दिगंत २.७ : आठवणी आठवणी..
दिवस कसे वेड्यासारखे जातात ना. आपल्याला वाटत राहतं दिवस उजाडतायत, मावळतायत. काय वेगळं घडतंय. पण घडत
तसं बरच काही असतं. आपल्या कळत-नकळत. त्यादिवशी उरलेला दिवस पूर्ण उंडारुन रात्रीच
घरी आले. सततच्या अभ्यासाच्या नादात बाहेरच्या विश्वाशी नातंच जणू तुटलय असं वाटत
होतं. खूप फिरले. जुन्या ओळखीच्या ठिकाणी जाऊन आले. Preparation सुरू केलं तेव्हाची पहिली लायब्ररी.
तिच्या बाजूला असलेलं खूपसं जुनं पिंपळाचं झाड. तेव्हा अभ्यासाचा, नव्या स्वप्नाचा, विश्वाचा इतका ध्यास जडला होता की
आता आपण सारं विश्वच बदलवून टाकू असा आत्मविश्वास आत भिनलेला. दिवस उजाडायच्या आत
भली-थोरली पुस्तकं घेऊन कोवळ्या उन्हात निथळणारं पिंपळाचं झाड पाहत लायब्ररी मध्ये
शिरायचं. मग दिवसभर मुक्काम तिथेच. जी सांगितली गेली होती ती सोडून इतरच अधिक
खोल-समग्र काहीतरी सांगू पाहणारी पुस्तकं मला अधिक वेधून घ्यायची. आणि ती
मोठ-मोठाली पुस्तकं वाचण्यात मी दिवस-दिवस दंग. कंटाळा आला की आपल्यासारख्याच
सडाफटिंग ग्रुपसोबत आंतरराष्ट्रीय राजकारण किंवा नदी-जोड प्रकल्प किंवा biodiversity किंवा पीडीएस सिस्टममधले दोष नाहीतर
गेलाबाजर इतिहास कुठेच नाही गेलेला,
कोणाची फिलॉसफी ग्रेट, कोण
बरोबर होतं, कोण चुकीचं
होतं असे सगळे चर्चा कम वाद घालत अमृततुल्य ओरपणे हा अगदी आवडीचा कार्यक्रम.
त्या दिवसात क्षितिज खूप विस्तारलं. तोवरच्या शैक्षणिक आयुष्यात कधीच समोर न आलेले
विषय आणि मुळात ‘अभ्यास’ या गोष्टीकडेच पाहण्याची नव्याने मिळालेली दृष्टी हे माझ्यासाठी खूप नवे
आणि समृद्ध करणारे शोध होते. इतके दिवस आपण केली ती केवळ रटाळ घोकमपट्टी आणि इथलं
तिथे छापण्याचे उद्योग. आतून ढवळून काढणारे विषय, खूप खोल
खोल कशानेतरी पछाडलं जाण्याचा अनुभव घेणं हे सगळं नवीन होतं. अक्षय आयुष्यात आला
तोदेखील त्याच दिवसात. त्यानेही अभ्यास सुरू केला होता. त्याचे पॉईंट्स वेगळे असले
तरी प्रॅक्टिकल असायचे. जग बदलणे, सिस्टमला फिल्मी स्टाइल
मध्ये धक्का देणे टाइप dreamy fantasies त्याच्या नव्हत्या. तो straight फॉरवर्ड आणि
प्रॅक्टिकल अप्रोच ठेऊन प्रॉब्लेम्स कडे पहायचा. आता नाही
कशाला म्हणा, तो मला आवडायचा. खूप आवडायचा. आणि गम्मत म्हणजे
त्यालाही मी. त्याने तसं विचारलं देखील होतं. पण समोर एवढं मोठं उदात्त-उत्तुंग
वगैरे ध्येय असताना प्रेमा-बिमाच्या भानगडीत मला पडायचं नव्हतं. मी नाही म्हटलं.
सरळ उठून निघून आले. तो हर्ट झाला असणार. पण नंतर तेही प्रॅक्टिकलीच घेतलं असणार.
मी माझ्याच मस्तीत गुंग. नंतर आम्ही म्हणजे मीच फारसं एकमेकांसमोर येणं टाळलं.
तर त्या माझ्या तेव्हाच्या भारावलेपणात मी आकंठ बुडालेली असतानाच
माझी पहिली प्रेलिम्स झाली. आणि मी जमिनीवर आले. एकदम कोसळलेच म्हणा ना. Competitive जगात खूप स्वप्नाळू
आणि bookworm असून चालत नाही हा पहिला महत्वाचा धडा मला
पहिली प्रेलिम्स फेल झाल्यावर मिळाला. काहीतरी खूप मेजर लॉस झाल्याशिवाय मला अद्दल
घडत नाही हे आईचं म्हणणं मी दरवेळी तंतोतंत खरं करून दाखवते तसं ते तेव्हाही झालं.
गम्मत म्हणजे अक्षय पास झाला. आणि फक्त प्रेलिम्सच नाही मेन्स आणि इंटरव्ह्यु
सुद्धा. त्यावर्षीच्या फायनल सेलेकटेड लिस्ट मध्ये तो पहिल्या शंभरात होता. म्हणजे
आयएएस फिक्स. त्यानंतर तर मी त्याच्याशी बोलणंच थांबवलं. तो भेटला तेव्हा त्याला
परक्यासारखं ‘congratulations!’ म्हटलं फक्त.
