या देवी.. ३
३.
इतरांच्या डोळ्यांवर अजून साखरझोपेची दुलई असतानाच ती उठते. पायाला भिंगरी लागल्यासारखी
आवरा-आवर, चहा, नाश्ते, डबे, स्नॅक्स, पथ्ये सारं पाहत एकीकडे मुलाच्या अंगावरची चादर ओढ,
दुसरीकडे लेकीला शाळेसाठी तयार कर, पीठ संपत आलंय, भाजी आजच्यापुरतीच आहे.. मनात होत चाललेल्या नोंदी.. त्यातच कामाचा
महत्वाचा कुठलासा फोन. गॅसवरची भाजी हलवायच्या नादात नीटसं बोलता न येणं. त्यावरून
पलिकडून, ‘दीज विमेन.. ओह गॉड!’ सारखे टोमणे, छद्मी हास्यं. आणि घरी, करपली होय भाजी? अजून एवढंही जमू नये. काय उपयोग
त्या शिक्षणाचा? टाइप मूक शेरेबाजी. कधी आर्थिक स्वातंत्र्य, कधी संसाराला हातभार, कधी passion जपण इ.इ. कारणांसाठी तीही हे सारं मनातल्या मनात ओके म्हणत गिळत राहते.
नाश्ता झाला का? डब्यात ही भाजी नको. आई आज पोट दुखतंय.
किंवा पेरेंट्स मीटिंग आहे. दहा हातांनी सार्याला तोंड देत राहते.. ही अमानुष
कसरत केवळ तीच पेलू जाणे. पण कितीही कणखरपणा अंगी बाणवला तरी एखादा दिवस अवघड
उजाडतोच. शरीराहून अधिक मन थकतं.. कुणावरतरी आवाज चढतो,
कुठेतरी चिडचिड होते. आणि मग केवळ थोड्याशा empathy ची
अपेक्षा असलेल्या तिला ऐकून घ्यावं लागतं,
‘नको करूस मग नोकरी!’
याच्या मागे आणि पुढे अर्थात बरीच उपवाक्यंही असतात. समोरच्यासाठी
प्रश्न इथे संपतो. तिच्यासाठी मात्र तो इथून सुरू होतो. Existential crisis. दिसायला तर सर्व उत्तम. पण अशी ही मनातली युद्धं सांगावीत कोणाला?
शेवटी पाणी वरुन कितीही शांत वाटत असलं तरी आत किती भोवरे आणि
किती खोल डोह आहेत हे केवळ त्या पाण्यालाच ठाऊक असतं!
...रोज ती या सार्यातून जात असली तरी रोज नव्याने तिला तिच्यातल्या
वाढत जाणार्या सामर्थ्याची जाणीवही होत जाते आणि मग सारं आवरून पायात चपला सरकावून
ती प्रसन्न मुद्रेने पुन्हा बाहेर पडते!
दुर्गायै दुर्गपारायै सारायै सर्वकारिण्यै ।
ख्यात्यै तथैव कृष्णायै धूम्रायै सततं नमः ॥
संजीवनी देशपांडे
टिप्पण्या
या मालिकेचा हेतूच मुळात एकीकडे 'देवीची' पुजा करून दुसरीकडे तिचं चैतन्यमयी रूप असलेल्या स्त्रियांना दुय्यम लेखणार्या समाजातील विरोधाभास दर्शवणे हा आहे!
It really takes courage to face such situations!