सरदार उधमच्या निमित्ताने..


सरदार उधम!

 

क्रौर्य, दु:ख, त्याग, धाडस, निष्ठा, अभिमान, तपश्चर्या.. या सार्‍या गोष्टींचा एक पट आपल्या डोळ्यांसमोर जीवंत करणारी कलाकृती. सरदार उधम. नाव ऐकून, इतिहासात कुठेतरी वाचून खरंतर सरदार उधम सिंघ आपल्याला माहित असतात. तसं जालियनवाला बाघ हत्याकांडही माहित असतंच. शाळेत इतिहासाच्या पुस्तकात वाचलेलं असतं. हळहळ. चीड, हतबलता तेव्हाही मनात दाटून गेलेली आठवते. पण ते तेवढ्यापुरतं. पहिलं इम्प्रेशन उमटून गेलं की मनही नंतर त्या भावनेला सरावतं. मग उरतात डिटेल्स. सणावळी. कारणे द्या. स्पष्ट करा. रौलट अॅक्टविरुद्ध निदर्शनं का झाली. हंटर समिति का नेमली गेली. तिचा रीपोर्ट काय. हे सारं निव्वळ परीक्षेपुरतं उरतं. किती लोक मारले गेले. किती जखमी झाले. आकडे फक्त. एवढे मृतदेह एका ठिकाणी! त्या वयात केवळ कल्पना केलेली आठवते. आणि त्यानंतर मनाचा उडालेला थरकापसुद्धा. ऑन रेकॉर्ड/ऑफ रेकॉर्ड म्हणजे काय हे नंतर मोठं होऊ तस-तसं उमजत जातं.

हा सिनेमा पाहिल्यावर मात्र revisiting the past चा अनुभव येतो. मन सुन्न होतं. आपल्या क्षुल्लक अस्तित्वाची आणि टिचभर कृत्रिम प्रश्नांची जाणीव होते. इतिहास समोर जीवंत उभा राहतो. तो काळ, तेव्हाचा आपला देश, भगत सिंघ, तत्वांसाठी प्राण देणारी माणसं सारं अंगावर काटा आणतं. इङ्कलाब झिंदाबाद च्या नुसत्या आरोळ्या नाहीत तर How revolutionary acts are different from terrorist ones हे सांगतानाचा तरुण भगत सिंह त्याच्या विचारसरणीसह यातून भेटतो. आपलं संपूर्ण अस्तित्वच नाकारणारी व्यवस्था समोर असणं, ती उलथवून टाकण्यासाठी कल्पना केली जाऊ शकत नाही अशा पातळीच्या वेदना साहणं हे सारं आजच्या काळात खरंच कल्पनातीत आहे.

असं आयुष्य जगलेल्या, सरदार उधम नावच्या क्रांतिकारकाची गोष्ट दिग्दर्शक शुजित सरकार यांनी पडद्यावर उभी केली आहे. विकी कौशलने उधम सिंघांच्या व्यक्तिरेखेला न्याय दिला आहे म्हणाला हरकत नाही. अविक मुखोपाध्याय यांची सिनेमॅटोग्राफी तर वादातीत आहे. इतिहासा संबंधी काही चुका त्यात जरूर असल्या तरी Cinematic liberty च्या नावाखाली इतिहासाशी केलेले बाष्कळ चाळे इथे नाहीत. आणि त्यामुळे ती गल्लाभरू, व्हीएफएक्सने पुरेपूर मसाला फिल्म नाही. ती इतिहासाशी, देशाशी प्रामाणिक राहते आणि हाच तिचा सर्वात मोठा प्लस पॉइंट आहे. चित्रपटाची परिणामकारकता अफाट आहे.

गवर्नर ओड्वायर आणि जनरल डायर ने 13 एप्रिल 1919 रोजी जालियनवाला बाघ मध्ये अतिशय शांतपणे क्रौर्‍याची परिसीमा गाठली. शेकाडोंना मारलं आणि जखमींना तसंच मृत्यूची वाट पाहत पडू दिलं. पूर्ण अमृतसरमध्ये कर्फ्यू. टेलीफोन लाइन्स बंद. प्रेस कवरेज बंद. वाहतूक बंद. उर्वरित देशाला घटना घडून गेल्यावर दोन दिवसांनी तिच्याविषयी समजलं. हे सगळं क्रौर्य आणि त्याचे भयाण परिणाम उघड्या डोळ्यांनी पाहिलेल्या आणि त्यानंतर जवळपास एकवीस वर्षं न थकता प्रयत्न करून लंडनमध्ये जाऊन गवर्नर ओड्वायरची समोरून गोळ्या झाडून हत्या केलेल्या सरदार उधम सिंघची कथा या चित्रपटातून उलगडते.

