सीमोल्लंघन
सीमोल्लंघन
हा देश सनातन. ही भूमी सनातन. इथली विजिगीषू स्त्री ही सनातन
आहे. जेव्हा पश्चिमेत प्लेटो ‘बायकांना
आत्माच नसतो’
वगैरे थोतांड मांडत होता, त्याच्या कितीतरी आधी आपल्याकडे
जनक राजाच्या सभेत अविवाहित तरुण विदुषी गार्गी, याज्ञवल्क्य
ऋषींशी तत्वज्ञानावर वाद-विवाद करत होती. इतकच नव्हे तर त्या
चर्चेत प्रकांड पंडित समजल्या जाणार्या याज्ञवल्क्य ऋषींना तिने हरवलं देखील होतं.
ही गार्गी जनक राजाच्या सभेतील नवरत्नांपैकी एक होती. हिंदू धर्माची आदिधुरा
असलेला ऋग्वेद.. त्यात जवळपास २७ विद्वान स्त्रियांनी रचलेल्या ऋचा आहेत.
लोपामुद्रा, घोषा, मैत्रेयी, गार्गी शिवाय विवस्वरा, अपाला, सुलभा, लिलावती.. अशा बर्याच विदुषिंचा ऋग्वेदात
उल्लेख आणि योगदान आहे. लोपामुद्रा ही अगस्त्य ऋषींची पत्नी होती. ऋग्वेदात तिच्या
बर्याच ऋचा आहेत. तसेच मैत्रेयी ही याज्ञवल्क्य ऋषींची पत्नी होती. या विदुषी
पतीच्या बरोबरीने विद्वान होत्या. आणि पतीच्या बरोबरीने कामही करत होत्या. आणखी एक
महत्वाची गोष्ट म्हणजे वेदकाळात शिक्षणास सुरुवात करण्याआधी मुलांबरोबर मुलींचाही
उपनयन (मुंज) संस्कार केला जायचा. शिकायचं की लग्न करायचं तेही कोणासोबत करायचं हे
सर्व निर्णय घेण्याचं स्त्रियांना स्वातंत्र्य होतं. ‘छे!
मुलींची कुठे मुंज करतात का?’ वगैरे म्हणणारे एकविसाव्या
शतकातले आपण या प्राचीन हिंदू समाजाच्या मानाने प्रचंड मागासलेले आहोत. स्वत:चं
मूळ विसरणे म्हणजे हे.
गेले आठ दिवस मी रोज एक संक्षिप्त लेख लिहला. त्यात देवीला आराध्य
मानून तिचं चैतन्यमयी रूप असलेल्या स्त्रीची मात्र आपण कशी उठता-बसता कुचंबना करतो
याविषयी लिहलं आहे. आणि त्यातला एकूण एक शब्द दुर्दैवाने खरा आहे. काही स्वागतार्ह
अपवाद जरूर आहेत. पण ते नगण्य. म्हणूनच बहुतेक जणी त्याच्याशी लगेच रिलेट झाल्या.
आजच्या या सीमोल्लंघनाच्या दिवशी आपल्या आताच्या समाजातले हे
विरोधाभास लवकरात लवकर दूर व्हावेत आणि आपण वेदकाळातील समृद्ध, कालातीत ब्रह्मवादिनींची
परंपरा पुनरज्जीवित करून पुढे न्यावी असं वाटतं. त्यासाठी प्रयत्नही स्वत:
स्त्रियांनीच केले पाहिजेत. स्त्रीच्या आयुष्यातील निम्म्याहून अधिक समस्या खुद्द
स्त्रीच दूर करू शकते. स्वामी विवेकानंदांचं एक खूप मार्मिक वाक्य आहे,
Women
will work out their destiny better than men can ever do for them.
All
mischief has come because men undertook to shape the destiny of women.
आपण आपल्या लेकीना चुल नि मूल पल्याडचं जग दाखवायला हवं. हरतर्हेने
त्यांना सक्षम बनवायला हवं. What we think, we become. या ‘think’ वर काम
करायला हवं. स्त्रीचा सर्वात मोठा दुर्गुण म्हणजे असूया. ही असूया दूर व्हायला हवी.
आपल्या लेकी-सुना-मैत्रिणी-वडीलधार्या भगिनी या जर प्रगती करत असतील तर त्यांचे पाय खेचण्याऐवजी
त्यांच्यासाठी हसतमुखाने जल्लोषात टाळ्या वाजवायला आपण शिकलं पाहिजे. आणि तेच खर्या
अर्थाने ‘सीमोल्लंघन’ ठरेल.
सर्वांना विजयादशमीच्या शुभेच्छा!
सर्वस्वरूपे
सर्वेशे सर्वशक्तिसमन्विते ।
भयेभ्यस्त्राहि
नो देवि दुर्गे देवि नमोऽस्तु ते ॥
सृष्टिस्थितिविनाशानां
शक्तिभूते सनातनि ।
गुणाश्रये
गुणमये नारायणि नमोऽस्तु ते ॥
संजीवनी देशपांडे
टिप्पण्या