या गोष्टीला आता तीन वर्ष होत आली. तो सक्सेसफुली एक जिल्हा
चालवतोय आता. नाव दिसतं अधून-मधून कुठे कुठे. मी दुर्लक्ष करते. म्हणजे तसं दाखवते
तरी. अधे-मधे त्याच्या profiles, स्टेटस पाहते. लग्न झालंय की नाही याचा धांडोळाही घेते. आणि मग पुन्हा
दुर्लक्ष मोड ऑन. प्रायवेट लाइफ भारी मेंटेन केलीय पण पठ्ठ्याने. कुठेच काहीच
थांगपत्ता लागत नाही कशाचा. परत फिरून मग स्वत:कडे बघते. मी अजून होते तिथेच आहे.
त्यानंतर अजून दोन failed attempts. आणि
आताचा हा काय माहित काय होतंय. त्यात हे लग्न-बिग्न. झेपणारे का मला खरंच सगळं? प्रश्न प्रश्न प्रश्न नुसते. उत्तरं कुठेच नाहीत.
त्यात आज घरी आले तेव्हा संहिता-अनिकेत चक्क भांडत होते. म्हणजे
संहिताचा आवाज पीक वर. अनिकेत अधून-मधून नेहमीच्या आवाजात मुद्दे मांडत होता.
त्यावर तिचा आवाज अजूनच चढत होता. काय झालंय काही कळायला मार्ग नाही. मी दोन
मिनिटं उभं राहून ऐकलं. शष्प बोध होईना आणि ते दोघे थांबेनात तेव्हा आत निघून
गेले. बराच वेळ कान देऊन ऐकल्यावर लक्षात आलं ‘लग्न’ या विषयाभोवती काहीतरी
सुरू होतं. श्या इथे पण लग्न!! भगवान उठाले मुझे.
मग मी बराच वेळ कानांत हेडफोन्स घालून पडून राहिले. पोटोबा तसा झालेलाच
होता. आज खूप दिवसांनी कॉलेजच्या कॅम्पस मध्ये गेले होते. कॅंटीन मध्ये
सहज म्हणून डोकावलं. तर तिथल्या पूर्वीच्या भय्याने ओळखलं की. तेव्हा हाताखालची कामं
करायचा. आता स्वत: कॅंटीन चालवू लागला होता. किती भरभरून बोलला. जुन्या आठवणी. किस्से.
वो दीदी कहा है, उस
भय्या से बात होती है की नही? किती ते प्रश्न त्याचे. त्यावेळी
मी नूडल्स ची किती भोक्ती होते ते आठवून भरपेट त्याच्या हातच्या स्पेशल नूडल्स खाऊ
घातल्या. जुनी चव, जुनं वातावरण पाहून नाही म्हटलं तरी थोडी nostalgic झालेच. जायला निघाले तेव्हा दीदी, शादी फिक्स हुई है
मेरी म्हणत फोन उघडून होणार्या बायकोचा किंचित लाजत फोटोही दाखवला. आनंद त्याच्या
चेहर्यावरून ओसंडून वाहत होता. एखाद्याला एवढा आनंद देत असेल तर ही लग्न नावाची गोष्ट
काही वाटते तितकी वाईट नसली पाहिजे, उगाच मनात येऊन गेलं. त्याला
मनापासून शुभेच्छा देत मग मी तिथून निघाले. ओसरत चाललेल्या दिवसासोबत बराच वेळ त्या
शांत परिसरात रेंगाळले. स्वत:चेच जुने अंश कुठे विखुरलेले सापडताहेत का पाहिलं..
तेव्हा आयुष्याविषयी किती व्हेग concepts होत्या माझ्या. काय करायचंय, काय बनायचंय याविषयी अजिबात clarity नव्हती. साचेबद्ध
आयुष्य चालू होतं. डिग्री घ्यायची मग जॉब मग लग्न मग... लिस्ट कंटिन्यूड. हे असं करायचं
असतं, सगळे असच करतात.. असं काहीसं प्रोग्रामिंग डोक्यात फिक्स
होतं. पन मग शेवटच्या वर्षात अचानक या सार्याला कलाटणी मिळाली. सिविल सर्विसेस ची
धुंदी चढली. चॅलेंजिंग वाटलं. This is my thing टाइप साक्षात्कार झाला. आणि तेव्हापासून मी बदलत
गेले. हा अभ्यास, ही तयारी.. मी खर्या अर्थाने घडत गेले. काय
करायचंय, का करायचंय सारख्या प्रश्नांची उत्तरं मिळत गेली. बरोबरचे
सारे ऑल्मोस्ट सेटल्ड आहेत आता. मी अजून नाही. पण आत कुठेतरी आपण आपल्या आवडीचं काहीतरी
करतोय याचं प्रचंड समाधान आहे. यश मिळेल न मिळेल पुढची गोष्ट. मला मी सापडत चाललेय
ही सुद्धा खूप मोठी गोष्ट आहेच की..
इतक्यात धाडकन दरवाजा उघडून संहिता आत आली. आणि मी माझ्या विचारांमधून
बाहेर आले.
क्रमश:
संजीवनी देशपांडे
टिप्पण्या
I’m currently working on both stories & Posting them soon. I know it’s been quite a while and stories are apparently paused. Sorry about that. Stay tuned.
kadhi yenar?