या देवी.. ७




 

कशी दिसते अगं ती, हत्ती बरा!

एवढंही नाजूक असणं काय कामाचं बाबा, हवा आली तर उडून जाईल.

काळी कुट्ट.. पांढरी पाल नुसती..

नाक जरासं नकटंच ए नाही?

केस? शेंडी म्हणा..

बायकांनीच बायकांची केलेली ही काही वर्णनं. यातलं बरचसं तिच्या रोज कानांवर पडायचं. घरी. बाहेर. कामाच्या ठिकाणी. किंवा अजून कुठे. कधी स्वत:च्या बाबतीत तर कधी अजून कोणाच्या. दिसायला डावं असणं हे पाप आहे? कितीतरी दिवस तिने स्वत:लाच हा प्रश्न विचारला. उत्तर नाही मिळालं. बर्‍याचवेळा अंगकाठी आपल्या हातात नसते. आणि रूप तर नसतंच. त्यावर मग नसते उपाय करत बसणं आलं. तिनेही ते पूर्वी कधी करून पाहिले होते. पण सुदैवाने तिच्या लवकरच लक्षात आलं, याला अर्थ नाही. आपण जसे आहोत तसेच सुंदर आहोत. आपल्या सौंदर्याची व्याख्या आपण ठरवायची. इतरांच्या फूटपट्टीने स्वत:ला जोखायचं नाही. असतील त्यांच्या लेकी-सुना गोर्‍या-गोमटया, सुबक-ठेंगण्या.. पण मग मीही मी आहे. माझ्यात माझं असं विशेष काही आहेच की. रंग-रूप-बांध्याव्यतिरिक्तही बर्‍याच गोष्टी असतात. आणि त्याच बहुतेकवेळा जगण्यासाठी जास्त गरजेच्या असतात. ज्या दिवशी हे तिच्या लक्षात आलं, त्या दिवशीपासून ती आरशाहून अधिक स्वत:च्या मनात डोकवायला लागली. खरं सौंदर्य तिथेच तर असतं!

आता दिसण्यावरून कोणी काही बोललं तर ती केवळ हसून पाहते त्यांच्याकडे..

तिला कळून चुकलंय, त्यांची मनं कुरूप आहेत!

 

या देवी सर्वभूतेषु तुष्टि-रूपेण संस्थिता।
नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः॥

 

तुष्टि = contentment

 

संजीवनी देशपांडे

 

 

टिप्पण्या

लोकप्रिय पोस्ट