या देवी.. ४
४.
जेमतेम बारावी झालेली पोर. आई लोकांची धुणीभांडी करणारी. वडीलही
असंच काहीतरी. पोरीचं लग्न ठरतं. तिच्याखाली अजून दोघी. एवढे हजार द्यायचे, एवढे कपडे घ्यायचे, एवढ्या माणसांचं जेवण असं लग्न तर ठरतंच. पण सोबत नुसती मुलगी देणं
म्हणजे सात जन्माचं पाप असल्यासारखं किंवा नवर्यामुलासाठी ‘मुलीसोबत
अख्खा संसार फ्री’ अशी जणू चहूकडे स्कीमच निघालीये अशा थाटात
तिला एलईडी टीव्ही पासून केरसुणी पर्यन्त सगळं म्हणजे सगळं दिलं जातं. आई बचतगटाची
कर्जं काढते, वडील व्याजावर पैसे जमवतात. पण आम्ही ही सगळी
हौस करणारच असा थाट! आणि एवढं सगळं करूनही पेंटर जावई लग्नादिवशी उगाच आपलं
करमणूक/प्रथा म्हणून का होईना रूसतोच. बारावी पास नवरी मुलगी पार्लरला वगैरे जाऊन
येते. आधी कधी न पाहिलेले प्रकार आणि पुढेही कदाचित कधीच न दिसू शकणारे, सारं करून घेते. सजते. बैलांचा पोळा दरवर्षी येतो. इथे मात्र एकदाच असतो.
लग्न पार पडतं. पुढचं वर्ष आई-वडिलांचं ठिक-ठिकाणची कर्जं फेडण्यात जातं. हुश्श
म्हणून आता ते पुढच्या लेकीकडे वळणार इतक्यात एके दिवशी लेकीचा रडत फोन येतो. ‘म्हाएराहून शिलाई मिशीन घ्यून ये न्हायतर शेतावर कामाला चल..’ तिच्या सासरच्यांचा निरोप कळतो. शहरात राहिलेली असल्याने शेतावर कामाला
जाणं पोरीला माहित नसतं. फारतर ती धुनी-भांडी करू शकते. पोरीसाठी जीव तुटतो.
दिल्याविना तर इलाज नाही. बाप डोक्याला हात लावतो.
त्याची नजर पुस्तक घेऊन अभ्यास करत बसलेल्या दुसर्या लेकीकडे
जाते.. त्याच्याही नकळत तो तिला विचारतो,
‘व्हय गं चंदे, तुले अभ्यास कराचा की लगीन?’
चंदी वर बघते.
‘अभ्यास कराचा बाबा. दिदीच्या हुंड्यावर घातले तेच्या निम्मेच माझ्यावर
खर्चा. शिकून तेच्या दुप्पट तुमाला कमवून आणून देईन..’
बाप तिच्याकडे पाहतच राहतो..
या देवी सर्वभुतेषू विद्यारूपेण संस्थिता ।
नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नम: ।।
संजीवनी देशपांडे
टिप्पण्या