आपल्या कडे चांगले चित्रपट वेगळ्याच कारणांमुळे नेहमी चर्चेचा विषय ठरतात. यावेळी तो विषय आहे, फिल्म फेडरेशन ऑफ इंडिया ने सरदार उधम या चित्रपटाचं ऑस्करसाठी भारतातर्फे official entry म्हणून केलेलं रीजेक्शन. हाही तसा कॉंट्रोवर्सीचा विषय नाही. त्यांना तो अधिकार आहे. पण त्यासाठी जे कारण त्यातल्या एका ज्यूरी मेंबर कडून दिलं गेलं ते दुर्दैवी आहे. ते मान्यवर म्हणतात,

‘movie harps on the Jallianwala Bagh incident. In this era of globalization, it is not fair to hold on to this hatred.’

जालियनवाला बाघ हत्याकांड घडून तब्बल 100 वर्षे होऊन गेली, देशाला स्वातंत्र्य मिळूनही आता 75 वर्षे होत आली आणि तरी परिस्थिति बदलली असं म्हणता येईल का? ही अशी गुलामी मानसिकता आपल्यात इतकी खोल रुजलेली असावी? आपला इतिहास मांडताना आपल्याला कमीपणा का वाटतो? बरं अशा मूवीज काय आधी येऊन गेलेल्या नाहीत का? आहेत की. आणि त्यांनी ऑस्करही मिळवलेले आहेत. मग आपल्याच लोकांना का नेहमी globalization आणि hatred ची काळजी असते. बरं या हत्याकांडासाठी जीवंत असताना ना कधी डायर ने माफी मागितली ना ओड्वायर ने. आणि त्यानंतरच्या तब्बल 100 वर्षात ब्रिटननेही कधी official माफी मागण्याची तसदी घेतली नाही.

इंग्रज देश सोडून गेले ते त्यांची ही अशी colonial legacy मागे ठेऊनच. आपली शिक्षणपद्धती अजूनही तोच दीडशे वर्ष जुना वसाहतवादी सांगाडा मिरवते. आपण अजूनही सिविल सर्वण्ट्सना देव मानतो. त्यांच्या मागे-पुढे करणं, लाळ-घोटेपणा करणं हे सगळं तिथूनच तर चालत आलेलं आहे. आणि दुर्दैव म्हणजे 75 वर्षं तथाकथित स्वातंत्र्य उपभोगणार्‍या आपल्या देशात आजही निपजणारे बहुतांश सिविल सेर्वंट्स स्वत:ला हे असं देव मानून घेण्यात धन्यता मानतात.

पश्चात्यांना स्वत:चा काळा colonial पास्ट स्वीकारायचा नसतो. They keep on glorifying their acts till date. विंस्टन चर्चिल चं उदात्तीकरण करणारा ‘darkest hour’ त्याचंच उदाहरण. पण ही ऑस्कर विंनिंग मूवी एकदाही या दुसर्‍या महायुद्धात लढलेल्या हजारो भारतीय सैनिकांचा साधा उल्लेखही करत नाही. ना ती युद्धादरम्यान चर्चिलच्या policies मुळे बंगालमध्ये उद्भवलेल्या भयानक ‘bengal famine’ विषयी बोलते. ज्यात तब्बल चार मिलियन भारतीयांना जीव गमवावा लागला होता.

या सगळ्या कॉंट्रोवर्सी कडे पाहिल्यावर एकच प्रश्न मनात येतो, आपण कधी आपल्या colonial past कडे डोळे उघडून पाहणार आणि कधी ही कातडीसारखी बनलेली colonial legacy झटकून मोकळा श्वास घेणार?

 

 

संजीवनी देशपांडे 

 

टिप्पण्या

लोकप्रिय पोस्ट