या देवी.. ६




 

ती आवरून बाहेर पडते. घराबाहेर पाऊल टाकताच तिला तिच्यावर रोखलेल्या डोळ्यांची जाणीव व्हायला लागते. सतत. रस्त्यावर. रिक्शामध्ये. बसस्टॉप. गल्ली. बोळ. हॉटेल्स. ऑफिस. अगदी मंदिरांमध्ये सुद्धा. हे वखवखणारे डोळे चोहीकडे असतात. त्यांना चेहरा असतो का? नसतो. आणि असलाच तरी तो चेहरा पूर्ण समाजाचा असतो. अनोळखी जागा आणि अनोळखी बायका दिसल्या की या नजरा जाग्या होतात. ओळखीच्या ठिकाणी पुन्हा त्या जमिनीकडे पाहत आम्ही किती सभ्य नामक बुरखा धारण करतात. पण रस्त्यावरून चालणार्‍या तिला या डोळ्यांकडे न पाहताही बरोब्बर त्यातला धीटपणा, निलाजरेपणा, नालायकपणा जाणवतोच. काहीजणी मग बुजतात. पटापट पावलं टाकतात. काहीजणींना चीड येते. राग येतो. पण करणार काय किती डोळे झाकणार. ते पावलो-पावली असतातच. काहीवेळा तर उगाच धक्का मारून निघून जाण्याइतके हे निडर होतात. बहुतेक जणी मनातल्या मनात शिव्या घालत चालू लागतात. विनयभंगाची खरी सुरुवात इथून होत असते. कोणी काही करू शकत नाही टाइप निडर आत्मविश्वास त्या डोळ्यांखाली मुरत जातो. आणि मग पुढे पेपरात छापून येणारी कृत्यं घडतात.

आज ती थोडी जास्तच अस्वस्थ होत होती. कारण तिच्यासोबत तिची तेरा-चौदा वर्षांची मुलगीही होती. ज्या नजरा आपण झेलल्या त्या आपल्या मुलीलाही झेलाव्या लागणार या विचारानेच तिच्या अंगाची लाही होते. नवरात्रीचे दिवस. दोघी मंदिरात शिरतात. भरगच्च लाईनमध्ये थांबतात. मुलीला कोणी धक्का तर मारत नाही ना.. ती सतत चाचपणी करत राहते. एवढ्यात सभामंडपातल्या खांबाला टेकून हाताची घडी घालून उभी असलेली एक नजर तिला दिसते. अतिशय निलाजरेपणाने ती तिच्या लेकीकडेच पाहत असते. तिच्या मुठी आवळल्या जातात. दुर्गे दुर्घट भारी.. तुजवीण संसारी.. देवीची आरती सुरू झालेली असते. तिच्या मनात मात्र येऊन जातं, हे असं गप्प बसून आपण मुलीला हे सगळं सहन करायला तर शिकवत नाही आहोत? तिने पुन्हा खांबाकडे पाहते. तीच तशीच नजर. आता तर त्याखाली घाणेरडं हसू पण अवतरलं होतं. तिला विलक्षण चीड येते. ती रांगेतून बाजूला होते. डोळ्यात विखार घेऊन खांबापाशी जाते. आणि चौसष्ठ योगिनींचं बळ अंगात संचारल्यासारखी त्याच्या एक कानशिलात ठेऊन देते.

ऐ.. ती नजर गडबडते.

काय ऐ????’ त्याच्याहून तिप्पट ऊंच आवाजात ति विचारते.

तिचे ते लाल भडक आणि भेदक डोळे पाहून आता तो घाबरतो. आणि मान खाली घालून निघून जातो.

जय देवी जय देवी जय महिषासुरमर्दिनी ।
सुरवरईश्वरवरदे..

आरती आता खर्‍या अर्थाने पुढे जात राहते..!


 

या देवी सर्वभूतेषु शक्ति-रूपेण संस्थिता।

नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः॥ 

 


संजीवनी देशपांडे 

 

टिप्पण्या

लोकप्रिय पोस्ट