावल्याबद्दल सॉरी.
(तुमच्या मनाच्या
अशा blocked अवस्था तुम्ही कशा हॅंडल करता तेही जरूर लिहा 😊)
संजीवनी
टिप्पण्या
Jithe apeksha aahe tithe upeksha aalich.
Jevha aapan konasathi kahi tari job todun aaplya goshti bajula thevun karto tevha tya vyakti kadun aaleli upeksha khupach jivhari lagte.
Mazyasathi to prashna sampat nahi ji paryant me mazi baju dusryala sangat nahi. Me kiti barobar ha konala patvun denyacha uddesh tyat nasto tar mazya vagnyacha chukicha arth lavla jau naye hyachi kalkal aste. He patkan karayla jat nahi especially jevha samorchi vyakti kahi hi aikun ghenyachya manasthiti naste, tya sathi Yogya velechi vat pahayla lagte. Pan mazyasathi te manache blockage nighat nahi jith paryant mazya manatlya bhavna samorchya vyakti paryant pochat nahi.
Jevha aapan sensitive asto tevha ignore vagre karne jamat nahi aani radun fakta bhavnancha tatpurta nichra hoto, te blockage tevhach dur hota jevha samorcha manus aaplya bhavna aani uddesh samajto. Tya sathi bolne aavshyak aahe.
Tumhi khup Chan lihita. Lihit raha. - Gauri
Thank you for sharing your thoughts.
Yes, speaking it out is always a best option. It relieves us a lot..
Thanks 😊